स्वाभिमानी शेतकरी संघटनेने भारतीय जनता पक्षासोबत राहून विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाचे नेते आणि खासदार राजू शेट्टी यांनी फेसबुकच्या माध्यमातून पक्षाच्या निर्णयाबद्दल माहिती दिली.
शिवसेनेशी असलेली युती तोडण्याचा निर्णय गुरुवारी भारतीय जनता पक्षाने घेतला. त्यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर तिथे उपस्थित होते. मात्र, स्वाभिमानी शेतकरी संघटना कोणासोबत जाणार, हे स्पष्ट झालेले नव्हते. राजू शेट्टी यांनी गुरुवारी संध्याकाळी आपण इतर घटक पक्षाच्या नेत्यांशी बोलून त्यानंतरच निर्णय घेऊ, असे जाहीर केले होते.
शुक्रवारी सकाळी फेसबुकवर प्रसिद्ध केलेल्या पोस्टमध्ये राजू शेट्टी यांनी शिवसेनेशी असलेली युती तुटल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. माझ्या लोकसभेच्या विजयात शिवसेनेचे नेते, कार्यकर्ते यांचा सिंहाचा वाटा होता. त्यामुळे महायुती तुटल्यामुळे मला अत्यत दुःख होत आहे. आमच्या कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी मला ज्या जागा हव्या होत्या (शाहुवाडी, राधानगरी, इस्लामपूर, चंदगड, पंढरपूर, माढा) त्या जागा शिवसेनेकडे असल्यामुळे मला त्या जागा मिळणे अशक्य होते. त्यामुळे मला माझ्या कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी भाजप बरोबर युती करणे भाग पडले. कॉंग्रेस मुक्त महाराष्ट्र करण्यात आपण आम्हाला पाठबळ द्याल, अशी अपेक्षा बाळगतो, असे त्यांनी लिहिले आहे.