उत्तर प्रदेशातील राज्य सरकारने गरिबी आणि बेरोजगारी हटविण्यासाठी काहीच केले नसल्याने तेथील नागरिक कामानिमित्ताने महाराष्ट्रात आले. पण इथे त्यांना सावत्रपणाची वागणूक देण्यात येत असून, त्यांच्यावर जुलूम करण्यात येत आहेत, असा आरोप बहुजन समाज पार्टीच्या सर्वेसर्वा मायावती यांनी मंगळवारी ठाण्यातील सभेत बोलताना केला. तसेच उत्तर प्रदेशात सत्तेवर असताना तेथे जशी कामे केली, तशीच महाराष्ट्रातही करू, असे आश्वासन देत बहुजन समाज पार्टीला एकहाती सत्ता देण्याचे आवाहन केले.
मंगळवारी ठाणे येथील सेंट्रल मैदानात मायावती यांची प्रचार सभा झाली. विशेष म्हणजे, भर पावसात ही सभा पार पडली. देशाच्या स्वातंत्र्यानंतर गरीब, बहुजन तसेच धार्मिक, अल्पसंख्याक समाजाच्या आर्थिक स्थितीत कोणत्याही प्रकारची सुधारणा झाली नाही. तसेच सरकारच्या योजनांमुळे गरिबी आणि बेरोजगारी कमी झालेली नाही. चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे महागाई वाढली असून त्याचा गरिबांना फटका बसतो आहे, असेही मायावती यांनी सभेत बोलताना सांगितले. महाराष्ट्रातही गरिबांचा फारसा विकास झालेला नाही. त्यामुळे आजवर सत्ता भोगणारे काँग्रेस, भाजप आणि इतर पक्षांना सत्तेत येण्यापासून रोखा, असे आवाहनही त्यांनी केले. लोकसभा निवडणुकीत ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखविणारे नरेंद्र मोदी सत्तेवर आले, पण पूर्वीच्या सरकारप्रमाणेच त्यांनी कोणतेच उल्लेखनीय काम केले नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत त्यांच्या ‘अच्छे दिन’च्या भूलथापांना बळी पडू नका, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.