|| रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ

‘मराठी विज्ञान परिषदे’पासून अनेक संस्था, विज्ञानलेखकांच्या दोन पिढय़ा, ग्रामीण भागात कार्य करणारे काही जण आणि शेती, पर्यावरण आदी क्षेत्रांत काम करणारे कित्येक तरुण आजही विज्ञानाचा दिवा तेवता ठेवत आहेत.. हे भान प्रवाही राहण्यासाठी वाचकांचाही सहभाग कसा असू शकतो, याची ही काही उदाहरणे..

आपण आता या लेखमालेच्या अंतिम टप्प्यापर्यंत येऊन पोहोचलो आहोत. आतापर्यंत आपण विज्ञान व वैज्ञानिक पद्धती म्हणजे काय हे समजावून घेतले. विविध दृष्टिकोनांतून त्याची समीक्षाही केली. परंपरेच्या किंवा मार्केटिंगच्या नावाखाली खपवले जाणारे कृतक-विज्ञान किंवा छद्मविज्ञान, तसेच आपली खरीखुरी वैज्ञानिक परंपरा, तिचा ऱ्हास होण्याची कारणे आणि नव्या काळाशी तिचा समन्वय कसा घालता येईल हेदेखील आपण समजून घेतले. आता वेळ आली आहे या सर्व बाबींचा मेळ घालून व्यक्तिगत किंवा सामूहिक पातळीवर काही तरी लहानशी पण ठोस कृती करण्याची. ते केले नाही तर आपण मिळविलेले ज्ञान विस्मृतीच्या कोशात दडेल किंवा केवळ माहिती बनून आपल्या मेंदूचा एखादा कप्पा अडवेल. प्रत्यक्ष जीवनात विज्ञानाचा प्रयोग-उपयोग करणे हाच आपले ज्ञान अद्यावत ठेवण्याचा राजमार्ग आहे. ज्ञानाचे योग्य उपयोजन केले नाही, ते प्रवाही ठेवले नाही तर काय होते, हे आपण  विज्ञान-इतिहासावरून शिकलो आहोतच.

वाटाडय़ांची तोंडओळख

गेल्या वर्षभरात मला अनेक वाचकांची पत्रे मिळाली. त्यातील काही आपले अनुभव शेअर करणारी व ‘आम्हाला इतरांचे विज्ञानभान जागविण्यासाठी किंवा आपले अधिक सजग करण्यासाठी काय करता येईल?’ अशी विचारणा करणारी होती. माझा अनुभव, माहिती आणि संपर्क यांच्या मर्यादा मान्य करून ज्यांचे काम आपल्याला पुढील वाट दाखविण्यास उपयोगी होऊ शकेल अशा काहींचा अल्प परिचय मी या लेखात करून देणार आहे.

महाराष्ट्रात वैज्ञानिक संशोधन व विज्ञानप्रसार यांची दीर्घ परंपरा आहे. बंगाल व केरळ वगळता असे चित्र अन्य राज्यांत दिसत नाही. विशेष म्हणजे वैज्ञानिक विचारपद्धती प्रमाण मानणारी राजकीय-सामाजिक परंपराही तमिळनाडू वगळता फक्त महाराष्ट्राला लाभली आहे. आता या गोष्टी इतिहासजमा झाल्या की काय, अशी भीती वाटावी असे वातावरण सभोवताली असले, तरी अनेक व्यक्ती व समूह आपापल्या पद्धतीने विज्ञानाच्या विविध पलूंवर काम करीत आहेत. त्या सर्वाना कार्यकर्त्यांची कमतरता भासते आहे. या स्तंभाचे सजग आणि उत्साही वाचक त्यांच्या कार्यात सामील झाले किंवा तसे कार्य स्वत: करू लागले, तर महाराष्ट्रातील मरगळ आलेल्या विज्ञानप्रसाराच्या कार्याला नवसंजीवनी प्राप्त होऊ शकेल.

‘मराठी विज्ञान परिषद’ ही राज्यातील विज्ञानप्रसाराचे काम करणारी सर्वात जुनी संस्था. मराठीतून विज्ञानाचा प्रचार-प्रसार करणे, इयत्ता तिसरी ते दहावीसाठी विविध वैज्ञानिक उपक्रम चालविणे आणि शहरी शेतीचा प्रसार ही तिची महत्त्वाची काय्रे आहेत. परिषदेच्या पुणे शाखेतर्फे प्रतिवर्षी सर्व वयोगटांसाठी कुतूहल व निरीक्षण यांवर आधारित ‘विज्ञान रंजन स्पध्रे’चे आयोजन करण्यात येते.

