News Flash

प्रस्थापित विज्ञानावरील आक्षेप

आतापर्यंत आपण विज्ञान, तंत्रज्ञान व त्यांच्या समीक्षेसाठी लागणाऱ्या काही संकल्पना समजून घेतल्या.

प्रतिनिधिक छायाचित्र

‘धर्मात हे आधीपासूनच आहे’ किंवा ‘हे असले विज्ञान धर्माला मान्य नाही’ अशा प्रकारचे आक्षेप सर्वच धर्माचे असू शकतात, पण मुद्दा वैज्ञानिकांच्या आक्षेपांचाही आहे. हे मार्क्‍सवादी आणि स्त्रीवादी आक्षेप सविस्तर जाणून घेण्याआधी, विज्ञानाकडे पाहण्याचे तीन दृष्टिकोनही समजावून घेतले पाहिजेत..

आतापर्यंत आपण विज्ञान, तंत्रज्ञान व त्यांच्या समीक्षेसाठी लागणाऱ्या काही संकल्पना समजून घेतल्या. येत्या काही लेखांमधून आपण विज्ञानावरील विविध आक्षेपांची सविस्तर चर्चा करणार आहोत. अर्थात ही केवळ तात्त्विक चर्चा नसेल; तर सर्वसामान्य माणूस, समाज व अखिल सृष्टी यांचे हित कशाने साधले जाईल व रोजच्या जीवनात आपल्याला जाणवणाऱ्या प्रश्नांची उत्तरे कशी सापडतील, या संदर्भात आपण त्याचा विचार करणार आहोत.

वेगवेगळ्या विचारांच्या समर्थकांनी विविध दृष्टिकोनांतून विज्ञानावर आक्षेप नोंदविले आहेत. त्यांचे दोन गटांत वर्गीकरण करता येईल – एक विज्ञानविरोधक (उदा. कट्टर धर्मवादी), तर दुसरे विज्ञान समीक्षक. प्रचलित विज्ञानातील त्रुटी दूर करून ते खऱ्या अर्थाने वस्तुनिष्ठ व जनसामान्यांसाठी हितकारक कसे ठरेल यासाठी झटणारे या दुसऱ्या वर्गात मोडतात. याशिवाय काही समाजशास्त्रज्ञ व तत्त्वज्ञ हे विज्ञानाविषयी काही प्रश्न उपस्थित करतात. उदा. विज्ञानाची अमुकच एक व्याख्या का करावी? विविध प्रकारच्या विज्ञानांचा मेळ का घालू नये? इत्यादी.

आपण सर्वप्रथम या संदर्भात नेहमी वापरल्या जाणाऱ्या काही संज्ञांच्या व्याख्या समजून घेऊ.

विज्ञानवाद (Scienticism)

विज्ञानाचे जे समर्थक विज्ञानाला धर्म मानतात आणि कट्टर धर्मवाद्यांप्रमाणे अतिशय अहमहमिकेने विज्ञानाचे समर्थन करतात, त्यांचे विचार, दृष्टिकोन व कृती यांना उद्देशून ही संज्ञा वापरली जाते. ‘धरण’ विषयावर सिव्हिल इंजिनीअर किंवा आरोग्यविषयक चर्चामध्ये डॉक्टर यांच्याशिवाय इतर कोणीही बोलू नये, अशी ‘मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है..’ भूमिका हे विज्ञानवादी भूमिकेचे उदाहरण म्हणता येईल.

पृथक्करणवाद (Reductionism)

एखाद्या गुंतागुंतीच्या घटना, प्रक्रिया किंवा प्रणालीचा अर्थ तिच्या घटकांच्या व त्यांच्या आंतरक्रियांच्या स्वरूपात समजावून सांगणे. आधुनिक विज्ञानाची दिशा ही स्थूलाकडून सूक्ष्माकडे जाण्याची आहे. साहजिकच जीवशास्त्राचा विचार करताना ते अवयवाकडून उती (टिश्यू) व तेथून पेशी (सेल) अणू-परमाणू या दिशेने जाते; पण मानवी शरीर हे केवळ सर्व पेशींची गोळाबेरीज आहे असे मानणे किंवा अख्खे जंगल म्हणजे फक्तत्यातली झाडेझुडपे, नद्यानाले एवढेच आहे असे मानणे हा झाला पृथक्करणवाद.

समग्रतावाद (Holicism)

कोणतीही व्यवस्था (भौतिक, जैविक, रासायनिक, सामाजिक, आर्थिक, मानसिक, भाषिक इ.) व तिचे गुणधर्म यांच्याकडे केवळ घटकांची गोळाबेरीज असे न बघता समग्रतेने बघावे असा विचार. उदा. जंगल हे त्यातील झाडेझुडपे, नद्यानाले, तलाव, पशुपक्षी, कीटक, खनिजे इ. असंख्य जैविक, पर्यावरणीय व्यवस्था, त्यांचे अंतर्गत व परस्परांशी असणारे संबंध यांचे अजस्र व गतिशील जाळे असते, हा झाला समग्रतावादी विचार.

