News Flash

काळझोप आणि धोक्याचे इशारे

सृष्टीवर ओढवलेल्या अरिष्टाचे कारण विज्ञान नसून विकासाची चुकीची संकल्पना व त्यातून बनलेली आपली जीवनशैली हे आहे.

|| रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ

सृष्टीवर ओढवलेल्या अरिष्टाचे कारण विज्ञान नसून विकासाची चुकीची संकल्पना व त्यातून बनलेली आपली जीवनशैली हे आहे. प्रश्न हा की, वैज्ञानिकांनीच केलेले हे निदान आपण मान्य कधी करणार?

मानवाने अल्प काळात किती प्रगती केली, सर्व सृष्टीला कसे अंकित केले, याबद्दल आपण मोठय़ा गर्वाने बोलत असतो. पण सृष्टिव्यवहाराचे सम्यक ज्ञान असणारा खरा वैज्ञानिक कधीही अशा वल्गना करणार नाही. कारण तो हे जाणतो की, दोन लाख वष्रे वय असणारा मानव गेल्या दहा हजार वर्षांतच पृथ्वीवर काही पराक्रम गाजवू शकला. शेतीपासून ते अण्वस्त्रांपर्यंत सारे शोध याच काळात लागले. यात जसे त्याचे श्रेय आहे, तसेच सृष्टीचेही. दहा-अकरा हजार वर्षांचा हा काळ पृथ्वीवरील हवामानाच्या दृष्टीने गेल्या चार लाख वर्षांतील सर्वात स्थिर असा काळ राहिला आहे. त्याला ‘ओलोसीन’ काळ असे म्हणतात. या काळात पृथ्वीवर हिमवादळे, प्रचंड उल्कापात असे उत्पात घडले नाहीत. प्रचंड प्रमाणावर जीवसृष्टीचा नाश झाला नाही. म्हणूनच मानव  प्रगती करू शकला.

अखेरची घरघर

पण या नेत्रदीपक प्रगतीला अखेरची घरघर लागली आहे व त्याला जबाबदार आहे मानवाचा अविवेक व हव्यास. विज्ञान क्षेत्रातील अनेक नोबेलविजेते व ‘युनियन ऑफ कन्सन्र्ड सायंटिस्ट्स’ यांनी १९९२ साली संयुक्तरीत्या मानवजातीला उद्देशून एक इशारेवजा खुले पत्र लिहिले. ‘मानवी हस्तक्षेपामुळे पर्यावरणावर अतिशय गंभीर परिणाम होत असून त्यामुळे हवामानबदल व जैवविविधता धोक्यात आली आहे. भावी अरिष्ट टाळण्यासाठी पृथ्वीचे नेतृत्व करणाऱ्यांनी या धोक्याची दखल घेऊन आपली धोरणे त्वरित बदलावी,’ असे आवाहन त्यात करण्यात आले होते. त्यानंतर २५ वष्रे उलटली. परिस्थिती सुधारण्याऐवजी अधिक गंभीर झाली. म्हणून २०१७ साली १५,००० शास्त्रज्ञांनी पृथ्वीच्या रहिवाशांवर ‘दुसरी नोटीस’ बजावून त्यांना सांगितले की, आपण पृथ्वीच्या सहनशक्तीच्या मर्यादा ओलांडण्याच्या खूप जवळ आलो आहोत. आपल्याला राहण्यासाठी एकच पृथ्वी मिळाली आहे; तिला जपा.

परिस्थिती खरेच इतकी गंभीर आहे का? जगभरातले शासनकत्रे व अनेक सुशिक्षित व्यक्ती यांना वाटते की, ही शास्त्रज्ञ मंडळी उगाचच निराशेचा सूर आळवत आहेत. वैज्ञानिक प्रगतीमुळे काही प्रश्न निर्माण झाले असतील तर त्यावर विज्ञान उत्तर शोधेल की. काहींच्या मते पर्यावरणविज्ञान हे अलीकडचे विज्ञान आहे. ते काही भौतिक किंवा गणितासारखे अचूक शास्त्र नाही. त्यामुळे त्या क्षेत्रातील व्यक्तींचे म्हणणे फार गंभीरपणे घेण्याची गरज नाही.   खरे तर मानवी अस्तित्वाला निर्माण झालेले धोके पर्यावरणविज्ञानाने समोर आणले असले तरी ते आंतरशाखीय विज्ञान असल्यामुळे त्याच्या संशोधनात अनेक विद्याशाखांचा समावेश असतो. म्हणूनच वर दिलेल्या दोन्ही उदाहरणांत इशारा देणाऱ्या वैज्ञानिकांत फक्त पर्यावरणतज्ज्ञ नसून सर्व विद्याशाखांचे प्रतिनिधी होते. सृष्टीवर ओढवलेल्या अरिष्टाचे कारण विज्ञान नसून विकासाची चुकीची संकल्पना व त्यातून बनलेली आपली जीवनशैली हे आहे. त्या समस्येचे उत्तर विज्ञानाने केव्हाच दिले आहे व तेच हे वैज्ञानिक सांगत आहेत. प्रश्न हा आहे की, आपण या बाबतीत गंभीर आहोत की नाही?

