19 February 2019

News Flash

अथा तो ज्ञान जिज्ञासा

आपल्याकडे विज्ञान-तंत्रज्ञान म्हणजे काहीतरी ‘लई भारी’ असा समज आहे.

प्रतिनिधिक छायाचित्र

आपल्या जगण्यात, जगाकडे पाहण्याच्या आपल्या दृष्टिकोनात विज्ञान-तंत्रज्ञानाविषयीचं आपलं भान हा मोठा भाग असतो.. हे भान किंवा विज्ञानाचं तत्त्वज्ञान कोणतं, याची चर्चा उपस्थित करणारी ही नवी लेखमाला! तिचा पहिला लेख अर्थातच विषयप्रवेशाचा; पण ‘माहिती’ किंवा ‘उत्तरं’ मिळवणं हे इथं अंतिम ध्येय नसून विचारप्रवृत्त होण्याला महत्त्व आहे, हेही सांगणारा..

वेदांतसूत्राची सुरुवात होते ती या शब्दांनी – ‘अथा तो ब्रह्मजिज्ञासा’ – चला आपण ब्रह्म (अंतिम सत्य) समजावून घेऊ या! यातील सत्य हे सूक्ष्म, आध्यात्मिक पातळीवरचे आहे. ते समजून घेण्याची ज्यांना गरज वाटते ते त्यांनी समजून घ्यावे. पण ज्यांना स्थूल, भौतिक जगाला जाणून घेण्याची आस आहे किंवा जाणून घेण्याची, ज्ञाननिर्मितीची प्रक्रिया काय आहे याविषयी कुतूहल आहे त्या सर्वाचे या सदरात स्वागत! चला, आपण विज्ञान म्हणजे काय, भौतिक जगाविषयीचे ज्ञान कसे निर्माण होते, त्याचे उपयोजन कसे केले जाते, त्यातून नवे प्रश्न कसे निर्माण  होतात व त्यांच्या सोडवणुकीसाठीसुद्धा विज्ञान किंवा वैज्ञानिक पद्धत कशी उपयुक्त ठरते हे समजून घेऊ या.

आपल्याकडे विज्ञान-तंत्रज्ञान म्हणजे काहीतरी ‘लई भारी’ असा समज आहे. महाविद्यालयीन शिक्षणासाठी ‘विज्ञान’ किंवा ‘तंत्रज्ञान’ शाखा निवडणारे म्हणजे हुशार लोक (इतर जणू मठ्ठ!) आयआयटीसारख्या संस्था, सरकारी किंवा बहुराष्ट्रीय संस्थांच्या प्रयोगशाळांतून निर्मिले जाते तेच खरे विज्ञान किंवा तंत्रज्ञान (उपयोजित विज्ञान) असे गैरसमजही त्यातून फोफावतात. खरे तर आपल्या जगण्याशी संबंधित सर्व  क्रिया या वैज्ञानिक नियमांनुसार घडत असतात. श्वास घेण्यापासून ते मोबाइल वापरण्यापर्यंत सर्व क्रियांमध्ये आपण वैज्ञानिक तत्त्वाचा किंवा तंत्रज्ञानातील शोधाचा वापर जाणता-अजाणता करीत असतो. तंत्रज्ञानाचा वापर करत असताना त्याच्या औचित्याबद्दल आपल्याला काही प्रश्न पडतही असतात. (उदा. तासन्तास मोबाइलवर ‘पडीक’ राहणे योग्य आहे का? बोटांचा वापर फक्त कीबोर्डवर करणाऱ्या पिढीचे भवितव्य काय?) पण ते आपण स्वतच्या किंवा इतरांच्या समोर उच्चारत नाही. या लेखमालेच्या निमित्ताने आपण सर्व मिळून असे अनेक प्रश्न विचारू व त्यांची उत्तरे सर्व मिळून शोधू. मला स्वतला पडलेले काही प्रश्न मी तुमच्यासमोर मांडतो :

विज्ञान म्हणजे काय?  विज्ञानाचा आशय म्हणजे तरी काय? तो नेहमीच प्रागतिक व स्वयंपूर्ण असतो की विज्ञानाची निर्मिती करणाऱ्यांच्या पूर्वग्रहांचे- मूल्यांचे रंग त्यावर चढत असतात? विज्ञानाची पद्धत म्हणजे नेमकी काय? सत्य शोधण्याची किंवा वास्तव जाणून घेण्याची ती एकमेव पद्धत आहे का? तिचे सामर्थ्य नेमके कशात आहे व तिच्या मर्यादा कोणत्या? वैज्ञानिक निरीक्षणे करताना पूर्णपणे तटस्थ राहणे शक्य आहे का?

