मतदानाचं पवित्र काम सोडलं तर आमचा निवडणुकीशी काहीही संबंध नाही. पण एक नक्की, मतदानाने सगळा अवकाश ढवळून निघतो आणि वास्तव समोर येतं. आपलं ट्रम्पभाऊंचं उदाहरण बघा की. एकदम नादखुळा!

पत्त्यांचा खेळ असो की एखादं प्रोजेक्ट पटकावण्यासाठी कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये लागलेली होड असो- ट्रम्प कार्ड अर्थात हुकमी एक्का हमखास वापरला जातो. मोक्याच्या क्षणी ज्या अस्त्रासह विजयाचं, यशाचं पारडं आपल्या बाजूने फिरतं असा हा एक्का. प्रतिस्पध्र्याला जेरीस आणण्यासाठी केलेल्या धूर्त डावपेचांचा बेरकी आविष्कार. जागतिक महासत्ता असलेल्या शक्तिशाली अमेरिकत सध्या अध्यक्षीय निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. डेमोक्रॅटिक पक्षाच्या हिलरी क्लिंटन यांना शह देण्यासाठी रिपब्लिकन पक्षाने डोनाल्ड ट्रम्प यांना उमेदवारी दिली. हे ट्रम्प कार्ड पक्षाला तारेल आणि अमेरिकेला प्रगतिपथावर नेईल असा आशावाद रिपब्लिकन पक्षाला होता. मात्र ट्रम्प कार्ड बूमरँगप्रमाणे फिरलं आणि पुढे जे घडतंय त्याने ट्रम्प, रिपब्लिकन पक्ष आणि अमेरिकेची जागतिक नाचक्की होतेय हे नक्की. आपण आणि अमेरिका यांच्यातलं अंतर आहे १३,५९५ किलोमीटर. वेळेच्या बाबतीत (आणि फक्त वेळेच्याच) आपण साडेनऊ तास पुढे आहोत अमेरिकेच्या. भौगोलिक अंतर प्रचंड असलं तरी समाजमाध्यमांमुळे ट्रम्प यांचा वाचाळपणा तत्क्षणी आपल्यापर्यंत पोहोचतो आहे. आपल्याकडच्या वाचाळवीर राजकारण्यांना पार भिरकावून देतील अशा आवेशात ट्रम्प सुटलेत. अध्यक्षपदाच्या शर्यतीत गाळात रुतूनही आपल्याकडे व्हायरल झालेल्या ट्रम्प कार्डाचा जुगाड समजून घेणं आपल्यासाठी आवश्यकच.

तुमचे आणि आमचे सामायिक मित्र गुगलजी यांना तुम्ही साद घाला आणि लिहा- डोनाल्ड ट्रम्प कोट. यानंतर जो खंडीभर मजकूर तुमच्यासमोर येईल त्याने तुमच्या मनात राग, कीव, किळस, संताप काहीही येऊ शकतं. आयुष्यात आलेल्या स्त्रिया म्हणजे पत्नी, गर्लफ्रेंड वगैरे. नोकरी, व्यवसाय क्षेत्रांतील समकालीन स्त्रिया, प्रतिस्पर्धी म्हणून समोर असणाऱ्या स्त्रिया, स्वत:ची मुलगी आणि एकुणातच स्त्री वर्ग यांना उद्देशून आयुष्यभर ट्रम्प यांनी जे तारे तोडलेत ते ‘आम्ही लिहू नये आणि तुम्ही ते वाचू नये’ इतक्या खालच्या पातळीवरील आहेत. पुरुषसत्ताक पद्धतीचे (बऱ्या मराठीत त्याला मेल शोव्हिनिझम म्हणतात) पाइक असाल तरी ट्रम्प यांचे उद्गार वाचल्यानंतर कडवे (धान्य नव्हे तीव्र भावना या अर्थी) फेमिनिस्ट व्हाल. एखाद्या देशाच्या आणि त्यातही अमेरिकासारख्या बलाढय़ देशाच्या अध्यक्षपदासाठीचा उमेदवार लंपट आणि छचोर प्रवृत्तीचा असावा आणि त्याविषयी त्यांना यत्किंचितही अपराधी वाटत नाही, हे आणखी काळजीत टाकणारं.

