दुकान म्हणजे खरेदी-विक्रीचे ठिकाण अशी व्याख्या. पण दुकानदारी म्हटल्यावर जरा गडबड होते. मायाजालावरच्या काही दुकानदाऱ्या अचानक बंद झाल्या. नेटिझन्सला बुचकळ्यात पाडणारी ही घटनाच व्हायरल झाली. कसलं दुकान, कसली दुकानदारी आणि काय हा जुगाड. वाचा सविस्तर.

शीर्षक वाचून गोंधळलात ना. साहजिक आहे म्हणा. माणूस नोकरीत ‘चिकटला’ असं म्हणतात. नोकरीचा मोठा भाऊ धंदा. पण त्याच्याबाबतीत माणूस धंद्यात ‘पडला’ असं म्हणतात. नोकरीत माणूस ‘येथेच छापून येथेच प्रसिद्ध’ असं होऊ शकतं. पण धंद्यात ‘कधी बरकत कधी लॉस’ असं पारडं फिरत राहतं. व्यापारउदीम आणि एकूणच धन, वित्त अशांपासून आम्ही सुरक्षित अंतरावर असतो. पण हा शब्दच्छली व्यापार प्रत्यक्षात समजून घेण्यासाठी निमित्त घडलं (बालपणी आम्ही नया व्यापार खेळात चक्क पेडर रोड विकत घेतलं होतं). मायाजाल अर्थात इंटरनेट वापरणाऱ्या नेटिझन्सची खिन्न मुद्रा पाहून आम्हाला राहवेना. दोन टोरंट साइट्स बंद झाल्या कायमसाठी अशी माहिती विमनस्क नेटिझन्सनी दिली. प्रिन्स ऑफ कोलकाता अर्थात आदरणीय सौरव (दादा) गांगुली यांच्यामुळे आम्हाला टोरँटो माहिती झालं होतं. आता हे टोरंट म्हणजे टोरँटोचं उपनगर समजावं का खुर्द आणि बुद्रुक मॅटर असावं अशा टेक्नो विवंचनेत सापडलो आम्ही. लगेच तंत्रस्वामींचा नंबर फिरवला. अतिव्यस्त असूनही त्यांनी आम्हाला वेळ दिला. व्हायरली जगात राहूनही ‘टोरंट’ ठाऊक नाही म्हटल्यावर त्यांनी आमची शाळा घेतली. कोणाकडून तरी ‘ऐकून घेण्याचा’ रोजचा कोटा पूर्ण झाला. शेवटी शिकणं महत्त्वाचं. त्यांनी उपदेशिल्या वर्णनाचं सार सांगतो.