पृथ्वीवरील मानवाचे भवितव्य नऊ मर्यादांवर अवलंबून आहे, त्यापकी तीन मर्यादा तर आपण २००९ सालीच ओलांडल्या आहेत. यातील एकेका मर्यादेचे उल्लंघन म्हणजे परतीची वाट नसणाऱ्या विनाशाकडे वाटचाल करणे होय. या अरिष्टामागे वाढती लोकसंख्या, पृथ्वीवरील हरित छत्र व वातावरणातील ओझोनछत्र विरळ होणे, जैवविविधतेचा नाश, शहरांतील मलमूत्र व कारखान्यांची रासायनिक घाण मिसळल्यामुळे मृत झालेल्या नद्या, जमिनीतील सेंद्रियता (कार्बन) लोप पावणे, भूजन्य (उदा. पेट्रोलियम) ऊर्जास्रोतांच्या उधळपट्टीमुळे वाढलेले तापमान अशी बरीच मोठी कारणपरंपरा आहे. पण या सर्वाच्या मुळाशी आहे माणसाने इतर जीवसृष्टीची केलेली कत्तल आणि विकासाच्या नावावर नसíगक संसाधनांची केलेली वारेमाप उधळपट्टी. आपण काही उदाहरणांतून हे समजावून घेऊ.

जैवविविधता आणि विकास

सृष्टीचे जीवनचक्र हे अनेक जीवजंतूंच्या परस्परावलंबनावर आधारित आहे. या शृंखलेतील एखादी कडी निखळली तर सारी शृंखलाच त्यामुळे धोक्यात येते. सुमारे ८०-९० वर्षांपूर्वी अमेरिकेतील सुप्रसिद्ध यलो स्टोन नॅशनल पार्कमधून सर्व कोल्हे नष्ट करण्यात आले. त्यामुळे त्यांचे भक्ष्य असणाऱ्या हरणांची व तृणभक्ष्यी प्राण्यांची संख्या प्रमाणाबाहेर वाढली. त्यांनी तेथील गवत व पाणी संपविले. हीच प्रक्रिया पुढे चालली असती तर खाद्य संपल्यामुळे हे प्राणीही लुप्त झाले असते. सन १९९० च्या सुमारास अभयारण्याच्या अधिकाऱ्यांनी कोल्ह्य़ांना परत आणले. त्यामुळे विस्कटलेला समतोल पुन्हा सांधला गेला. हरणे डोंगरात गेली. गवत, पाणी व सृष्टीचे जुने रूप पुन्हा परतले. अंटाíक्टकातील व्हेलचे क्रील हे खाद्य आहे. व्हेलची मोठय़ा प्रमाणावर शिकार झाल्यावर क्रीलची संख्या वाढण्याऐवजी कमी झाली. कारण क्रीलचे खाद्य आहे समुद्री प्लावक व प्लावकांना जगण्यासाठी लोह आवश्यक असते व ते त्यांना व्हेलच्या विष्ठेतून मिळते. अशी ही परस्परावलंबी शृंखला आहे. म्हणून जैवविविधता हा पर्यावरणसंतुलनाचा प्रमुख निकष आहे. सध्या पृथ्वीतलावरील ५० टक्के प्रजाती लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत व त्यापकी दहा टक्के तर कायमच्या लुप्त झाल्या आहेत. उष्णकटिबंधीय जंगलांतून दर वर्षी १४,००० ते ४०,००० प्रजाती लुप्त होत आहेत. (ही २००० सालची आकडेवारी आहे.) थोडक्यात सांगायचे तर मानवी हस्तक्षेपामुळे प्रजाती नष्ट होण्याचे प्रमाण हे नसíगक प्रक्रियेच्या हजार पटीने अधिक आहे. मधमाश्या नष्ट झाल्या तर परागीकरण होत नाही व शेतीचे उत्पादन घटते, हे आपल्याला माहीत आहे. इतर हजारो प्रजातींचे महत्त्व अद्याप आपल्याला कळलेले नाही. त्यामुळे जैवविविधतेच्या नाशामुळे मानव जातीचे नुकसान किती झाले आहे, याची मोजदाद आपल्याला अजून नीटपणे करता येत नाही.

