विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवाच्या पाश्र्वभूमीवर प्रत्येक जिल्ह्यातील नेत्यांशी संवाद साधून कोठे आणि काय चुकले याचा आढावा राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार हे लवकरच घेणार आहेत.
पराभवामुळे पक्षात अस्वस्थता निर्माण झाली आहे. अशा वेळी पक्षामध्ये चैतन्य निर्माण करावे लागणार आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या मुख्यालयात छगन भुजबळ, सुनील तटकरे, जयंत पाटील, हेमंत टकले आदी नेत्यांशी शुक्रवारी सविस्तर चर्चा केली. आघाडी तुटल्यावर स्वबळावर लढताना पक्षाला अपेक्षित यश मिळाले नाही. काँग्रेसची पीछेहाट होईल आणि राष्ट्रवादी तिसऱ्या क्रमांकावर राहिल, असे राष्ट्रवादीच्या नेत्यांचे गणित होते. पण राष्ट्रवादीच्या नेत्यांचे सारे अंदाज चुकले. पक्ष नव्याने उभा करण्यासाठी शरद पवार यांनी आतापासूनच प्रयत्न करण्यावर भर दिला आहे.
पहिल्या टप्प्यात निवडणुकीतील विजयी आणि पराभूत दोन्ही उमेदवारांच्या जिल्हानिहाय बैठका आयोजित केल्या जाणार आहेत. या बैठका जिल्हानिहाय होतील, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली. याबरोबरच राज्यातील निवडक नेत्यांचे दोन दिवसांचे शिबिर अलिबागमध्ये आयोजित केले जाणार आहे.