व्हायरल म्हटल्यावर केवळ इन्फेक्शनच डोळ्यासमोर येते. पण नेटविश्वात सैरावैरा होणे म्हणजेच व्हायरल अशी मायाजालाची परिभाषा. मायाजालाला व्यापून टाकणाऱ्या इन्फेक्शनची गोष्ट – ‘व्हायरलची साथ’मध्ये.

ही गोष्ट आहे जपानमधल्या एका मुलीची आणि पर्यायाने व्यवस्थेची. जपानच्या उत्तर भागात होकिअडो रेल्वे स्टेशन कंपनी कार्यरत आहे. कामी शिराटाकी हे दुर्गम भागातलं रेल्वे स्टेशन. फारशी आवक नसल्याने कंपनीने हे स्टेशनच बंद करण्याचा निर्णय घेतला, परंतु एक शाळकरी मुलगी दिवसातून एकदाच जाणाऱ्या-येणाऱ्या या ट्रेनचा उपयोग करत असल्याचं कंपनीच्या लक्षात आलं. स्टेशन बंद झाल्यास, मुलीची शाळा बंद होईल, असा विचार कंपनीच्या व्यवस्थापनाने केला.

तोटा सहन करावा लागला तरी तिचं शालेय शिक्षण होईपर्यंत स्टेशन सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. शाळा संपल्यावर उच्च शिक्षणासाठी त्या मुलीला मोठय़ा शहरात जाणं क्रमप्राप्त आहे. जेणेकरून तिला या स्टेशनची आवश्यकताच भासणार नाही या विचारातून स्टेशन सुरू राहिलं. सलग तीन र्वष केवळ एका मुलीसाठी एक स्टेशन सुरू राहिलं. तिच्या शाळेच्या वेळांप्रमाणे एकमेव ट्रेनच्या वेळेतही बदल करण्यात आला. यंदा मार्च महिन्यात त्या मुलीचं शालेय शिक्षण पूर्ण होणार आहे. त्यानंतर ते स्टेशन इतिहासजमा होईल.

बर्फाच्छादित परिसरातलं ते स्टेशन, एकमेव ट्रेन आणि प्लॅटफॉर्मवरची एकमेव प्रवासी अर्थात ती मुलगी हे सगळं व्हायरल झालंय. होकिअडो रेल्वे कंपनीच्या फेसबुक पेजवर कौतुकाचा वर्षांव होतोय. ‘सरकार माझ्यासाठी एवढं करणार असेल तर देशासाठी प्राण वेचायला मी तयार आहे,’ अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया जपानी नागरिकांनी नोंदवल्या आहेत. वाढती लोकसंख्या हा तमाम जगाचा कॉमन प्रॉब्लेम झाला आहे. मात्र जपानमधल्या होकिअडो प्रांतात जन्म दर झपाटय़ाने घटला आहे. याचाच परिणाम होऊन या विभागातल्या २० महत्त्वपूर्ण रेल्वेसेवा कायमस्वरूपी बंद करण्यात आल्या आहेत.

सोशल मीडियावर अफवांपासून बदनामीपर्यंत सगळं व्हायरल केले जातं. कशावरून हे सेल्फ प्रमोशनचं गिमिक नाही अशी टीकाही झाली. कालांतराने ती मुलगी, ते स्टेशन आणि ती रेल्वे कंपनी खरीखुरी असल्याचं सिद्ध झालं. नकाशावर जेमतेम ठिपक्याचं अस्तित्व असणारी असंख्य गावं आपल्याकडेही आहेत. गावोगावी शिकणाऱ्या मुलामुलींसाठी आजही सरकारी बससेवा हाच प्रमुख आधार आहे. पालकांनाही मुलामुलींना या बसने पाठवणं सुरक्षित वाटतं. पण कसं आहे- लेटेस्ट एसयूव्हीची फीचर्स टॅबवर चेक करणाऱ्या मंडळींना एसटी डाऊन मार्केट वाटते. म्हणूनच एसटीच्या, बसच्या आठवणी मनातच राहतात. त्या सोशल मीडियापर्यंत पोहचतच नाहीत. एसटीच्या पासचा खर्च परवडत नाही या कारणासाठी आपल्याच राज्यात शाळकरी मुलीने आत्महत्या केली होती. त्यानंतर दुष्काळग्रस्त भागातल्या शाळकरी मुलांना मोफत प्रवासाची सुविधा मिळावी यासाठी लढा द्यावा लागला. तेव्हा कुठे दुष्काळी भागातली मुले ‘शाळेला जातो आम्ही’ म्हणू लागली.

‘गाडीचे पायदान आणि फलाटामधील अंतर याकडे लक्ष असू द्या’ हे ऐकत शाळेला जाणारी- येणारी असंख्य मुलं आपण रोज पाहतोच. आपली व्यवस्था सूचनांपलीकडे त्यांना काहीच देत नाही. उगवत्या सूर्याचा, अणुबॉम्बच्या राखेतूनही भरारी घेणारा, टेक्नोसॅव्ही आणि कष्टकरी समाजाचा जपान एका मुलीसाठी एवढं करू शकतोय तर आपल्यालाही थोडी प्रेरणा घ्यायलाच हवी. ‘मुलगी शिकली, प्रगती झाली’ हे खरंच अनुभवायचं असेल तर एवढं करायलाच हवं.