21 January 2021

News Flash

तंत्र व मानव्य : विद्यांमधील दुभंग

तांत्रिक-प्रगती स्वयंभूपणे होतच राहिली आहे. नवमार्गशोधन (इनोव्हेशन) हा मानवी स्वभावच आहे.

नव्या तंत्राला कट्टरतेने विरोध करायचा आणि पराभव होताच ते पूर्णच मान्य करायचे, या परंपरेमुळे, तंत्रात सखोल उतरून त्याला योग्य ते मानवीय वळण देणे राहूनच जाते आहे.

तांत्रिक-प्रगती स्वयंभूपणे होतच राहिली आहे. नवमार्गशोधन (इनोव्हेशन) हा मानवी स्वभावच आहे. एकूण उत्पादकता आणि समृद्धी वाढवत नेणाऱ्या आर्थिक-स्पर्धेतून (कधी शस्त्रस्पर्धेतूनही) आणि सरकारी साह्यानेसुद्धा प्रगतीचा रेटा जबरदस्त राहिलेला आहे. प्रदूषण, जंगलतोड, जागतिक तापमानवाढ, अश्मेंधनांवरील अवलंबित्व, प्लास्टिक-कचरा अशा काही प्रश्नांत सामाजिक हस्तक्षेपाचे प्रयत्न दिसतात. तसेच बायोगॅस, जलसंधारण, सौर-ऊर्जा असे काही पर्याय थोडय़ा प्रमाणात निर्माण झालेत. असे असले तरीही तांत्रिक प्रगतीची कॉस्ट-इफेक्टिव्ह ‘मुख्यधारा’च जोरकस व वेगवान राहिली आहे. कल्पनेपलीकडील बदल आपण पाहिले आहेत. आता तर नुसता वेग नव्हे तर त्वरण (अ‍ॅक्सलरेशन) लक्षात घ्यावे लागेल. तंत्रविद्या इतकी विशेषीकृत झाली आहे की ती इतर जाणकारांनाही अनाकलनीय बनते आहे. बदलांचा वेग रोखता येण्यासारखा नसल्याने, आकलनाचा वेग वाढवण्याला गत्यंतर नाही. पण हे आकलन वाढणार कसे?

मानव्यविद्याशाखांतील लोक किंवा सामाजिक/अराजकीय कार्यकत्रे व पत्रकार यांना तंत्रविद्योची जाण इतकी जुजबी आहे की नुसतीच धोक्याची घंटा जोरजोरात वाजवणे आणि काही (रास्त नसतानासुद्धा) तात्पुरते स्थगिती-आदेश मिळवणे, इतपतच हस्तक्षेप ते करत असतात. तिकडे तंत्रज्ञांच्या जगात मानवी प्रश्नांबाबतची आस्था व जाणही क्षीण आहे. त्याहूनही चिंतेची बाब अशी की ‘मूल्ये’ ही गोष्ट तंत्रविद्य्ोत उपरी बनली आहे. साध्य जर दिलेले असेल तर साधनाची परिणामकारकता आणि स्रोतबचत कशी साधता येईल एवढाच अजेंडा तंत्रज्ञांपुढे असतो. साध्ये ठरवण्याचे काम त्यांचे मालक किंवा ग्राहक (खासगी / सरकारी) करतात. त्यामुळे त्यांची विचारपद्धतीच साधनवादी (इन्स्ट्रमेंटॅलिस्ट) बनून बसते. ‘कसे?’ या प्रश्नाचे उत्तर, (नो-हाऊ) असते. विज्ञानाची जोड असल्याने ‘कशामुळे?’ (नो-व्हाय) ही कारणमीमांसादेखील असते. पण मानवी जीवनातील सर्वात महत्त्वाचा प्रश्न ‘कशासाठी?’ हा आहे. म्हणजेच प्रयोजनमीमांसा विकसित होण्याची गरज आहे.

प्रयोजनमीमांसा पुरवण्याची जबाबदारी मानव्यविद्यांची आहे. परंतु विज्ञानाचे दैवतीकरण झाल्याने मानव्यविद्या स्वतचे वैज्ञानिकीकरण करून घेत गेल्या! त्यामुळे मानवी जगाबाबतही ‘कशासाठी?’ हा प्रश्न बाजूला राहून ‘कशामुळे याचे खुलासे देणे’ हे जणू एकमेव बौद्धिक कार्य असल्यासारखे वातावरण निर्माण झाले. पण खुलासा म्हणजे समर्थन वा विरोध नव्हे. कौल वा निवाडे (जजमेंट्स) देणे, मूल्यदुविधांना तोंड देणे, काही तोटे पत्करूनही तोडगे (ट्रेडऑफ्स) काढणे, ही विद्या ना तंत्रविद्य्ोत नीट विकसित होत आहे ना मानव्यविद्यांत. लोकप्रियतावादी राजकीय आखाडय़ात, चिवट नोकरशाहीत आणि एकमेकांचा बडेजाव राखणाऱ्या तज्ज्ञगोटांत, असे मिळून निर्णय घेतले जात आहेत.

