‘नैसर्गिक निवडी’चा सिद्धांत मांडला गेला, तेव्हा निसर्गाचे किंवा ‘जीवांच्या जीवना’चे आकलन अभ्यासाच्या आधारे- म्हणजेच दैवीशक्तीचे साह्य़ न घेता शक्य आहे, हेही सिद्ध झाले. पुढे उत्परिवर्तन (म्युटेशन), स्थानांतरण (मायग्रेशन) व जनुकीय अपवहन (जेनेटिक ड्रिफ्ट) या प्रक्रियाही उत्क्रांतीला कारणीभूत आहेत, अशी जोड या अभ्यासाला मिळाली. विज्ञानात कोणतेही दावे अंतिम नसतात, पण तसे ते नाही म्हणून विज्ञान ‘चुकीचे’ असेही नसते..
डार्विनच्या उत्क्रांती सिद्धांतावरील विविध आक्षेप धर्मवाद्यांच्या ‘इंटिलिजंट डिझाइन’ या कृतक-वैज्ञानिक (वैज्ञानिक भाषा वापरून विज्ञानाचा आभास निर्माण करणाऱ्या पण वैज्ञानिक समीक्षेच्या निकषांवर न टिकणाऱ्या) संकल्पनेवर आधारित आहेत हे आपण मागच्या लेखात पाहिले व त्या संकल्पनांचे खंडनही केले. या लेखात आपण नैसर्गिक उत्क्रांतीचा सिद्धांत काहीशा विस्ताराने समजून घेऊ.
नैसर्गिक निवडीचा सिद्धांत
डार्विनप्रणीत उत्क्रांतीच्या सिद्धांताचा पाया ‘नैसर्गिक निवड’ हा आहे. त्याच्या मुळाशी दोन साध्या संकल्पना आहेत. एक, सर्व सजीवांमध्ये जगण्यासाठीचा संघर्ष व त्यासाठीची स्पर्धा हे तीव्र असतात. कारण जगण्याची संसाधने (उदा. अन्न) मर्यादित असतात, तर लोकसंख्यावाढीचा दर अनियंत्रित असतो.
दोन, प्रत्येक प्रजातीत गुणधर्माची विविधता असते. ‘नैसर्गिक निवडी’चा सिद्धांत असे सांगतो की, ‘जे प्राणी आपल्या पर्यावरणाशी अधिक चांगल्या रीतीने अनुकूलन (जुळवून घेणे) करून घेऊ शकतात, त्यांच्या बाबतीत जगणे व पुनरुत्पादन यांच्या संभाव्यता इतरांच्या तुलनेत अधिक असतात.’ कारण स्पर्धेत तगून राहण्यासाठी सुयोग्य गुणांची किंवा गुणधर्माची निवड निसर्ग करतो. उदाहरणार्थ, भुंगेश (बीटल) नावाचा किडा दोन रंगांत सापडतो- हिरव्या, तपकिरी (म्हणजे त्याच्या गुणधर्मात विविधता आहे.). मर्यादित संसाधने असणाऱ्या पर्यावरणात त्याची संख्या अमर्यादित राहू शकत नाही. हिरवे किडे पक्ष्यांच्या नजरेत पटकन येतात व त्यांचे भक्ष्य बनतात. त्याउलट मातीच्या रंगाशी जुळवून घेणारा तपकिरी किडा लवकर दिसत नाही. तो हिरव्याच्या तुलनेत अधिक काळ जगून पुनरुत्पादन करतो. त्याची संख्या हिरव्याच्या तुलनेत वाढते (आता दोन्ही प्रकारच्या किडय़ांच्या पुनरुत्पादन प्रमाणात अंतर पडले.). रंग हा आनुवंशिक गुणधर्म असल्यामुळे तपकिरी किडय़ांची संख्या पुढच्या पिढीत वाढलेली दिसते. याच प्रक्रियेतून, कालांतराने सर्व भुंगेश तपकिरीच आढळतील. म्हणजे, आनुवंशिक गुणधर्मात फरक असला आणि त्यातील एका गुणधर्मामुळे अधिक जुळवून घेता येत असेल तर गुणधर्मातील फरकाचे रूपांतर पुनरुत्पादनातील फरकात होते आणि अधिक अनुकूलन क्षमतेच्या गुणधर्माची ‘नैसर्गिक निवड’ होते. शेतकरी, विशिष्ट पिकाच्या अधिक चांगल्या वाणाच्या किंवा अधिक उपयुक्त पाळीव प्राण्याच्या (उदा. अधिक दूध देणारी गाय किंवा म्हैस) निर्मितीसाठी याच तंत्राचा वापर करतो (ब्रीडिंग). डार्विन त्याला ‘कृत्रिम निवड’ असे संबोधतात. नैसर्गिक निवडीच्या याच प्रक्रियेतून सुयोग्य गुणांचा संच व अनुवंश तयार होतो व त्यातून नव्या सजीवांची निर्मिती होते.
