08 August 2020

News Flash

‘स्टार्टअप’ प्रवासाची जर्नी

मिशन कोणतंही असो, ‘स्टार्ट’ महत्त्वाचा. अर्थात तो ‘अप’ म्हणजे प्रगतीच्या गगनभरारीच्या दिशेनेच असणं बाय डिफॉल्ट.

व्हायरल म्हटल्यावर केवळ इन्फेक्शनच डोळ्यासमोर येते. पण नेटविश्वात सैरावैरा होणे म्हणजेच व्हायरल अशी मायाजालाची परिभाषा. मायाजालाला व्यापून टाकणाऱ्या इन्फेक्शनची गोष्ट – ‘व्हायरलची साथ’मध्ये.

मिशन कोणतंही असो, ‘स्टार्ट’ महत्त्वाचा. अर्थात तो ‘अप’ म्हणजे प्रगतीच्या गगनभरारीच्या दिशेनेच असणं बाय डिफॉल्ट. हा प्रेरणांकुर कोणाला कधी इन्डय़ुस करेल काही सांगता येत नाही. बंगळुरहून चेन्नईला जाणाऱ्या शताब्दी एक्स्प्रेसमध्ये मारवाडी समाजाचा मुलगा चढला. (जातिवाचक झालो म्हणून उद्धार करू नका) प्रसन्न सकाळी होणाऱ्या पाच तासांच्या प्रवासात सहप्रवासी एक स्मार्ट मुलगी आहे हे त्याच्या लक्षात आलं. तारुण्यसुलभ भावनांना जागत या तरुणीला इम्प्रेस करावं या हेतूने त्याने संभाषण सुरू केलं. अवघ्या काही मिनिटांत तरुणी स्टार्टअप इंडस्ट्रीत काम करत असल्याचं कळलं. एकदम त्याच्यातला उद्यमशीलतेचा वाण जागा झाला. तात्काळ त्याने ब्रँडेड टीशर्ट चांगल्या दराने विकण्याचा प्रस्ताव ठेवला थेट. स्वत:च्या फॅक्टरीत फोन करून त्याने टीशर्ट प्रॉडक्शन शेडय़ुल जाणून घेतलं आणि २४ तासांत सप्लाय मिळेल असं जाहीर केलं.

प्रवासात अनोखळी माणसाकडून चॉकलेट, शीतपेयं घेऊ नयेत, त्यात गुंगीचं औषध असण्याची शक्यता असते हे बायहार्ट करून निघालेल्या तरुणीला टीशर्टची २४ तासांत मोठी ऑर्डर पुरवणाऱ्या माणसाची शंका आली. ही रास्त शंका ओळखून त्या मुलाने आजोबा, बाबा आणि आता तो करत असलेल्या परंपरागत आंत्रप्रुन्यरल व्हेंचरची माहिती दिली. डेमो म्हणून बॅगेतून तलम फॅब्रिक सादर केलं. बिझनेसवाला आहे खरा हे जाणून मुलीने स्टार्टअपमधल्या को-ओनर्सला कॉल केले. दरम्यानच्या काळात मुलगा पाचवी नापास आणि मुलगी इंजिनीयर असल्याचं कळलं एकमेकांना. विक्रेत्यांना आपापले विभिन्न प्रॉडक्ट्स विकण्यासाठी कॉमन प्लॅटफॉर्म उभारून देण्याचा स्टार्टअप आहे, यासाठी २ कोटींचं भांडवलही उभं केल्याचं समजलं. मुलगा २४ वर्षांचा आहे आणि बिझनेस एक्सपिरिअन्स दहा वर्षांचा आहे. मुलीच्या स्टार्टअपसाठी मार्केटिंग न करता समोर आलेला हा पहिलाच सेलर. इडली, अप्पम वाफाळत्या सांबाराच्या साक्षीने अचानकच प्रेम आणि लग्नाचा विषय निघतो. परंतु चहा येईपर्यंत चर्चेची गाडी पुन्हा बिझनेसच्या ट्रॅकवर परतली. डीलपूर्वी सीएशी बोलणं गरजेचं आहे असं मुलगी सांगते, फोन लावते, नेटवर्क नसल्याने सिम कंपनीच्या नावाने.. असो.

मुलगा काटपाडीला उतरणार असतो, पण बिझनेस डील लक्षात घेऊन तो थांबतो. कानाला हेडफोन आणि स्मार्टफोनवर रममाण माणसाला उद्देशून माणसं किती गिझ्मो असतात असं ती मुलगी म्हणते. फोनाफोनी सुरू राहते, मुलगी अॅपलचा लॅपटॉप काढते. एक्सेलशीट अवतरते. मुलीला फोन येतो. मुलाने दिलेल्या ऑफरपेक्षा कमी दरात वस्तू मिळेल असं कळतं. स्मार्ट मुलगा २ टक्के डिस्काउंट देतो म्हणतो आणि आजच रात्री सप्लाय होईल सांगतो. चर्चा घासाघीस मोडमध्ये जाते. ‘तुमचं नाही-आमचं नाही हा मधला आकडा’ असं सॉर्टऑफ संभाषण. पहिल्यावहिल्या सेलरला आणि तोही चालत्या ट्रेनमध्ये बसल्या जागी समोर आलेल्याला दुखावून चालणार नाही हे जाणून मुलगी डील ओके करते. मुलगा रिसिट बुक काढतो. टोकन म्हणून मुलगी १ रुपया देते आणि सेल नंबरही देते. आमची खरोखरच फॅक्टरी आहे हे चेक करण्यासाठी मुलगा मुलीला आमंत्रण देतो. मुलीने हुशारीने वडलांना स्टेशनवर पिकअप करायला बोलवलेलं असतं. तुम्ही दोघंही चला फॅक्टरी पाहायला असं मुलगा म्हणतो. मुलीला जेन्युनिटी जाणवते. गाडीचा वेग मंदावतो. मुलगी पसारा आवरते. मुलगाही फॅब्रिक बॅगेत भरतो, रिसिट बुक आत ठेवतो.

समोरचा गिझ्मो माणूस घाईघाईने स्मार्टफोनवर टाइप करतो, हेडफोन बॅगेत कोंबतो. त्याच्या चेहऱ्यावरचा आनंदातिरेक पाहून मुलगी आणि मुलगा चक्रावतात. त्यांना काय माहिती गिझ्मो इसम या लाइव्ह डीलची ट्विटर कॉमेन्ट्री देत होता. ४० ट्विटची ही अनोखी कॉमेंट्री तुफान व्हायरल झालेय.. चोरून ऐकू नये शिकवण या गिझ्मोलाही मिळालेली, पण समोरच्या सीटवर स्टार्टअपचा उदय होत असताना कोण कसं शांत बसू शकतं.. पटापटा आँखो देखा हाल पुरवणारा गिझ्मो बंगळुरूत रिटेल मॅनजमेंट कंपनीसाठी काम करतो. त्याच्या कंपनीचं नाव आहे- ‘पैसा वसूल’. स्टार्टअपच्या लाइव्ह डेमोने गिम्झोचा ‘पैसा वसूल’ झाला की राव!
(सूचना- स्टार्टअप इच्छुकांनी आपल्याकडच्या जनशताब्दी एक्स्प्रेसचे तिकीट काढावे.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 29, 2016 1:08 am

Web Title: startup
टॅग Startup,Viva
Next Stories
1 मुलगी शिकली..
2 हा सूर्य, हा जयद्रथ..
3 फुकट ते पौष्टिक?
Just Now!
X