आगामी आव्हाने व संधीसुद्धा  

विद्याशाखांमध्ये जरी दुभंग असला तरी, ‘मानवी अर्था’चे जग (वर्ल्ड ऑफ ह्यूमन मीनिंग्ज) आणि तंत्रवर्ि भौतिक जग (आर्टफिॅक्च्युअल मटेरियल वर्ल्ड) ही जगे अभूतपूर्वरीत्या एकमेकांत घुसत चाललेली आहेत. आपल्या शारीरिक क्षमतांचे वर्धन (एक्सटेन्शन, मॅग्निफिकेशन) तर होत आलेलेच आहे. आता जाणिवेतील घडामोडींचे जडात समरूपण (सिम्युलेशन) जोरदारपणे चालू आहे. यात स्वयंचलितीकरण ही एक आघाडी आहे. दुसरी आघाडी जिथे प्रत्यक्ष प्रयोग करणे शक्य नसते तिथे समरूपणात प्रयोग करणे ही आहे.

पढवलेली यंत्रे (प्रोग्रॅम्ड मशीन्स) आता स्थिरावली आहेत आणि शिकणारी यंत्रे (लìनग मशीन्स) नव्याने वाढत आहेत. कृत्रिम-बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) हे क्षेत्र वेगाने प्रगत होत आहे.

अजीव ते जीव आणि जीव ते मानव ही उत्क्रांती लाखो वर्षे चाचपडत झाली. यदृच्छया म्युटेशन्स घडणे, जीवनसंघर्षांत ती टिकणे, ती मारक न ठरता तारक ठरणे आणि सुटसुटीत जीवांकडून प्रक्रिया-व्यूह-समृद्ध (प्रोसेस-स्ट्रॅक्चर-रिच) जीवांकडे नेणारी ही प्रक्रिया घडायला प्रचंड कालावधी लागला आहे.

याउलट कृत्रिम बुद्धिमत्ता ही बुद्धिमान मंडळीनी सहेतुकपणे घडविलेली असते. तिच्यातील सिग्नल्स व स्विचिंगचा वेग तुफान असतो. अनेक संगणकांचे जाळे असलेले महासंगणक बांधलेले असतात. इथे चुकून म्युटेशन्स घडत नसून अनेकजण ब्रेक-थ्रूज् मिळवत असतात. कास्पारोव्हला पराभूत करणारा डीप-ब्ल्यू, रोगनिदान करणारा वॉटसन, चालकरहित कार्स/ड्रोन्स ही मंडळी अगोदरच उपस्थित आहेत. कृत्रिम बुद्धीने मानवी बुद्धीला ‘निपुणता’या पातळीवर ओव्हरटेक करणे आता फारसे दूर नाही.

जाणीव, सुखदुखसंवेदना आणि इच्छास्वातंत्र्य या गोष्टी आपल्याकडे म्हणजे ‘कार्बन-मानवां’कडेच राहातील व आपण बनवलेले ‘सिलिकॉन-मानव’, त्यांच्यात स्वेच्छा निर्माण होऊन आपल्यालाच गुलाम करणार नाहीत, हा आशावाद आहे. पण तसे निर्वविाद सिद्ध करता येत नाहीये. असे संकट येऊ नये यासाठी काळज्या नेमक्या कोणत्या घ्यायच्या? व त्याहीपेक्षा या काळज्या कोणी घ्यायच्या? म्हणजेच टेक्नोलॉजीवर गव्हर्नन्स कसा/ कोणी करायचा? याची उत्तरे आज आपल्याकडे नाहीत.

आर्टििफशियल इंटेलिजन्स सोडूनही, मूलभूत आव्हाने उभी करू शकतील, अशा आणखीही बऱ्याच गोष्टी तंत्रविद्य्ोत आहेत. संदेश व चालनादेश (सिग्नल्स अँड कमांड्स) रूपांतरित करणाऱ्या वस्तूंना ट्रान्सडय़ूसर्स म्हणतात. थेट मेंदूंत बसविता येतील असे ट्रान्सडय़ुसर्स, बाह्य यंत्रांना जोडले गेले, तर एका बाजूने मानवी क्षमता खूपच वाढेल. पण हेच ट्रान्सडय़ूसर्स उलटे वापरून कोणी तंत्र-सज्ज सत्ताधीश आपल्या जाणिवेत थेट हस्तक्षेप करील तर? हा भिववणारा प्रश्न आहे.

रासायनिक मानसोपचार आतापावेतो, ‘रुग्ण गणलेल्यां’चे सफिरग कमी करून त्यांना सामान्य जीवन जगायला सक्षम करणे, एवढेच करत होता. माणूस बदलला पाहिजे असे आपण नेहमीच म्हणतो. प्रवचने झोडून तो फारसा बदलत नाही हेही पाहतो! दुर्गुणांचा निरास आणि सद्गुणांची जोपासना करण्यासाठीसुद्धा रासायनिक हस्तक्षेप का करू नये? करता येईलही व मूलत हरकतही नाही. पण सद्गुण/दुर्गुण कोणी ठरवायचे? तसेच ज्या व्यक्तीत रासायनिक हस्तक्षेप करायचा तिच्या स्वातंत्र्याचे काय? हे प्रश्न अनुत्तरितच आहेत.

