|| रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हे विज्ञानाचे युग आहे असे म्हटले जाते. हे स्त्री-पुरुष समानतेचे युग आहे असेही मानण्यात येते. आपल्या समाजाची वाटचाल स्त्री-पुरुष विषमतेकडून समतेकडे होताना आपल्याला जीवनाच्या अनेक क्षेत्रात दिसते. परंतु, विज्ञानाच्या क्षेत्रात मात्र स्त्री-पुरुष समता अजून खूपच दूर आहे. या क्षेत्रात स्त्री-पुरुष विषमता किती प्रमाणात आहे, त्यामागील नक्की कारणे कोणती, विज्ञानाचा आशय आणि व्यवहार हा खरोखर िलगभेदनिरपेक्ष आहे का या प्रश्नांची उत्तरे आपण येत्या काही लेखांमधून शोधणार आहोत. हे आपण का करणार याचीही अनेक करणे आहेत – भारतातल्याच नाही तर जगभरातल्या विज्ञानसंस्थांना हे प्रश्न गेल्या अनेक दशकांपासून भेडसावीत आहेत. त्याचप्रमाणे, विज्ञान सर्वभेदनिरपेक्ष आहे अशी त्याची व्याख्या केल्यावर ते खरोखरच तसे आहे की नाही हे तपासून पाहणे हादेखील वैज्ञानिक पद्धतीचाच एक भाग आहे. हा शोध समाजासाठी व विज्ञानाच्या प्रगतीसाठी उपयुक्त तसेच आवश्यकही आहे. शिवाय या प्रश्नांचा शोध घेताना आपण स्वत: वैज्ञानिक डेटा, निरीक्षणे यांचा कसा अर्थ लावतो, सामाजिक प्रश्नांकडे वैज्ञानिक दृष्टीने कसे पाहतो, याचाही कस लागणार आहे.

विज्ञानक्षेत्रात स्त्रिया : वस्तुस्थिती

युनेस्कोच्या २०१८च्या अहवालानुसार जगभरातील वैज्ञानिक संस्थांमध्ये कार्यरत पूर्णवेळ व अंशकालीन संशोधकांमध्ये स्त्रियांचे प्रमाण २८.४ टक्के इतके आहे. विज्ञान-तंत्रज्ञान-अभियांत्रिकी- गणित- वैद्यक (STEMM ) या सर्व क्षेत्रांत स्त्रियांची संख्या वाढते आहे. पण शिक्षण व व्यवसाय या दोन्ही बाबतींत प्रगतीच्या पायऱ्या चढताना पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांची संख्या झपाटय़ाने कमी होताना दिसते. म्हणजे पदवी-पदव्युत्तर शिक्षण-पीएचडी या प्रवासात स्त्रिया कमी-कमी संख्येने दिसतात. तसेच प्राध्यापक, विभागप्रमुख, संचालक, वरिष्ठ वैज्ञानिक, सल्लागार या पातळ्यांवर स्त्रिया अभावानेच आढळतात.

या अल्पसंख्य स्त्री-वैज्ञानिकांची संशोधनाच्या क्षेत्रातील प्रत्यक्ष कामगिरी कशी आहे? ‘जेन्डर गॅप ग्रेडर’ या संस्थेने केलेल्या अभ्यासानुसार महत्त्वाच्या संशोधन-नियतकालिकांत  (‘हायली सायटेड जर्नल्स’मध्ये) नमूद केलेल्या संशोधकांपकी स्त्री-संशोधकांची संख्या २००१ साली सात टक्के होती. सन २०१४ मध्ये हे प्रमाण १३ टक्क्यांपर्यंत वाढले. अर्थात विविध विद्याशाखांमध्ये हे प्रमाण वेगवेगळे आहे- संगणक क्षेत्रात नऊ टक्के, तर सामाजिक विज्ञानात ३१ टक्के. अभियांत्रिकी, गणित व भौतिकशास्त्र  यांत हे प्रमाण अनुक्रमे ११ टक्के, ११ टक्के व चार टक्के इतके आहे.

