31 March 2020

News Flash

खुल जा सिम सिम..

इंटरनेट शिकवणं, वेबसाइट्स तयार करणं ही कौशल्यं आत्मसात केली.

नशीब आणि संधी कधी आपला दरवाजा ठोठावतील सांगता येत नाही. एखादी घटना खंडप्राय ठरून आयुष्याला पालटवू शकते. नोटाबंदीच्या निर्णयावर दोन्ही बाजूंनी खल सुरू आहे, पण याच निर्णयाने एका व्यक्तीचं आणि पर्यायाने एका कंपनीचं नशीब सर्वार्थाने उघडलंय. वाचा त्यांची कहाणी!

उत्तर प्रदेशातल्या अलिगढमध्ये विजय शेखर शर्माचं बालपण गेलं. साहजिकच शिक्षणही तिथेच. कर्मठ विचारसरणीचा हिंदीबहुल परिसर. विजय यांचं शिक्षणही हिंदी माध्यमातच झालेलं. शुद्ध देसी घी वाल्या हिंदीत वाट्टेल ते बोलायला अथवा लिहायला सांगा असा आत्मविश्वास विजय यांच्याकडे होता. दहावी-बारावीचं शिक्षण पूर्ण झाल्यावर पुढच्या शिक्षणासाठी विजय यांनी राजधानी दिल्ली गाठली. दिल्ली कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमध्ये (आता या संस्थेचं नामकरण दिल्ली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी) अ‍ॅडमिशनची प्रोसेस झाली. आवडत्या विषयातलं नवं शिकणं आनंददायी होण्याऐवजी भंबेरी आणि फजितीचे प्रसंग ओढवू लागले. दिल्लीतलं कॉस्मोपॉलिटन कल्चर, इंग्रजी भाषेचा वापर करणारी स्ट्रीटस्मार्ट मुलंमुली, नवं शहर, वातावरण आणि खाणंपिणंही. हे सगळं आपलंसं करायचं तर उत्तम इंग्रजी लिहिता आणि बोलता यायला हवं हे विजय यांना उमगलं. आधी हिंदीत वाचायचं, मग इंग्रजीत समजावून घ्यायचं. दोस्तमंडळी, शिक्षक, इंग्रजी सुधारेल अशी चांगली पुस्तकं याबळावर विजय यांचा इंग्रजीचा बागुलबुवा हळूहळू कमी होत गेला.

नवं शिकण्याची, मांडण्याची धडपडी वृत्ती विजय यांच्याकडे होतीच. कॉलेजाच्या दुसऱ्याच वर्षी मित्रांच्या साथीने ‘एक्सएस कॉर्प्स-इंटरनेट जायंट’ कंपनी सुरू केली. दिल्लीतल्या पुस्तकांसाठी प्रसिद्ध दर्यागंज भागात जाऊन कॉम्प्युटरविषयीची पुस्तकं धुंडाळून ज्ञान अवगत करण्याची सवय विजय यांनी अंगी बाणवली. इंटरनेट शिकवणं, वेबसाइट्स तयार करणं ही कौशल्यं आत्मसात केली. ठोस असा जॉब मिळत नाही म्हटल्यावर प्रोजेक्ट बेस्ड काम करायला सुरुवात केली. १९९७ साली जेट एअरवेजसाठी त्यांनी इलेक्ट्रॉनिक वेळापत्रक तयार केलं. केंद्र सरकारच्या पर्यटन खात्याची वेबसाइट तयार केली. पुढच्याच वर्षी सर्चइंजिन तयार करण्याचा प्रयत्न केला. मात्र अपुऱ्या निधीमुळे हा प्रकल्प बारगळला. कंटेट मॅनेजमेंट टूल डेव्हलप केलं.

कॉलेज संपतानाच कर्तेपणाची झूल अंगावर आली. काही दिवसांतच एक्सएस कॉर्प्स कंपनी त्यांनी अमेरिकेतल्या उद्योजकाला विकली. कमवणं गरज असल्याने रिव्हर रन कंपनीत विजय रुजू झाले. उत्तम पगार होता; पण जीवाला स्वस्थता नव्हती. चाकरी करण्यापेक्षा आपण स्वत:च कंपनी उभारू शकतो हा विश्वास होता. या विचारांतून नोकरी सोडली. २०००साली त्यांनी ‘वन ९७ कम्युनिकेशन्स’ची स्थापना केली. एसएमएसच्या माध्यमातून ऑनलाइन डिरेक्टरीची संकल्पना सुचली, कार्यान्वित झाली. भविष्य, क्रिकेट स्कोअर, गाणी या व्हॅल्यू अ‍ॅडेड सव्‍‌र्हिससाठी प्रारूप विजय यांनीच पुरवलं. पण टेलिकॉम कंपन्यांनी देणी थकवली आणि विजय यांच्यावर कफल्लक होण्याची वेळ आली. याकाळात घरोघरी जाऊन कम्प्युटर दुरुस्त केले. स्वत: संस्थापक असलेल्या कंपनीतला ४० टक्के हिसा अपरिहार्यतेपोटी विकला.

