News Flash

लोकपरंपरा आणि उदकविज्ञान 

पाण्याची समस्या आधुनिक काळाची असली तरी ‘उदक चालवावे युक्ती’ हे शहाणपण आपल्या पूर्वजांजवळ होते.

कोलकाता शहराची सांडपाणी-शुद्धीकरण व्यवस्था

रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ 

पिढीजात मिळणाऱ्या ज्ञानाची परंपरा जिवंत ठेवून जनसामान्यांच्या हितासाठी तिचा उपयोग केला, तर आधुनिक विज्ञानाला हेवा वाटावा असे काम त्यातून उभे राहू शकते. पण असे झाल्याची उदाहरणे कमी. कोलकाता शहराची सांडपाणी-शुद्धीकरण व्यवस्था, हे त्यापैकी मोठय़ा प्रमाणावर राबवले गेलेले, म्हणून महत्त्वाचे..

आपल्या देशात अतिशय समृद्ध अशा अनेक परंपरा आहेत. कालपरत्वे त्यांच्यात सत्य-कल्पिताची काही सरमिसळ झाली आहे. कुठे विचार क्षीण झाला आहे तर कुठे हितसंबंध बळावल्यामुळे त्यातील सत्त्व झाकले गेले आहे. तरीही खेडय़ापाडय़ांत, आदिवासी भागांत अनुभवी वृद्धांजवळ पारंपरिक शहाणपणाचे संचित अजूनही शिल्लक असलेले आपल्याला दिसते. एखाद्या अशिक्षित वैदूजवळ केवळ नाडीपरीक्षा करून अचूक रोगनिदान करण्याचे कसब असते, कोणा हाडवैद्याला प्लास्टर न लावता मोडलेले हाड सांधण्याचे शास्त्र अवगत असते. कोणा म्हाताऱ्या शेतकऱ्याला पाऊस कधी व किती पडेल याचा अदमास घेता येतो. एखाद्या आजीबाईच्या बटव्यात साप किंवा िवचवाच्या दंशावर लागू पडेल अशी मात्रा असते. या सर्व उदाहरणांच्या मागे पिढय़ान्पिढय़ा चालत आलेले अनुभवाचे संचित असते, तसेच निरीक्षण किंवा प्रयोग करून त्यात भरही  घातलेली असते. पण या माणसांजवळ विद्यापीठांच्या पदव्या नसतात, संपर्क किंवा संवादाची कौशल्ये नसतात. म्हणून त्यांचे ज्ञान व अनुभव यांचे मोल होत नाही; त्यांच्याजवळील ज्ञानपरंपरेचा गाभा शोधून त्याची मूल्यवृद्धी करून जग पुढे जात नाही.

अनेकदा तर, आपले ज्ञान आपल्यासोबत नष्ट झाले तरी चालेल, पण ते मी कोणाला देणार नाही, या दुराग्रहामुळे त्या व्यक्तीसोबत ते ज्ञानही नष्ट होते. पिढीजात मिळणाऱ्या ज्ञानाची परंपरा जिवंत ठेवून जनसामान्यांच्या हितासाठी तिचा उपयोग केला, तर आधुनिक विज्ञानाला हेवा वाटावा असे काम त्यातून उभे राहू शकते. एकविसाव्या शतकाला भेडसावणाऱ्या एका गहन प्रश्नाच्या बाबतीत ते कसे उपयुक्त ठरले आहे याचे उदाहरण आपण पाहू या.

पाण्याचे नियोजन हे या शतकापुढील सर्वात गंभीर आव्हान आहे. पाणीटंचाई व सांडपाण्याची विल्हेवाट या दोन्ही समस्या दिवसेंदिवस अधिकच उग्र होत आहेत. पाण्याच्या टंचाईमुळे शहरे रिकामी करावी लागणे किंवा पाण्यावरून दंगे होणे या बाबी आता कथाकादंबऱ्यांचा नव्हे, तर वास्तवाचा भाग बनल्या आहेत. सांडपाण्याचे नियोजन अयशस्वी ठरल्यामुळे गंगा-यमुना या आपल्या परमपवित्र नद्या सांडपाण्याची गटारे बनून राहिल्या आहेत. या पाश्र्वभूमीवर पारंपरिक ज्ञानावर आधारित राजस्थान व कोलकाता येथील यशस्वी पण अप्रसिद्ध प्रयोग आपल्याला नवी दृष्टी देऊ शकतात.

