X

स्त्री-पुरुष भेद : नैसर्गिक की मानवनिर्मितच?

आपापल्या मनातील पूर्वग्रहांना सुसंगत तेवढेच विज्ञान मांडण्याचा प्रकार अनेक जण करत असतात..

|| रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ

आपापल्या मनातील पूर्वग्रहांना सुसंगत तेवढेच विज्ञान मांडण्याचा प्रकार अनेक जण करत असतात.. ‘स्त्रियांच्या मेंदू’बद्दल दामोरने हेच केले. निरीक्षणालाच ‘निष्कर्ष’ मानायचे आणि त्याचे बहिर्वेशन करून टाकायचे, हेही त्याने केलेच. आपण विचार करताना या चुका टाळायला हव्यात..

अन्य क्षेत्रांच्या तुलनेत विज्ञान-तंत्रज्ञानात स्त्री-पुरुष भेद अधिक प्रमाणावर आहे हे आपण मागच्या लेखात पाहिले. ‘त्यासाठी स्त्री-पुरुषांच्या मेंदूच्या रचनेतील फरक जबाबदार आहे,’ असे काही लोक मानतात. आपण विज्ञानाच्या निकषांवर ही भूमिका तपासून पाहू.

स्त्री-पुरुषांच्या वैज्ञानिक क्षमतांमधील भेद हा नैसर्गिक (म्हणजेच अपरिवर्तनीय) आहे ही भूमिका मानणाऱ्या अनेक व्यक्ती (उदा. मागच्या लेखात उल्लेखिलेला दामोर) आपल्या समर्थनासाठी वैज्ञानिक संशोधनाचे दाखले देतात. असे असताना त्यांची भूमिका पुन्हा विज्ञानाच्या कसोटीवर कशी तपासून पाहणार, हा प्रश्न कोणाला पडू शकतो. या लेखमालेच्या सुरुवातीला आपण हे पाहिले की विज्ञान हा केवळ ‘ज्ञानाचा संचय’ नसून ती एक ‘विचार करण्याची पद्धत’ही आहे. त्यामुळे आपल्या समर्थनासाठी विज्ञानाचे दाखले देणे म्हणजे वैज्ञानिकता नव्हे. विज्ञानाच्या कोणत्याही शाखेत एखाद्दुसऱ्या प्रयोगावरून सरसकट निष्कर्ष काढता येत नाहीत. अनेक वष्रे विविध परिस्थितीत विविध अंगांनी अनेक वैज्ञानिकांनी विषयाचा वेध घेतल्यावर हळूहळू त्या प्रश्नावर सर्वसाधारण एकमत तयार होते. अर्थात कोणत्याही विषयावर अंतिम निष्कर्ष असा नसतोच, कारण आजचा निष्कर्ष भविष्यात बदलण्याची शक्यता असतेच. विज्ञानाची हीच गंमत आहे आणि ताकदही. हे लक्षात न घेता आपल्या मनातील पूर्वग्रहांना सुसंगत तेवढेच विज्ञान मांडणे हे खरे विज्ञान नव्हे, हे तर कृतक-विज्ञान किंवा छद्म-विज्ञान!

मेंदूचा आकार आणि बुद्धिमत्ता

स्त्रियांना कमी लेखण्याच्या समर्थनासाठी करण्यात येणारे बहुतेक युक्तिवाद हे अशा छद्म-विज्ञानाचे द्योतक आहेत. मेंदूचे आकारमान व वजन यांचा बुद्धिमत्तेशी संबंध असतो, असे पूर्वी मानले जात होते. स्त्रियांचा मेंदू पुरुषांच्या तुलनेत आकाराने छोटा व वजनाने हलका असतो, हेदेखील खरे आहे. त्याशिवाय मेंदूच्या अंतर्गत रचनेच्या बाबतीत स्त्रिया आणि पुरुष यांच्यात काही लक्षणीय फरक आहेत, हेदेखील सत्य आहे. पण या बाबींचा बुद्धिमत्तेशी काहीही संबंध नाही. मुळात बुद्धिमत्ता कशाला म्हणावे, ही बाब तिचे वेगवेगळे पलू लक्षात घेता एकाच निकषात बांधून टाकण्यासारखी नाही. पण बुद्धिमत्ता कसोटीच्या आधारे मापण्यात येणारा बुद्धय़ांक (आय क्यू) हाच निकष लावला, तरीही मेंदूचा आकार/वजन आणि बुद्धिमत्ता यांचा कारक संबंध (कॉजल रिलेशनशिप) सिद्ध करता येत नाही. सोप्या भाषेत  सांगायचे तर आइन्स्टाइनचा मेंदू सरासरी आकाराचा होता व आतापर्यंतचा सर्वात मोठा व जड मेंदू हा ‘जडबुद्धी’च्या मानवाचा होता, एवढे लक्षात ठेवले तरी पुरे. मेंदूच्या वजन-आकारापेक्षा मेंदूचे विविध भाग परस्परांशी कसा संवाद करतात यावर बुद्धिमत्ता अधिक प्रमाणात अवलंबून असते, असे आजचे विज्ञान सांगते. मेंदूच्या रचनेत ‘पुरुषी’ आणि ‘बायकी’ असे भेद आहेत. पण साधारणत: सहा टक्के व्यक्तींचे मेंदू ‘पुरुषी’ किंवा ‘बायकी’ या वर्गीकरणात बसू शकतात. बाकीच्या व्यक्तींमध्ये ‘पुरुषी’ व ‘बायकी’ गुणधर्माचे विविध प्रमाणातील मिश्रण आढळते.

