स मोर बर्फाचे कडे दिसत होते. असेच त्या दिवशी ते तुटून खाली आलेलेही आठवले त्याला. क्षणभर गरगरलं. ट्रेकिंगचा तिसराच दिवस होता तो. अचानक वातावरणात झालेला तो बदल. आलेलं वादळ. छे! तोलही सांभाळता येईना त्या वाऱ्याच्या झंझावातात! बर्फाचे गोळे तोंडावर थडाथड आपटत होते. अचानक वरून बर्फाचे मोठमोठे खडक गडगडत खाली यायला लागले. कधी बर्फाखाली गाडलो गेलो ते कळलंच नाही. त्यानं त्या आठवणीनंही डोळे मिटून घेतले. आता जरा बरं वाटतंय. इथले लोक चांगले आहेत. पण घरची ओढ लागलेय. डॉक्टर कधी सोडणार कोण जाणे? त्याला वाटलं- स्नेहाला काही कळलं असेल? तिला सहन होणार नाही. बिचारी! फार प्रेम करते वेडू! त्याच्या मनात तिच्याबद्दलचं प्रेम दाटून आलं.

 

‘काय कसं वाटतंय? तुमच्या सगळ्या टेस्ट नॉर्मल आल्यात. आज तुम्हाला इथून सोडणार आहोत. तुम्ही कुठे राहता ते आठवतंय का तुम्हाला?’ आलेल्या डॉक्टरांनी विचारलं.

‘अर्थात. मी अगदी बरा आहे डॉक्टर. थँक्स. तुम्ही माझे प्राण वाचवलेत. आमच्या ग्रुपमधले सगळे कसे आहेत?’ त्याने विचारलं.

‘इथे काही नोंदी आहेत. त्यावरून इकडचे नसलेले तुम्ही आणि आणखी एकजण वाचलात.’ डॉक्टर म्हणाले.

‘अरे बापरे! मग स्नेहाला तातडीनं कळवायला हवं.’ तो म्हणाला.

‘नाही. जरा धीरानं घ्या. बसा शांतपणे. तुम्हाला महत्त्वाचं काही सांगायचं आहे. तुम्हाला काही दिवसच झाल्यासारखे भासत असतील. हो ना? पण तुम्ही बर्फात गाडले गेलात त्या गोष्टीला आज तीस र्वष होतायत.’ डॉक्टर म्हणाले.

‘काय? कसं शक्य आहे? काहीतरीच काय डॉक्टर? मला आठवतंय, मी बर्फात गाडला गेलो त्यानंतर हळूहळू माझी शुद्ध हरपली. पुढे मला काही आठवत नाही. पण डॉक्टर, माझ्या दिसण्यातही तसा काही फार बदल झालेला नाहीये. मी अजूनही त्याच वयाचा दिसतोय की!’

‘बरोबर आहे. तुम्ही बर्फात गाडले गेलात. तुम्ही सापडलात तेच तब्बल वीस दिवसांनी. तुमचं शरीर बर्फाने ताठरलं होतं. हृदय बंद पडलं होतं. हृदयाला होणारा रक्ताचा पुरवठा थांबला होता. अवयव गोठल्यासारखे होऊन काम करेनासे झाले होते. शरीराचं तापमान खूप उतरलं होतं. चयापचय क्रिया जवळपास बंद झाली होती. तुमच्या शरीराला, मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा होत नव्हता. शुद्ध हरपलेली होतीच. अशावेळी मेंदूला इजा पोहोचू शकते. पण तुमचं तसं झालेलं नव्हतं. तुम्हाला सुरक्षित अशा रिसर्च सेंटरच्या इमारतीत नेण्यात आलं. तुमच्या ठावठिकाणाचा  शोध चालू होता; पण काही माहिती मिळाली नव्हती.’  डॉक्टर म्हणाले.

‘असं कसं? निदान घरून फोन तरी आले असतील?’ त्याने विचारलं.

