माणसं मोठी कशी होतात याचं सगळ्यांनाच कुतूहल असतं. यो, फंकी लुकिंग माणूसही महानतेच्या मखरात जातो हे पचणं थोडं अवघड. पण त्याने हे ‘करून दाखवलं’. तेही विधायक कृतीतून. आणि मोठं होताना जपलेली मूल्यं अगदी ट्रॅडिशनल आहेत. ‘त्या’ फ्युजन व्यक्तिमत्त्वाची कहाणी!

‘अर्बन युथ’ नावाची इंटरेस्टिंग कॉन्स्पेट आम्हाला फार भावते. त्यातही दिल्लीकर म्हटल्यावर काही विचारूच नका. केसांना जेल आणि कुर्रेबाज स्टाइल वगैरे केलेली, डोळ्याला इट्स काइंड ऑफ कुल मॅन असा गॉगल, मुखी च्युइंग गमचा रवंथ, आत्मविश्वास असा ठासून भरलेला, अंगावर विविध ब्रँडेड वस्तूंची रेलचेल, मातृभाषा हिंदी मात्र इंग्रजीवर प्रभुत्त्व. जगाने त्याला पहिल्यांदा पाहिलं तेव्हापासून तो असाच ‘यो’ लुकिंग आहे. क्रिकेट खेळणं हे त्याचं काम. त्याच्याच नेतृत्त्वाखाली भारताने १९ वर्षांखालील संघाचा विश्वचषक जिंकला. कर्णधार असलेल्या त्याने संघासमोर उदाहरण ठेवत शानदार प्रदर्शन केलं. पण प्रदर्शनापेक्षा चर्चा झाली त्याच्या आक्रस्ताळ्या सेलिब्रेशनची. फाजील आत्मविश्वास आणि उर्मटपणाकडे झुकणारं वागणं बरं नव्हे अशाही चर्चा रंगल्या. अंगी उपजत असलेली अमाप गुणवत्ता, टेक्नोसॅव्ही असल्याने अत्याधुनिक उपकरणांच्या माध्यमातून त्याने सातत्याने स्वत:मधल्या फलंदाजाला सुधारलं. या प्रोसेसची परिणिती भारतीय संघात स्थान मिळण्यात झाली. त्याची बॅट त्याचा श्वास झाली. त्याने मागे वळून पाहण्यापेक्षा लोकच त्याच्याकडे वळून पाहू लागले.
एवढय़ातच आयपीएलची जत्रा भरली. किंगफिशरी मालकांच्या संघाने त्याला स्कायस्क्रॅपरी बोली लावून विकत घेतलं. क्रिकेटेन्मेंट नावाखाली होणाऱ्या पाटर्य़ा, पेजथ्री कल्चर, बेगडी वागणं या काव्यशास्त्रविनोदात तो रमू लागला. बक्कळ पैसा मिळत होता, म्हणाल तेवढी प्रसिद्धी मिळत होती. हे डिस्ट्रॅक्शन आहे, ते बाजूला सार हे सांगायला वडलांचं छत्रही नव्हतं त्याच्याकडे. कामगिरी घसरू लागली, आतापर्यंत त्याच्या एलिगंट कव्हर ड्राइव्हची चर्चा करणारे आता त्याच्या टेक्निकमधले दोष काढू लागले. त्याच्या चंगळवादी लाइफस्टाइवरही टीका होऊ लागली. आपल्याबरोबर नक्की काय होतंय त्याला कळेचना. समुद्रकिनाऱ्यावर उभं असताना लाट पाण्याबरोबर वाळूही ओढून नेते. पायाखालची वाळू सरकणे या वाक्यप्रचाराचा त्याने अनुभव घेतला.

