19 February 2019

News Flash

वर्गीय-प्रवृत्ती नव्हे;‘प्रवृत्ती-वर्ग’

माणूस जीवनाच्या निरनिराळ्या प्रांतांत ज्या भूमिकांमध्ये असतो त्याही एकाच स्तराच्या असतील असे काही नसते.

अभिजात भांडवलशाहीचे कम्युनिस्ट वर्तुळात रुजलेले प्रारूप (मॉडेल) व्यवस्थेतील नूतनीकरणांमुळे कालबाह्य तर झालेले होतेच. शिवाय त्यात तत्त्वतच वर्गआधी येतात व ते सत्ता निर्मितात ही गैर-समजूतही होती. 

भांडवलशाहीतील  वर्गीयतेचे नमुनेदार कम्युनिस्ट प्रारूप अनेक अंगांनी खोटे पडत गेले आहे. (१) एक शुद्ध शोषक आणि दुसरा शुद्ध शोषित असे दोनच दोन वर्ग राहिले नाहीत. (२) भाकितानुसार मधले स्तर नष्ट होण्याऐवजी वाढतच गेले. (३) फम्र्सकडून फम्र्सचे शोषण आणि एकाच फर्मअंतर्गत उतरंडीनुसार शोषण असे दोन्ही होत गेले. (४) मध्यमवर्ग स्वतंत्र व्यावसायिक म्हणूनही वाढला आणि नोकरदार म्हणूनही वाढला. (५) शोषित-फम्र्सचे मालक, स्वत उत्पादक योगदान करून आणि स्वतच्या कामगारांचे शोषण करूनही, कधी मालक असूनही शोषित राहिले! (६) शोषक फम्र्समधील तळचे कामगारसुद्धा इतर फम्र्सच्या शोषणात हिस्सा घेऊ शकले. (७) फर्मअंतर्गत उतरंडीत बजावण्याच्या भूमिका, या अंशत उत्पादक श्रमही करणे आणि अंशत वरून मिळालेली सत्ता खाली गाजवणे, अशा संमिश्र बनल्या. (८) शेतकऱ्यांमध्ये अशी उतरंड बनली की त्यातील स्तरांत, वरून खाली जावे तसे, शेतमालकत्व उतरत आणि शेतमजूरत्व चढत गेले. (९) एकुणात ‘वर्ग-विसंगत’ भूमिका कमी होण्याऐवजी वाढत गेल्या. (१०) सरकारी नोकरांची अडवणूक क्षमता इतकी वाढली की ते उद्योजकांनाही नाडू शकले. (११) भांडवलाच्या मालकीपेक्षा ताबा किंवा नियंत्रण महत्त्वाचे ठरून आणि किरकोळ भागधारक वा बचतदार यांचे भांडवल व्यवस्थापनेच वापरू लागली. (१२) स्पर्धा हा जरी मुख्य युगधर्म असला, तरी संघटित होऊन स्पर्धेवर आवर घालणे, हे कामगार, मालक वा सम-हित-संबंध असलेल्या कोणाही समूहाला शक्य झाले. संख्याबल हेही बल बनले.

माणूस जीवनाच्या निरनिराळ्या प्रांतांत ज्या भूमिकांमध्ये असतो त्याही एकाच स्तराच्या असतील असे काही नसते. एखाद्या फर्ममधील तळचा कामगार हाच, बाहेर चाळमालक असू शकतो. दुसरे तुलनेने गरीब कामगार त्याचे भाडेकरू असू शकतात. गरीब कामगाराची बायको श्रीमंत कामगाराकडे भांडी घासायला जात असू शकते. एखादा सरकारी नोकर किंवा अनुदानित प्राध्यापक एखाद्या गावातल्या त्यातल्या त्यात बडय़ा शेतकऱ्यापेक्षा श्रीमंत असू शकतो. एखादा श्रीमंत म्हातारा रात्री पावसाळ्यात अडचणीत असला तर एरवी भाडय़ाने रिक्षा घेऊन चालवणारा श्रमिक-रिक्षावाला त्याला नाडू शकतो. एखादा उद्योजक स्वत उत्पादक योगदान करून मिळणाऱ्या फळात श्रमिकांनासुद्धा भागीदार मानून वाटा देत असू शकतो. म्हणजेच सामाजिक स्थाने आणि वृत्तिवैशिष्टय़े (उदार/ अनुदार; नडणारी/ नाडणारी) यांच्या काय जुळण्या झालेल्या असतील हे नुसत्या औपचारिक पदांवरून (मालक/ नोकर; वरिष्ठ/ कनिष्ठ) एकास एक ठरवता येत नसते.

