केंद्रात मंत्रिपदाचे आश्वासन मिळाल्यानंतर भाजप महायुतीसोबत राहण्याचा निर्णय घेणारे रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांच्यावर सोमवारी शिवसेनेने बोचरी टीका केली आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधील अग्रलेखात रामदास आठवले भाजप महायुतीमध्ये पण भीमशक्ती बाहेर असे चित्र राज्यात दिसत असून, त्यांनी भीमशक्तीला अंधारात ठेवून आंबेडकरी जनतेला दगा दिला असल्याचे या अग्रलेखात म्हटले आहे.
रामदास आठवले यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर शिवसेना त्यांच्यावर कसा हल्ला करते, याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले होते. शनिवारी मुंबईत झालेल्या जाहीर सभेमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आठवले यांना शिवसेनेसोबत येण्याचे आवाहन केले होते. त्याचबरोबर सत्ता आल्यास उपमुख्यमंत्रीपद देण्याचे आश्वासनही दिले होते. मात्र, त्याला आठवले यांच्याकडून कोणताच प्रतिसाद न मिळाल्याने अखेर सोमवारी त्यांच्यावर शाब्दिक प्रहार करण्यात आले.
भीमशक्तीच्या भावनेची कदर न करता रामदास आठवले हे भारतीय जनता पक्षाच्या तंबूत घुसले आहेत, पण आठवले आत व भीमशक्ती बाहेर असेच चित्र राज्यभरात दिसत आहे. आठवले व त्यांचे दोन-पाच पुढारी हे व्यक्तिश: शेठ-सावकारांच्या मांडीस मांडी लावून बसले असले, तरी आंबेडकरी जनता महाराष्ट्रहितासाठी शिवशक्तीबरोबरच राहणार आहे व तसे वातावरण सर्वत्र दिसत आहे. वृत्तपत्रांतील बातम्यांवर विश्‍वास ठेवला तर नवा सौदा असा झालेला दिसतो की, आठवले यांना केंद्रात मंत्रीपदाचा चोथा दिला जाईल व भाजपची सत्ता आलीच तर सत्तेत १० टक्के वाटा दिला जाईल! बाकी विधानसभेच्या ७-८ जागा चणे-फुटाणे म्हणून त्यांच्या हाती ठेवल्या असल्या तरी केंद्रातील मंत्रीपदाचा गूळ हेच सौदा यशस्वी होण्याचे मुख्य कारण आहे, असे या अग्रलेखात लिहिण्यात आले आहे.