काँग्रेस आणि राष्ट्रवादीत आघाडीची घसरलेली गाडी रुळावर आणण्याच्या उद्देशाने उद्या पुन्हा एकदा बैठक होत असली तरी काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि नारायण राणे या दोन मुख्य नेत्यांचा अपवाद वगळता अन्य बाकी ज्येष्ठ नेते राष्ट्रवादीबरोबर हातमिळवणी करण्याच्या विरोधात आहेत. राष्ट्रवादीमध्ये अजित पवार यांनी आघाडीच्या विरोधात दंड थोपटले आहेत.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे आघाडी टिकावी म्हणून प्रयत्न करीत आहेत. राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्याशी मुख्यमंत्री सतत संपर्कात आहेत. विरोधकांचा सामना करण्याकरिता उद्योगमंत्री नारायण राणे हे सुद्धा आघाडीस अनुकूल आहेत. मात्र प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यासह माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे व अशोक चव्हाण तसेच राज्याचे प्रभारी मोहन प्रकाश हे तेवढे अनुकूल नाहीत. राष्ट्रवादीमध्येही आघाडीवरून उघडपणे दोन मतप्रवाह दिसतात.
पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासह प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, आर. आर. पाटील आदी नेते आघाडी व्हावी या मताचे आहेत. मात्र अजित पवार आणि सुनील तटकरे या दोघांचा तीव्र विरोध आहे. राज्यात पक्षाची ताकद वाढविण्याकरिता हीच योग्य संधी आहे. अशा वेळी सर्व जागा लढवून आपली ताकद अजमावून बघू या , अशी अजितदादांची भूमिका आहे.
राष्ट्रवादीची जास्त जागांची मागणी मान्य करू नये, असाच मतप्रवाह रात्री उशिरा झालेल्या काँग्रेस नेत्यांच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला. राष्ट्रवादीने १३४ जागांची मागणी लावून धरली असली तरी १३०वर समझोता करण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र गतवेळच्या ११४ वरून १३० म्हणजे अधिकच्या १६ जागा सोडणे पक्षासाठी हितकारक नाही, असा मतप्रवाह होता. १२८ पेक्षा जास्त जागा सोडता कामा नये, असे मत मांडण्यात आले.
दोन अपक्ष आमदार काँग्रेसमध्ये
राष्ट्रवादीने दहा अपक्ष आमदारांना दाखल करून घेतल्यावर काँग्रेसने आणखी दोन आमदारांना पक्षात प्रवेश दिला जाणार आहे. शिरीष कोतवाल आणि भारत भालके हे दोन अपक्ष आमदार उद्या काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.