12 August 2020

News Flash

सगुण निर्गुण निराकार..

चारचौघांत असं दिसल्यानं ‘अब्रमण्यम सुब्रमण्यम’ झालं.

असे दचकू नका. आम्ही विरक्तीच्या वाटेला लागलेलो नाही. असंख्य ‘डेड’लाइन्सनी वेढलेल्या विश्वात तुमच्यासारखेच जगतोय आम्ही. एकमेकांशी दुरान्वयानंही संबंध नसलेल्या दोन घटनांमधील अद्वैताने मात्र आम्ही चक्रावून गेलो आहोत. ‘बादरायण संबंध’ जोडतात असं आतापर्यंत म्हणत तुम्ही उद्धार केला असेल; पण सूक्ष्मपणे पाहा, तुम्हालाही जाणवेल. वाचा, पटलं तर कळवा.

हरयाणाच्या विधानसभेत ‘कडवे वचन’ उपक्रमाअंतर्गत एका सद्गृहस्थांचं भाषण झालं. शिक्षणमंत्री राम बिलास शर्मा यांच्या विनंतीवरून हे सत्संगरूपी व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं. हे गृहस्थ अनावृत होते. त्यांनी अनुसरलेल्या धर्मतत्त्वांनुसार कपडय़ांचा त्याग केला जातो. हे जग चालवणाऱ्या सर्वोच्च परमात्मा शक्तिप्रति त्यांचं आयुष्य वाहिलेलं असतं. त्यांनी षड्रिपूंवर विजय मिळवलेला असतो. एका विशिष्ट धर्मीयांसाठी अशी मंडळी अत्यंत आदरणीय असतात. भरगच्च अशा विधानसभेत राज्यपाल, मुख्यमंत्री आणि मंत्रिगण यांच्यापेक्षाही वरच्या उच्चासनावर विराजमान या गृहस्थांनी धर्म आणि राजकारण (पती आणि पत्नी), पाकिस्तान, स्त्रीभ्रूणहत्या, गुन्हेगारी पाश्र्वभूमी असलेले राजकारणी अशा बहुविध ऐहिक गोष्टींवर विवेचन केलं. विधानसभा म्हणजे लोकशाहीचं एक प्रतीक. या वास्तूत भाषण करताना या गृहस्थांनी धर्माने राजकारणावर नियंत्रण राखावं अशी भूमिका घेतली. धर्म पती आहे आणि राजकारण पत्नी आहे. पत्नीचे रक्षण करणे पतीचे कर्तव्य आहे. पतीच्या अनुशासनाचे पालन करणे पत्नीचे कर्तव्य आहे, असेही त्यांनी सांगितले. धर्माचे राजकारणावर नियंत्रण नसेल तर उन्मत्त हत्तीवरचे नियंत्रण सुटल्यासारखी परिस्थिती ओढवेल असे त्यांनी स्पष्ट केले. स्त्रीभ्रूणहत्या ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. मुलींच्या जन्माला विरोध करणाऱ्या माणसांकडून संतांनी कोणतीही मदत स्वीकारू नये असा सल्ला त्यांनी दिला. देशात दहशतवाद रुजवणाऱ्या पाकिस्तानवर कोरडे ओढले. ४० मिनिटांचे मौलिक विचार सदस्यांनी नीट कान देऊन ऐकले. त्यांचे श्रवण झाले, प्रश्न आम्हाला पडले. विधानसभेत असंख्य धर्म, पंथ, जात, वंशाचे लोकप्रतिनिधी असतात. हे गृहस्थ जसे विशिष्ट धर्मीयांना आदरस्थानी आहेत तसेच अन्य सदस्यांच्या आपापल्या धर्मानुसार आदरणीय व्यक्ती आहेत. लोकशाही सदन असल्याने प्रत्येक सदस्याच्या श्रेष्ठतम धर्मगुरूला बोलण्याची संधी मिळणार का, असा प्रश्न पडला. ज्या सदनात आपापल्या विचारधारा बाजूला सारून प्रशासन चालवणे अपेक्षित असते तिथे धर्माधिष्ठित गुरूचे व्याख्यान होऊ शकते? संविधानानुसार सदनात पदानुसार सदस्यांची आसनव्यवस्था असते. व्याख्याते गुरुजी सर्वोच्च आसनावर विराजमान होते. हे नियमानुसारच आहे ना? सार्वजनिक ठिकाणी पोशाखाचे काही शिष्टसंकेत असतात. अनावृत व्याख्याता गुरूंची विचारधारा भारताला नवीन नाही. त्यांचे योगदानही सर्वश्रुत आहे. पोशाख हा वैयक्तिक विषय आहे. परंतु सार्वजनिक ठिकाणी पोशाखांची लांबी-रुंदी तसेच शरीर प्रदर्शनासंदर्भात नियम केले जाणाऱ्या व्यवस्थेत अनावृत व्याख्याता चालतो. अन्य विचारप्रवाहांच्या नुसार हे शिष्टसंमत नसू शकते. आदिम काळात आपण मोकळे होतो. आता वस्त्रप्रावरणांवरून माणूस जोखला जातो. प्रोटोकॉलसाठी ओळखल्या जाणाऱ्या वास्तूत निर्गुण व्याख्यान रंगते. हाच न्याय महिला साधकाला लागू होणार का, प्रश्न आणि उत्तर निराकार..

