महायुतीचा घटक पक्ष असलेल्या रिपब्लिकन पक्षाची आज बुधवारी महत्वपूर्ण बैठक होणार आहे. जागावाटपाबाबत निर्वाणीची मुदत देऊनही शिवसेना व भाजपकडून कसलीही हालचाल झाली नाही. त्यामुळे अशा प्रकारे प्रमुख पक्ष उदासीनता दाखवित असतील तर, महायुतीत रहायचे की नाही, यावर आजच्या बैठकीत चर्चा होणार आहे. महायुतीकडे रिपाइंने ५९ जागांची यादी दिली आहे. त्यावर काहीही चर्चा झाली नाही. परंतु रिपाइं नेतृत्वानेच हा आकडा १५ पर्यंत खाली आणला. त्याचवेळी भाजप व शिवसेनेकडून अवघ्या सहा जागा सोडण्यात येणार असल्याची माहिती पक्ष नेतृत्वाला मिळाल्याने पक्षात नाराजी पसरली. त्यामुळे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्याच्या आधी एक दिवस पक्षाचे प्रवक्ते अर्जून डांगळे यांनी पत्रकार परिषद घेऊन १० सप्टेंबपर्यंत १५ जागा देण्याचा निर्णय झाला नाही तर, वेगळा राजकीय विचार करण्याचा इशारा दिला होता. परंतु मंगळवार रात्रीपर्यंत शिवसेना व भाजपकडून कसलाही प्रतिसाद मिळाला नाही, असे समजते.  अशा वातावरणात खासदार रामदास आठवले यांच्या अध्यक्षतेखाली आज पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली आहे.