महाराष्ट्रात गेल्या वर्षी दुष्काळ पडलेला असताना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेले वादग्रस्त विधान ‘आयुष्यभर त्यांना डाचत राहील.’ मात्र त्या वक्तव्याबाबत महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना क्षमा करायला हवी, असे उद्गार अजित पवार यांच्या चुलत भगिनी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी काढले.‘इंडियन एक्सप्रेस’तर्फे आयोजित आयडिया एक्सचेंज कार्यक्रमांत त्या बोलत होत्या.
अजित पवार हे माझे बंधू आहेत म्हणून नव्हे, पण मी त्यांना चांगले ओळखते. मी त्यांच्याविषयी एक गोष्ट तुम्हाला नक्कीच सांगू शकते. ते खुनी नाहीत, ते बलात्कारी नाहीत. गोध्रासारख्या एखाद्या प्रकरणात त्यांचे हात रक्ताने माखलेले नाहीत. त्यामुळे त्यांचे धरणातील जलसाठय़ाबाबत केलेले विधान नक्कीच क्षम्य ठरते. त्या विधानाबद्दल लोकांनी त्यांना माफ करावयास हवेच, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. मात्र त्याच वेळी या किंवा अशा प्रकारच्या विधानांचे समर्थन करता येणार नाही हेही त्यांनी आवर्जून नमूद केले.
उपमुख्यमंत्र्यांनी मनस्वीपणे त्या वादग्रस्त विधानाबद्दल माफी मागितली होती. अगदी आपले फेसबुक पान सुरू केल्यावर अजित पवार यांनी केलेली पहिली गोष्ट म्हणजे आपल्या विधानाविषयी व्यक्त केलेला पश्चात्ताप होता, असे सुळे यांनी नमूद केले. अजित पवारांच्या विधानाची जबरी किंमत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला येत्या विधानसभा निवडणुकीत चुकवावी लागेल का, या प्रश्नास उत्तर देताना लोकसभेच्या निकालाकडे सुळे यांनी लक्ष वेधले. जरी आपल्याला मिळालेल्या विजयात आघाडी कमी झाली असली तरीही बारामतीत आपल्याला ९० हजारांहून अधिक मतांची आघाडी मिळाली होती, ही बाब त्यांनी अधोरेखित केली.
शेवटच्या क्षणापर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षात आघाडी होईल किंवा नाही याबाबत संभ्रमावस्था राहिल्यामुळे मतदारांमध्ये चुकीचा संदेश गेला आहे, हे सत्य असल्याचे सुप्रिया सुळे यांनी मान्य केले. या वा अशा प्रकारांमुळे मतदार राजा उद्विग्न झाल्यावाचून राहत नाही, असे निरीक्षणही त्यांनी नोंदवले.