04 April 2020

News Flash

व्हायरलची साथ : ऑलिम्पिक भावनेचा कोलाज!

ऑलिम्पिकचं बोधचिन्ह म्हणजे पाच खंड आणि त्यातल्या देशांच्या राष्ट्रध्वजाच्या रंगाचं प्रतिनिधित्व करणारी ही वर्तुळं

चांगलं घडण्यासाठी चांगलं पाहावं, ऐकावं असं म्हणतात. असाच एक अनुभवण्याचा सोहळा सध्या ब्राझीलमधल्या रिओत रंगला आहे. विविध प्रश्नांनी ग्रासलेल्या देशांना एकत्र आणणारी ही चळवळ. आपण यात कुठे यापेक्षाही आपण काय शिकलो हे महत्त्वाचं.

भूमिती आणि भूगोल या दोन ‘भ’ मंडळीशी आमची सलगी होऊ शकली नाही. पायथागोरसचे प्रमेय आणि पॅसिफिक महासागरातले गर्ते यांच्यामुळे आयुष्यात उलथापालथीचे काही घडणार नसल्याने आम्ही ऋणानुबंधाच्या फंदातच पडलो नाही. पण गेले काही दिवस आणि पुढचेही काही दिवस आमची ‘भ’ मंडळींशी गट्टी असणार आहे.
सातवी ‘ब’ मध्ये दक्षिण अमेरिकेतले देश या धडय़ात ब्राझील आणि पर्यायाने रिओ दी जानिरो यांची पहिल्यांदा ओळख झाली. पाठय़पुस्तकातलं ब्राझील आणि ऑलिम्पिकचा उत्सव भरवणारं ब्राझील यांच्यात ‘ध्रुवीय’ अंतर पडलं आहे. ऑलिम्पिकचं बोधचिन्ह म्हणजे पांढऱ्या कॅनव्हासवर एकात एक गुंफलेली (निळा, काळा, हिरवा, पिवळा आणि लाल) रंगांची वर्तुळं. पाच खंडांचं आणि त्यातल्या प्रत्येक देशाच्या राष्ट्रध्वजाच्या रंगाचं प्रतिनिधित्व करणारी ही वर्तुळं. अनोखी विभिन्न गुणवैशिष्टय़ं जपणाऱ्या देशांना समान तोलणारी ही वर्तुळं. हा महासत्तेचा आणि तो तिसऱ्या जगातला असा दुजाभाव नाही. वंश-वर्ण-रंग-जात-धर्म-प्रांत यांच्या पल्याड जाऊन माणसांना एकत्र आणणारा महासोहळा.
आणि म्हणूनच भारताच्या नकाशावर ठिपक्याएवढे अस्तित्व असणाऱ्या त्रिपुराची दीपा कर्माकर ‘ट्रेण्डिंग’ होते. ट्रेन, बस किंवा तत्सम सार्वजनिक प्रवासात गर्दीमुळे जी आसनं घडतात तेवढंच आपलं शरीर आकुंचन-प्रसरण पावतं. मात्र चूक झाली तर जिवावर बेतणाऱ्या ‘प्रोडुनोव्हा’चं परफेक्ट सादरीकरण पाहिल्यावर छोटय़ा चणीच्या दीपाचं मोठेपण लक्षात येतं. स्वातंत्र्यदिनी झेंडावंदन आणि सांस्कृतिक कार्यक्रम असल्याने आदल्या दिवशी मंडळी लवकर झोपतात. पण यंदा स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला दीपासाठी हजारो घरं आणि त्यातले टीव्ही उशिरापर्यंत जागे होते. अथक सरावाच्या बळावर मानवी शरीरातून काय किमया घडू शकते याचा दीपाविष्कार आपण अनुभवला. एरव्ही उल्फा, बोडो या उग्रवादी संघटनांच्या हल्ल्यांची शिकार ठरणाऱ्या त्रिपुराच्या दीपापुरतं हे मर्यादित नाही. हा लंबक आपल्या राज्यात येऊन नाशिक जिल्ह्य़ातल्या तळेगाव रोहीमध्ये येऊन विसावला. ज्याच्या घरात टीव्ही नाही, कुठल्याही ब्रँडेड वस्तूंच्या चळती नाहीत, ज्याच्या गावात आजही लोडशेडिंग होतं अशा दत्तू भोकनळने रिओतल्या लेकमध्ये बोट वल्हवली. त्याला पदक मिळालं का? तो कितवा आला यापेक्षाही तो मेरिटच्या बळावर तिथपर्यंत पोहचला ही शिकवण महत्त्वाची. विजिगीषु हा शब्द आपल्या निबंधांपुरता मर्यादित राहतो. हा शब्द दत्तूचं जगणं आहे.
