व्हायरल म्हटल्यावर केवळ इन्फेक्शनच डोळ्यासमोर येते. पण नेटविश्वात सैरावैरा होणे म्हणजेच व्हायरल अशी मायाजालाची परिभाषा. मायाजालाला व्यापून टाकणाऱ्या इन्फेक्शनची गोष्ट – ‘व्हायरलची साथ’मध्ये.

स्वयंप्रतिमाखेचदंडुका अर्थात सेल्फीस्टिकमधून फोटो काढणे, तो अपलोड करणे आणि त्यापुढच्या उपरोक्त चळवळींकरिता आम्ही हल्ली इन्स्टाग्राम मुक्कामी असतो. फेसबुक चावडीवरचा वावर आटला आहे. पण परवा आम्ही आमच्या दुसऱ्या विरोपपत्रावर अर्थात ई-मेलवर लॉगइन केले. पाहतो तो काय खच पडलेला फेसबुक नोटिफिकेशनचा. प्रसिद्धीपराङ्मुखता आमचे धोरण आहे, अशा परिस्थितीत एवढं झालं तरी काय की लोकांनी आमची आठवण काढावी? मग त्वरेने फेसबुकी गेलो, तर फेसबुकजनकांविरुद्ध पत्र मोहिमेला उधाण आलेलं.

मागच्याच वर्षी झकरबर्गजींनी आपल्या पंतप्रधानांना त्यांच्या पंचक्रोशीत बोलावून आदरसत्कार केल्याचं आम्ही पाहिलं होतं. यावरून दोन्ही बाजूंचे संबंध बरे असावेत, असा समज आम्ही करून घेतलेला. नेटीझन मंडळींनी ‘ट्राय’ नावाच्या संस्थेला पत्रव्यवहार सुरू केलाय, पत्रांचा आकडाही लाखांत आहे म्हणे. कोणाविरुद्ध तर साक्षात समकालीन झकरबर्गजी. परवापर्यंत त्यांच्या उद्यमशीलतेचे कवित्व आम्ही ऐकत आलो परिषदा आणि परिसंवादांमध्ये. मग एकदम वारं फिरलं कसं काय- आम्ही काही तंत्रस्वामी नाही जे उत्पादन मोडमध्ये असणाऱ्या स्मार्टफोनची गुणवैशिष्टय़े घडाघडा वदतात. अल्पमतीने समजून घेताना कळलं की हे ‘फ्री फेसबुक’ असं मॅटर आहे. आतापर्यंत आम्हाला शाळेत मोफत माध्यान्ह भोजन देतात तेवढंच माहिती होतं. त्या खिचडीचं काय होतं हे माहीत असल्याने या फ्री प्रकारामुळे गांगरून गेलो.

खरं तर झकरबर्गजींचा हेतू केवढा उदात्त. कच्छच्या रणातल्या माणसापासून, रामेश्वरच्या सेतूवरून श्रीलंकेला निघालेल्या व्यक्तीपर्यंत सर्वाना तंत्रज्ञान मिळावे. अरुणाचलातल्या माणसाला जीपीआरएसद्वारे आपल्या राज्याचा काही भाग चीनमध्ये असल्याचं कळावं, या धर्तीवरचं सगळं काही. आपण व्याख्यानात ऐकतो ना- समाजातला शेवटचा माणूस- अगदी तोच (वंचित, उपेक्षित, दुर्बल हे बाय डिफॉल्टच) या माणसापर्यंत टेक्नोलॉजी न्यायची आणि ती फुकटात द्यायची असा विडाच उचललाय झकरबर्गजींनी. अहो हल्ली मोठमोठय़ा लोकांच्या शिंकाही स्पॉन्सर्ड असतात आणि इकडे फुकट फेसबुक द्यायचं म्हणतात. विचारांचं ३६० डिग्री आवर्तन झेपेना.. पण मग विरोध का बुवा- माहिती, ज्ञान, फोटो, व्हिडीओ सगळं तुम्हाला दारी येईल पण ते फेसबुकला हवं असेल तेच.

बुद्धिजीवी वाटू लागलो ना- सोपं कठीण करून सांगणाऱ्याला तेच म्हणतात हल्ली. डेमो पाहू- समजा, तुम्हाला दुर्वाबद्दल माहिती हवीय. वा टाइप होईपर्यंत आली माहिती. पण फेसबुकचं सुदान प्रांतातल्या दुर्वा उत्पादकाशी टायअप आहे. मग तुमच्या प्रांतातल्या दुर्वा अगदी सुवासिक आणि आठ दिवस निर्माल्य होणार नाही, अशा असतील तरी उपयोग नाही. कारण फेसबुक फक्त सुदानच्या दुर्वाचीच माहिती देईल. ऑनलाइन विक्रीसाठी त्याच दुर्वा उपलब्ध दिसतील. कावीळ झाल्यावर पिवळं दिसतं, तसं आता निळं दिसणार- झकरबर्गजींचा आवडता कलर, त्यांचा चष्मा, त्यांची दृष्टी सगळ्यांनी अंगीकारावी, असा हट्ट आहे त्यांचा. पण आमचे नेटिझन्स ‘देई वाणी, घेई प्राणी’ नाही. त्यांनी मोहीम काढली.

इंटरनेट हवंय, पण त्यावर कोणा एकाची मक्तेदारी नको या भूमिकेतून. टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॅरिटी ऑफ इंडियानेही दखल घेतली आणि झकरबर्गजींना तूर्तास चाप लावलाय. भूखंड हडपतात तसं इंटरनेट स्वार्थासाठी लाटण्याचा हा प्रकार आहे हे वाचून आम्ही खडबडून जागे झालो. प्रो आणि अँटी असे दोन्ही बाजूंचे विचार वाचून दमलो- भूक लागली. तेलाच्या कॅनवर बिस्किटांचा पुडा फ्री मिळालेला. पौष्टिक खावं, पण फुकट मिळालं की मिंधेपण येतं म्हणतात. फुकटचा पौष्टिकपणा घेऊन अजीर्ण व्हायला नको, आज लंघनच बरे..