13 August 2020

News Flash

मळभाचे ढग आणि रुसलेला कवडसा..

नववर्षांच्या प्रथमदिनी ग्लोबल वॉर्मिग, क्लायमेट चेंज, पोल्युशन अलर्ट्स, पार्टिकल्स अशी शाळाच घेतली अनेकांची.

वर्ष बदलतं म्हणजे नक्की होतं तरी काय? काळाचं एक आवर्तन पूर्ण होतं. पण आपलं जगणं बदलतं का? ‘मागच्या पानावरून पुढे चालूराहूनही नववर्षांचं सेलिब्रेशन करण्यात खरंच गंमत आहे? रंध्रारंध्रात मोकळी हवा  साठवून घेणंही कठीण झालं तर काय करायचं.. वाचा आणि सांगा तुम्हीच

मंडळी, इंग्रजी नववर्षांच्या तुम्हाला मन:पूर्वक शुभेच्छा. (धर्म, जात, पंथ, पंचांग, तिथी वगैरेनुसारही कॅलेंडरं असतात पण आम्ही मॅक्रो विचारपंथी आहोत) स्टाइलमध्ये लाइफ जगणं म्हणजे ‘लाइफस्टाइल’ असा आमचा गैरसमज होता. ३१ तारखेला बाराच्या ठोक्याला झिंगाट सेलिब्रेशन करण्यापेक्षा १ तारखेच्या प्रसन्न सकाळी सूर्योदय पाहणं आम्हाला जास्त थ्रिलिंग वाटतं. कारण आपला दिवस खऱ्या अर्थाने सकाळीच सुरू होतो आणि तसंही ‘बारा वाजणे’ या टर्मला असणारा नकारात्मक सूर का अंगावर घ्या? आपले सख्खे शेजारी आणि ‘हिंदी चिनी भाई भाई’मधले बंधुराज चीनची राजधानी बीजिंगमध्येही न्यू इयर सेलिब्रेशन प्लॅन्स तयार झालेले. काही रात्रीचे, काही उत्तररात्रीचे, काही सकाळचे असे. पण कसलं काय. पार विचका झाला ना राव! डीजे बंद पडला, केटर्सने दगा दिला असलं कारणपण नाही. काय तर म्हणे एअर पोल्युशन. नववर्षांच्या प्रथमदिनी ग्लोबल वॉर्मिग, क्लायमेट चेंज, पोल्युशन अलर्ट्स, पार्टिकल्स अशी शाळाच घेतली अनेकांची.

गॅझेट्स निर्मित्तीचं पॉवरहाऊस, थेट ऑलिम्पिक पदक पटकावतील अशा खेळाडूंना घडवणाऱ्या अकादमीरूपी फॅक्टऱ्या, व्यापारउदिमात अग्रेसर, जीडीपी अर्थात दरडोई उत्पन्न उंचावणारा, सधन अर्थव्यवस्था चालवणारा आणि साम्यवादी विचारसरणीचं प्रशासन राबवणाऱ्या अशी ओळख असलेल्या चीनच्या साम्राज्याची राजधानी असलेल्या बीजिंग आणि परिसरात नववर्ष प्रथमदिनी असं कोंदट मळभ दाटून आलेलं. धूर-धूळ आणि घातक रसायनांचं मिळून विषारी धुकं आसमंतात पसरलं होतं. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने मांडलेल्या किमान प्रदूषण लेव्हलपेक्षा २४ पटींनी प्रदूषण वाढल्याचं आकडे दर्शवत होते. श्वास घ्यायला त्रास, दमा, अस्वस्थपणा, भूक हरवणं अशा आजारांना नागरिकांना सामोरं जावं लागलं. दृश्यमानता अर्थात लो व्हिजिबिलिटीमुळे असंख्य विमानउड्डाणं रद्द झाली, रस्त्यावरची वाहतूकही कोलमडली. न्यू इयरचा जल्लोष दूर, मास्क घालून फिरणं क्रमप्राप्त झालं. चीनमध्ये हवेच्या पातळीनुसार रेड (अतिप्रदूषित), ऑरेंज (प्रदूषित), ब्लू (मध्यम प्रदूषित), ग्रीन (अल्प प्रदूषित) असे अलर्ट जाहीर करण्यात येतात. नववर्षांची सुरुवात डेंजर अशा रेड अलर्टने झाली. गाडय़ांमधून बाहेर पडणारा धूर, कोळसा प्रकल्पांतून निघणारे वायू, घातक वायू उत्सर्जित करणारे कारखाने यांच्यामुळे एअर पोल्युशनसंदर्भात जगात चीनमधली हवा सगळ्यात भयंकर आहे असं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने स्पष्टपणे नोंदवलं आहे. चीनमध्ये दरवर्षी होणाऱ्या मृत्युंपैकी ३१ टक्क्यांपेक्षा जास्त मृत्यू प्रदूषित हवेमुळे होत असल्याचा निष्कर्ष असंख्य संशोधनांद्वारे सिद्ध झालाय. आता ते चिन्यांचं काही का होईना, आम्ही स्वदेशीचा मक्ता घेतलाय असं म्हणून हात झटकू नका.