वैद्यकशास्त्रातील झपाटय़ाने होणाऱ्या प्रगतीमुळे एक प्रश्न आलाय. ‘दीर्घायुरारोग्य लाभो!’ अशी शुभेच्छा आपण सहजच देतो. अगदी ‘अमर’ असे नव्हे पण ‘अजर’ होण्यात नक्कीच अर्थ आहे. पण ही ‘जरा’ पोस्टपोन करता आली तर मरणही पोस्टपोन होणार. लोकसंख्येचा प्रश्न, जो आजवर मुख्यत जादाच्या जन्मप्रमाणामुळे होता, तो मृत्यूप्रमाण अत्यल्प होण्यावर सरकेल काय? यामुळे कोणत्या प्रकारचे संकट येऊ शकते?

मानवी जीनोममध्ये गर्भधारणेच्या क्षणी हस्तक्षेप करणे किंवा एम्ब्रियो निवडणे हे फारच धाडसी असल्याने त्यावर सध्या तरी बंदी आहे, हे ठीकच आहे. पण जनुक-सुधारित बियाणे, जी निर्धोक असल्याचे जगभर सिद्ध झालेले आहे, ती देखील भारतात प्रयोगावरच बंदी घालून रोखली जातात. यामुळे शेतकरी व ग्राहक यांच्यावर मोठाच अन्याय होत आहे. तंत्र/ मानव्य दुभंगामुळे संधीही गमावल्या जातात.

जाणिवेच्या स्वायत्ततेचे काय

आपण फक्त हुशारच नव्हे तर ‘शहाणे’सुद्धा रोबो बांधू! अशी घोषणा करण्यासाठी मुदलात आपण कितपत शहाणे आहोत? म्हणजे समजा तांत्रिक प्रगती आत्ताच्या पातळीवर रोखली तरीही आत्ताच्या पातळीवरच आपली नैतिक उन्नती कुठे समाधानकारक आहे? ती कशी पुढे नेणार आहोत? याची उत्तरे शोधणेच जडवादाच्या प्रभावामुळे थांबवले जात आहे.

विज्ञाननिष्ठा मानली तर जडवाद मानावाच लागतो अशी अनेक विज्ञानवाद्यांची दृढ धारणा आहे. जडवाद अनिवार्य का नाही यावरचे माझे विचार आपण सध्या बाजूला ठेवू. जडवादच मानला असे गृहीत धरू. जडवाद मूल्यचिकित्सा पुरवू शकतो काय? ‘यश हेच श्रेय’, अशी घोषणा जडवादात दडलेली आहे. श्रेयाश्रेयविवेक हवाच कशाला? प्रिय ते करत जाऊ मग होईल ते होईल, अशी वृती आहे. कॉम्प्युटेशनॅलिझम नावाचे जे दर्शनच रुळू पाहाते आहे त्यानुसार समस्या जर कॉम्प्युटेबल बनवता आली तरच ती सोडवता येते. अंतर्भान (इन्टय़ूशन) हे ‘प्रमाण’च नव्हे. आपल्याला जाणीव, इच्छास्वातंत्र्य व सत्प्रवृती आहेत, हे सारेच आभास मानले जाऊ लागले आहेत. जडवादानुसार खुद्द आपण कार्बनादिक द्रव्यांचे रोबोजच (झाँबीज्) आहोत. जर सिलिकॉन-टिश्यू-रोबोज आपल्यापेक्षा श्रेष्ठ ठरले, तर आपण त्यांचे गुलाम होणे हीच आपली लायकी आहे असे मान्य करावे लागेल. कारण जडवादानुसार परफॉर्मन्स हीच श्रेष्ठता!

जडवादानुसार, आतून जगणाऱ्याचे विषयीत्व (फर्स्टपर्सन-सब्जेक्टहुड) हा मुद्दाच विज्ञानबाह्य, म्हणून रलागू ठरतो! मग जाणिवेकडे जाणीव म्हणून पाहिलेच जात नाही. तर दुसऱ्या टोकाला चिद्वादी मंडळी भौतिक जगच व्हर्च्युअल  मानून आत्मस्वरूपाकडे निघाली आहेत किंवा ईश्वरकृपेची खात्री बाळगून आहेत. मग नवी आव्हाने समजू शकणारे ‘तंत्र/मानव्य ऐक्य’ कोठून येणार? त्यासाठी चित्/जड यापैकी एकच खरे हा आग्रह सोडून त्यांचा द्वंद्वात्मक परस्परप्रवेश ओळखला जावा लागेल.

लेखक तत्त्वज्ञान व सामाजिक शास्त्रांचे आंतरविद्याशाखीय अभ्यासक आहेत. ई-मेल :  rajeevsane@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 30, 2018 3:12 am

Web Title: article on technical progress
Next Stories
1 नोटा-बदली : पूर्वतयारी हवी होती
2 संधीच्या समतेसाठी सक्षमीकरण
3 कॉस्ट + ५० % : फसवे आश्वासन
Just Now!
X