X

मानव, निसर्ग आणि विज्ञान

वैज्ञानिक प्रगतीची परिणती कशात व्हावी हे विज्ञान ठरवीत नाही.

|| रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ

वैज्ञानिक प्रगतीची परिणती कशात व्हावी हे विज्ञान ठरवीत नाही. याउलट, निसर्गनियमांची पायमल्ली केल्यास काय परिणाम होतात, हेही विज्ञानच आपल्याला सांगते. या दृष्टीने पर्यावरणशास्त्र या विज्ञानशाखेचा आपण खोलात जाऊन विचार करायला हवा..

एक काळ होता, जेव्हा हे सारे विश्व हे मानवासाठी कोडे होते. अग्नी, वादळ, पाऊस, दुष्काळ, हिमवर्षांव यांमुळे तो त्रस्त व भयभीत होत असे. तेव्हा निसर्ग ही त्याच्या पूजेची व श्रद्धेची बाब होती. आधुनिक विज्ञानाचा जन्म झाला आणि ही परिस्थिती झपाटय़ाने बदलली. निसर्गाचे नियम मानवाने ज्ञात करून घेतले व त्यानुसार तो निसर्गाला, आपल्या सभोवतालच्या परिस्थितीला वाकवू लागला. गुरुत्वाकर्षणाचा सिद्धान्त व गतीचे नियम समजून घेतल्यावर तो पृथ्वीची गुरुत्वाकर्षण कक्षा ओलांडून अवकाशात झेप घेऊ लागला. रोगराईची कारणे कळल्यावर तो दीर्घायुषी झाला. तंत्रज्ञानात पारंगत मानवासाठी वस्तूंची रेलचेल ही सहज बाब झाली. सर्वाना हवीहवीशी वाटणारी ऐहिक समृद्धी अनेकांच्या आवाक्यात आली. मग मानवनिर्मित माध्यमे मानवाने विज्ञानाच्या साह्याने निसर्गावर मिळविलेल्या ‘विजयाची’ कहाणी रंगवून सांगू लागली. जणू काही विज्ञान हे निसर्गावर ‘ताबा, नियंत्रण’ मिळविण्याचे, त्याला जिंकण्याचेच साधन होते. विज्ञान मानणाऱ्या अनेकांना (सर्वाना नव्हे) ‘निसर्गावर मात’ हे विज्ञानाचे प्रमुख कार्य, त्याच्या अस्तित्वाचे प्रयोजन वाटू लागले. मात्र जेव्हा कधी त्सुनामीचे संकट येते, माळीण किंवा हिमाचल प्रदेशात दरड कोसळून होत्याचे नव्हते होते, केरळला अतिवृष्टी होते, मुंबईला २६ जुलचा फटका बसतो, तेव्हा माणसे म्हणतात – ‘निसर्गाने सूड उगवला, विज्ञान हरले, निसर्ग जिंकला’ ..

अहंकार, सूडबुद्धी, वर्चस्व गाजविण्याची वृत्ती या सर्व मानवी प्रेरणा, विकार आहेत. निसर्ग व विज्ञान, यांच्यापासून मुक्त आहेत. निसर्ग स्वत:च्या नियमानुसार, निरपेक्षपणे चालतो. तो त्यातून होणाऱ्या लाभ-हानीचा विचार करीत नाही. विज्ञान निसर्गाचे हे नियम समजून घेते. आपली मानवजात, आपण वास्तव्य करतो ती पृथ्वी, हे सर्व या विराट निसर्गाचाच एक भाग आहे, हे विज्ञान जाणते. म्हणून खरा वैज्ञानिक निसर्गावर हुकुमत गाजविण्याच्या गोष्टी कधीच करू शकणार नाही.

निसर्गावर हुकुमत गाजविण्याची प्रेरणा

मग निसर्गाला अंकित करण्याची बाब येते कोठून? तर ती येते तंत्रज्ञानातून. निर्गुण, निराकार विज्ञानाचे सगुण, प्रत्यक्ष रूप असते तंत्रज्ञान. विज्ञानाने जाणलेल्या निसर्गनियमांचे उपयोजन करते तंत्रज्ञान. हे करताना निसर्गाने मानवावर घातलेल्या मर्यादा ओलांडणे त्याला शक्य होते. मानवाच्या ऐहिक समृद्धीसाठी पाहिजे तिथे ऊब, थंडावा निर्माण करणारे, हवा/पाणी यांच्यामधून विहार करविणारे हे तंत्रज्ञान मूलत: त्याच्या नियंत्याच्या हितरक्षणासाठी काम करते. विज्ञान प्रथमदर्शनी तरी हेतुनिरपेक्ष, मूल्यनिरपेक्ष असते, तसे तंत्रज्ञान असू शकत नाही. ज्या उद्देशाने त्याची निर्मिती केली जाते, त्याचा रंग त्यावर चढतोच. त्यातूनच ‘आम्ही निसर्गाला आमच्या सोयीसाठी हवे तसे वापरू’ असा अहंकार तयार होतो.