सुमारे साडेतीनशे कोटी वर्षांपूर्वी सर्वप्रथम समुद्राच्या पाण्यातील रासायनिक पदार्थात योगायोगाने घडलेल्या रासायनिक प्रक्रियेतून साध्या एकपेशीय प्राण्यांची निर्मिती झाली. नंतर क्रमाक्रमाने त्यांचा विकास व उन्नती होऊन अधिकाधिक उन्नत, गुंतागुंतीच्या सक्षम प्रजाती निर्माण झाल्या. ही प्रक्रिया कोटय़वधी वर्षांपासून चालत आली आहे.
अर्थात, जीवसृष्टीच्या निर्मितीचे व उत्क्रांतीचे रहस्य डार्विनना काही एका झटक्यात उलगडलेले नाही. नैसर्गिक निवडीचा सिद्धांत व त्याद्वारे होणारी उत्क्रांती हे त्यांचे योगदान. नंतरच्या दीडशे वर्षांत शेकडो शास्त्रज्ञांच्या एकत्रित कामगिरीतून हे कोडे क्रमश: उलगडत गेले. आजही ते १०० टक्के समजल्याचा दावा विज्ञान करत नाही (विज्ञान असले दावे कधीच करत नाही. ‘झटपट’, ‘अक्सीर’, ‘रामबाण’ किंवा ज्ञानप्राप्ती, साक्षात्कार, इलाज.. हे सारे कृतक-विज्ञान.). डार्विनने आपल्या सिद्धान्ताच्या पुष्टीसाठी २५ वर्षे मेहनत घेतली. त्यासाठी एच.एम.एस. बीगल या जहाजातून ५७ महिने प्रवास केला. त्यात त्यांनी तीन महासागरातील बेटे व प्रदेश यांवरील जीवसृष्टीचे बारकाईने निरीक्षण केले. परतताना त्यांनी मद्यार्कात साठवलेले १५२९ प्रजातींचे नमुने, ३९०७ प्रजातींचे वाळविलेले नमुने, काही जिवंत प्राणी, ७७० पानांची रोजनिशी, भूशास्त्रावरील १३८३ पाने टिपणे व प्राणीशास्त्रावरील ३६८ पाने टिपणे इतका खजिना सोबत आणला आणि त्यांच्या परिशीलनातून त्यांनी आपले मूळ प्रमेय सिद्ध केले. डार्विनच्या सिद्धांताची सत्यता आजही अनेक गोष्टींमधून आपल्या प्रत्ययाला येते. प्रतिजैविकांचा वारेमाप उपयोग केल्यामुळे रोगजंतूंमध्ये त्यांना दाद न देणारे वाण निर्माण झाले व त्यातून अचाट किडय़ाचा (सुपरबग) धोका निर्माण झाला, हे त्याचेच उदाहरण. अर्थात उत्क्रांतीचे परिणाम घडून येण्यास अनेक पिढय़ा जाव्या लागतात. रोगजंतूंचे जीवनचक्र कमी दिवसांचे असल्यामुळे एखाद्या दशकातच त्यांच्या शेकडो पिढय़ा उलटून जातात व त्यांच्यावरील परिणाम आपण लवकर पाहू शकतो, इतकेच. मानवप्राण्याचे जीवनचक्र त्यांच्या हजारो पटीने दीर्घ असते. त्यामुळे त्यात होणारे बदल दिसायला हजारो किंवा लाखो वर्षे उलटून जावी लागतात, हेही आपण समजून घेतले पाहिजे. याच प्रदीर्घ प्रक्रियेतून पर्यावरणाशी अधिक योग्य अनुकूल साधणाऱ्या नव्या प्रजाती जन्माला येतात हे एकदा समजले की, माकडीणीने माणसाला जन्म दिल्याची घटना आपण का पाहू शकत नाही, असले प्रश्नही आपल्याला पडणार नाहीत.
उत्क्रांती सिद्धांत : नवे संश्लेषण
मेंडेलचा आनुवंशिकतेचा सिद्धांत रुजायला व त्यातून अनुवंशशास्त्र विकसित व्हायला विसावे शतक उजाडावे लागले. त्यामुळे आनुवंशिकतेचा आधार समजायला व डार्विनचा सिद्धांत मजबूत व्हायला मदत झाली.
