11 July 2020

News Flash

लग्न ‘दाखवावे’ करून

या सोहळ्याचे यजमान ‘सबका साथ सबका विकास’ ब्रीद असणाऱ्या पक्षात होते.

घर पाहावे बांधून आणि लग्न पाहावे करून ही म्हण आपल्या सगळ्यांना शिकवलेली. कालौघात काही बदल होणारच ना म्हणींमध्ये, समजुतीतही. घर उभं राहताना माणूस आडवा व्हायची वेळ येते. पण म्हणीचा दुसरा टप्पा ड्रॅस्टिकली बदलला आहे. लाइफस्टाइल प्रॉडक्ट झालेल्या लग्नामुळे म्हणही बदलू शकते.

‘गार्डन सिटी’ अर्थात बंगळुरू शहरातल्या ‘हुज हू’ म्हणजे वलयांकित मंडळींना एक लग्नपत्रिका आली. सोन्याचा वर्ख असलेला बॉक्स. आतमध्ये चक्क एलसीडी स्क्रीन. ऑडिओ-व्हिज्युअल लग्नपत्रिका. स्क्रीनच्या बाजूचे बटन क्लिक केल्यावर तीन मिनिटांचा व्हिडीओ सुरू. वधू आणि तिचा भाऊ यांच्यात लडिवाळ संवाद. लग्न ठरलंय, वधूचे विविध पोशाख पक्के होताना दिसतात. मेहंदी, संगीत वगैरे दरम्यान वधू-वर बागेतून थेट डोक्यात अशा सुवासिक फुलांची, पाकळ्यांची पखरण होते. डौलदार शुभ्र घोडय़ावरून ‘वर’ येतो. पीळदार शरीरयष्टीचे, भरजरी वस्त्रंप्रावरणं परिधान केलेले, केसांना जेल, डोळ्याला गॉगल, दाढीचे खुंटही दिसणार नाहीत असा तुकतुकीत चेहरा असे राजबिंडे वर येतात. गुडघ्यात लवून वधूला माझ्याशी लग्न करशील अशी मागणी घालतात. स्क्रिप्टनुसार वधू लाजत हो म्हणते. मग वधुपिता आणि कुटुंबीय स्क्रीनवर अवतरतात. कन्नडमधलं एक मंजुळ गाणं सर्वजण म्हणतात. मग लग्नाचं औपचारिक बोलावणं करतात. हातात मोबाइल, टॅब, लाइटसेबर असलेली बच्चेकंपनी आमच्या दीदीच्या लग्नाला यायचं हं असं दटावते. छानशा फॉँटमध्ये बोल्ड टाइपात इंग्रजी आणि कन्नड भाषेतील पत्रिका स्क्रीनवर येते. विवाहस्थळ, वेळ, पार्किंगची सुविधा हे असं एम्बॉस होऊन पाहणाऱ्याच्या मनात ठसतं. मनात आहे पण सगळ्यांच्या घरी आमंत्रणाला येणं शक्य नाही. त्यामुळे ही पत्रिका गोड मानून लग्नाला यायचं असं वधूची आई अगत्याने सांगते. लग्नमंडपात भेटूच असं स्क्रीनवर येतं आणि व्हिडीओ थांबतो. या लग्नपत्रिकांसाठी खर्च झालेत एक कोटी रुपये.