धर्मवाद्यांचा विज्ञानविरोध

विज्ञानाला विरोध करणारा सर्वात प्रभावशाली गट आहे धार्मिक कट्टरपंथीयांचा. विज्ञानाचा ‘सत्य सांगण्याचा’ दावा चुकीचा आहे, कारण सत्य काय हे फक्तधर्मालाच ठाऊक आहे, असे ते मानतात. ब्रह्मांड, त्यातील पृथ्वी, तिच्यावरील सजीव-निर्जीव कसे अस्तित्वात आले याबद्दल बायबलमध्ये निर्मिती सिद्धान्त (थिअरी ऑफ क्रिएशन) सांगितलेला आहे. त्यानुसार ईश्वराच्या मनात आले व त्याने सहा दिवसांत सर्व सृष्टी रचली. (उदा.- ‘‘ईश्वर म्हणाला – प्रकाश येऊ दे आणि प्रकाश अवतीर्ण झाला’’!) डार्विनने मांडलेल्या उत्क्रांतीच्या सिद्धान्ताने या संकल्पनेला तडाखा बसला. असे असले तरी आजही अमेरिकेतील अनेक ख्रिस्ती शैक्षणिक ग्रंथांमध्ये उत्क्रांतीऐवजी बायबलप्रणीत निर्मिती सिद्धान्त शिकविला जातो. सूर्य पृथ्वीभोवती फिरत नसून पृथ्वी सूर्याभोवती फिरते असा ‘धर्मविरोधी’ सिद्धान्त मांडल्याबद्दल गॅलिलिओला तुरुंगवास भोगावा लागला. केवळ ख्रिश्चन धर्मीयच नव्हे, तर सर्व धर्मातील कट्टरपंथी विज्ञानाच्या विरोधात असतात. अमेरिकेचे अंतराळवीर चंद्रावर उतरले तेव्हा एका ज्येष्ठ हिंदू धर्मगुरूंनी, ‘‘हे सारे बकवास आहे. शंकराच्या कपाळावरील चंद्र सुरक्षित आहे, कोणीही मर्त्य माणूस तिथे पोहोचलेला नाही,’’ असे जाहीर केले होते. आपल्या देशाच्या मनुष्यबळ विकास खात्याच्या राज्यमंत्र्यांनीही, ‘‘आपल्या कोणत्याही धर्मग्रंथात उत्क्रांतीचा उल्लेख नसल्यामुळे आपण उत्क्रांतीचा सिद्धान्त मानू नये व तो पाठय़पुस्तकात शिकवला जाऊ नये,’’ असे विधान केले. ग्रहणाबद्दल शालेय पाठय़पुस्तकात काहीही शिकवले जात असले तरी ग्रहणाच्या दिवशी आपल्या देशात रस्त्यांवर शुकशुकाट असतो व ते सुटल्यावर ‘दे दान सुटे गिराण’चा नारा रस्त्यांवर दुमदुमतो, हे वेगळे सांगायची गरज नाही. असे किती तरी अवैज्ञानिक समज धर्माच्या आधारावर अजूनही जनमानसात टिकून आहेत, कारण ‘विज्ञानावर विश्वास ठेवू नका, धर्मावर ठेवा,’ असे धर्म सांगतो. त्याला खरा धर्म म्हणायचे की नाही, हा प्रश्न वेगळा; पण असा समज बाळगणारे धर्माचा आधार घेतात हे निश्चित! तसेच अध्यात्म व विज्ञान यांचे नाते हाही एक वेगळ्या चच्रेचा विषय आहे.

या भूमिकेचा व्यत्यास म्हणजे ‘सर्व विज्ञान हे धर्मातच सामावलेले आहे’ किंबहुना ‘विज्ञान जे आज सांगते आहे, ते ‘आमच्या’ धर्माने पूर्वीच सांगितले आहे,’ अशी मांडणी. ‘प्राचीन भारतात रस्त्यावरून अनेक रथ (मोटारगाडय़ा) आणि आकाशातून पुष्पकादी विमाने जात होती’, ‘गणपतीचा जन्म हा प्लास्टिक सर्जरीतून झाला’ असे अनेक ‘शोध’ अलीकडच्या काळात लागत आहेत. सायन्स काँग्रेससारख्या विज्ञानाच्या प्रतिष्ठित पीठांवरूनही ते प्रसारित केले जात आहेत व काही राज्यांच्या पाठय़पुस्तकात त्यांचा समावेशही झाला आहे. एकीकडे उत्क्रांतीला विरोध करताना दुसरीकडे विष्णूचे दशावतार म्हणजे ‘उत्क्रांतीची कथा’च आहे, असेही मांडले जात आहे. ऋग्वेद असो, बायबल असो वा कुराण.. यातून आधुनिक विज्ञान शोधण्याचे कार्य विविध देशांमध्ये जोरात सुरू आहे. या सर्व बाबींचा सविस्तर विचार आपण पुढील काही लेखांतून करू.