भेद नैसर्गिक की परिस्थितीजन्य?

आपण आता जेम्स दामोरच्या मांडणीचे विश्लेषण करू. मुळात दामोरने हा पत्रमय निबंध का लिहिला? गुगल कंपनीचे धोरण स्त्री-पुरुष समतेचे व विविधतेला प्रोत्साहन देण्याचे आहे. कंपनीत स्त्रियांचे प्रमाण कमी आहे असे जेव्हा तिच्या संचालकांच्या ध्यानात आले, तेव्हा त्यांनी स्त्रियांची सर्व पदांवरील संख्या वाढावी या दृष्टीने आपल्या धोरणाची पुनर्रचना केली. दामोरचे म्हणणे असे की स्त्रिया व पुरुष यांच्या क्षमतांमध्ये मुळातच फरक आहे, जो नैसर्गिक, म्हणून अपरिवर्तनीय आहे. त्यामुळे स्त्रिया आणि पुरुष यांना वेगवेगळ्या प्रकारच्या कामात रस व गती असते. असे असताना स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीला आणून बसवल्याने कंपनीचे नुकसान होईल, शिवाय असे करणे हे विज्ञानविरोधी आहे. आपल्या मांडणीच्या समर्थनासाठी त्याने मानसशास्त्राचे दाखले दिले. उदा. डेव्हिड श्मिट या मानसशास्त्रज्ञाच्या अभ्यासात पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये चेता-अपदशा (न्यूरॉसिस)चे प्रमाण अधिक आढळले. यावरून त्या जबाबदारीच्या पदावर कामे करण्यास लायक नाहीत, असा निष्कर्ष दामोर काढतो. प्रश्न हा आहे की स्त्रियांमध्ये पुरुषांच्या तुलनेत न्यूरॉसिसचे प्रमाण किती जास्त आहे? खुद्द श्मिटच्या मते एकूण फरकापकी फक्त १० टक्के फरक हा स्त्री-पुरुष भेदामुळे आहे; उरलेला ९० टक्के फरक हा सभोवतालचे वातावरण, व्यक्ती-व्यक्तींतील फरक आणि त्या व्यक्तीची वाढ कशी झाली यावर अवलंबून आहे. त्यामुळे त्या आधारावर दामोरने काढलेला निष्कर्ष साफ चुकीचा आहे, असे श्मिट म्हणतो. दामोर सामाजिक क्षेत्रातील एक निरीक्षण घेतो- ‘साधारणत: स्त्रियांना व्यक्तींमध्ये रस असतो, तर पुरुषांना वस्तूंमध्ये.’ दामोर त्याला वैज्ञानिक सिद्धांत कल्पून त्याचे बहिर्वेशन (एक्स्ट्रापोलेशन) करून सांगतो की, पुरुषांना निसर्गानेच वस्तूंवर लक्ष केंद्रित करण्यासाठी ‘घडविले’, किंवा ‘प्रोग्राम केले’ आहे. पुरुषी मेंदू हा ‘व्यवस्थावादी’ असतो तर स्त्रियांचा मेंदू हा ‘अनुभूतीवादी’ असतो. म्हणून गुगलसारख्या कंपनीत-  जेथे वस्तू, संकल्पना यांना महत्त्व असते तिथे- स्त्रियांची भूमिका नगण्यच असणार, किंवा असायला हवी, असा निष्कर्ष तो काढतो. एक तर गुगलसारख्या कंपनीत काम करणाऱ्या स्त्रियांची ‘वस्तू’विषयक काम करण्याची क्षमता पुरुषांच्या तुलनेत कमी आहे, असे कोणीही शास्त्रज्ञ सांगत नाही. शिवाय एवढय़ा जगड्व्याळ कंपनीतील कोणती कामे ‘वस्तू’विषयक आहेत आणि कोणती ‘व्यक्ती’विषयक, हे कसे ठरवायचे? ‘कोडिंग’ करणे हे ‘वस्तू’विषयक मानले, तर आपल्या टीमकडून ‘कोडिंग’चे काम करून घेणे, किंवा कोणत्याही कामासाठी इतरांना प्रोत्साहित करणे, नेतृत्व करणे, नवी दिशा दाखविणे यांचे वर्गीकरण कसे करणार? आयटी कंपनीत कोडिंग करणे, बँकेत रोखीचे व्यवहार सांभाळणे किंवा रासायनिक/औषधी कंपन्यांत रासायनिक पृथक्करण करणे ही कामे स्त्रियांना जमणार नाहीत, असे पूर्वी मानले जायचे. आता स्त्रियांना अशी तीच-तीच, रटाळ कामे चांगली जमतात, असे ‘प्रमाणपत्र’ देऊन पुरुषांना अधिक जोखमीच्या, नेतृत्वाच्या, वरच्या पदावर पाठवायला हवे अशी पुरुषांना सोयीस्कर मांडणी आपली पुरुषी व्यवस्था नेहमीच करीत आली आहे, हे आपण लक्षात ठेवायला हवे.

