20 February 2019

News Flash

मूल्य-दुविधा आणि इष्टतमीकरण

दुविधाजनक प्रश्नांना, हे नाही तर ते, असे उत्तर सहसा नसते.

ही लेखमाला तंत्र आणि विज्ञान यातच अडणार नाहीये. आज मूल्यप्रणाल्या, राजकीय अर्थकारण या प्रांतांत आज प्रवेश करतोय. आपल्या बहुविध आस्थांनुसार कायआणि कितीआवश्यक असेल, हे अनेक दिशांनी परस्परविरोधी असते. कोणत्या आस्थेला किती महत्त्वद्यायचे, हा निर्णय कोणत्याही एका विद्याशाखेत बसूच शकत नाही.

‘धरलं तर चावतंय सोडलं तर पळतंय’, ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशा म्हणी दुविधा (डायलेमा) दर्शविणाऱ्या असतात. ‘आखूडशिंगी-बहुदुधी गाय’ म्हणजे सर्वागांनी सर्वोत्तम अशी कोणतीच गोष्ट असत नाही. एखाद्या उत्पादनाचे (प्रॉडक्ट) किंवा एखाद्या प्रक्रियेचे (प्रोसेस) जेव्हा आपल्याला रचना-योजन (डिझाईन) करायचे असते तेव्हा ‘वजने (वेटेजेस) चिकटवण्याची’ गणितबाह्य़ कला साधावीच लागते. हा प्रश्न समजावून घ्यायचा असेल तर प्रथम आपल्याला हे स्पष्ट करून घ्यावे लागेल की, ‘मूल्य’ शब्द कसा वापरायला हवा.

अनेकदा आपण नीतितत्त्वांना म्हणजेच मॅक्झिम्सना ‘मूल्ये’ म्हणतो. न्याय, स्वातंत्र्य, समता, अहिंसा वगैरे ही खरे तर नीतितत्त्वे आहेत. मग मूल्य कशाला म्हणायचे? योग्य वापर करायचा तर ‘मूल्य’ हा शब्द नेहमी उपपद लावूनच वापरला पाहिजे. सोयाबीनला पोषण-मूल्य आहे, ताजमहालला सौंदर्य-मूल्य आहे, कार्यानुभवाला शिक्षण-मूल्य आहे, या सिनेमाला करमणूक-मूल्य आहे, पण आशय-मूल्य फारसे नाही, या वास्तूला परंपरा-मूल्य (हेरिटेज-व्हॅल्यू) आहे, पण कलात्मक-मूल्य नाही इत्यादी. अशा तऱ्हेने मूल्य हा शब्द वापरला पाहिजे. अगदी ‘नीतिमूल्य’ हाच शब्द नव्या तऱ्हेने वापरायचा झाला तर, ‘‘इहवादात सत्कृत्याला पुण्य-मूल्य राहात नाही, पण नीतिमूल्य राहातेच.’’ असा वापरता येईल. उपयोग-मूल्य, विनिमय-मूल्य, सुलभता-मूल्य, दुर्मीळता (स्केअर्सिटी)-मूल्य, सुरक्षा-मूल्य, भरपाई-मूल्य, आन्हिक (रिच्युअल)-मूल्य, प्रतिष्ठा (प्रेस्टिज)-मूल्य, चाळा-मूल्य, टाइमपास-मूल्य, उद्दीपन (अराऊजल) मूल्य, थरार (थ्रिल) मूल्य अशी यादी कितीही लांबवता येईल. पूर्वपद लावण्याने विवक्षित  असे काही तरी म्हटले जाईल. नुसतीच गोलमाल सुभाषिते फेकली जाणार नाहीत.

दुविधांची धमाल, निर्णयांची कमाल

माणूस हा दुविधेत सापडणारा प्राणी आहे. इतर प्राण्यांनाही दुविधा असतात. चित्ता पाठलागात तीव्रतेने ऊर्जा ‘घालत’ असतो. चित्त्याला, आत्ता जिच्या मागे लागलो आहे ती शिकार, प्रयत्नांची शर्थ करून मिळवायची की फारसे न दमता वेळेतच सोडून द्यायची, याचा निर्णय करावा लागतोच. पाठलागात जितकी ऊर्जा गमवायची आहे तिच्यापेक्षा शिकार खाऊन मिळणारी ऊर्जा जास्त असेल की कमी असेल? पडखाऊ  चित्ता उपाशी मरेल आणि हट्टी चित्ता दमून मरेल. ज्या अर्थी चित्ता म्हणून जगणारे प्राणी टिकून आहेत त्या अर्थी हा ‘धर’ की ‘सोड’ विवेक चित्त्यांना करता येत असलाच पाहिजे. अर्थात अंत:प्रत्ययाने. वरील भाषेत विश्लेषण करून नव्हे! म्हणजे माणूस नुसता दुविधेत सापडणारा नसून तो दुविधेवर चर्चा करता येऊ  शकणारा प्राणी आहे!