अ. भा. अंधश्रद्धा निर्मूलन समिती व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती या दोन संघटना चांगल्याच परिचित आहेत. वैज्ञानिक दृष्टिकोन जागवून प्रबोधन, प्रत्यक्ष संघर्ष व कायदेशीर लढाई या सर्व पातळ्यांवर अंधश्रद्धांचा मुकाबला करणे हे त्यांचे महत्त्वाचे कार्य आहे. महाराष्ट्र अंनिस नजीकच्या भविष्यात आपल्या कार्यकक्षा रुंदावून विद्यार्थी व युवक यांना  वैज्ञानिक पद्धतीचे प्रशिक्षण देणे व छद्म-विज्ञानाच्या मदतीने पसरविल्या जाणाऱ्या आधुनिक अंधश्रद्धांचा विरोध करणे, या दिशेनेही कार्य करणार आहे. या दोन्ही संघटना महाराष्ट्राच्या बहुतेक जिल्ह्य़ांत सक्रिय आहेत.

माहितीचे स्रोत

विज्ञानाचे क्षेत्र झपाटय़ाने विस्तारत आहे. अशा वेळी आपल्या आवडीच्या विद्याशाखेबद्दल माहिती मिळवून ती अद्ययावत ठेवणे आवश्यक ठरते. इंग्रजीत तर या माहितीचा महापूर आहे. पण मराठीत ती उपलब्ध आहे की नाही, यांबद्दल अनेकांच्या मनात संभ्रम असतो. अर्थात, मराठीत विज्ञानलेखकांची कमतरता नाही. बहुतेक प्रथितयश प्रकाशन संस्थांकडे विज्ञानविषयक पुस्तकांचे वेगळे दालन आहे. जयंत नारळीकर (खगोलशास्त्र व वैज्ञानिक दृष्टिकोन), सुबोध जावडेकर (मेंदू विज्ञान), नंदा खरे (उत्क्रांती, अभियांत्रिकी, पर्यावरण) या त्यांतील अधिकारी व्यक्ती. त्याशिवाय अनिल अवचट (शरीरक्रिया), डॉ. सुलभा ब्रह्मनाळकर (जेनेटिक्स), अच्युत गोडबोले, दीपा देशमुख, नीलांबरी जोशी (वैज्ञानिक व वैज्ञानिक शोध), डॉ बाळ फोंडके, निरंजन घाटे व अन्य अनेक लेखक उत्साहाने व निष्ठेने विज्ञानाच्या क्षेत्रातील घडामोडींशी मराठी वाचकाची गाठभेट घालून देत आहेत.

विज्ञान समजून घेण्यात वैज्ञानिक परिभाषेचे अनन्यसाधारण महत्त्व असते. कारण कोणतीही संकल्पना नेमकेपणे समजण्यासाठी आपल्याला परिभाषेचा आधार लागतो. मूळ इंग्रजीत असणाऱ्या वैज्ञानिक संज्ञांचे मराठी प्रतिरूप माहिती करून घेण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या भाषा संचालनालयाने प्रत्येक विषयाचे परिभाषाकोश तयार करून मोलाचे काम केले आहे. हे कोश शासकीय ग्रंथ विक्री केंद्रांवर, तसेच भाषा संचालनालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

अरिवद गुप्ता हा अवलिया वैज्ञानिक त्याच्या हयातभर विज्ञान शिक्षणाचे कार्य अभिनव पद्धतीने करीत आहे. त्यांच्या संकेतस्थळावर या विषयावरील मराठी, इंग्रजी व अन्य भाषांतील शेकडो महत्त्वाची पुस्तके व लेख उपलब्ध आहेत. त्यांतील वैज्ञानिक खेळणी हा फारच अनोखा प्रकार आहे. संकेतस्थळावरील पुस्तक डाऊनलोड करून किंवा वाचून अगदी दुर्गम भागातील शिक्षक, विद्यार्थी व पालकही अनेक वैज्ञानिक खेळणी स्वत: बनवू शकतील व त्यातून स्वत:ची जाण वाढवून इतरांनाही वैज्ञानिक संकल्पना समजावून सांगू शकतील.