कोणताही वैज्ञानिक सिद्धांत अधिक बिनचूकपणे मांडण्यासाठी त्याला गणिती भाषेचा पोशाख चढवावा लागतो. उत्क्रांती सिद्धांताच्या बाबतीत हे कार्य रोनाल्ड फिशर व त्यानंतर जे. बी. एस. हाल्डेन यांनी केले. पहिल्या जीवाच्या निर्मितीची मांडणी हाल्डेन यांनीच केली. नंतर डोब्झान्स्की व अन्य शास्त्रज्ञांनी ‘नैसर्गिक निवडी’बरोबरच उत्परिवर्तन (म्युटेशन), स्थानांतरण (मायग्रेशन) व जनुकीय अपवहन (जेनेटिक ड्रिफ्ट) या प्रक्रियांतून उत्क्रांती घडते असे सिद्ध केले. वरचेच उदाहरण घेऊ. अतिनील विकिरण किंवा अन्य कारणांमुळे जनुकीय संरचनेत अचानक बदल होऊन हिरव्या बीटल्सना तपकिरी रंगाची अपत्ये होऊ शकतात. तपकिरी बीटल्स हिरव्या बीटल्सच्या समूहात स्थानांतरित झाल्यामुळे त्यांच्या जनुकांची सरमिसळ होऊ शकते किंवा एखाद्या पिढीत अपघाताने फक्त काही हिरवे बीटल्स पायाखाली चिरडले गेल्यामुळे पुढील पिढीत तपकिरी बीटल्सची संख्या हिरव्यांपेक्षा वाढू शकते. त्यातून विशिष्ट गुणधर्म तगून राहणे किंवा ते नष्ट होणे शक्य होते.
डार्विननी लावलेल्या रोपटय़ाचा आता वटवृक्ष झाला आहे. अनेक शाखा-उपशाखा, पारंब्या, त्यातून नवे वृक्ष असा पसारा वाढला आहे. स्टीफन जे गूल्ड, डॅनियल डेनेट, रिचर्ड डॉकिन्स, स्टीव्हन पिंकर व कार्ल सिग्मंड अशा शेकडो प्रज्ञावंतांनी त्यात भर घातली आहे. भाषाशास्त्र, वैद्यक, मनोविज्ञान, समाजशास्त्र, जेनोमिक्स, रेणवीय जीवशास्त्र ते थेट भौतिकी, संगणक विज्ञान अशा विविध ज्ञानशाखांमधल्या अत्याधुनिक विचारप्रवाहांवर त्याची गडद छाया पडली आहे व ही प्रक्रिया यापुढेही चालूच राहणार आहे. त्यामुळे उत्क्रांती नाकारणे म्हणजे आपणच आपले डोळे बंद करून घेणे होय.
उत्क्रांतीवादाचा विपर्यास
हर्बर्ट स्पेन्सर यांनी उत्क्रांती सिद्धांताचे केलेले सुलभीकरण – ‘सव्र्हायव्हल ऑफ द फिटेस्ट’ – आणि ‘बलवान तेवढेच जगतील’ हे त्याचे विपर्यस्त भाषांतर – या दोन्ही बाबी भल्याभल्यांच्या बोलण्या-लिहिण्यात आढळल्या तरी त्या उत्क्रांतीशास्त्राच्या दृष्टीने चुकीच्या आहेत, हे मात्र आपण ध्यानात ठेवले पाहिजे. यापुढे जाऊन काही लोक उत्क्रांतीचा अर्थ ‘बळी तो कान पिळी’ असा लावतात व त्याआधारे सामाजिक व्यवस्थेतील अन्याय, अत्याचार, शोषण यांचे समर्थन करतात. तेही चुकीचेच. नैसर्गिक निवडीचा संबंध ‘अनुकूलना’शी आहे, शारीरिक शक्ती किंवा आक्रमक प्रवृत्तीशी नव्हे.
दैवीशक्तीचे साह्य़ न घेता निसर्गाचे आकलन शक्य आहे, हे डार्विनने सिद्ध केले. तीच प्रक्रिया अधिक उंचावर नेणाऱ्या स्टीफन हॉकिंग या प्रज्ञावंताचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या कार्याचा परामर्श पुढील लेखात.
लेखक समाज-विज्ञान यांच्या आंतर संबंधांचे अभ्यासक व कार्यकर्ते आहेत. ई-मेल :
रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ ravindrarp@gmail.com
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 17, 2018 1:51 am