नऊ नवे प्रवृत्ती-वर्ग

शोषण ही प्रक्रिया ‘‘नाडणाऱ्या बलवानांकडून, नडलेल्या बलहीनांचे उत्पादक योगदान हिरावून घेणे’’ अशी असते. जसे सत्ता-धारी निर्माण होतात तसे सत्ता-प्रतिकारीदेखील निर्माण होतात. सत्ता-संघर्षांतून बाहेर फेकले गेलेले दुर्बल हे शोषणापासूनही ‘वंचित’ असतात. याउलट सत्तेची गरज नसण्याइतकी वैयक्तिक सौदाशक्ती असलेले लोकही असतात. यातून सत्ता या ‘अक्षावर’ आपल्याला सत्ताधारी, सत्ताप्रतिकारी आणि सत्तानिरपेक्ष असे तीन प्रकार मिळतात.

योगदान करण्याची संधीच मिळत नसलेले लोक शोषित नव्हे तर ‘वंचित’ असतात. खुद्द शोषण याही अक्षावर, शोषणाची संधी वापरणारे किंवा ती असूनही न वापरणारे लोक असतात. एकाच वेळी शोषण करणाऱ्या व शोषण केल्या जाणाऱ्या व्यक्तींचाही एक वर्ग असतो. जर मिळणारे फल हे योगदानापेक्षा जास्त (योगदान<फल) असेल तर तो ‘शोषक’ ठरतो. याउलट जर मिळणारे फल हे योगदानापेक्षा कमी (योगदान>फल) असेल तर तो ‘शोषित’ ठरतो. या अंगाने ‘योगदान>फल’ आणि ‘योगदान<फल’ हे प्रकार तर मिळतातच. पण आपण तिसरा आणि महत्त्वाचा प्रकारही लक्षात घेतला पाहिजे. तो म्हणजे ऋण-योगदान करणारे व तरीही कमीअधिक फल मिळवणारे लोक. यांचा विशेष असा की हे विघातक लोक बल-निर्मिती करून ‘बल’ हा रोग उत्पादनाच्या क्षेत्रातही पसरवत रहातात. हे शोषणाचे मूळ असतात. म्हणजेच शोषण या अक्षावरही आपल्याला योगदान>फल, योगदान<फल आणि ऋण-योगदान अशा तीन विधा उपलब्ध होतात.

या दोन अक्षांच्या जुळण्या तीन बाय तीन म्हणजे नऊ होतात व पुढील मॅट्रिक्स सापडते.

वर्गीय-प्रवृती म्हणजे ‘क्लास-कॅरॅक्टर’. प्रथम हे लक्षात ठेवले पाहिजे की कोणतीच व्यक्ती कायमस्वरूपी एकाच वर्गीय-प्रवृत्तीत जखडून राहते असे नाही. त्या त्या प्रसंगस्थितीमध्ये (सिच्युएशन) असताना ती व्यक्ती कसे सामाजिक आचरण करते ते आपण जोखणार आहोत. म्हणजेच आपण नुसते वर्ग मानून त्या वर्गाना विशिष्ट प्रवृत्ती चिकटवून देत नाही आहोत. याउलट आपण अशा नऊ प्रवृत्ती शोधल्या आहेत, की ज्या संधी येताच वा नाइलाज होताच, कोणीही आचरू शकतो! हे प्रकार म्हणजे माणसांचे कायमस्वरूपी समूह नसून माणूस कोणकोणत्या वर्गीय-भूमिकेत शिरू शकतो, त्या भूमिकांचे प्रकार आहेत. मोह पडून किंवा नाइलाजाने व्यक्ती प्रसंगोप्रसंगी त्यांत उतरत असतात.

एकेका प्रवृत्तीचे अंतरंग 

आता मॅट्रिक्समध्ये दिसणाऱ्या नऊ प्रकारांचा आणि त्यांना दिलेल्या नावांचा खुलासा करून घेऊ. प्रथम सत्ताधारी म्हणजे वरचा ‘रो’ लक्षात घेऊ. ‘समावेशक (अकोमोडेटर्स)’ हे सत्ता असूनही शोषण करत नाहीत, कारण त्यांच्या प्रेरणाही वेगळ्या असतात आणि उत्पादकतेमुळे शोषण अपरिहार्य राहिलेले नसते. सत्तेचा वापर शोषण करण्यासाठी करणारे म्हणजे अभिजात अर्थाने ‘शोषक (एक्सप्लॉइटर्स)’ होत. जे सत्ताधारी वैर पेटवून सत्ता मिळवतात व ती टिकवण्यासाठी वैर पेटवत राहतात त्यांना ‘वैरप्रेरक (अण्टॅगोनाइझर्स)’ म्हटले आहे.