PLOS Biology या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अध्ययनानुसार जगभरात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या वैज्ञानिक शाखांमध्ये केवळ संख्येच्या बाबतीत स्त्री-पुरुष समता स्थापित होण्यासही अजून बराच काळ जावा लागेल- भौतिकशास्त्र २०० वर्षे, संगणकशास्त्र- २८० वर्षे, गणित – ६० वर्षे आणि शल्यचिकित्सा – ५२ वर्षे.

भारताच्या संदर्भात हे चित्र अधिकच निराशाजनक आहे. संशोधनक्षेत्रातील स्त्रियांचे प्रमाण  फक्त १३.९ टक्के  आहे. सहायक प्राध्यापक ही अध्यापनक्षेत्राच्या शिडीची सर्वात खालची पायरी आहे. देशभरातील १६ आयआयटींतील तीन विभागात या पदावर काम करणाऱ्या स्त्री-पुरुषांचे गुणोत्तर १:१४  इतके विषम आहे. साहजिकच आयआयटी, भारतीय विज्ञान संस्था (आयआयएससी), टाटा मूलभूत संशोधन संस्था अशा ख्यातनाम संस्थांचे संचालकपद, पद्म पुरस्कार, पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागारपद अशा मोक्याच्या ठिकाणी कार्य करणाऱ्या संशोधकांमध्ये स्त्रिया अपवादानेच आढळतात. यावरून आपल्या देशातील विज्ञान-संस्थांमध्ये स्त्री-पुरुष समता पूर्णपणे प्रस्थापित होण्यास आणखी किती शतके जावी लागतील याचा अंदाजच केलेला बरा.

विज्ञानात स्त्रिया मागे का?

या प्रश्नाची दोन लोकप्रिय उत्तरे दिली जातात –

(१) विज्ञान हे निसर्गत:  पुरुषांचे क्षेत्र आहे – त्यामुळे स्त्रियांना विज्ञानात स्थान नाही किंवा विज्ञानाला स्त्री-विश्वात जागा नाही,

(२) विज्ञान हे स्त्री- पुरुषभेदनिरपेक्ष पण गुणवत्ताधारित ज्ञानक्षेत्र आहे.

यांपकी पहिल्या भूमिकेशी सहमत असणारे पुरुष सर्वत्र आढळतात. त्यांच्या मते विज्ञानाच्या क्षेत्रातील स्त्री-पुरुष विषमता हा विषम सामाजिक रचनेचा परिणाम नसून त्याला मेंदूविज्ञान व उत्क्रांतीय मानसशास्त्र या विज्ञानांचा आधार आहे. त्यांच्या मते मुळात स्त्री आणि पुरुष यांच्या मेंदूत फरक आहे. स्त्रियांचा मेंदू आकाराने छोटा व वजनाने हलका असतो. म्हणजेच बुद्धिमत्तेत निसर्गानेच पुरुषाला झुकते माप दिले आहे. मेंदूच्या वेगवेगळ्या भागांना वेगवेगळी काय्रे सोपविलेली असतात. गणिती विश्लेषणाची क्षमता (जी विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी व गणित या क्षेत्रात काम करण्यास आवश्यक असते) स्त्रियांमध्ये कमी आढळते. शिवाय पुरुषांमध्ये गर्भावस्थेपासून टेस्टेस्टेरॉन या संप्रेरकाचे प्रमाण अधिक असल्यामुळे त्यांच्यामध्ये नेतृत्व करण्याची, आक्रमक होण्याची, संघर्ष करण्याची क्षमता अधिक असते. गुगलचा माजी तंत्रवैज्ञानिक कर्मचारी जेम्स दामोर याने या संदर्भात लिहिलेला पत्ररूपी निबंध सध्या चच्रेत आहे  (तो firedfortruth.com या ब्लॉगवर पूर्ण वाचता येईल). त्याच्या मते सर्वसाधारणत स्त्रिया (पुरुषांच्या तुलनेत) सौंदर्य व भावना यांच्या बाबतीत अधिक मोकळ्या असतात, त्यांना गोष्टी किंवा संकल्पना यांपेक्षा व्यक्तींमध्ये अधिक रस असतो.