बंगळुरू पॅलेस मैदानाचा ३६ एकर परिसर तीन दिवस भाडेतत्त्वावर घेतलेला. कन्नड चित्रपटांचा सेट निर्मित्ती करणारे शशीधर अडापा यांच्याकडे लग्नाचा भव्य सेट उभारण्याची जबाबदारी. इतिहासातील वैभवशाली विजयानगर साम्राज्याची प्रतिकृती वसवलेली. साम्राज्य म्हटलं की गाव आलं, प्रजा आली. ते सगळं उभारलेलं. जगप्रसिद्ध हंपी परिसरही इथे चितारलेला. विठ्ठल-शिव आणि गणपती यांची मंदिरेही उभारलेली. थोडक्यात आटपाट नगरात वावरल्याचा फील देणारा सेट. पाहुण्यांच्या मनोरंजनासाठी बैठे आणि फार न दमवणारे मैदानी खेळ खेळण्यासाठी मिनी मैदानं. लग्नाचे विधी होणार तो सेट म्हणजे हुबेहूब तिरुपती मंदिर. फरक एवढाच की आजूबाजूला मुंडन केलेले स्त्री-पुरुष नाहीत. सोनं, हिरे आणि विमानाने दाखल झालेल्या फुलांनी मढलेला हा सेट. यजमानांची तिरुपती बालाजीवर खूप श्रद्धा. काही वर्षांपूर्वी त्यांनी देवाला ४५ कोटी रुपयांचा हिरेहार अर्पण केलेला. याच मंदिरातील आठ पुजारी भटजी म्हणून कार्यरत. २१ वर्षांची वधू बॅचलर ऑफ बिझनेस मॅनेजमेंट ग्रॅज्युएट. वर अर्थातच बिझनेसमन. वधूजींच्या लग्न दिवशीच्या साडी आणि अन्य पोशाखांचा खर्च साधारण १७० दशलक्ष रुपये. वधूजींच्या आभूषणांसाठी ९०० दशलक्ष रुपये खर्च झालेले. पन्नास हजार पाहुण्यांची या शाही विवाह सोहळ्याला उपस्थिती. देशापरदेशातून बंगळुरूत दाखल होण्यासाठी चार्टर्ड फ्लाइट. विमानतळावरून लग्नस्थळी जाण्यासाठी मर्सिडीझ, स्कोडा, ऑडी अशा गाडय़ांची व्यवस्था. एवढी मोठी माणसं येणार म्हटल्यावर काळजी वाटणारच. म्हणूनच ३००० बाउन्सर्स (क्रिकेटमध्ये ज्याने बॅट्समनची भंबेरी उडते तो बॉल नव्हे) ३०० पोलीस, स्निफर डॉग्स आणि बॉम्ब स्क्वॉड असं सज्ज. भोजनव्यवस्थेत २००हून अधिक पदार्थ. लोकल ते ग्लोबल असा खाद्यपसारा. लग्नाचा साधारण खर्च ५५० कोटी.

या सोहळ्याचे यजमान ‘सबका साथ सबका विकास’ ब्रीद असणाऱ्या पक्षात होते. कर्नाटकात पक्षाला सत्ता मिळवून देण्यात त्यांचा ‘भरीव’ वाटा होता. मात्र बेकायदेशीर खाण उत्खननप्रकरणी त्यांना दोनदा तुरुंगात जावं लागलं. गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाने त्यांना जामीन दिला. लग्न म्हणजे दोन कुटुंबांना जोडणारा सोहळा ही व्याख्या अडगळीत टाकून द्या. लग्न म्हणजे वैैश्विक सोहळा. साधी राहणी उच्च विचारसरणी अशा बुळचट कल्पना बाजूला सारा. ‘पॉश राहणी आणि क्लासी विचारसरणी’ अवलंबा (मास वगैरे संकल्पना कार्ल मार्क्‍ससाठी राहू द्या) फक्त लग्नासाठी एवढा पैसा खर्च होऊनही यजमानांचं लाइफ एकदम सुरळीत. मुलीच्या लग्नाने ओढग्रस्तीला लागणारा बाप ही गैरसमजुती प्रतिमा चित्रपट आणि मालिकावाल्यांसाठी सोडून द्या. व्यवसायाचे झोलार स्वरूप, कारणे दाखवा नोटिसा, टीका, तुरुंगवास या क्षणिक भौतिक गोष्टींनी विचलित न होता मार्गक्रमण करत राहिलं तर भव्य स्वप्नंही प्रत्यक्षात साकारतात ही शिकवण देशभरातल्या उद्यमशील मंडळींसाठी महत्त्वाची. निश्चलनीकरण म्हणजे नोटांचं मॅटर झालं ना- त्याआधीच सहा महिने पेमेंट झालेलं सव्‍‌र्हिस प्रोव्हायडर्सना. प्लॅनिंग लक्षात घ्या तुम्ही कसलं सॉलिड आहे! एका लग्नाने किती हजार हातांना रोजगार मिळाला- हा मानवतावाद किती उदात्त. ‘थिंक बिग’सारख्या निबंधी संकल्पना प्रत्यक्षात कशा आणाव्या याचा हा डेमो. लिहिता लिहिता बातमी आलीय की यजमानांना इन्कम टॅक्स विभागाने नोटीस पाठवलीय म्हणे. महत्त्वाचं काय- कार्य निर्विघ्नपणे पार पडलं, तेव्हा कुठलाही अडथळा आला नाही. म्हणून सुरुवातीला म्हटलेलं- लग्न ‘दाखवावे’ करून!

(परवा ठाण्यातही एक शाही लग्न झालं म्हणे. वाहतुककोंडीची तक्रार केली लोकांनी. ट्रॅफिक अडकेल एवढा जनसंपर्क आहे का तुमचा? प्री वेडिंग शूट पाहिलंत? नवीन शिकावं, पाहावं की माणसानं! )

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 25, 2016 1:16 am

Web Title: janardhan reddy daughter marriage story
Next Stories
1 ‘नोट’ करावे अशा मुद्दय़ांची टाचणं!
2 स्तंभ खचला..
3 बूमरँगी ‘ट्रम्प’ कार्ड!
Just Now!
X