मध्य प्रदेशातील ‘एकलव्य’ हा समूह शालेय विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान व वैज्ञानिक पद्धती रुजविण्याचे कार्य गेली अनेक दशके एकलव्याच्या निष्ठेने करीत आहे. ‘चकमक’ हे ११ ते १४ वयोगटांसाठी ‘एकलव्य’ने काढलेले हिंदी मासिक. ते निव्वळ उघडून बघणे हा शुद्ध आनंदमय अनुभव आहे. त्यातील मुलांशी सहजसंवाद करण्याची वृत्ती, त्यांच्या मनोविश्वाशी नाते जोडणारी अप्रतिम चित्रे (मुले व मोठी माणसे यांनी काढलेली), विषयांचे वैविध्य व सुरेख, प्रवाही भाषा केवळ अप्रतिम आहेत. थोडे परिश्रम घेतले तर मराठी पालक व शिक्षक यांना त्याचा भरपूर लाभ घेता येईल.

शालेय विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय स्तरावर किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना व राष्ट्रीय प्रतिभा शोध स्पर्धा या महत्त्वाच्या स्पर्धाचे प्रतिवर्षी आयोजन केले जाते. बाल विज्ञान काँग्रेस (परिषद) जिल्हा पातळीपासून राष्ट्रीय स्तरापर्यंत भरवली जाते. अगदी स्थानिक पातळीवर विज्ञानभान जागविण्याचे हे प्रभावी मध्यम आहे. खेदाची बाब अशी की, ठाणे येथील ‘जिज्ञासा ट्रस्ट’सारखे अपवाद सोडल्यास या क्षेत्रात सातत्याने कार्य करणारी मंडळी फार थोडी आहेत.

सोलापूरजवळच्या अंकोली या गावात वास्तव्य करून आपले सारे आयुष्य विज्ञानप्रसार, शेती व जलसंधारण या क्षेत्रांत प्रयोग करण्यासाठी पणाला लावणारे अरुण व सुमंगल देशपांडे हे ध्येयवादी जोडपे म्हणजे चालतेबोलते लोकविज्ञान आहे. युवा पिढीच्या मदतीने ग्रामीण व शहरी जीवनशैलीचा मिलाफ घडविणाऱ्या अभिनव प्रयोगातून भारताचा कायापालट कसा करता येईल हा त्यांच्या ध्यासाचा विषय आहे. ग्रामीण तंत्रज्ञाननिर्मितीच्या क्षेत्रातील पुण्याजवळ पाबळ येथील ‘विज्ञान आश्रम’, तसेच सार्वजनिक स्वच्छतेच्या विविध पलूंवर निरंतर काम करणारी नाशिक येथील नावरेकर कुटुंबीयांची ‘निर्मल ग्राम’ या संस्था कित्येक दशके जे मोलाचे कार्य करीत आहेत, त्यांतून खूप शिकण्यासारखे आहे. याशिवाय निसर्गशेती, सार्वजनिक आरोग्य, बीजसंवर्धन अशा विविध क्षेत्रांत विज्ञान-तंत्रज्ञानाच्या मदतीने नवे प्रयोग करणारी तरुण ‘धडपडणारी मुले’ महाराष्ट्राच्या विविध भागांत विखुरलेली आहेत. धुळ्याचा विनोद पगार दुर्गम आदिवासी शेतकऱ्यांच्या नसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी जिवाचे रान करीत आहे; तर नागपूरचा सजल कुलकर्णी देशी वाणाच्या गाईंवर संशोधन करतो आहे. ठाणे जिल्ह्य़ातील जव्हार परिसरात संजय पाटील धान्याचे जुने, स्थानिक वाण जोपासण्याच्या शास्त्रीय पद्धती शोधतो आहे.

म्हणजे आपण समजतो इतकी परिस्थिती निराशाजनक नक्कीच नाही. प्रतिकूल परिस्थितीतही जिद्दीने काम करणारे कमी नाहीत. त्यांच्या पणतीने आपण आपला दिवा लावायचा की आपला स्वत:चा नवा दिवा तयार करायचा हे आपण ठरवायचे आहे. आपण स्वत: काय करू शकतो, याची चर्चा पुढच्या व अंतिम लेखात करू. प्रश्न केवळ अंधाराशी झगडण्याचा आहे.

लेखक समाज-विज्ञान यांच्या आंतर संबंधांचे अभ्यासक व कार्यकर्ते आहेत.

ravindrarp@gmail.com