वाळवंटात ओअ‍ॅसिस

वर्षभरात केवळ पाच-दहा इंच पाऊस पडणाऱ्या राजस्थानमध्ये पारंपरिक ज्ञान व तंत्रांचा वापर करून पाण्याच्या व्यवस्थापनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे, जी अनेक शतकांपासून आजपर्यंत कार्यरत आहे. पावसाचा प्रत्येक थेंब वाचवून तो जमिनीत व्यवस्थित जिरवण्यासाठी तिथे विविध प्रकारच्या विहिरी व तलाव बांधण्यात आले आहेत. त्यातून पेयजलासोबत शेतीचीही गरज भागते. काही ठिकाणाची शेती इतकी समृद्ध आहे की तीत राबण्यासाठी पंजाबातून मजूर मागवावे लागतात. अनुभवातून शहाणे झालेले येथील समाजमन इतके कमालीचे जलसाक्षर आहे की पाण्याचा थोडासाही अपव्यय हे इथे पाप मानले जाते. पाणी ही सार्वजनिक संपत्ती आहे, क्रयविक्रयाची बाब नाही, असे मानल्यावर सामूहिक जलस्रोतांचे व्यवस्थापन महत्त्वाचे ठरते. जलस्रोतांची निर्मिती, देखरेख, त्यांचे प्रदूषणापासून संरक्षण व संचित पाण्याचा सार्वजनिक हितासाठी योग्य विनियोग ही सर्व कामे अतिशय सक्षमपणे अशिक्षित म्हणविल्या जाणाऱ्या स्थानिक जाती/ व्यक्ती करतात. सुप्रसिद्ध पर्यावरणतज्ज्ञ अनुपम मिश्र यांनी त्यांच्या ‘आज भी खरे हैं तालाब’ आणि  ‘राजस्थान की रजत बूंदे’ (दोघांचे प्रकाशक ‘गांधी शांती प्रतिष्ठान’) या दोन अप्रतिम पुस्तकांतून राजस्थानमधील पारंपरिक जलसंधारणशास्त्राचा संपूर्ण पट उलगडून दाखविला आहे. अतिशय कमी खर्चात केवळ स्थानिक साधनसामग्री, अनेक पिढय़ांची निरीक्षणे व प्रदेशाशी एकरूप झालेले कसबी कारागीर यांच्या मदतीने जल साठविण्याचे किती तरी प्रकार राजस्थानमध्ये आजही प्रचलित आहेत- एखादा माणूस मोठय़ा मुश्किलीने उतरू शकेल अशा अरुंद विहिरी, घरच्या उपयोगासाठी बांधलेली भूमिगत ‘टाकी’, आयताकृती पायऱ्यांची महिरप असणारी ऐसपस ‘बावडी’ (पायविहीर), मातीचे चेकडॅम ‘जोहड’, टेकडीच्या उतारावर पाणी साठवून शेती करण्यासाठी विणलेले ‘खादीन’चे जाळे, वरच्या अंगाला असलेल्या तलावातील झिरपणारे पाणी टिपणारी ‘झालर’, तीन-चार बिघ्यांपासून कित्येक किलोमीटर क्षेत्रात पसरलेले विविध प्रकारचे विस्तीर्ण तलाव.. पारंपरिक विज्ञान-तंत्रज्ञान- संस्कारांच्या बळावर या वाळवंटी प्रदेशात मानव व पशुजीवन शेकडो वर्षे तगून आहे.