हरयाणापासून दूरवर आपल्या पुण्यात कर्वे रोडवर इलेक्ट्रॉनिक जाहिरात अर्थात साइनबोर्डवर चक्क पोर्न क्लिप सुरू झाली, तीही दिवसा. अतरंगी पाटय़ांसाठी प्रसिद्ध पुण्यात या कालविच्छेदक इलेक्ट्रॉनिक पाटीने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला. सुरुवातीला मॉर्फ इमेज, मनघडत कहाण्या असं वाटलं लोकांना पण नंतर पोलिसांकडे तक्रार झाली. पोलिसांनी या पाटीचं कंत्राट असणाऱ्या जाहिरात कंपनीच्या एका माणसाला अटकही केली. वायफाय आणि डेटापॅकच्या माध्यमातून नेटरूपी गंगा सहज वाहत असल्याने पोर्न आता काही गुपित राहिलेलं नाही. एरवी ट्रॅफिक जॅममुळे खोळंबून राहणाऱ्या कर्वे रोडवर या पाटीने कोंडी केली. पण ‘बंद करा ही थेरं’ किंवा ‘काय हे नसते उद्योग’ असं कोणी म्हणाल्याचं ऐकिवात नाही. कोंडी झालीच आहे तर जाता जाता बघू या, असा पवित्रा घेतला अनेकांनी. शालेय मुलांमध्ये पोर्न पाहण्याचे प्रमाण वाढल्याने मूल्यशिक्षणावरचा ताण वाढला आहे. चारचौघांत असं दिसल्यानं ‘अब्रमण्यम सुब्रमण्यम’ झालं. अहो पण दहीहंडीला प्रमुख पाहुण्या म्हणून सनीताई लिऑन चालतात. मग चुकून दिसली पोर्नक्लिप तर गावभर बभ्रा कशाला. सनीताई ज्या देशातून आल्यात त्या कॅनडात पोर्न ही एक व्यावसायिक इंडस्ट्री आहे. जशी सॉफ्टवेअर, लॉजिस्टिक्स असते तशी. तुम्हा-आम्हाला अनैतिक वाटतं त्याकडे सनीताईंच्या देशात रीतसर ‘काम’ म्हणून पाहिलं जातं. दुसऱ्या अर्थी त्यांनीही षड्िरपूवर विजय मिळवलाय की. आता तर आपण त्यांना ‘अभिनेत्री’ असंही म्हणतो. त्या सिद्धिविनायकला येतात. सनीताईंचे चित्रपट लोक तिकीट काढून पाहतात. पण कर्वे रोडवरच्या त्या क्लिपमधली माणसं वाईट आणि ती क्लिप चुकून चालवणारा माणूस थेट जेलमध्ये. आचार आणि विचार निराकार..

असा गोंधळ उडतो. सेक्युलर, नॉन सेक्युलर, कडवे, पावटे, डावे, उजवे, देशद्रोही, राष्ट्रवादी, विखारी, आस्तिक-नास्तिक, धर्माध असा काही तरी ठपका लावतातच माणसं. एखादा निकोप दृष्टिकोनाचा चष्मा मिळाल्यास धाडावा.

-पराग फाटक

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 2, 2016 1:09 am

Web Title: trending news of this week
Next Stories
1 सांत्वनाचा इव्हेंट..
2 व्हायरलची साथ : ऑलिम्पिक भावनेचा कोलाज!
3 दुकान बंद झाले आहे. क्षमस्व..
Just Now!
X