या अहंकारामागे आणखी एक कारण आहे. आधुनिक विज्ञान जन्मले ते युरोपात. प्रबोधनकाळाच्या पाश्र्वभूमीवर विज्ञान-कला आदी सर्व क्षेत्रांत नवनिर्मितीला उधाण आले, त्यामागे समता-स्वातंत्र्यादी मूल्यांप्रमाणेच, ‘साऱ्या जगाला आपल्याप्रमाणे शहाणे करून सोडण्याची’ ख्रिस्ती धर्माची प्रेरणाही होती. कोणी त्याला ‘रानटी एतद्देशीयांना आपल्याप्रमाणे सुसंस्कृत करणे ही गोऱ्या माणसाची नतिक जबाबदारी’ (व्हाइट मॅन्स बर्डन) असेही म्हणतात (या वैज्ञानिक –  औद्योगिक क्रांतीच्या गरजा भागविण्यासाठी युरोपीय वसाहतवाद जगभर पसरला हा आणखी पुढचा इतिहास). ख्रिश्चन कथांनुसार  मानव ही ईश्वराची सर्वात लाडकी निर्मिती असून तो या सृष्टीच्या केंद्रस्थानी आहे, आधुनिक विज्ञानाच्या सुरुवातीच्या काळात बीजरूपाने असलेला हा विचार विज्ञान-तंत्रज्ञानाच्या प्रसारासोबत फोफावत गेला आणि त्यातूनच निसर्गाच्या इतर घटकांचा विचार न करता मानवाच्या सुखोपभोगासाठी निसर्गाचा वारेमाप उपभोग घेण्याची वृत्ती वाढीला लागली, असेही एक मत विज्ञानाच्या इतिहासात मांडले जाते.

सुरुवात कोठूनही झालेली असो, तंत्रज्ञानाच्या कमालीच्या प्रगतीमुळे संपत्तीची निर्मिती, ऐहिक समृद्धी व सुखसुविधा या बाबी आता मानवाच्या हातात आल्या आहेत. पण तिच्यासोबत अखिल सृष्टीच्या कल्याणाची व्यापक प्रेरणा नसल्यामुळे उपभोगवाद व नंतर चंगळवाद फोफावलेला आपल्याला दिसतो. हिंदू धर्मात तर ‘वसुधव कुटुंबकम्’ ची संकल्पना सांगितली आहे. चराचर विश्वात ईश्वरी चतन्य सामावलेले आहे, अशी अद्वैताची धारणा आहे. पण तरीही आपल्या सभोवताली दिसणारी वखवख, ‘पुढच्या पिढय़ांचे मला सांगू नका, मला हवा तेवढा उपभोग आत्ता, या क्षणी घेता यायला हवा’ ही वृत्ती इतर धर्मीयांच्या तुलनेत हिंदूंमध्ये कमी आहे, असे कोणीही म्हणू शकणार नाही. एकूणच साऱ्या पृथ्वीवरील मानव चंगळवादाच्या इतक्या आहारी गेला आहे, की सृष्टिचक्रामध्ये वाटेल तशी ढवळाढवळ तो करीत आहे. निसर्ग त्याच्या नियमांनी चालतो. त्यामुळे या ढवळाढवळीचे परिणाम आपल्याला भोगावेच लागतात –  ढगफुटी. अवर्षण, महापूर, तापमान बदल, इ. विज्ञान > तंत्रज्ञान > पराकोटीचा ऐहिक विकास > चंगळवाद अशी ही साखळी असल्यामुळे, या सर्वासाठी  विज्ञान दोषी आहे का, तर नाही. वैज्ञानिक प्रगतीची परिणती कशात व्हावी हे विज्ञान ठरवीत नाही. याउलट, निसर्गनियमांची पायमल्ली केल्यास काय परिणाम होतात, हेही विज्ञानच आपल्याला सांगते. या दृष्टीने पर्यावरणशास्त्र या विज्ञानशाखेचा आपण खोलात जाऊन विचार करायला हवा.

