कांद्याचे दर कोसळत असल्याने त्यात शेतकऱ्यांच्या हितासाठी हस्तक्षेप करण्याची मागणी करीत केंद्र सरकारला पाठिंबा असलेल्या स्वाभिमानी पक्षाचे खासदार राजू शेट्टी यांनी सरकारविरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे. तातडीने पावले न उचलल्यास ९ सप्टेंबरपासून आंदोलन सुरु केले जाणार आहे.
कांद्याचे दर वाढल्याने सरकारने दोन वेळा निर्यात शुल्कात वाढ केली व कांद्याची आयातही होत आहे. परिणामी निर्यातीला फटका बसला आणि देशांतर्गत उत्पादनही वाढल्याने आता कांद्याचे दर कोसळत आहेत. परिणामी शेतकऱ्यांचे नुकसान होत असून त्यांचा उत्पादनखर्चही भरुन निघत नाही. केवळ ग्राहकाभिमुख दृष्टीकोन ठेवून सवंग लोकप्रियतेसाठी केंद्र सरकारने हे निर्णय घेतले. आता शेतकरी हितासाठी कांद्याची आयात बंद करुन निर्यातीसाठी अनुदान द्या, अशी मागणी स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे.  केंद्रात भाजपचे सरकार असतानाही शेतकऱ्यांच्या हितासाठी शेट्टी यांनी आंदोलनाचा निर्णय घेतला आहे.