जागतिकीकरणाचा नूर ओळखून विजय यांनी कंटेट बिझनेस पेमेंट बिझनेस वळवण्याची शिफारस केली. ‘मोबाइलद्वारे पेमेंट’ हा मुद्दा कोअर टीमने मोडीत काढला. स्मार्टफोनचा नामोनिशाणही नव्हतं त्यावेळी. विजय निर्णयावर ठाम राहिले. महत्त्वाकांक्षेचं खूळ पाहून अनेकांनी कंपनी सोडली. त्यांनी हार मानली नाही. मोबाइल प्रत्येकाचा आयुष्याचा घटक होणार आणि इंटरनेटची वाढणारी व्याप्ती यांचा मेळ घालून व्यवहार करता येतील या विचारातून काम सुरू झालं. एखादी गृहिणी, गावकरी खेडुत, टेक्नॉलॉजीचा गंध नसलेला दुकानदार, कॉलेजमध्ये जाणारी मुलंमुली, नोकरदार वर्ग अशा समाजातील कोणत्याही स्तरातली, वर्गातली माणसं वापरू शकतील, अशी संरचना हवी हे विजय यांच्या डोक्यात होतं. संरचना सोपी हवी आणि त्यांना समजणाऱ्या भाषेतही उपलब्ध हवी हा आग्रह होता. अदृश्य असला तरी पैशाचा व्यवहार होणार. त्यामुळे दडपण होतं. एका दमडीचाही अपहार व्हायला नको. अफरातफर झाली तर अख्खा बिझनेसच कोसळेल या विचारातून या व्हच्र्युल व्यवहाराला कडेकोट बंदिस्ती केली. या सगळ्यासाठी पैसा आवश्यक होता. त्यासाठी विजय यांनी असंख्य बँका, कंपन्या, घरांचे उंबरे झिजवले. मोठय़ा मुश्किलीने पैशाचं पाठबळ मिळालं. सॉफ्टवेअर, बँकिंग, भाषा, लेआऊट अशा अनेक आघाडय़ांवर सिद्ध झाल्यावर २०१० मध्ये एक छोटेखानी लाँचिंग कार्यक्रम झाला. त्या प्रॉडक्टचं नाव होतं- ‘पेटीएम’.

८ नोव्हेंबरच्या रात्री पंतप्रधानांनी ५०० आणि १०००च्या नोटा चलनातून रद्द केल्यानंतर व्हायरल झालेला हा ब्रँड. ई-वॉलेट सुविधेची असंख्य अ‍ॅप आता बाजारात आहेत. अनेक बँकांनी स्वत:च तशी यंत्रणा तयार केली आहे. पण वापरण्यास सोपं आणि सुलभ, आकर्षक रंगसंगती, गैरव्यवहाराची कमीत कमी भीती, रिझव्‍‌र्ह बँकेचा असणारा परवाना आणि स्थानिक भाषेत उपलब्ध असणाऱ्या पेटीएमनं बाजी मारली आहे. नोटबंदीपूर्वी पेटीएमचे १५० दशलक्ष युजर्स होते. नोटाबंदीनंतर पुढच्या आठ दिवसांत ८ दशलक्ष युजर्सची भर पडली आहे. तब्बल ७०० टक्क्य़ांनी पेटीएमचे व्यवहार वधारले आहेत. पेटीएमच्या अकाऊंट्समध्ये पैसा जमा करणाऱ्यांचं प्रमाण १००० टक्क्य़ांनी वाढलंय. नोटाबंदीनंतर ‘एटीएम नही पेटीएम करो’ कॅचलाइनच्या जाहिरातींवर कंपनीने २७ कोटी रुपये खर्च केलेत. व्यापाऱ्यांना सोयीचं व्हावं यासाठी दीड टक्के अधिभार काढण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. एवढं सगळं करूनही कंपनीची आर्थिक स्थिती दणकट आहे. ‘झेरॉक्स’ आणि ‘कॅडबरी’ प्रमाणे ई वॉलेट म्हणजे पेटीएम असा समज रूढ होतो आहे. पंतप्रधानांची छबी पेटीएमच्या जाहिरातीत अवतरल्यानंतर नोटाबंदीच्या टीकाकारांना कंपनीचं महत्त्व लक्षात आलं.

तूर्तास पेटीएममध्ये चीनमधील बलाढय़ कंपनी अलीबाबाची ४० टक्के गुंतवणूक आहे. खात्यात पैसे असणारा, ते खर्च करण्याची तयारी असणारा टेक्नोसॅव्ही वर्ग भारतात बक्कळ आहे हे मार्केट टॅप करण्यासाठी अलीबाबा आणखी ३० टक्के गुंतवणार असल्याची वदंता आहे. जवळपास निम्म्याने मालकी असणाऱ्या चीनच्या कंपनीकडे भारतीयांचा आर्थिक डेटा जातोय हा धागा पकडून टीकेचा सूर तीव्र झालाय. अब्ज, निखर्वाच्या उलाढालीचे मानकरी झालेल्या विजय यांनी मात्र पेटीएम म्हणजे ‘छोटी भारतीय स्टार्टअप कंपनी’ असल्याचं म्हटलंय. ई वॉलेटचा धंदा तेजीत असतानाच विजय यांनी आता ‘पेमेंट बँके’कडे मोर्चा वळवला आहे. पुढच्या वर्षी हा उपक्रम कार्यान्वित होणार आहे. नोटाबंदीवरून यथेच्छ कलकलाट सुरू असतानाच पेटीएमची चांदी झाली आहे. कसं आहे-धन, वित्त, अर्थपासून आम्ही सुरक्षित अंतरावर असतो. पण तुमचं तसं नाही. आपापल्या क्षेत्रात प्रयत्न करत राहा. न जाणो पेटीएमप्रमाणे तुमच्या नशिबाचं ‘खुल जा सिम सिम’ व्हायचं !

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 2, 2016 1:14 am

Web Title: paytm vijay shekhar sharma
Next Stories
1 लग्न ‘दाखवावे’ करून
2 ‘नोट’ करावे अशा मुद्दय़ांची टाचणं!
3 स्तंभ खचला..
Just Now!
X