‘त्यांच्यावर’ भ्रष्टाचाराचे आरोप करुन विधिमंडळाचे कामकाज बंद पाडले हे खरे असले तरी त्यांना अजून न्यायालयाने किंवा चौकशी यंत्रणेने दोषी ठरविलेले नाहीत, असा लंगडा बचाव करीत भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या ‘आयारामां’साठी भाजपने दरवाजे खुले केले आहेत. माजी मंत्री बबनराव पाचपुते यांना प्रवेश दिला असताना शनिवारी डॉ. विजयकुमार गावीत यांना प्रवेश दिला जाणार आहे. कोणावरही आरोप सिध्द झाले, तर त्यांना लगेच पक्षातून काढले जाईल, असे ज्येष्ठ भाजप नेते एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले.
भाजपमध्ये ‘आयाराम’ नेत्यांसाठी गालिचा अंथरण्यात आला आहे. त्यामुळे पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. पाचपुते व डॉ. गावीत यांच्यावर प्रदेश भाजप नेत्यांनी विधिमंडळात आरोप करुन कारवाईच्या मागणीसाठी कामकाज बंद पाडले होते. पण आता ते भाजपमध्ये येत असल्याने त्यांचे दोष दूर झाल्याचा साक्षात्कार भाजप नेत्यांना झाला असून अजून दोषी ठरविलेले नाही, असा बचाव खडसे यांनी केला. डॉ. गावीत यांच्याविरुध्द तर उच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत. तरीही त्यांचे प्रकरण आम्ही अभ्यासले असून त्यांनी भ्रष्टाचार न केल्याचे प्रमाणपत्र खडसे यांनी दिले आहे. ज्यांचा गैरव्यवहार सिध्द होईल, त्यांना तुरुंगात पाठवा, हीच पक्षाची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.
आयारामांची गर्दी, भाजप कार्यकर्ते बाहेर
भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात माजी खासदार भास्करराव खतगावकर, सूर्यकांता पाटील, बबनराव पाचपुते, माधव किन्हाळकर  यांच्यासह स्थानिक नेत्यांना प्रवेश देण्यात आला. षण्मुखानंद सभागृहात भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यासाठी या नेत्यांच्या समर्थकांची व कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. ते मेळाव्याच्या दोन-तीन तास आधीच दाखल झाले होते. त्यामुळे पुढील रांगांमध्ये आणि बाल्कनीतही त्यांची मोठी गर्दी झाली. मुंबईतील भाजप कार्यकर्ते मेळाव्याच्या वेळेत आल्याने त्यांना गर्दीमुळे लांबवर व बाहेर थांबावे लागले व त्यांना दरवाजावर धडकाही मारल्या.