आता आपण उत्पादक व्यक्ती किंवा कंपनीला कोणते दुविधाजनक निर्णय घ्यावे लागतात ते पाहू. एखादे उत्पादन (वा सेवा) स्वत:च करावे की दुसऱ्याकडून मोबदला देऊन करून घ्यावे? (‘मेक’ ऑर ‘बाय’ डिसिजन). टिकाऊ  वस्तू बनवून तिचा उत्पादन खर्च थोडा वाढू द्यावा की कमी आयुष्य असलेली स्वस्त वस्तू बनवावी? उत्पादन खर्चाहून थोडासाच जास्त किंमत-फरक (मार्जिन) ठेवून, भरपूर ग्राहक मिळवून, उलाढाल वाढवून नफा घ्यावा की महाग घ्यायला तयार असणारे मोजके ग्राहक राहू द्यावेत? म्हणजे त्यांच्यासाठी चढी किंमत ठेवून, उलाढाल कमी होऊनही मार्जिन जास्त ठेवल्याने नफा मिळेल.

कारखान्यात दोन कार्यस्थळां मध्ये अर्धकच्च्या मालाचा भरपूर साठा बाळगला तर खेळत्या भांडवलावर व्याज जास्त जाते; पण साठा अगदीच हातातोंडाची गाठ पडेल इतकाच बाळगून व्याज वाचवावे, तर जरा कुठे काही गडबड झाली तर कार्यस्थळांची अख्खी साखळीच बंद पडून ती अडचण सुटेपर्यंत सगळेच काम खोळंबणार! उत्पादित वस्तूचे रचना-योजन उत्तम आहे, पण बनवण्याची प्रक्रिया अवघड/अडनिडी होऊन बसतीय. म्हणजे डिझाइन करताना प्रोसेस स्मूथ होईल याचीही काळजी घेणे आले. श्रमप्रधान कार्यपद्धती वापरावी की भांडवलप्रधान? किंमत कमी ठेवून ग्राहक आकर्षित करावेत की जाहिरातबाजीवर जास्त खर्च झाला तरी चालेल?

कामगारांना संतुष्ट ठेवून निष्ठावान राखावे की अगतिक ठेवून? दुसरीकडे कामगारालाही प्रश्न असतो, जादाचे काम नाकारून साहेबाची खप्पामर्जी ओढवून घ्यावी की त्याला ‘मऊ  लागलंय म्हणून कोपरानी खणू’ द्यावे? डॉक्टरपुढे तर बऱ्याच दुविधा असतात. पेशंटला बरे ‘वाटणे’ आणि तो खरोखरच बरा होणे यातही फरक असतो! दुविधेत कोणती तरी एकच बाजू बरोबर असते आणि दुसरी चूक असते असे नसते. त्या त्या परिस्थितीत किंवा प्रसंगी काय आणि कितपत बरोबर ठरते हे बघावे लागते. दुविधा जीवनाच्या सर्व क्षेत्रांत असतात. अल्पसंतुष्ट पण निवांत जगावे की महत्त्वाकांक्षा ठेवून बरीच धडपड करावी? शिवाय कशाची ‘महत्त्वाकांक्षा’ धरावी हा प्रश्न वेगळाच! आपल्याला आवडलेल्या व्यक्तीशी लग्न करावे की आपण जिला आवडतो अशा व्यक्तीशी करावे? आवडणे, पटणे, वेव्हलेंग्थ जुळणे, पूरक ठरणे, शोभून दिसणे, यापैकी कशाला किती वेटेज द्यायचे?

सरकारला तर प्रचंड दुविधा असतात. करांचे दर जास्त ठेवावेत की दर कमी ठेवून करदात्यांची संख्या आणि त्यांची कर भरण्याची वृत्ती जास्त राखावी? मतदारांना खूश करण्यासाठी त्यांचे हट्ट पुरवत राहावेत की त्यांना दूरगामी हित समजावून सांगावे? आणि न पटल्यास निवडणूक गमवावी?