आजच्या साऱ्या शोधांचे बीज हिंदू धर्मग्रंथात आहे हे खरे आहे का? पुष्पक विमान, प्लास्टिक सर्जरी (संदर्भ : गणेश जन्म), क्लोनिंग (संदर्भ : एका थेंबापासून हजारोंची निर्मिती सांगणाऱ्या पुराणकथा), टेस्ट टय़ूब बेबी (संदर्भ : मानवी शरीराबाहेर गर्भधारणा झाल्याच्या कितीतरी ऋषींच्या जन्मकथा) या साऱ्या गोष्टी आपल्या पूर्वजांनी शोधल्या होत्या का? मग त्या लुप्त कशा झाल्या?

एवढे मोठे शोध पूर्वी लागले नसले तरी आपले जे सांस्कृतिक संचित आहे; उदा. शेती, आहार-विहार-आरोग्य यांबद्दलच्या पारंपरिक समजुती किंवा ज्ञान यांना वैज्ञानिक आधार आहे का? उदा. पूर्वीच्या काळी पाऊस किती पडणार, केव्हा येणार, याबद्दल पशुपक्षी, किडे यांच्या हालचाली, वाऱ्याच्या दिशांवरून शेतकरी काही ठोकताळे बांधायचे, किंवा अमुक ऋतूत अमुक अन्न खाल्ल्यास ते बाधते अशा समजुती होत्या. त्यांत काही तथ्य आहे का? आयुर्वेद, लोकविद्या- उदा. पारंपरिक वस्त्रविद्या, धातुशास्त्र. भारतीय शास्त्रांची काहीतरी उपयुक्तता होती, हे खरे का? त्यांचा वैज्ञानिक आधार कोणता? आयुर्वेदातील पंचमहाभूते, त्रिदोष अशा कल्पना व आधुनिक आरोग्यशास्त्र यांच्यात काहीच सारखेपणा दिसत नाही. पण आयुर्वेदातील काही औषधींची उपयुक्तता आधुनिक शास्त्रीय निकषांवर सिद्ध झालेली आहे, याचा अर्थ काय?

तंत्रज्ञान हे नेहमी तटस्थ असते का व त्याचा वापर-गैरवापर केवळ करणाऱ्यावर अवलंबून असतो का? काही तंत्रज्ञान मुळातून समाज किंवा मानवजात किंवा विश्व यांच्यासाठी घातक असणे शक्य नाही का? (उदा. संहारक अस्त्रे). तसेच काही तंत्रज्ञान विशिष्ट परिस्थितीत योग्य असले तरी काही विशिष्ट परिस्थितीत ते अयोग्य किंवा हानिकारक असू शकेल का? तंत्रज्ञानाची उपयुक्तता जर स्थल-काल-परिस्थितीवर अवलंबून असेल तर मग भारताच्या आजच्या परिस्थितीत ‘समुचित तंत्रज्ञान’ कोणते असू शकते?

विज्ञान-तंत्रज्ञानावर हक्क कोणाचा असतो? कोणाचा असायला हवा? स्वामित्व हक्क (पेटंट) ही नक्की काय गोष्ट आहे? त्यामुळे संशोधकांच्या हक्काचे रक्षण होते की कंपन्यांच्या? यात सर्वसामान्य व्यक्तीच्या हक्कांना कोठे अवकाश आहे का? विज्ञान किंवा तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात कोणत्या विषयावर संशोधन व्हावे हे कोण व कसे ठरवितात? जे शोध लागतात त्यांच्यापैकी किती समोर येतात व किती नष्ट होतात? त्याबद्दल निर्णय कोण घेतात? प्रयोगशाळेपासून ग्राहकाच्या घरापर्यंत तंत्रज्ञान कसे पोहचते? सर्वसामान्य जनतेच्या दृष्टीने काही महत्त्वाचे शोध लागतात. उदा. गवताची झोपडी अग्निरोधक करणे सहज शक्य आहे; पण ते कधीच त्यांच्यापर्यंत पोहचत नाहीत. याउलट समाजाला घातक पण काही लोकांना भरपूर लाभ मिळवून देणारे तंत्रज्ञान (उदा. गर्भिलग परीक्षेसाठी घरोघरी जाणाऱ्या सोनोग्राफी व्हॅन्स ) वेगाने पसरते. यामागील रहस्य कोणते?