याच ट्रम्पभाऊंना निवडणुकीत यश मिळावं यासाठी परवा राजधानी दिल्लीत हवन आयोजित करण्यात आला होता. त्या हवनाचा धूर नाकातोंडात जाऊनच ट्रम्पसाहेब अशी बेताल वक्तव्यं करतात का, देव जाणे! आपलं म्हणणं मांडण्याची, टीका करण्याची एक सनदशीर पद्धत असते आणि त्यातही शिष्टाचाराचे संकेत पाळले जातात. परंतु उथळ, सवंग प्रसिद्धीचे धनी झालेल्या ट्रम्प यांना त्याची जाणीवच नाही. जगातलं बेस्ट टॅलेंट आपल्या कह्य़ात असावं हा अमेरिकचा रिवाज. परंतु ट्रम्प पडले कर्मठ. ‘मेक्सिकोतून अमेरिकेत ड्रग्सची तस्करी होते, गुंड येतात- गुन्हेगारी वाढीस लागते. हा बाहेरचा कचरा आम्हाला नको. मेक्सिको नव्हे जगातल्या बहुतांशी देशांसाठी आम्ही डम्पिंग ग्राऊंड झालो आहोत’ अशा आशयाचं विधान ट्रम्पभाऊंनी केलं. विविधता अभिमानाने मिरवणाऱ्या अमेरिकेत अचानकच ‘मेक इन अमेरिका’ नारा घुमू लागला. अमेरिकत स्थायिक झालेली बाहेरची मंडळी अस्वस्थ. मी अध्यक्ष झालो तर देशात मुस्लिमांना येण्यावर बंदी घालेन असा दावा केला ट्रम्पभाऊंनी. विद्यमान अध्यक्ष बराक ओबामा ‘आयसिस’ या दहशतवादी संघटनेचे संस्थापक आहेत असं अशक्यही बोलले ट्रम्पभाऊ. न्यूयॉर्कमध्ये आज एवढी थंडी की आपल्याला ग्लोबल वॉर्मिग हवंच असंही ते म्हणाले. माझा आयक्यू एवढा भारी आहे, पण तुम्ही असुरक्षित वाटून घेऊ नका असं वाक्ताडन केलं भाऊंनी. मी भररस्त्यात कोणालाही यमसदनी धाडू शकतो आणि तरीही माझी मतं कमी होणार नाहीत असं अर्वाच्यही बोलून झालंय भाऊंचं.

पिंगट केस, उभट सुरकुतलेला चेहरा आणि सदैव टाळ्याला लावलेली जीभ हा अवतार. रिअल इस्टेट हा भाऊंचा मुख्य व्यवसाय. तसंही आपल्याकडे पण रेती, डम्पर, वाळू, बिल्डर, रिअल इस्टेट या धंद्यांमध्ये असणं मस्ट आहेच की राजकारणी होण्यासाठी. जगावर दाटलेली आर्थिक मंदी, दहशतवादानं घातलेलं थैमान, पर्यावरणीय समस्या याबाबत भूमिका घेण्याऐवजी रंगेलपणात करण्यात आणि त्याच्या सुरम्य मनघडत कहाण्या ऐकवण्यात ट्रम्पभाऊ मश्गूल आहेत. एका बाबतीत भाऊ आदरणीय आहेत आमच्यासाठी- माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. संदर्भ तोडून वक्तव्य दाखवण्यात आलं असं भाऊ एकदाही म्हणालेले नाहीत. बोललो तर बोललो, खापर फोडण्याचे उद्योग नाहीत. भाऊंच्या बेताल वक्तव्यांचं पुस्तक बेस्ट सेलर्स यादीत लवकरच दिसू शकतं. भाऊ एवढं बोलतात तर हिलरीताई मूग गिळून गप्प तर बसणार नाही. त्याही बोलतात, पण भाऊंच्या बोलबच्चनपुढे आवाज नाही दुसरा. बरं हल्ली निगेटिव्ह पब्लिसिटी मॅटर करते. पॉझिटिव्ह अ‍ॅटिटय़ूड शिकवणारे नाक्यानाक्यांवर भेटतात. लवकरच निवडणुकीचा ‘निकाल’ लागेल. निर्णय काहीही लागला तरी भाऊंना रोजीरोटीची भ्रांत नाही.

असंख्य विशेषाधिकार असलेल्या अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठीची ही निवडणूक. उमेदवार जसं विशिष्ट राज्याचे प्रतिनिधित्व करतो तसं घर, संस्कार आणि अप्रोचचंही. बहुतांशी देशांवर मक्तेदारी असल्यानं जगाच्या कानाकोपऱ्यांत या निवडणुकीची चर्चा आहे. अ‍ॅपल, अ‍ॅमेझॉन, गुगल अशा जगभरात लोकप्रिय कंपन्यांची माहेरघरं अमेरिकेत आहेत.  फॅशनपासून संगीतापर्यंत अजब आणि तऱ्हेतऱ्हेचे नाणावलेले ब्रँड याच अमेरिकेत जन्मतात आणि जगभर लोकप्रिय होतात. लष्करी सामर्थ्यांच्या बाबतीत जगात दुसऱ्या क्रमांकावर असणारी आणि जगाला मुबलक प्रमाणात शस्त्रास्त्रांचा पुरवठा करणारी अमेरिका. मध्यपूर्वेवरचं परावलंबित्व नको म्हणून देशातल्या भूमीला खरवडून तेल काढणारी अमेरिका. व्हिएतनाम असो की अफगाणिस्तान- जगात घडणाऱ्या किंवा घडवून आणलेल्या घटनांमागे अमेरिकाच असते. वैयक्तिक स्वातंत्र्य जपणारी अमेरिका, सामान्यांनाही श्रीमंत करणारी अमेरिका. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका हे गारुड विलक्षण आहे. समृद्धी आहे, पण विकृत वखवखलेपण आहे. सवंग प्रसिद्धीचा सोस आहे. मन:शांती नसल्याने गर्दीतही एकलकोंडं झाल्याची भावना आहे. विवेकाची बैठक नसल्याने अश्लाघ्य बोलणं आणि कृती घडतेय. ट्रम्प यांच्या निमित्ताने अमेरिका उघडी पडलेय ती अशी.