स्वच्छ भारत अभियान जोरात असतानाच राजधानी दिल्ली जगातलं सगळ्यात प्रदूषित शहर आहे असं विविध अभ्यासगटांनी संशोधनाअंती म्हटलंय. गेल्या वर्षभरात दिल्लीची हालत काय झाली हे जरा आठवून बघा. शाळा बंद ठेवण्यात आल्या, रणजी क्रिकेट स्पर्धेचे सामने रद्द करण्यात आले. मध्य दिल्लीत धूलिकणांची पातळी ५०० असल्याचं आपल्याच केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने स्पष्ट केलंय. २५ पेक्षा जास्त पातळी असेल तर ते आरोग्याला अतिघातक असतं, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने म्हटलंय.  शहरात कधीच फ्रेश वाटत नाही अशी दिल्लीकरांची तक्रार आहे. ‘आप’ल्या सरकारच्या उपाययोजना आहेत, पण प्रश्नच आवाक्याबाहेर गेलाय अशी अवस्था आहे. बरं हे फक्त दिल्लीपुरतं नाहीये. अलाहाबाद, वाराणसी, ग्वाल्हेर शहरांमध्ये कधीच मोकळं, निरभ्र वातावरण नसतं असेही अहवाल आहेत. नववर्षांतला पहिला दिवस मुंबईकरांसाठी देवनार डंपिंग आगीनंतरचा सगळ्यात विखारी हवेचा होता असं वास्तव समोर आलंय. एअर क्वालिटी इंडेक्स फारच घसरलाय. आपल्याकडे अलर्ट बिलर्ट काही नाही. हॉस्पिटल किंवा डॉक्टरचं बिल हाच उतारा प्रश्नावर. वजन कमी करण्यासाठी मोकळ्या हवेत चालायला जा असं हल्ली डॉक्टरही सांगत नाहीत. चिकुनगुनिया, टीबी, मलेरिया, लेप्टो स्पायरोसिस यांचाच विळखा घट्ट असल्याने प्रदूषणातून उद्भवणारे आजार तूर्तास आपली प्रायॉरिटी नाही. मोठा आलाय मास्क घालून फिरणारा असा शेलकी टोला मास्कधारी मंडळींना उद्देशून लगावला जातो.

कसं आहे, चीन-बीजिंग फार दूर. पण सेम प्रश्न अगदी तुमच्या आमच्या उंबऱ्यापर्यंत आलाय. ‘हवा येऊ द्या’ म्हणायलाही स्कोप उरला नाहीये. घाबरवण्याचा मुद्दाच नाही. वर्ष बदललं, नवीन कॅलेंडर भिंतीवर आलं, संकल्पांचं रेझोल्युशन्स मांडले लोकांनी, फॉरवर्डेड शुभेच्छांचा ढीग व्हॉट्सअ‍ॅपवर साचला. हे सगळं तांत्रिक झालं. नवीन वर्षांत आपलं जगणं निकोप व्हावं यासाठी कृती करायला हवी आपल्यालाच. नाहीतर चीनप्रमाणे लाल बावटा आपल्या घरी लागायचा..

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 6, 2017 6:22 am

Web Title: new year celebration 2
Next Stories
1 सुधर्माची अखेर?
2 खुल जा सिम सिम..
3 लग्न ‘दाखवावे’ करून
Just Now!
X