11 July 2020

News Flash

व्हायरलची साथ: बालपणाचा स्पेक्ट्रम..

रुद्रने पत्रात लिहिलं-लाइट्सइबरसाठी नाण्यांच्या रूपात १००६ रुपये जमवले आहेत.

नेटविश्वात एखादा विषय, छायाचित्र, मुद्दा सैरावैरा होणे म्हणजेच ‘व्हायरल’ अशी मायाजालाची परिभाषा. या आठवडय़ात मायाजालाला व्यापून टाकणाऱ्या इन्फेक्शनची गोष्ट आहे – एका बालपणाची आणि बालपण टॅप करणाऱ्या उद्योजकाची.
बालपण या चार अक्षरी शब्दांत एक सुखनैव जिंदगी दडलेली आहे. कर्तेपणाची झूल लादली जाण्यापूर्वीचं जग. नोकरी-व्यवसाय नाही. सांसारिक जबाबदाऱ्या नाहीत. कर्जाचे हप्ते नाहीत. शिष्टाचार जपण्याचं मिंधेपण नाही आणि एकुणातच रुटिनची चाकोरी नाही. हुंदडण्याचं, खिदळण्याचं, धमाल मस्तीचं स्ट्रेसमुक्त जग. चंपक-ठकठक-चांदोबा वाचणं, बोरकूट खाणं, आगळीक केली म्हणून हातावर ताशीव लाकडी पट्टीचे रट्टे झेलणं, छत्री आणि रेनकोट असतानाही नखशिखांत भिजणं, ट्रेन किंवा बसमध्ये खिडकी मिळावी यासाठीची धडपड, जत्रेत ‘मौत का कुआ’ पाहण्याचं कुतूहल, मारुतीच्या मंदिरात त्याची इन्फिनिटी शेपटी कुठपर्यंत आहे याचा घेतलेला शोध, हट्टाने प्लॅस्टिक बॉलच्या आकारातलं आइस्क्रीम मिळवणं असे अनेक बालपणाचे कप्पे प्रत्येकाच्या मनाच्या सांदीकोपऱ्यात जपलेले असतात. बदल हा आपला स्थायीभाव. व्हायरल झालेली ही गोष्ट आहे एका बालपणाची आणि बालपण टॅप करणाऱ्या उद्योजकतेची.

दिल्लीत राहणाऱ्या सात वर्षांच्या रुद्रने गेल्या वर्षी ‘स्टार वॉर्स-द फोर्स’ अवेकन्स बघितला. सातव्या वर्षी आम्हाला रामायण महाभारतातलं रामानंद सागर यांनी दाखवलेलं युद्ध ठाऊक होतं फक्त. असो. आता स्टार वॉर्स घराजवळच्या मोरेश्वर चित्रपटगृहात बघणं पॉसिबल नाही. साहजिकच मल्टिप्लेक्समधली राजदरबारात असते तशी ऐसपैस शेवटची लाल खुर्ची, थ्री डी गॉगल, पाव लिटरची कोकची बाटली आणि १०० ग्रॅम पॉपकॉर्न असा २५० रुपयांचे पॅकेज, ओ वॉव, ऑसम अशा उद्गारपूर्ण वातावरणात रुद्रने स्टारांचं वॉर्स पाहिलं. या मूव्हीमधली लाइट्सइबर त्याला जाम आवडली. पिक्चरमधल्या कॅरेक्टर्सनी हाती घेतलेली ऊर्जेची तलवार किंवा मशाल असं स्वैर भाषांतर वस्तू समजून घेऊन तुमच्यासाठी केलं आहे. रुद्रची आई आधुनिक मॉम. पण मागितलं आणि लगेच मिळालं तर किंमत राहात नाही हे एथिक रुद्रच्या आईने बिंबवलेलं. लाइट्सइबरसाठी पैसे साठव पिगीबँकेत असा सल्ला आईने दिला. वर्षभर कासवाच्या गतीने रुद्रकडे १००६ रुपये जमा झाले. आणि सगळी नाणी. नाण्यांच्या टांकसाळीचे आईने हजारच्या एका गुलाबी नोटेत रूपांतर केले नाही. लाइट्सइबर विकणाऱ्या कंपनीला पत्र लिहिण्याचं आईने सुचवलं. इथून खरा ट्विस्ट आहे कहानी में.