‘नाही. इथे स्थिती फार वाईट होती. एकतर तुमची माहिती मिळणं कठीण होतं. तुमच्यावर उपचार करण्यासाठी साधनंही नव्हती. तुम्हाला जागं केलं तर कदाचित तुमचा जीव गेलाही असता. त्यामुळे तुम्हाला विचारणंही शक्य नव्हतं. तेव्हा तुम्हाला रिसर्च सेंटरमध्ये शास्त्रज्ञ करत असलेल्या क्रायोजेनिक्सबाबतच्या संशोधन मोहिमेत घेतलं गेलं. आणि त्याच स्थितीत ठेवण्यात आलं. त्यानंतर जेव्हा इथली स्थिती बरी झाली तोवरही कोणी तुमची विचारणा केलेली नव्हती. त्यामुळे तुमच्यावरचा प्रयोग चालू राहिला. हे इथे केलेल्या नोंदीनुसार सांगतोय.’ डॉक्टर म्हणाले.

‘क्रायोजेनिक्स? म्हणजे?’ त्यानं विचारलं.

‘शून्याखालच्या तापमानात मानवी शरीरं गोठवून ठेवतात. त्या निद्रित अवस्थेत शरीरातल्या प्रक्रिया जवळजवळ पूर्ण थांबतात. प्राणी हायबरनेशनमध्ये जातात नं हिवाळ्यात, तसं माणसांबाबत करत होते. तुमची अवस्था तीच होती. तेव्हा ठरल्याप्रमाणे तीस वर्षांनंतर आता तुम्हाला जागं केलंय. काहीसं अशक्त होतात. पण आता तुम्ही अगदी नॉर्मल आहात. आणि तुमच्या तारुण्याचं रहस्य म्हणजे शरीराच्या सगळ्या प्रक्रिया थांबल्यानं तुमचा शारीरिक वय वाढण्याचा वेगही मंदावला असणार. तरुणपण मिळालंय तुम्हाला त्यामुळे!’ डॉक्टर हसत पुढे म्हणाले- ‘काही काळजी करू नका. तुमच्या घरचे..’ तो म्हणाला, ‘असणारच!’

 

तो घरी परत येताना उत्साहात होता. स्नेहाला फोन करायचा प्रयत्न केला, पण लागला नाही. दरवाजा उघडायला आलेल्या स्नेहाला पाहून तो गोंधळला. त्याने तिच्यात काही बदल होईल हे गृहीतच धरलेलं नव्हतं. समोर उभी होती एक प्रौढा!

तीस वर्षांनंतर घरी येताना नक्की कोणत्या बदलांना सामोरं जायचंय, याची त्याला कल्पनाच करता येईना. खरं तर घराच्या बाहेरचाही बदल त्याला जाणवला. विश्वास वाटत होता तो फक्त स्नेहाचा. तीच तर होती त्याच्या जीवनाची साथीदार! बाकी होतंच कोण त्याला? त्याला असं अकस्मात समोर उभे राहिलेलं पाहिल्यावर ती त्याला आनंदानं मिठी मारेल, ही त्याने केलेली कल्पना त्याला थोडी दचकवून गेली. पण तीही का दचकली? त्याने हॉस्पिटलची चिठ्ठी दाखवली. त्याला ओळखूनही आधी त्याला घरात घ्यावं की न घ्यावं, या विचारात ती घुटमळली. पण मग दरवाजातून बाजूला झाली. तो घरात आला. त्याने सगळं काही तिला सांगितलं. तिच्या डोळ्यांतून त्याचे कष्ट ऐकून ना अश्रू आले, ना त्याच्या आल्याचा आनंद तिच्या डोळ्यांत दिसला. तो हिरमुसला.

‘स्नेहा, तुला आनंद नाही झाला?’ त्यानं विचारलं.

‘सतीश, मला नक्की काय वाटतंय तेच मला कळत नाहीये. तू आलायस म्हणून आनंद न वाटायला काय झालं? तेव्हा तू नाहीस हे स्वीकारणं खूप कठीण गेलं. आता..’ स्नेहा म्हणाली. त्याला पटलं.

‘तू गोंधळणं स्वाभाविक आहे. पण आपण त्या सुटलेल्या धाग्याला पुन्हा हातात घेऊया.’ सतीश म्हणाला. त्यालाही त्याचा स्वर पोकळ भासला.