स्त्रिया व पुरुष यांच्यात भेद आहे हे सर्वमान्य आहे. त्यामागे दोन कारणे आहेत- जीवशास्त्रीय / नैसर्गिक (म्हणून अपरिवर्तनीय) व सामाजिक (म्हणून परिवर्तनीय). दामोर व त्याच्यासारख्या अनेकांची गफलत ही होते की ते सामाजिक घटकांकडे दुर्लक्ष करून हे भेद जीवशास्त्रीय आहेत असा हेका धरतात. असे करताना ते कधी उत्क्रांतीय जीवशास्त्राच्या (इव्होल्यूशनरी बायॉलॉजी) क्षेत्रातील एखादी गोष्ट उचलतात आणि ती सरसकट सामाजिक शास्त्रांना लावून मोकळे होतात. उत्क्रांतीच्या अनुभवामुळे ‘निसर्गाने पुरुषांचा मेंदू हा सत्ता मिळवणे व टिकविणे, नेतृत्व करणे यासाठी घडविला गेला आहे, तर स्त्रियांची भूमिका ही संगोपनाची राहिल्यामुळे त्यांना तशा दुय्यम भूमिकाच द्यायला हव्या’ असे ते बिनदिक्कतपणे मांडतात.

असे करणे अवैज्ञानिक आहे. कारण वातावरण अनुकूल असल्यास स्त्रिया कोणतेही ‘पुरुषी’ काम सहजतेने करू शकतात असे विज्ञान सांगते. आपण आपला गेल्या १००वर्षांचा इतिहास तपासला तरी ‘बायकांना जे करता येणार नाही’ त्याची यादी कशी कमी होत गेली हे आपल्या ध्यानात येईल. १९९० साली अमेरिकेत उच्च माध्यमिक व  महाविद्यालयीन मुला-मुलींच्या गणितीय क्षमतांची चाचणी घेण्यात आली, तेव्हा त्यांत लक्षणीय फरक असल्याचे हाइड नावाच्या अभ्यासकांना जाणवले. त्यांनी हीच चाचणी २००६ साली पुन्हा घेतली, तेव्हा हा फरक नाहीसा झाला होता.

साधा विचार करा : लहानपणापासून मुलग्यांना क्रिकेटची बॅट किंवा फुटबॉल आणि मुलींना बाहुली खेळायला देणाऱ्या देशाला ‘मुलींना क्रिकेट किंवा फुटबॉल खेळता येत नाही’ असे म्हणण्याचा अधिकार आहे का?

.. जे क्रिकेटचे, तेच गणित-विज्ञान, आयआयटी व संशोधनाचे!

ravindrarp@gmail.com