रुद्रने पत्रात लिहिलं-लाइट्सइबरसाठी नाण्यांच्या रूपात १००६ रुपये जमवले आहेत. कॅश ऑन डिलिव्हरी देताना हा नाण्यांचा खजिना स्वीकारणार का? इलेक्ट्रॉनिक खेळण्यासाठी वर्षभर पैसे जमवणाऱ्या मुलाच्या पत्राला उत्तराला कोण कितपत सीरियसली घेणार हा मुद्दा होताच. पण बॉस क्लायंट इज किंगचा जमाना आहे. पत्र कंपनीला पोहचलं. वस्तू विकतानाच माणसाला जिंकून घेणं महत्त्वाचं हे तत्त्व त्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या अ‍ॅप्रोचमध्ये भिनलेलं. त्यांनी भन्नाट विचार केला आणि कामाला लागले. स्टार वॉर्समध्ये जेडी नावाचं कॅरेक्टर असतं. लाइट्सइबररूपी जादूई तलवार हाती असलेलं कॅरेक्टर. हृतिक रोशनच्या क्रिशमध्ये जादू नावाचं परलोकातलं कॅरेक्टर होतं तसंच स्टार वॉर्समध्ये योडा असतो. योडा आणि रुद्र अर्थात लाइट्सइबर हवा असलेला जेडी अशी नात्याची गुंफण करत कंपनीने छानसा संदेश तयार केला. ग्लेझ कागद, त्यावर दोन कोपऱ्यांत योडा आणि जेडीचं ग्राफिक आणि लाइट्सइबर धाडत आहोत अशा आशयाचा संदेश रॅप करण्यात आलं. त्याच्या जोडीला कोरी करकरीत लाइट्सइबर पॅक केली गेली. कंपनीचं ब्रँडनेम ठळकपणे कोरलेल्या खोक्यात हे सगळं जमा झालं. पत्राला उत्तर नाही म्हणून रुद्र हिरमुसला होता. लाइट्सइबर काही आपल्याला मिळत नाही. पैसे साठवले, पत्र लिहिलं-पण काही नाही. मित्रांना लाइट्सइबर खेळताना पाहणं त्याच्या हाती उरलं. अशा वातावरणात त्या कंपनीचा माणूस रुद्रच्या घरी अवतरला. नमस्कार, चमत्कार झाले. सुरुवातीला त्यांनी योडाचा जेडीसाठी अर्थात रुद्रसाठीचा संदेश हाती दिला. तो वाचून होण्याआधीच कंपनीच्या माणसाने लाइट्सइबर काढली आणि रुद्रच्या हाती सोपवली. स्वारीने जोरदार आरोळी ठोकली, आईला मिठी मारली. पठय़ा जाम खूश झाला. लाइट्सइबर हाती घेऊन फिरतानाच त्याने पिगीबँक कंपनीच्या माणसासमोर आणली. तो माणूस म्हणाला, मित्रा पत्र पुन्हा वाच. योडीने तुला ही भेट दिली आहे. पैसे द्यायचे नाहीयेत तुला. रुद्र आणि त्याची आई अवाक झाले. हा काय प्रकार! एवढा सगळा खटाटोप फुकटात? कंपनीच्या माणसानं सांगितलं-‘वस्तू विकणं आमचं काम. त्यातूनच आम्हाला पैसा मिळतो. पण काही गोष्टी पैशापल्याड असतात. रुद्रने पै पै गोळा करत रक्कम जमवली. त्याची पिगीबँक रिकामी करणं आम्हाला योग्य वाटलं नाही. लाइट्सइबरच्या चाहत्यासाठी एवढं आम्ही नक्कीच करू शकतो. आमच्याकडून चिमुरडय़ा खरेदीकारासाठी प्रेमाची भेट.’

रुद्र आणि त्याचं अख्खं कुटुंब पुढे आयुष्यभर आपल्याकडूनच ऑनलाइन वस्तू खरेदी करतील याचं सेटिंग या एका इमोशनल गिफ्टने केलं. मामाचा गाव अनुभवण्यासाठी ‘आजोळ’ नावाच्या रिसॉर्टवर जावं लागण्याचे दिवस. अंगणातून वर पाहताना आभाळभर पसरलेले ‘स्टार्स’ नाहीत आणि भावंडांशी चालणारी ‘वॉर्स’ नाहीत. बालपणाचा स्पेक्ट्रम बदललाय तो असा!

– पराग फाटक

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 29, 2016 1:09 am

Web Title: viral on social media childhood
Next Stories
1 व्हायरलची साथ: एक सेल्फी आरपार!
2 व्हायरलची साथ: मुक्तछंदी ‘चाम्पियन’!
3 व्हायरलची साथ: भावना, कर्तव्य की निव्वळ बघे?
Just Now!
X