याउलट पुरुषांना निसर्गानेच वस्तूंवर लक्ष केंद्रित करण्यासाठी ‘घडविले’ किंवा ‘प्रोग्राम केले’ आहे. त्यामुळे मुलगे शाळेच्या दिवसांपासून गणित व अमूर्त संकल्पना यांत रमतात, त्यांना कोणत्याही बाबतीत ‘व्यवस्था’ कशी काम करते हे समजून घेण्यात रस असतो. थोडक्यात म्हणजे पुरुषी मेंदू हा ‘व्यवस्थावादी’ असतो तर स्त्रियांचा मेंदू हा ‘अनुभूतीवादी’ असतो.

दामोर असा संदर्भ देतो की नवजात अर्भकांच्या एका अध्ययनात असे आढळले की मुलगे मोबाइलकडे अधिक वेळ टक लावून बघतात, तर मुली चेहऱ्याकडे लक्ष केंद्रित करतात. उत्क्रांतीच्या अनुभवामुळे निसर्गाने पुरुषांचा मेंदू हा शिकार करणे, जंगलात रस्ता शोधणे यासाठी घडविला. त्यामुळे सत्ता मिळवणे व टिकविणे, नेतृत्व करणे, एखाद्या  क्षेत्रात विशेष ज्ञान प्राप्त करणे या गोष्टी त्यांना ‘निसर्गत:’ जमतात. याउलट, उत्क्रांतीच्या प्रक्रियेत स्त्रियांची भूमिका ही संगोपनाची राहिल्यामुळे त्यांना काळजी घेणे, मैत्री जोडणे-जोपासणे, गप्पा मारणे यांत अधिक मजा वाटते. स्त्रिया इतरांना समजून घेण्यात इतक्या गुंग असतात की, त्यांना सभोवतालचे जग समजून घेण्याची गरजच भासत नाही. ताण घेणे व काळजी करणे हा त्यांच्या स्वभावाचा भाग असल्यामुळे त्यांचे स्वतवरील नियंत्रण अनेकदा सुटते. त्यामुळेच त्या जबाबदारीच्या जागांवर काम करू शकत नाहीत.

दुसरे उत्तरही अनेकांना मान्य आहे. बहुसंख्य वैज्ञानिकांच्या मते विज्ञान स्त्री-पुरुष भेद करत नाही. जी व्यक्त विज्ञानाची कार्यपद्धती समजावून घेऊन तिच्या शिस्तीत काम करते, तिला विज्ञानात प्रगती करण्यात कोणी रोखू शकत नाही. स्त्रिया जर या क्षेत्रात मागे पडत असल्या तर दोष विज्ञानाचा नसून  स्त्रियांची गुणवत्ता कमी पडली असा त्याचा अर्थ होतो. प्रेरणा व कामगिरी या दोन्ही बाबीत मुली मुलांपेक्षा खूप कमी पडतात आणि म्हणून या स्पर्धात्मक क्षेत्रात त्या टिकाव धरू शकत नाहीत. स्वतला कामात झोकून देणे, आपली कामगिरी पणाला लावणे, प्रतिकूल परिस्थितीत चिकाटीने काम करीत राहणे या बाबी स्त्रियांना जमत नाहीत, किंवा त्यासाठी त्या स्वतची  सिद्धता  करत नाहीत. कामात सवलती घेणे, कामाच्या जागी कौटुंबिक समस्यांचा विचार करणे यात त्यांची शक्ती खर्च होते. त्यांनी हे करणे टाळले, आजच्या काळाला आवश्यक गुण अंगी बनवले, तर त्याही  पुरुषांप्रमाणे विज्ञानच्या क्षेत्रात आपला ठसा उमटवू शकतील.

एकूणच, दोन्ही प्रकारचे लोक विज्ञानातील स्त्री-पुरुष विषमतेबद्दल व्यवस्थेला दोष न  देता स्त्रिया पुरुषांच्या तुलनेत कमी पडतात, असे मानतात. काही जण त्यासाठी निसर्गाला जबाबदार धरतात, तर काही  स्त्रियांना. याविषयी विज्ञान काय सांगते हे आपण पुढच्या लेखात पाहू. पण दरम्यानच्या काळात  तुम्हाला स्वतला याबद्दल काय वाटते,  हे नक्की तपासून पहा.

ravindrarp@gmail.com

 

मराठीतील सर्व विज्ञान भान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Women in science
First published on: 07-07-2018 at 03:15 IST