वाराणसी या आपल्या मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दौरा केला असला, तरी गरिबांच्या कल्याणासाठी त्यांनी कोणतीही ठोस पावले उचलली नाहीत, असा आरोप बसपाच्या नेत्या मायावती यांनी केला आहे. केवळ लोकप्रिय घोषणांची यापुढे मदत होणार नाही, असेही त्या म्हणाल्या.
गरीब आणि वंचितांच्या कल्याणासाठी कोणतीही ठोस पावले उचलण्याऐवजी मोदी नेहमीचेच तुणतुणे वाजवत आहेत. त्यामुळे आता लोकप्रिय घोषणांऐवजी मोदी यांनी ठोस पावले उचलावी, असेही मायावती म्हणाल्या.
मोदींच्या कार्यक्रमपत्रिकेवर सामाजिक न्याय कोठेच दिसत नाही, मात्र जनतेने सरकारकडून अपेक्षा ठेवण्यात काही गैर नाही, असेही त्या म्हणाल्या. भाजपप्रणीत केंद्र सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी, अशी मागणी त्यांनी केली. मोदी सरकारला सहा महिने पूर्ण होत असल्याने आता जनता, ‘मोदी सरकार काला धन वापस लाओ, प्रत्येक देशवासी को १५ लाख दिलाओ’, अशी मागणी करीत असल्याचेही त्या म्हणाल्या.