‘विश्वासा’आधीच अविश्वास

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत दुभंगलेली भारतीय जनता पक्ष व शिवसेना नेत्यांची मने रविवारी होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारातही जुळण्याची चिन्हे नाहीत.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत दुभंगलेली भारतीय जनता पक्ष व शिवसेना नेत्यांची मने रविवारी होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारातही जुळण्याची चिन्हे नाहीत. जोपर्यंत राज्यात निर्णय होत नाही तोपर्यंत केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात सहभागी होण्यावर चर्चादेखील होणार नाही, असे शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्याने ‘लोकसत्ता’शी बोलताना स्पष्ट केले. शिवसेनेला केंद्रात मंत्रिपद दिले जाणार असल्याची चर्चा निर्थक असल्याची टिप्पणी या नेत्याने केली. ज्यांचे नावे सातत्याने केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेत प्रसारित केली जात आहेत, त्या खासदार अनिल देसाई यांनीदेखील या वृत्ताचा इन्कार केला आहे.
महाराष्ट्रात सत्तेत सहभागी होण्यावर शिवसेनेने रविवारी महत्त्वाची बैठक बोलावली आहे. महाराष्ट्राचा निर्णय होत नाही तोपर्यंत केंद्राचा निर्णय कसा होईल, असा सवाल करीत आमच्या पक्षाचे सर्व निर्णय उद्धव ठाकरे हेच घेतील, असे देसाई यांनी स्पष्ट केले. केंद्रातील मंत्रिमंडळ विस्तारात सहभागासाठी त्यांच्याकडून कोणताही अधिकृत आदेश अद्याप आला नसल्याचे देसाई यांनी सांगितले. दरम्यान,  दिल्लीश्वरांपुढे झुकणार नाही, असे भाषणांमध्ये वारंवार सांगितले तरी प्रत्यक्षात सत्तेसाठी शिवसेनेने शेवटपर्यंत वाट पाहिली, असे चित्र मात्र महाराष्ट्रात निर्माण होत आहे. भाजपनेही आपली भूमिका कायम ठेवताना हिंमत असेल तर शिवसेनेने विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी विरोधी मतदान करावे आणि विरोधी पक्षात बसण्याची भूमिका जाहीर करून नेत्याची निवड करावी, असे आव्हान दिले आहे. त्यामुळे भाजप शिवसेनेला पुन्हा ठेंगाच दाखविणार असल्याचे सध्यातरी चित्र आहे.
दहाजणांचा शपथविधी
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात दहा जणांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर, चंद्रपूरचे खासदार हंसराज अहिर, पंजाबमधील होशियारपूरचे विजय सांपला यांची नावे निश्चित मानली जात आहेत. मुख्तार अब्बास नक्वी यांचाही मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता आहे. माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांचे पुत्र जयंत यांचाही समावेश मंत्रिमंडळात केला जाण्याची शक्यता आहे. हरयाणातील जाट नेते बीरेंद्र सिंह, गिरिराज सिंह, भोला सिंह, राजस्थानमधील कर्नल सोनाराम चौधरी व गजेंद्र सिंह शेखावत यांच्या नावांची चर्चा आहे.
मोदींना प्रभूच हवेत..
सुरेश प्रभू यांना केंद्रीय मंत्रिपद देण्यास स्वत: पंतप्रधान मोदी इच्छुक आहेत. पायाभूत सुविधा या स्वतंत्र मंत्रालयाची निर्मिती करून त्याची धुरा प्रभू यांच्या हाती सोपविण्याची मोदी यांची योजना असल्याचा दावा सूत्रांनी केला. मात्र प्रभू यांचा गेल्या काही वर्षांत सेनेशी काहीही संबंध राहिला नसल्याने त्यांना मंत्रिपद देऊन ते शिवसेनेला दिल्यासारखे भासविण्यास सेनेचा विरोध आहे.
नक्वींचेही नाव
मुख्तार अब्बास नक्वी यांचाही मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता आहे. वयोवृद्ध नेत्या नजमा हेपतुल्ला यांच्या जागी त्यांची वर्णी लागणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र नक्वी अल्पसंख्याक मंत्री होण्यास इच्छुक नाहीत. माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांचे पुत्र जयंत सिन्हा यांचाही समावेश मंत्रिमंडळात केला जाण्याची शक्यता आहे. हरयाणातील जाट नेते बीरेंद्र सिंह, बिहारमधील वादग्रस्त भूमिहार नेते गिरिराज सिंह, भोला सिंह, राजस्थानमधील कर्नल सोनाराम चौधरी व गजेंद्र सिंह शेखावत यांच्या नावांची चर्चा आहे.
सेनेचे राष्ट्रवादीला साकडे?
मुंबई : राष्ट्रवादीने देऊ केलेल्या पाठिंब्याच्या बळावर विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्यासाठी सज्ज असलेल्या भाजप सरकारला सुरूंग लावण्याचा शिवसेनेचा इरादा आहे. विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी राष्ट्रवादीच्या आमदारांनी सभागृहात अनुपस्थित राहण्याची भूमिका सोडून सरकारविरोधात मतदान करावे, अशी मागणी करत शिवसेनेच्या पाच आमदारांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची गुरुवारी रात्री उशिरा भेट घेतल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. मात्र त्यास दुजोरा मिळू शकलेला नाही.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Shiv sena bjp distrust before trust