शारीरिक जखमांपेक्षाही मनावर उमटलेला ओरखडा विसरणं कठीण असतं. ‘फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन’ या काळात सुंदर काय याची व्याख्याही बदलली आहे. रंगरूपाच्या सुंदरतेपेक्षाही भावनिकदृष्टय़ा कणखर सौंदर्याकडे लक्ष देणं आवश्यक झालंय. का? ते तुम्हीच समजून घ्या.

तीन कारणांनी न्यूयॉर्क चर्चेत आहे. मुख्य कारण ‘नाइन इलेव्हन’ला पंधरा र्वष पूर्ण झाली. जागतिक महासत्ता असणाऱ्या अमेरिकेवरचा तो दहशतवादी हल्ला, गगनचुंबी ट्विन टॉवर्सना भेदणारी ती विमानं, किंकाळ्या आणि कल्लोळ आजही आपल्या डोळ्यासमोर आहे. सहिष्णू असल्याने बॉम्बस्फोट, दहशतवादी हल्ले, नैसर्गिक आपत्या आपण सहज पचवतो. तेवढं पुरेसं नाही म्हणून कथित आरोपींचं पुढची अनेक र्वष आदिरातिथ्यही करतो. पण भक्कम आर्थिक, भौगौलिक, सामाजिक तटबंदीच्या अमेरिकेत असं काही होईल याची कल्पनाच कोणी केली नव्हती. विनाश अटळ अशा रसायनांनी अर्थात अ‍ॅसिडने भरलेली स्फोटकं कुठून आली, कोणी दिली याचा माग अमेरिकेने काढला. त्या हल्ल्यातून अमेरिकेने बोध घेतला. हल्ल्याचा सूत्रधार आणि एकेकाळचा त्यांचा हस्तक ओसामा बिन लादेनला त्यांनी ठार केलं. पुढच्या पंधरा वर्षांत त्यांनी एकही हल्ला होऊ दिला नाही. ज्यांनी आपल्या घरातलं, नात्यातलं, ओळखीचं, कचेरीतल्या आणि पर्यायाने देशातल्या कोणाला तरी गमावलं त्यांच्यासाठी हा स्मृती दिन हळवा क्षण.

याच न्यूयॉर्कच्या परिघात दर वर्षी वर्षांतली शेवटची ग्रँड स्लॅम टेनिसमैफल रंगते. यंदाची मैफल नवविजेत्यांनी गाजवली. उष्ण आणि आद्र्र वातावरणात जगातल्या सर्वोत्तम खेळाडूंना टक्कर देत तासनतास खेळलं की, शरीरात लॅक्टिक अ‍ॅसिड निर्माण होतं. यामुळेच माणूस थकतो, दमतो. मात्र याच वेळी शरीरातल्या अन्य रसायनांना चेतवून स्वत:ला प्रेरित करावं लागतं. समोरच्याला मागे टाकण्याची आणि स्वत:ला उंचावण्याची ही कसोटी. प्रस्थापितांची सद्दी मोडून विजयाचं तोरण बांधायला धमक लागते. त्यासाठी मेंदूत आणि मनात असंख्य रसायनं प्रसवतात. या अ‍ॅसिड्सची शास्त्रीय आणि बोली भाषेतली नावं निरनिराळी. असंख्य विचारांच्या घुसळणीतून सर्वोत्तमाच्या ध्यासासाठी स्वत:ला ताणणं जिकिरीचं. पण त्यातूनच इतिहास घडतो. देदीप्यमान असं काही तरी निर्माण होतं आणि जगभरातल्या चाहत्यांना घरबसल्या त्याची अनुभूती मिळते. या मैफलीत आपली ठरावीक माणसं वर्षांनुर्वष सहभागी होत आहेत. यंदा एकाची भर पडली पण एकुणातच सगळ्यांनी झटपट गाशा गुंडाळला.