पर्यावरणशास्त्र हे विज्ञान आहे का? त्याची विज्ञान-तंत्रज्ञानाबद्दल काय भूमिका आहे? त्याचे निष्कर्ष बंधनकारक का मानले जात नाहीत?

असे प्रश्न पडणे ही मनाच्या आरोग्याची खूण आहे. आपल्याला सर्वानाच असे अनेक प्रश्न नेहमी पडत असतात. पण त्यांची उत्तरे कशी शोधावी हे आपल्याला माहीत नसते. शिवाय आपल्या  ‘गप्प बसा’ संस्कृतीत जास्त प्रश्न विचारणे फारसे चांगले  मानले जात नाही. अशा माणसाला देण्यासाठी ‘दीडशहाणा’, ‘अतिचिकित्सक’ अशी बिरुदावली इतरांकडे तयारच असते. वर्गात प्रश्न विचारणारा विद्यार्थी शिक्षकांना आवडत नाही. राज्यकारभाराविषयी प्रश्न विचारणारे नागरिक राज्यकर्त्यांना चालत नाहीत. समाजातील रूढ धारणा, परंपरा यांना प्रश्नांकित करणारे विचारक-कार्यकत्रे यांना तर आपण थेट देश-संस्कृतीद्रोही, विकासाचे विरोधक ठरवून मोकळे होतो. पण एकविसाव्या शतकाची आव्हाने पेलायची असतील तर आपल्याला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात ‘नवनिर्मिती’ करण्याशिवाय पर्याय नाही. नवनिर्मिती करायची तर ‘जरा हटके’ (आउट ऑफ बॉक्स) विचार करायलाही पर्याय नाही.  असा विचार करण्याची पहिली पायरी आहे- नवनवे प्रश्न मनात तयार होणे.

प्रश्न विचारण्याची प्रक्रिया कधीच थांबत नाही. अखेरीस ती तिला प्रेरणा देणाऱ्या गोष्टीलाच प्रश्नांकित करते. आपणही इथे विज्ञानाला देव्हाऱ्यात न बसवता त्याची व त्याच्या निर्मात्यांचीही उलटतपासणी करणार आहोत. ही मुक्त चर्चा आहे. इथे कोणालाही अटकाव नाही, कोणताही प्रश्न निषिद्ध नाही. आधुनिक विज्ञानाचे समर्थक-विरोधक, विवेकवादी-प्रारब्धवादी सर्वानी या विचारपीठावर वाद-विमर्शासाठी एकत्र यावे, प्रश्न विचारावे, उत्तरे शोधावी. कारण प्रश्न विचारणे, इतकेच नाही तर त्यासाठी वाद घालणे ही आपली भारतीयांची परंपरा आहे. त्यानुसार  प्रश्न केवळ ब्रह्म जाणण्यासाठीच नव्हे, तर ऐहिक जीवन समृद्ध करण्यासाठीही जाहीररीत्या विचारले जात. प्राचीन काळातील आयुर्वेदातील तज्ज्ञांच्या परिषदा असोत की एकविसाव्या शतकात एखाद्या विकास प्रकल्पाच्या सामाजिक- पर्यावरणीय प्रश्नांवर आयोजलेली जनसुनवाई असो, या सर्वामागे एकच प्रेरणा आहे- सत्यशोधनाची. तेच ध्येय समोर ठेवून पाक्षिक सदरलेखनाच्या मर्यादेत जेवढे आदानप्रदान होईल, जेवढा वाद-संवाद करता येईल तेवढे आपण नक्कीच करू.

या लेखमालेतून आपल्याला फारशा प्रश्नांची उत्तरे गवसली नाहीत, पण बरेच नवे प्रश्न निर्माण झाले तरी तिचे सार्थक होईल. कारण प्रश्न विचारणे, योग्य प्रश्न विचारणे हे वैज्ञानिक पद्धतीतील पहिले पाऊल आहे. विज्ञानाची पद्धत चोखाळली तर या प्रश्नांची उत्तरे शोधायलादेखील आपल्याला जड जाऊ नये. तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची मी वाट पाहत आहे.

लेखक समाज-विज्ञान यांच्या आंतर संबंधांचे अभ्यासक व कार्यकर्ते आहेत. ई-मेल :

रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ  ravindrarp@gmail.com

First Published on January 6, 2018 2:16 am

Web Title: ravindra rukmini pandharinath article on science and technology