सत्ताप्रतिकारकांच्या ‘रो’मध्ये शोषणाविरुद्ध लढा देणारे पण तो यशस्वी न झाल्याने शोषितच राहणारे म्हणजेच अभिजात अर्थाने ‘शोषित (एक्सप्लॉइटेड)’ हा पहिला प्रकार आहे. लढा यशस्वी होऊन किंवा इतर फम्र्सकडून येणाऱ्या वाटय़ातून किंवा समावेशकांच्या छत्राखाली, ज्यांचे योगदान कमी पडूनसुद्धा ज्यांना फल जास्त मिळते ते म्हणजे ‘समावेशित (अकोमोडेटेड)’. टिपिकल मध्यमवर्गीय! गुन्हेगारी वा भ्रष्टाचार वा निव्वळ विघातक वृत्तीमुळे ऋण योगदान करणारे म्हणजे ‘अतिक्रमक (एनक्रोचर्स)’. हे सरळसरळ इतरांच्या हक्कांवर अतिक्रमण करत असतात.

सत्तानिरपेक्ष ‘रो’मध्ये ‘सृजनवीर (एनरिचर्स)’ असा शब्द येतो. यांचे योगदान इतके असते की त्याची समाजाकडून परतफेड शक्यच नसते. पण तरीही अंगभूत आनंदासाठी ते योगदान करत राहतात. हे संख्येने तुरळक असले तरी सकारात्मक परिणाम लक्षणीय असतो. पुरेशी संधीच न मिळाल्याने ज्यांचे योगदान बेताचे असते, पण जे विधायक धडपड करून संधीच्या शोधात असतात, त्यांना ‘उत्कष्रेच्छू (स्ट्रगलर्स)’ म्हटले आहे. यांना मदत करणे हे समाजाचे कर्तव्य आहे. पण त्याच वेळी मिळणारी मदत वापरून अक्षमच राहणारे आणि त्यासाठी सत्ताधाऱ्यांची चमचेगिरी करणारे म्हणजे ‘आश्रित (पॅट्रनाईझ्ड)’ होत. लोकशाहीत यांचा रोल ऋण-योगदानाचाच राहतो.

वरून खाली व डावीकडून उजवीकडे असा उतरता कर्ण जोडला (१-५-९) तर ज्यांना फार दोष देता येणार नाही असे वर्ग मिळतात. या कर्णाच्या वर आणि उजवीकडे जे तीन वर्ग आहेत (२-३-६) हे सरळसरळ निषेधार्ह आहेत. त्याउलट कर्णाच्या खाली व डावीकडे असणारे (४-७-८) हे असे वर्ग आहेत की ज्यांच्या बाजूने ठाम उभे राहिलेच पाहिजे.

नव्या प्रारूपानुसारही वर्गसंघर्ष आहेच व तो करणे परिवर्तनवादीच आहे. पण नमुनेदार कम्युनिस्ट प्रारूपातला ‘आहेरे विरुद्ध नाहीरे’ असा सुटसुटीत वर्गसंघर्ष मानणे वस्तुस्थितीला धरून नाही हे लक्षात येईल. हल्ली तर राजकारणामुळे जणू काही जाती व धर्म हेच वर्ग असल्यासारखे भासवले जात आहे. पण खरे महत्त्वाचे संघर्ष वरील प्रारूपानुसार किमान नऊ ठळक वर्ग मानल्याशिवाय पुढे नेता येणार नाहीत. सध्याच्या औद्योगिक समाजरचनेची व्यामिश्रता लक्षात घेता, सत्यशोधनासाठी आणि शोषण सौम्यीकरणाच्या दूरगामी प्रक्रियेसाठी हेच प्रारूप मार्गदर्शक ठरेल. त्याचे जास्त मूर्त परिणाम लेखमालेत पुढे स्पष्ट होत जातील.

लेखक तत्त्वज्ञान व सामाजिक शास्त्रांचे स्वातंत्र्यसमृद्धीसवरेदयवादीआंतरविद्याशाखीय अभ्यासक आहेत.

ई-मेल:  rajeevsane@gmail.com

First Published on April 18, 2018 2:05 am

Web Title: article on capitalism communist