त्याच न्यूयॉर्कच्या परिसरात फॅशनमेळ्याचं आयोजन करण्यात आलं, तोही जागतिक स्वरूपाचा. आता फॅशन शो म्हटलं की, झुळझुळीत वस्त्रं, कमनीय बांध्यांच्या एकामागोमाग एक येत लेटेस्ट डिझाइन प्रेझेंट करणाऱ्या मॉडेल्स, शो स्टॉपर, वस्त्रघसरण वगैरे आलंच ओघानं. पण यंदा चर्चेचा केंद्रबिंदू होता रेश्मा कुरेशी. अ‍ॅसिडच्या माऱ्याला सामोरी गेलेली रेश्मा. दोन वर्षांपूर्वी अलाहाबादजवळच्या मौ ऐमा शहरात बहिणीबरोबर फिरत असताना रेश्मावर अ‍ॅसिड फेकण्यात आलं. फेकणारी माणसं तिच्या नात्यातली होती. त्यांना दुसऱ्याच व्यक्तीला टार्गेट करायचं होतं. गैरसमजातून त्यांनी रेश्मावरच अ‍ॅसिड फेकलं. डावा डोळा आणि चेहऱ्याने अतोनात वेदना सहन केल्या. ती वाचली, मात्र चेहरा कायमस्वरूपी विद्रूप झाला. पहिल्यांदा आरशात बघितल्यावर रेश्माच्या मनावर ओरखडा उमटला. आत्महत्येचा विचारही तिच्या मनात येऊन गेला. अशा मन:स्थितीत ‘मेक लव्ह, नॉट स्कार्स’ या स्वयंसेवी संघटनेनं रेश्माला जगण्याचं महत्त्व पटवून दिलं. हळूहळू तिला दैनंदिन आयुष्यात परत आणलं. ‘एण्ड अ‍ॅसिड सेल’ उपक्रमासाठी रेश्माने मॉडेलिंग विश्वात पाऊल ठेवलं. न्यूयॉर्क फॅशन वीकमध्ये अर्चना कोचर यांनी आपल्या डिझाइनच्या सादरीकरणासाठी रेश्माची निवड केली. तिने कोणतं डिझाइन सादर केलं यापेक्षाही निर्भयपणे ती जगासमोर आली. ‘अनुकंपा व्यक्त करण्याऐवजी आत्मविश्वास द्या,’ असंही तिने सांगितलं. जागतिक फॅशनचं केंद्र असणाऱ्या न्यूयॉर्कच्या पटलावरून अ‍ॅसिड फेकणाऱ्यांना रेश्माने चोख प्रत्युत्तर दिलं.

याच काळात मुंबईत प्रीती राठी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणाचा निकाल लागला. २०१३ मध्ये प्रीतीवर अ‍ॅसिडहल्ला झाला होता. भारतीय नौदलात मिळालेल्या नोकरीत रुजू होण्यासाठी म्हणून प्रीती मुंबईत आली. स्वप्नांची नगरी मुंबईत पाऊल ठेवल्याच्या काही क्षणांतच तिला दुर्दैवी क्षणाला सामोरे जावं लागलं. तिचे डोळे जायबंदी झाले, प्रकृती चिंताजनक होती. अनेक तज्ञ डॉक्टरांनी प्रयत्नांची शर्थ केली मात्र ती अपुरी ठरली. घरातल्या कर्त्यां मुलीला राठी कुटुंबीयांनी गमावलं. तीन वर्षांनी केसचा निकाल लागला. दोषी आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात आली. प्रीती यातनांमध्ये गेली आणि याला सरकारी मौत. ‘बेटी बचाओ’ अभियान यशस्वी झाल्याचा टेंभा मिरवत असतानाच्या काळात २०१२ मध्ये १०६, २०१३ मध्ये १२२, २०१४ मध्ये ३४९ तर २०१५ मध्ये ५०० हून अधिक अ‍ॅसिडहल्ल्यांची नोंद दप्तरी आहे. या हजारोंपैकी केवळ एक रेश्मा जगासमोर येऊ शकली आहे. बाकी अनेकींच्या नशिबी वेदनादायी मरण आहे किंवा अंधारातलं जगणं. प्रीती खटल्याच्या निमित्ताने अ‍ॅसिडच्या विक्रीचा मुद्दा समोर आला आहे. अ‍ॅसिड कोणाला देता येऊ शकतं आणि त्याच्या किरकोळ विक्रीसंदर्भात कठोर नियम आहेत मात्र त्यांची सर्रास पायमल्ली होते आहे हे वाढते हल्ले सिद्ध करत आहेत. अ‍ॅसिड हल्ल्यात जखमी झालेल्यांना उपचारांकरिता आपली अनेक हॉस्पिटल्स सुसज्ज नाहीत हेही समोर आलंय.

दहशतवादी हल्ले होतच राहतात. निरपराध माणसं जीव गमावत राहतात. खेळांची स्पर्धा भरते, आपण तिथेही पिछाडीवरच राहतो. अ‍ॅसिड हल्ले होतच राहतात. सौंदर्याला कायमचा बट्टा लागतच राहतो. आपण ‘न्यूयॉर्क’ नाही. आपल्याकडे ‘न्यूयॉर्क’ नावाचा सिनेमा येतो, त्याचीही पायरेटेड कॉपी आपण पाहतो. रावसाहेबांचं वर्णन करताना पु.ल. म्हणतात- ‘रावसाहेब शौकीन होते पण वखवखलेले नव्हते’. वखवखलेल्यांच्या झुंडीतून विकृत मानसिकता जन्माला येते. एकूणच सौंदर्याच्या ‘अ‍ॅसिड’ टेस्टमध्ये आपण फेल आहोत हे नक्की! कारण मागे असो, जायबंदी असो की गेलेला माणूस असो- प्रत्येक जण आपापल्या परीने सौंदर्यवान असतोच ना..

– पराग फाटक