भांडवलशाही विज्ञान वि. मार्क्‍सवादी विज्ञान

मार्क्‍सवाद हा मानवी समाजाला समजून घेण्याचा एक महत्त्वाचा दृष्टिकोन आहे. विज्ञान हे मानवी प्रतिभा व श्रम यांनी समाजाला दिलेले महत्त्वाचे योगदान आहे, असे मार्क्‍सवाद मानतो. मार्क्‍स व एंगल्स यांनी त्यांच्या सिद्धान्ताला ‘सामाजिक जगाचा वैज्ञानिक अन्वयार्थ’ असे संबोधिले. आपला समाजवाद हा ‘वैज्ञानिक समाजवाद’ आहे असाही अनेक मार्क्‍सवाद्यांचा दावा असतो. त्यावरून मार्क्‍सवादी हे विज्ञानाचे प्रखर व उत्साही समर्थक असल्याचे दिसते; पण ज्या भांडवली अर्थव्यवस्थेत विज्ञानाचा विकास झाला, त्याची मूल्यव्यवस्था व विचाराची चौकट प्रस्थापित विज्ञानाने स्वीकारली, असा महत्त्वाचा आक्षेप मार्क्‍सवाद्यांनी घेतला आहे. भांडवलशाहीप्रमाणे विज्ञानाने समूहाऐवजी व्यक्तिवादाला महत्त्व देणे हे पृथक्करणवादाचे द्योतक आहे, असेही मार्क्‍सवाद मानतो. विज्ञानाचा उपयोग मूठभर भांडवलशहांच्या आर्थिक लाभासाठी न होता सर्वसामान्य जनसमूहांच्या व्यापक हितासाठी तो व्हावा, असा मार्क्‍सवादाचा आग्रह आहे.

स्त्रीवादी समीक्षा

अनेक स्त्रीवादी विचारवंतांनी विज्ञानाची भाषा व आशय यांच्यावर पुरुषप्रधान विचारसरणीचा प्रभाव असल्याची टीका केली आहे. एमिली मार्टिन, रुथ हबार्ड व एव्हेलीन फोकस केलर ही त्यांपैकी काही अग्रगण्य नावे. विज्ञान हे तटस्थ व वस्तुनिष्ठ असल्याचा दावा करत असले तरी त्याच्या गाभ्यात दडलेल्या लिंगभेदाकडे ते दुर्लक्ष करते, असा त्यांचा आरोप आहे. प्रचलित जीवशास्त्र हे पुरुषाच्या शरीराला प्रमाण मानते व स्त्री शरीर हे जणू त्याची बिघडलेली आवृत्ती (अ‍ॅबरेशन) आहे असे मानते;  नैसर्गिक घटना व प्रक्रियांकडे वस्तुनिष्ठपणे न पाहता समाजात प्रचलित असणारे स्त्री-पुरुष भेदांविषयीचे भ्रम बळकट करण्याचे कार्य ते करते, असा दावा या स्त्रीवादी समीक्षकांनी (यातील बहुतेक ख्यातनाम जीवशास्त्रज्ञ आहेत) केला आहे. कारण स्वत: शास्त्रज्ञ हे पूर्वग्रहांपासून मुक्तनसतात, पुरुषप्रधान मूल्यांचा खोल ठसा त्यांच्यावर उमटलेला असतो व तो त्यांच्या वैज्ञानिक कामातही उमटलेला दिसतो, असा त्यांचा आक्षेप आहे व विज्ञानाची या पूर्वग्रहांपासून मुक्तता करणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे.

हे आक्षेप व त्यातून आपल्या मनात उभे राहणारे प्रश्न यांची चर्चा आपण पुढील काही लेखांमध्ये करू.

(३ फेब्रुवारीच्या अंकात ‘सूर्यग्रहणाच्या वेळी चंद्र हा सूर्य व पृथ्वी ह्यंच्या मध्ये आल्यामुळे चंद्राची सावली सूर्यावर पडते’ असे विधान नजरचुकीने आले आहे.  त्याऐवजी चंद्रामुळे सूर्य  झाकला जातो असे म्हणायला पाहिजे. चुकीबद्दल क्षमस्व व ती लक्षात आणून देणाऱ्या जागरूक वाचकांचे आभार ! )

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 17, 2018 2:59 am

Web Title: three way of viewing to understand science
Next Stories
1 वैज्ञानिक पद्धत म्हणजे काय?
2 विज्ञान म्हणजे काय?
3 अथा तो ज्ञान जिज्ञासा
Just Now!
X