सेना आमदार विरोधात बसण्याच्या तयारीत!

कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेचे आमदार फुटणार नाहीत अशी ग्वाही सेनेच्या आमदारांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिली.

कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेचे आमदार फुटणार नाहीत अशी ग्वाही सेनेच्या आमदारांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिली. विरोधी पक्षात बसून भाजपला जशास तसे उत्तर देण्याची तयारीही सेना आमदारांनी दाखवली असली तरी अजूनही शिवसेनेला भाजपकडून सकारात्मक भूमिकेची आशा असल्याचे संकेत मिळत आहेत. बहुधा त्यामुळेच, ‘सेनेचा निर्णय उद्याच कळेल’ असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या आमदारांची बैठक मंगळवारी सायंकाळी शिवालयात पार पडली. यावेळी गेल्या काही दिवसात भाजपबरोबर सत्तेत सामील होण्यासंदर्भात झालेल्या बैठका व चर्चेचा सारा तपशीलच उद्धव ठाकरे यांनी आमदारांपुढे मांडला. भाजपकडून कोणतेही ठोस आश्वासन देण्यात आलेले नसून केवळ शिवसेनेला झुलविण्याचेच काम सुरु असल्याचे दिसून येत आहे. हिंदुत्व व महाराष्ट्रात स्थिर सरकार मिळावे यासाठी शेवटपर्यंत सेनेने आपले दरवाजे उघडे ठेवले आहेत. तथापि भाजपकडून ठोस प्रस्ताव नसल्याचे उद्धव यांनी स्पष्ट केले. यानंतर सर्व आमदारांनी भाजपच्या चालीला जशास तसे उत्तर देण्याची तयारी दाखवली. सेनेचा एकही आमदार फुटणार नाही आणि पक्षप्रमुखांच्या निर्णयाची सारे आमदार अमलबजावणी करतील अशी ग्वाहीही उपस्थित आमदारांनी दिली. तथापि उद्या अध्यक्षपदाची निवडणूक आणि विश्वासदर्शक ठरावावर नेमकी काय भूमिका घ्यायची याबाबत उद्याच काय ते स्पष्ट होईल, असे सेनेच्या एका ज्येष्ठ अमदाराने सांगितले. तर आमची भूमिका उद्या सकाळी कळेल असे सूचक उद्गार उद्धव यांनी काढले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Shiv sena to sit in maharashtra assembly opposition