सुवर्णमध्यमधोमधच असेल असे नाही

दुविधाजनक प्रश्नांना, हे नाही तर ते, असे उत्तर सहसा नसते. काही प्रमाणात दोन्हीही हवे असे उत्तर बऱ्याचदा येते. एक अ‍ॅडव्हांटेज वाढत जातो तेव्हा दुसरा अ‍ॅडव्हांटेज घटत जात असतो. हे आलेख एकमेकांना जिथे छेदतात तिथे इष्टतम बिंदू असू शकतो. दोन्ही घटकांचा काही अंशी त्याग करावा लागतो, पण दोन्ही उचित मात्रेत शिल्लकही ठेवावे लागतात. थोडे असभ्य वाटेल, पण अगदीच समर्पक असल्याने एक उदाहरण देतो. घर्षण आणि वंगण या परस्परविरोधी गोष्टी आहेत. उदाहरणार्थ संभोगात, दोन्ही उचित प्रमाणात लागत नाहीत काय? या बाबतीतच नव्हे तर सगळ्याच दुविधांत कोणते प्रमाण उचित हा खरा प्रश्न असतो.

विचारपूर्वक निर्णय घेतले पाहिजेत यात शंकाच नाही, पण निर्णय ‘वेळेत’ही घेतले गेले पाहिजेत. नाही तर बराच वेळ विचार/चर्चा करून अचूक उत्तर सापडले, पण तोवर संधीच गेली किंवा संकट टाळत असताना, निर्णयाला वेळ लागून संकट प्रत्यक्षात ओढवले, असे होऊ  शकते. विचारवंत हे कृतिवंत का नसतात याचे बहुधा हेच कारण असावे! कृतिवंतसुद्धा स्वत:पुरता निर्णय घेत असेल तर ठीक आहे, पण त्याची दुविधा नेतृत्व करताना जास्तच बिकट होते. कारण निर्णय एका व्यक्तीपुरता घ्यायचा नसून बऱ्याच व्यक्तींकरिता घ्यायचा असतो. इतकेच नव्हे तर, घेतलेला निर्णय मागे वळून पाहता चुकलेला ठरू शकतो, कारण निर्णयानंतरच्या नव्या परिस्थितीत, जो अगोदर अपेक्षित करणे शक्यच नव्हते, असा वेगळाच घटक उपस्थित झालेला असू शकतो.

एकाच लेखात, इष्टतमीकरणाची हमखास चालणारी गुरुकिल्ली वाचकांना देणे, कोणालाच शक्य नाही. मुद्दा हा आहे की, जेव्हा आपण कोणावर दोषारोप करतो, कोणाला नालायक ठरवून शिव्या घालतो, कोणावर राग धरतो, तेव्हा आपण सारेच तारेवरची कसरत करत असतो, हे विसरले जाते. कर्तव्य करावे आणि मोह टाळावा हे झालेच; पण काय करणे म्हणजे कर्तव्य ठरेल आणि काय करणे म्हणजे मोह ठरेल, याचे सुटसुटीत उत्तर दर वेळी आपल्याकडे नसते, हेही आपण ध्यानात घ्यायला हवे. असे केल्याने आपण जास्त क्षमाशील बनू आणि क्षमाशील बनणे हे (नेहमीच) इष्टतम नसले तरी ‘इष्ट’ आहे हे मात्र निश्चित.

अर्थात क्षमाशील जरी राहिलो तरी चिकित्सा थांबवायची नाहीये; किंबहुना क्षमाशील वातावरणात जास्त मोकळेपणाने संवाद होऊन जास्त चांगली चिकित्सा होऊ  शकेल. ‘कोण चुकले आहे’ यापेक्षा ‘काय चुकले आहे’ यावर चर्चा केंद्रित होईल. तसेच अमुक एक जुळणी इष्टतम नाही असे म्हणताच, मग तुमच्या मते इष्टतम कोणती व का, हे सांगण्याची जबाबदारी टीकाकारांवर येईल. अशा विधायक चर्चातूनच आपली इष्टतमीकरणाची क्षमता वाढत जाते.  महत्त्वाचा मुद्दा हा आहे की, कोणताच निर्णय असा नसतो, की ज्यायोगे काहीच गमवावे लागणार नाही. कशासाठी काय गमवायचे याला ट्रेड-ऑफ म्हणतात. आता आपण शहाणा ट्रेड-ऑफ करतोय की पलायनवादीपणा? हे एक तर ‘अंत:साक्ष्य’ आहे. म्हणूनच इष्टतमीकरणाचे गणित मांडल्यावर मग त्याआधारेच पलायनवादाचा संशय घेणे साधार ठरेल. ट्रेड-ऑफ करण्यालाच सरसकट पलायनवाद म्हटले तर कोणताच निर्णय घेता येणार नाही.

लेखक तत्त्वज्ञान व सामाजिक शास्त्रांचे स्वातंत्र्यसमृद्धीसवरेदयवादीआंतरविद्याशाखीय अभ्यासक आहेत. ई-मेल   rajeevsane@gmail.com

First Published on February 14, 2018 3:02 am

Web Title: article on political economics by rajeev sane