04 August 2020

News Flash

व्हायरलची साथ: भावना, कर्तव्य की निव्वळ बघे?

‘जिनेव्हा येथे ऑफिसच्या कामासाठी मला जायचं होतं.

कामानिमित्ताने ‘ती’ प्रवासाला निघाली होती. याच दरम्यान जिवावर बेतणाऱ्या संकटातून ती थोडक्यात बचावली. भावना गोठून टाकणाऱ्या त्या क्षणांतही तिने एक छोटी कृती केली. या कृतीनेच संकटाचे गहिरेपण जगासमोर आले. व्हायरल झालेल्या त्या फोटोकर्तीची कहाणी.

‘जिनेव्हा येथे ऑफिसच्या कामासाठी मला जायचं होतं. विमानतळावरच्या डिपार्चर हॉलमधून मी जात होते आणि अचानक कानठळ्या बसवणारा आवाज झाला. क्षणभर काय झालंय काही कळेचना. प्रचंड धक्का बसला. माझ्या आजूबाजूचे लोक रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. बहुतांशी लोकांनी त्यांचे पाय गमावले होते. मी माझ्या पायांकडे अनेकदा पाहिलं, स्पर्श केला. आपले पाय शाबूत आहेत याची चाचपणी करताना हृदय धडधडत होतं. पाय होते आणि मी जिवंतही होते. पडलेल्या जागेवरून मी डॉक्टर डॉक्टर असं ओरडले. पण सगळीकडे गोंधळ होता. कुणीच आलं नाही. या परिस्थितीत पत्रकारानं काय करावं? स्वत:ला सावरल्यानंतर मनात आलेला पहिला प्रश्न- लोकांना मदत करावी, डॉक्टर आपल्या मदतीला येईपर्यंत वाट पाहावी का फोटो टिपावा? आत कुठेतरी वाटलं- फोटोच घ्यावा. निरपराध लोकांना मृत्यूच्या खाईत ढकलणाऱ्या संकटाने काय होतं- हे जगभरातल्या लोकांना समजावं. अस्ताव्यस्त झालेल्या सामानातून कॅमेरा काढला आणि समोरचं दृश्य टिपलं. युनिफॉर्मचं पिवळं जॅकेट घातलेली एक बाई आणि आपण हल्ल्यातून वाचलो आहोत हे घरच्यांना फोनवरून सांगणारी एक मुलगी. माझ्यासमोरच्या बाकडय़ावर त्या दोघी विमनस्क अवस्थेत होत्या. डेबरिस, धूर, धूळ, कोलाहल यांमध्ये मी थोडेफार फोटो काढू शकले. ज्यांचे फोटो मी काढले, ते लोक स्वत:च्या पायावर चालू शकत नव्हते. मी त्यांना मदत करू शकत नव्हते याचं वाईट वाटलं. काही मिनिटांतच शस्त्रधारी सैनिक आले. त्यांनी बाहेर पडण्याच्या सूचना दिल्या. माझ्यासारखंच कामासाठी विमानतळावर आलेल्या मात्र संकटात अडकलेल्या लोकांना तिथेच सोडून जाताना मन हेलावलं. स्वत:च्या पायावर बाहेर जाणारी मी एकमेव होते. मला त्यांना मदत करायची होती पण करू शकले नाही. मला भराभर बाहेर नेण्यात आलं, तिसरा स्फोट होऊ शकतो या भीतीने. संपूर्ण शरीर थरथरत असताना मी फोटो कसा काढला मला ठाऊक नाही. आपण हे करावं असं कुठेतरी खोलवर जाणवलं आणि तो क्षण कॅमेऱ्यात कैद झाला. माझ्यावरच्या प्राथमिक उपचारानंतर मी तो फोटो फेसबुकवर टाकला. कॅप्शन देताना डोळ्यातलं पाणी कीबोर्डवर आलं पण तरी लिहिलं. ‘एक्स्प्लोजन- हेल्प’.

जॉर्जिअन पब्लिक ब्रॉडकास्टरसाठी बेल्जियमध्ये आठ र्वष स्पेशल करस्पॉडंट म्हणून काम करत असलेल्या केटीव्हान कार्दाव्हा यांचं हे मनोगत. काही दिवसांपूर्वी ब्रसेल्स विमानतळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातून त्या वाचल्या. त्या परिस्थितीतही त्यांनी काढलेल्या फोटोने मदतीला वेग आला. कारण त्या फोटोत जेट एअरवेजच्या निधी चाफेकर होत्या. ब्रसेल्स आणि बेल्जियम म्हणजे अमेरिका, इंग्लंडइतका भारतीय मंडळींनी भरलेला परिसर नाही. परंतु कामासाठी भारतीय माणसं जगभर वावरत असतात. निधी चाफेकरही आपल्या कंपनीसाठी तिथे काम करत होत्या. कार्डव्हा यांनी काढलेल्या फोटोत निधी यांनी परिधान केलेलं युनिफॉर्मचा भाग असलेलं पिवळं जॅकेट ओळखीचा आधार ठरलं आणि सूत्रं हलली. भारत सरकार, ब्रसेल्समधील भारतीय दूतावास, जेट एअरवेज आणि निधी यांचे कुटुंबीय सगळ्यांचे प्रयत्न सुरू झाले.

विकृत मनोवृत्ती अंगीकारलेल्या मंडळींमुळे दहशतवादी हल्ले आता रुटिनचा भाग झाले आहेत. तीव्र शब्दांत निषेध नोंदवणं आणि कुणीतरी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारणं या ‘पॅसिव्ह’तेलाही आपण सरावलो आहोत. मुद्दा उरतो तो म्हणजे आकस्मिकपणे समोर येणाऱ्या अशा घटनांवेळी आपला दृष्टिकोन काय असू शकतो याचा. भावनाविवश होऊन स्वत:चं खच्चीकरण होऊ देणं, आपण नको त्या लफडय़ात अडकायला म्हणून निव्वळ बघ्याची भूमिका घेणं किंवा नागरिक तसंच माणूस म्हणून आपलं कर्तव्य पार पाडणं. भारताशी काहीही संबंध नसलेल्या कार्डव्हा यांनी कर्तव्याला प्राधान्य दिलं. आणि मी कसा शूरपणे फोटो काढला किंवा हल्ल्याचे पहिले फोटो फक्त माझ्याकडे असा डंका न पिटता. निधी यांची प्रकृती आता स्थिर आहे आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. निधी यांच्यासह हल्ल्यात जखमी झालेल्या प्रत्येकामागे शुभेच्छांचं बळ उभं करणं एवढंच आपल्या हाती.

(कार्दाव्हा यांनी काढलेला ‘तो’ फोटो उपलब्ध आहे. मात्र संवेदनशीलता जपणे महत्त्वाचे मानून आम्ही तो छापलेला नाही. फोटोकर्ती आणि त्यामागची भावना महत्त्वाची!)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 1, 2016 1:11 am

Web Title: trending on social media
टॅग Social Media,Viva
Next Stories
1 व्हायरलची साथ: विराट शिकवण!
2 व्हायरलची साथ: सामान्य ज्ञान की अज्ञानात सुख?
3 व्हायरलची साथ: प्रकाशझोतातला ‘स्पॉटलाइट’
Just Now!
X