अशिक्षितांची किमया

पाण्याच्या व्यवस्थापनातील दुसरा निकडीचा प्रश्न आहे शहरातील प्रदूषित सांडपाण्याचे शुद्धीकरण. कोलकाता महानगरातून दररोज ७५ कोटी लिटर सांडपाणी व प्रदूषित पाणी बाहेर फेकले जाते, ज्यावर प्रक्रिया करण्यासाठी एकही आधुनिक संयंत्र बसविलेले नाही. या साऱ्या पाण्याचे होते तरी काय? हे सर्व पाणी पूर्व कोलकात्यातील पाणथळ भागात जमा होते. हा सारा भूभाग मिठागरे आणि भरतीचे पाणी मिसळल्यामुळे खारट झालेल्या नद्या यांनी बनलेला आहे. शहरातून आलेल्या घाण पाण्याचा या पाणथळ भागात प्रवेश होण्यापूर्वी त्याला झडपा बसविलेल्या खड्डय़ांतून नेले जाते. तिथे त्यातील गाळ खाली बसतो व वरचे नितळ पाणी पाणथळ भागात सोडले जाते. या दोन भागांतील पाण्याची सरमिसळ होऊ नये व पाणथळ भागातील मासे घाण पाण्यात जाऊन नष्ट होऊ नयेत यासाठी त्या दोघांच्या मध्ये ‘फिश ट्रॅप’ बसविला आहे. खड्डय़ातील घाण पाणी स्वच्छ होण्याची प्रक्रिया ही वरकरणी सोपी, पण अतिशय गुंतागुंतीच्या जैवरासायनिक व सूक्ष्मजीवीय अभिक्रियांवर आधारलेली आहे. प्रथम या पाण्यातील गाळ खाली बसतो. तेथील विशिष्ट पर्यावरणामुळे खड्डय़ातील पाणी काहीसे कोमट असते. त्यात वाढणारे विशिष्ट प्रकारचे शैवाल (Algae) व अन्य वनस्पती, पाण्यात व वनस्पतीत वाढणारे जिवाणू व प्राणवायू यांच्या संयोगाने गाळातील घातक रसायनांचे विभाजन होते व त्यांचे रूपांतर निर्धोक रसायनात होते. सूक्ष्मजीव व वनस्पती सांडपाण्यातील अत्यंत घातक जड धातू (heavy metals) व फॉस्फेट शोषून घेतात, नायट्रेटचे रूपांतर करतात. हळूहळू खड्डय़ातील गढूळ पाणी निवळू लागते. त्यानंतर सूर्यप्रकाश त्यात प्रवेश करतो व सर्व प्रक्रियेला वेग येतो. सरतेशेवटी २० दिवसांत गाळाचे रूपांतर मत्स्यान्नात होते. पुढच्या टप्प्यात या मत्स्यान्नाचा उपयोग करून मोठमोठय़ा टाक्यांतून (स्थानिक भाषेत भरींतून) माशांची पदावार केली जाते. स्वच्छ झालेल्या पाण्यावर भात व भाजीपाला पिकविला जातो व ते पाणी पुढे समुद्रात सोडले जाते. वर्षांकाठी १०,००० टन मासे व कोलकाता बाजारातील ४०-५० टक्के भाजी या पाणथळ भागात तयार होतात. आजही कोलकात्यात भात आणि मासे अतिशय स्वस्तात मिळतात, त्यामागील रहस्य हे आहे. या अन्नात कोणत्याही घातक रसायनांचा लवलेशही नाही याची ग्वाही जादवपूर विद्यापीठ आणि राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने वारंवार दिली आहे.

हे आखूडिशगी बहुदुधी तंत्रज्ञान शोधून काढणारे संशोधक अमेरिकेत किंवा आयआयटीत प्रशिक्षित झाले नव्हते. या परिसरात राहणारे अशिक्षित शेतकरी व पिढीजात मासेमारी करणारे कोळी यांनी हे तंत्रज्ञान शोधून काढले व त्यांच्या सहकारी संस्था गेली अनेक दशके ते यशस्वीरीत्या राबवीत आहेत. आज त्या परिसरात कित्येक एकरांवर जैवविविधतेने समृद्ध मुदियाली निसर्गोद्यान डौलाने उभे आहे, त्याचे श्रेयही याच सहकारी संस्थांना आहे. त्यांच्या कामामागील विज्ञान हे डॉ. ध्रुवज्योती घोष या वैज्ञानिकांनी तीन दशकांपूर्वी शोधून काढले. कोलकात्याच्या विज्ञानप्रेमी भद्रजनांना मात्र ‘आपल्या महानगराचे ‘यकृत’ या ‘अज्ञजनां’मुळे तंदुरुस्त आहे’ याचे भान अजूनही आलेले नाही.

पाण्याची समस्या आधुनिक काळाची असली तरी ‘उदक चालवावे युक्ती’ हे शहाणपण आपल्या पूर्वजांजवळ होते. आता आपण ते शोधून त्याला आधुनिक रूप द्यायचे की फक्त ‘जुने ते सोने’ मानून गप्प बसायचे हा निर्णय सर्वस्वी आपलाच!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 23, 2018 1:26 am

Web Title: new technologies in wastewater treatment
Next Stories
1 आयुर्वेद : आव्हाने व शक्याशक्यता
2 आयुर्वेद : एकविसाव्या शतकासाठी
3 आयुर्वेद : विज्ञान की भाकडकथा?
Just Now!
X