टोरंट म्हणजे विविध स्वरूपाची माहिती डाउनलोडिंगद्वारे उपलब्ध करून देणाऱ्या साइट्स. टोरंटचं वैशिष्टय़ काय तर अपग्रेडेड सॉफ्टवेअर्स, बाजारात नुकतेच रिलीज झालेले किंवा रिलीजच्या वाटेवर असलेले चित्रपट, गाणी, रिसर्च, कम्प्युटर प्रोग्रॅम्स, डॉक्युमेंट्स, स्क्रिप्ट अशा असंख्य गोष्टी तुम्हाला चकटफू मिळू शकतात. पायरसी धंद्याचा हा गेटवे. बरं हा सगळा व्यवहार दृष्टीआड सृष्टी. जगातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यात बसून ही खरेदीविक्री होऊ शकते. टोरंटवर कंटेन्ट अपलोड करणारी मंडळी असतात. काय खपतं साइटवर यानुसार सीड्स दिले जातात. पुरस्कारासाठी मानांकनं दिली जातात तसं. एकच कंटेन्ट अपलोड करणारे अनेकजण असू शकतात. मग ज्याची प्रत खणखणीत तो हिट होतो. बरं हे सगळंच बेकायदा आणि स्वामित्व हक्क अर्थात कॉपीराइट्सचा उल्लंघन करणारं. म्हणूनच विकसित देशांमध्ये या साइट्सविरोधात प्रशासनाने कठोर नियम केले आहेत. टोरंटची दुकानं बंद पडणं या कारवाईचा परिणाम. बरं टोरंट व्यवहारात पैशाची देवाणघेवाण नसते. पण तुमच्या मशीनसंदर्भात सगळी गोपनीय माहिती टोरंट साइटकडे जाते. कोणीतरी मेहनतीने तयार केलेली कलाकृती ढापून ते तुम्हाला देऊ शकतात. तुमच्या डेस्कटॉप किंवा मांडीसंगणक अर्थात लॅपटॉपवर एक हब तयार होतं. जेणेकरून तुम्ही टोरंटच्या क्लायंट यादीत समाविष्ट होता. एखादा नवा चित्रपट पाहायचा आहे. थिएटरला त्याचे शो संपलेत. टोरंटवर सर्च केलं तर सापडू शकतो. प्रिंट चांगली असेलच याची खात्री नाही. पण मिळेल हे नक्की. हॉलीवूड आणि विदेशी चित्रपट, अमेरिकन टीव्ही सीरियल्स, गाणी, जर्नल्स वाट्टेल ते तुमच्याकडे डाउनलोड होऊन सेव्ह होऊ शकतं. एरव्ही तुम्ही विकत घ्यायला गेलात तर मिळतील याची खात्री नाही. परवडतील असंही नाही.

अशी सेवा पुरवणाऱ्या किकअ‍ॅस (हे कंपनीचे नाव आहे) आणि टोरंट्झ या प्रसिद्ध कंपन्यांची दुकानं नुकतीच बंद झाली.

किकअ‍ॅस कंपनीचा संस्थापक अर्टेम व्हॉलिनला पोलंडमध्ये अटक करण्यात आली. थेट अटकच झाली म्हटल्यावर कामकाज थंडावलं कंपनीचं. यांचं असं झालं म्हणून नेटिझन्स टोरंट्झ साइटवर गेले. तर तिकडे पाटी लावलेली- ‘टोरंट्झ विल ऑलवेज लव्ह यू. फेअरवेल’. साइट आहे सुरू पण लॉगइन करता येत नाही, काही शोधता येत नाही, काही मिळतही नाही. जगभरात काही दशलक्ष क्लायंट आहेत टोरंट्झचे. पण अचानकच त्यांनी दुकान बंद केल्याची पाटी झळकावली. एक दुकान बंद झालं तर दुसऱ्या दुकानात जाता येतं. पण बंद झालेल्या दुकानाला आपल्या गिऱ्हाईकांची आणि सप्लायरची यादी जाहीर केली तर आपलं काय या विचाराने जगभरातल्या अनेकांचे धाबे दणाणले आहेत. सप्लायरचं एकवेळ ठीक पण टोरंटच्या जोरावर फोफावलेल्या स्वयंघोषित एक्स्पर्ट्सची पंचाईत झाली आहे. लोक टिझरची चर्चा करत असताना कडक प्रिंटसह अख्खा पिक्चर फुकटात देणाऱ्या चित्रपट वितरकांचे वांदे झाले आहेत. आपल्याकडे आता पायरसीविरोधातली मोहीम हळूहळू आकार घेतेय. फुकट ते पौष्टिक म्हणजे टोरंट. नेटिझन्सचा तिकडे ओढा असणं साहजिकच. पण ज्याचं काम ढापलं जातं त्याची फरफट होते. मेहनत वाया जाते. मनस्ताप होतो तो वेगळाच. तुम्हीच ठरवा- ढापाढापीत सहभागी व्हायचं का ओरिजिनल कंटेन्ट पैसे देऊन विकत घ्यायचं. फुकट मिळालं की किंमत राहत नाही म्हणतात. तुमची किंमत तुम्हीच ठरवा. नाहीतर तुमच्या दुकानालाही टाळं लागायचं..

-पराग फाटक