स्फटिकासारख्या नितळ निळ्या पाण्यात विहरून लखलखत्या सुवर्णपदकांची रास मांडणाऱ्या अमेरिकेच्या मायकेल फेल्प्सच्या वर्णनासाठी नेटिझन्सना विशेषणं थिटी पडतात. समुद्राची गाज ऐकत प्रदूषणविरहित वातावरणात मुक्त धावणारा जमैकाचा बोल्ट अचंबित करतो. १०० मीटर हे अंतर ते किती. त्यात हा माणूस संथ सुरुवात करतो, शेवटाला जवळपास चालत जातो, मध्ये डावीकडच्या आणि उजवीकडच्या प्रतिस्पध्र्याकडे तुम्ही कशाला धावताय असा कटाक्ष टाकतो आणि तरीही जिंकतो. तो चर्चेत न राहील तरच नवल..
युद्ध, यादवी, बंड यांमुळे ज्यांना देशच उरला नाही अशा मंडळींच्या स्वतंत्र संघाने छाप उमटवली आहे. जिवंत राहण्यासाठी बोटीतून समुद्रात उडी घेणारी सीरियाची जलतरणपटू युसरा मार्दिनी ऑलिम्पिकपर्यंत पोहोचली. तिचा जगण्याचा रसरशीत ‘सूर’ असंख्य नैराश्यग्रस्त मनांना उभारी देणारा आहे. अक्षरश: टिकलीएवढा असणाऱ्या ‘कोसोवो’ देशाच्या माणसाने सुवर्णपदक जिंकलं. आम्हाला फक्त ‘लेनोव्हो’ माहितेय! ज्या देशाचे नाव उच्चारताना जिभेचा व्यायाम होतो अशा ‘प्युअटरे रिको’च्या टेनिसपटूने सुवर्णपदकाची कमाई केली. हा पदकांचा पसारा अझरबैजानपासून लिथुएनियापर्यंत असा खंडप्राय पसरला आहे. या भूगोलाला भूमितीची साथ आहे. सतत बाऊन्स होणाऱ्या डेकवर सादरीकरणाचे ट्राम्पोलिन जिम्नॅस्टिक्स, स्वत:ला आणि घोडय़ाला सांभाळून करायच्या अश्वशर्यती, चकचकीत वर्तुळाकार ट्रॅकवर सुसाट वेगाने होणाऱ्या बीएमक्स सायकल शर्यती, स्वत: उभं असलेलं ठिकाण-वारा तसंच गुलाबी रंगाची सरकत येणारी क्ले टार्गेट्स असा भूमितीय कोन सांभाळून करायचं स्कीट नेमबाजी असे एक ना अनेक थरारक खेळ आपण अनुभवतोय. मैदानाचा आकार, परीघ, प्रतिस्पध्र्यापर्यंतचं अंतर, गुणांकन पद्धती सगळंच वेगळं. भूमितीय पटांवर साकारणारे खेळ आणि नॅनो सेकंदानेही मिळणारं किंवा हुकणारं पदक यांची मजा तुम्ही आम्ही अनुभवतोय. कोणी ‘शोभा’ करून घेतंय, कोणाचे ‘विजय’ प्रताप सुरू आहेत. कसं आहे- मूर्खपणा सिद्ध करण्याची संधी प्रत्येकाला मिळते. काहीजण त्यातही घाई करतात. आपण कशाला रोखा त्यांना! एवढा महासोहळा म्हटल्यावर वाद, कुरबुरी, नाराजी साहजिकच नाही का?
‘जे जे उत्तम उदात उन्नत’ असं आयतं टीव्हीवर पाहायला मिळतंय. न जाणो त्यातून आपल्याला धावण्याची, खेळण्याची, निरोगी आणि सुदृढ शरीरयष्टी आणि पर्यायाने संपन्न जीवनशैलीसाठी प्रेरणा मिळेल. ऑलिम्पिकचा उद्देश तोच तर आहे. अन्यथा ऑलिम्पिक ज्योत एका देशातून दुसऱ्या देशात जाईल. आपल्या मनातली ज्योत तेवण्यासाठी आऊटसोर्सिग कोणी करणार नाही. त्यासाठी आपल्यालाच पुढाकार घ्यावा लागेल.
(ता. क. अब्जावधी लोकसंख्या आणि एका हाताच्या बोटांवर मिळणारी पदकं या आपल्या व्यस्त समीकरणाचा शोध चीनमध्ये घेण्यात आला. त्यांनी एक फर्डा अहवालही तयार केलाय. आपल्याकडे ऊठसूट निघणाऱ्या अहवालांच्या तुलनेत हा परकीयांनी केलेला अभ्यासू अहवाल डोळे उघडवणारा आहे. जिज्ञासूंनी तो आवर्जून वाचावा, नाही तर चॅनेलीय चर्चा आहेतच.)

– पराग फाटक

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 19, 2016 1:06 am

Web Title: few highlights in rio olympic 2016
Next Stories
1 दुकान बंद झाले आहे. क्षमस्व..
2 व्हायरलची साथ:बिकिनी, डय़ूटी आणि गोची
3 व्हायरलची साथ: रॉबिन हुडच्या गोष्टी!
Just Now!
X