उत्तर महाराष्ट्राने कायम भाजप-शिवसेनेला साथ दिली असल्याने महायुती सत्तेवर आल्यास मुख्यमंत्री उत्तर महाराष्ट्राचा हवा, असे प्रतिपादन ज्येष्ठ भाजप नेते एकनाथ खडसे यांनी केले आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाचे ते प्रबळ दावेदार असून जागावाटप पूर्ण होण्याआधीच भारतीय जना पक्षामध्ये मुख्यमंत्रीपदावरुन स्पर्धा तीव्र झाल्याचे दिसून येत आहे.
कोणाचीही लाट असो की नसो, उत्तर महाराष्ट्राने कायमच युतीला साथ दिली आहे. जळगाव भागात तब्बल सात वेळा युतीचे खासदार निवडून येत आहेत. उत्तर महाराष्ट्रातही एखादा अपवाद वगळता तीच परिस्थिती आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ येथील मुख्यमंत्री झाले. पण उत्तर महाराष्ट्रातून कोणीही झाला नाही, अशी खंत खडसे यांनी व्यक्त केली. खडसे यांच्या वाढदिवसानिमित्ताने २ सप्टेंबरला उत्तर महाराष्ट्रात काही कार्यक्रम झाले. त्यावेळीही त्यांनी ही भूमिका मांडली होती.
मला मुख्यमंत्री करावे, असे म्हणणे नसून कोणालाही करा, पण उत्तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हवा, अशी खडसे यांची मागणी आहे. महायुतीचे जागावाटप अजून पूर्ण होण्याआधीच भाजप नेत्यांमध्ये मुख्यमंत्रीपदावरुन स्पर्धा वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस व विनोद तावडे यांच्यात स्पर्धा होत असताना आता खडसेही त्यात हिरीरीने उतरले आहेत.