विकास हा सध्या परवलीचा शब्द झाला आहे. विकास म्हणजे केवळ आíथक विकास असे शासनकर्त्यांना वाटते. आíथक विकासाचे इंजिन आहे ऊर्जा. आपण पेट्रोलसारखी भूगर्भातील इंधने किती प्रमाणात वापरतो, हा विकासाचा महत्त्वाचा निकष मानला जातो. ही इंधने हैड्रोजन व कार्बन यांची संयुगे आहेत. ती जाळल्यावर कार्बन डायऑक्साईड निर्माण होतो. वीजनिर्मितीसाठी आपण औष्णिक विद्युत केंद्रे उभारतो. त्यासाठी कोळसा जाळावा लागतो, ज्यातून पुन्हा कार्बन डायऑक्साईड निर्माण होतो. कोळसा मिळविण्यासाठी आपण जंगले नष्ट करतो. वनस्पती आपले अन्न तयार करण्यासाठी कार्बन डायऑक्साईड घेऊन प्राणवायू सोडतात. जंगले नष्ट झाल्यामुळे कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण कमी करण्याचा हा उपायही खुंटतो. कार्बन डायऑक्साईडमुळे हवेतील उष्मा वाढतो. एखाद्या बंद खोलीत खूप माणसे असतील, तर त्यांच्या केवळ उपस्थितीमुळे खोलीत उष्मा जाणवतो. त्याचे कारण तेथील वातावरणात वाढलेले कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण.

आज आपण विकासाच्या नावाखाली जी जीवनशैली स्वीकारली आहे व ज्याचे स्वप्न आपण १२५ कोटी भारतीयांना दाखवीत आहोत, तिची पर्यावरणीय किंमत किती असेल, याची आपल्याला कल्पनाही करता येणार नाही. पूर्वी गावातील लोक शौचासाठी शेतात जात व विष्ठेवर माती पसरत. कालांतराने त्यातील नत्र जमिनीत मिसळून जमीन अधिक समृद्ध होत असे. गांधीजींच्या प्रेरणेने गावात सेप्टिक टाकी असलेले कमीत कमी पाणी लागणारे संडास बांधण्यात आले. त्यांतील विष्ठाही कालांतराने खतात परिवर्तित होऊन जमिनीची सुपीकता वाढविण्यात हातभार लावत होती. आता आपण गाव, शहर सर्वत्र असे संडास बनविले की ज्यातील मला थेट नदीच्या पाण्यात सोडला जातो. भारतातील बहुसंख्य नद्या या मलावाहिन्या झाल्या आहेत. कारखान्यांतील रासायनिक द्रव्येही योग्य प्रक्रिया न करताच नदीत सोडली जातात. त्यामुळे नदीतील पाण्यात वाढणारी जीवसृष्टी धोक्यात आहे. आपली परमपवित्र गंगा ही जगातील पाचव्या क्रमांकाची प्रदूषित नदी आहे व तिचा ६०० किमी प्रवाह हा पर्यावरणीयदृष्टय़ा मृत असल्याचे शास्त्रज्ञांनी जाहीर केले आहे. आपला समुद्र आम्लधर्मी होत आहे. शेतजमिनीचा कस नष्ट होत आहे. पिण्याच्या पाण्यात कीटकनाशके आहेत. राजधानी दिल्लीतील हवा इतकी प्रदूषित आहे की, हिवाळ्यात शाळांना सुट्टी जाहीर करावी लागते. हरित क्रांतीची प्रयोगभूमी असणारा पंजाब कॅन्सरचे माहेरघर झाला आहे.

आणखी किती धोक्याचे इशारे मिळाल्यावर आपली काळझोप उघडेल?

ravindrarp@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 15, 2018 3:12 am

Web Title: science and human lifestyle
Next Stories
1 मानव, निसर्ग आणि विज्ञान
2 मानवाचे अंती एक गोत्र
3 स्त्रीवादाने विज्ञानाला काय दिले?
Just Now!
X