ती हसली. म्हणाली, ‘खरंच, ते शक्य आहे असं वाटतं तुला? तू माझ्याकडे बघतोयस. तू तुलाही बघितलंयस. आधीच तुझ्यापुढे सामान्य होते मी. तेव्हाही तू नवरा असून सतत वाटत राहायचं- तू माझा राहशील ना म्हणून? आणि आता?’

तो ते आठवून मनमोकळं हसला. म्हणाला, ‘पण, तुझ्यावर मात्र माझा विश्वास होता आणि आहे. तुझा हा संशय आनंद द्यायचा मला.. तुझं माझ्यावरचं प्रेम दाखवून द्यायचा.’

स्नेहाचा चेहरा कसनुसा झाला. ‘सतीश, तुला समजत नाहीये.’

‘काय ते?’ सतीशने हसून विचारलं.

‘सतीश, तू तीस वर्षांनी आलायस. खूप काही बदललंय. तुझ्या-माझ्यात आता ते नातं पुन्हा निर्माण होणं शक्य नाही. माझं वय.. ’ स्नेहा बोलत असतानाच बेल वाजली. ती लगबगीने दार उघडायला गेली.

‘अगं तू?’ स्नेहाने आत येणाऱ्या निशाला विचारलं.

‘हो. राकेशने मला घरी यायला सांगितलंय. मग कुठे बाहेर जायचंय म्हणाला.’ निशा म्हणाली.

‘असं होय. बरं बस. मी चहा आणते.’ स्नेहा म्हणाली.

‘अं .. हे ..?’ निशाने विचारलं.

‘हे सतीश..!’ स्नेहाने काहीसं घुटमळत सांगितलं. सतीशला ते थोडंसं खटकलंच.

स्नेहा चहा घेऊन बाहेर आली तेव्हा निशा सतीशशी छान हसून बोलत होती.

त्याने स्नेहाचा चेहरा पाहिला. अजूनही तशीच आहे. कधीतरी नवऱ्यावर विश्वास ठेव.

पण ही कोण आहे?

स्नेहाने नंतर ते सांगितलं आणि मनानं कोलमडूनच गेला तो. ‘तुझ्याबद्दल कळलं. पण तिथे पोचणं कठीण होतं. तिथे सगळी वाताहत झालेली होती. सारखी चौकशी करायची मी. बाकी आपलं होतं कोण? तुझे सगळे मित्र तुझ्याबरोबरच तिथे. तुमच्या ग्रुपबद्दल.. इथल्या ऑफिसकडून तू गेल्याचं कळलं. मी वाट पाहिली तुझी. खूप. मग तुझ्या स्टुडिओची जागा भाडय़ाने दिली आणि मी नोकरी करायला लागले. पण कठीण असतं रे एकटीनं..’

स्नेहाचं वेगळं कुटुंब आहे? आता नसला तरी तिचा पती, त्यांचा मुलगा, होणारी सून.. या सगळ्यांत तो कुठेय? त्याच्या आणि तिच्यातला तो धागाच तुटून गेलाय? ज्या स्नेहावरच्या विश्वासाने तो परत आला, तो त्याच्या पायाखालचा आधारच सरकल्यासारखं वाटलं त्याला. आता कोणत्या नात्याने आपण एकत्र राहणार? घर त्याचं आहे. तो ते सोडून आणखी कुठे जाणार? स्नेहा ते नाकारत नाहीये. पण तरी इथे राहणं? तिचा मुलगा येईल- त्याला ती काय सांगणार? मुळात स्नेहा परकी झाल्यावर आता काय करायचं? इकडे आपल्या घरात आपणच उपरे झालोय, की हे उपरे आहेत? घर आपलं असलं तरी आपल्या घरासाठी आपणच अनोळखी झालोयत. एकटं पडलेलं मूल भोकाड पसरतं. तसंच करावंसं वाटत असूनही मी..  त्याने आवंढा गिळला. पुढे काय करायचं? पुन्हा तारुण्य उपभोगायची ही कसली शिक्षा?  ल्ल

potnissmita7@gmail.com