टीम इंडियात एक गुरुबंधू होता. यशापयश, पैसा-प्रसिद्धी, कौतुक-टीकेचे असंख्य चढउतार त्याने पचवलेले. आता आपण सुधारलो नाही तर आपला विनोद कांबळी होईल हे त्याने जाणलं आणि तो कामाला लागला. फलंदाजीची सगळी तंत्रकौशल्यं पुन्हा घोटली. पेस असो की स्पिन-कोणालाही तोंड देता येईल इतका सराव केला. डय़ुनेडिनची हुडहुडी भरवणारी थंडी असो की रणरणतं पर्थ- कुठेही शाबूत राहील अशी तंदुरुस्ती कमावली. परफेक्शनची ओढ लागलेल्या त्याने फिल्डिंगचं तंत्रही सुधारलं. जगातल्या यच्चयावत संघांचा आणि खेळाडूंच्या कुंडल्या कोळून प्याला तो. यशस्वी व्हायचं, आता माघार नाही. कोणी बोलंदाजी केली तर तिखट जीभ नेमकी कधी चालवायची याचाही अभ्यास केला. देशाचं प्रतिनिधित्त्व करताना कसं बोलायचं, काय बोलायचं नाही, प्रोटोकॉल कसे फॉलो करायचे याचं तंत्र अवगत केलं. कट्टर प्रतिस्पर्धी संघातल्या खेळाडूंशी मैत्रीचं नातं जोडलं. आता तो टीम इंडियाचं रन मशीन आहे.

त्याची धावांची भूक अवाक करणारी आहे. कोणाचाही पाठलाग करणं कठीणच. त्यातही अमूक षटकांत तमूक असा धावांचा पाठलाग चॅलेंजच. पण तो म्हणतो मला चॅलेंज आवडतं. जिवंत पिचवर, मातब्बर गोलंदाजांला टक्कर देत रन्स करणं महत्त्वाचं असंही सांगतो. बॉलीवूड अभिनेत्रीला गर्लफ्रेंड केल्यावर सायबर टोळ्यांचा माराही झेलला. परवा टीम इंडियासमोर पाकिस्तानचं आव्हान होतं. सो कॉल्ड धर्मयुद्ध वगैरे. हरलो तर वर्ल्डकपमधून घरी असं इक्वेशन. चॅलेंज होतंच आणि त्याने सोनं केलं त्याचं. चॅलेंज पेलताना हाफ सेंच्युरी झाल्यावर स्टँडमधल्या एका व्यक्तीला त्याने वाकून अभिवादन केलं. स्टँडमधल्या व्यक्तीने संयत स्मितहास्य करताना येस्सचा अंगठा दाखवला. सामना झाल्यावर तो म्हणाला- ‘त्याला पाहात मी मोठा झालो. भव्य मैदानावर चाहते त्याच्या नावाचा पुकार करत आहेत हे चित्र मी कितीतरी वेळा पाहिलं, अनुभवलं. अब्जावधी देशवासियांच्या आशाअपेक्षांचं ओझं त्याने दोन दशकांपेक्षा जास्त काळ समर्थपणे सांभाळलं. तो माझ्यासाठी दैवत आहे. मैदानावर स्टँड्समध्ये तो समोर असताना ६७,००० चाहत्यांच्या साक्षीने त्याला कुर्निसात करता आला हे माझं भाग्य आहे’.

ही खेळी सचिनला समर्पित हे सांगताना कणखर मनाच्या त्याच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या. कर्तेपणाची झूल एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होते. खांदे बळकट असणाऱ्यांनाच झूलीचं वजन पेलतं, बाकीचे गांगरून जातात. पाकिस्तान संघाला उद्देशून व्हायरल झालेल्या थुकरट पीजेंपेक्षा तेवढय़ाच प्रमाणात व्हायरल झालेलं हे कर्तेपणाचं संक्रमण आपल्यासाठी महत्त्वाचं. सकस, पौष्टिक गोष्टीही व्हायरल होतात आणि ‘यो’ लुकिंग माणसंही योग्य ट्रॅडिशन्स जपतात ही शिदोरी आपल्यासाठी! आतापर्यंत तो कोण हे तुम्हाला कळलं असेलच- नसेल तर बुरा ना मानो ‘कोहली’ है!