पर्यावरणशास्त्राला खरे तर विज्ञानाचे विज्ञान म्हणायला हवे. कारण ते साऱ्या विश्वाचा एक व्यवस्था म्हणून विचार करते. एका अर्थाने विश्लेषणात्मक (रिडक्शनिस्ट) आधुनिक विज्ञानाचा हा र्सवकष (होलिस्टिक) अवतार आहे, असे म्हणायला हरकत नाही. ‘या विद्याशाखेत अनेक भौतिक, जीवशास्त्रीय व माहितीपर विज्ञानांचा व त्यांच्या पर्यावरणाशी होणाऱ्या आंतरक्रियांचा समावेश होतो.  त्याचबरोबर, पर्यावरणाच्या असंतुलनातून उद्भवणाऱ्या समस्यांची उत्तरे शोधण्यासाठीही आपल्याला याच विद्याशाखेचा आसरा घ्यावा लागतो. पण गंमत म्हणजे अमेरिकेपासून भारतापर्यंतच्या अनेक देशांची सरकारे, माध्यमे व जनता या विद्याशाखेला विज्ञान मानतच नाहीत. कल्पना करा – ए पी जे अब्दुल कलामांसारख्या शास्त्रज्ञाने क्षेपणास्त्राविषयी एखादे विधान केले, एखादी योजना सुचवली, तर ते विनाकारण नाकारण्याची हिंमत कोणामध्ये होती? रामानुजन, सी व्ही रामन, जगदीशचंद्र बसू, न्यूटन, आइन्स्टाइन या सर्वाना आपण थोर मानतो. कारण त्यांचे शास्त्र (विज्ञान) आपल्याला मान्य आहे, आदरस्थानी आहे. (अगदी आपल्याला अगम्य गणिती भाषेत कोणी बोलू लागला की आपण तो थोर वैज्ञानिक असल्याचे मनोमन मान्य करतो). मात्र, पर्यावरणविज्ञानात आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त डॉ. माधव गाडगीळ यांना आपले केंद्रीय सरकार एका महत्त्वाच्या विषयाचा (पश्चिम घाटाच्या पर्यावरणाचा) अभ्यास करायला नियुक्त करते आणि त्यांचा विज्ञानाच्या कसोटय़ांवर घासून तयार केलेला अहवाल मात्र न वाचताच फेटाळून लावते, याला काय म्हणावे?

गाडगीळ समितीच्या अहवालानुसार पश्चिम घाटातील ६०,००० चौरस कि.मी. एवढा परिसर पर्यावरणदृष्टय़ा अतिशय संवेदनशील असल्यामुळे त्यातील मानवी हस्तक्षेपावर बंधने टाकणे क्रमप्राप्त होते. त्यातील सर्वात संवेदनशील भूभागात खाणकाम व मोठी धरणे बांधणे यावर बंदी घालण्यास समितीने सुचविले होते. या समग्र भूपट्टय़ाचा पर्यावरणदृष्टय़ा साकल्याने विचार-विकास करण्यासाठी एकच नियामक मंडळ स्थापन करून पर्यावरणरक्षणाची प्रक्रिया ‘वरून खाली’ (सरकार ते जनता) न चालवता ती खालून वर चालवण्यास समितीने सुचविले. तेव्हा तिच्यावर ‘जादाच पर्यावरणस्नेही’ असल्याचा आक्षेप घेण्यात आला. (उद्या बालहक्करक्षणासाठी नेमलेली समिती जादाच ‘बालप्रेमी’ आहे, असे आपण म्हणणार काय?) मग पर्यावरणतज्ज्ञांच्या अहवालाचा ‘पुनर्वचिार’ करण्याचे कार्य कृष्णस्वामी कस्तुरीरंगन या ‘अंतरिक्षवैज्ञानिका’कडे  सोपविण्यात आले. अपेक्षेनुसार त्यांनी तो अहवाल बराच पातळ करून नव्याने सादर केला. परंतु तेवढाही सरकार व जनता यांना मान्य नव्हता. म्हणून पर्यावरणसंरक्षणाच्या कार्याला सुरुवातच झाली नाही. अर्थात् याची खबर ‘बिचाऱ्या’ निसर्गाला नसल्यामुळे तो त्याच्या नियमांनुसार वागला. परंतु त्यामुळे केरळात केवढा प्रलय ओढवला! आता या संहारातून आपण काही शिकणार, की ‘पर्यावरणासाठी विकासाची किंमत आम्ही मोजणार नाही’ असेच म्हणत राहणार.. माफियांच्या सुरात सूर मिसळून?

ravindrarp@gmail.com