17 February 2019

News Flash

हीसुद्धा उत्पादक-योगदाने नव्हेत?

ओघांना व टप्प्यांना एकमेकांशी जोडण्याचे काम व्यापारी आणि दुकानदार करत असतात.

मानवी श्रम ही अत्यंत व्यापक संकल्पना आहे. परंतु जणू फक्त अंगमेहनतअसेल तरच ते उत्पादक- श्रम अशी समजूत पसरते. तितकेसे कष्टप्रद नाही याखातर कार्यात्मकदृष्टय़ा आवश्यक अशी विधायक कामे करणाऱ्यांनाहीअनुत्पादक-ऐतखाऊगणण्याची चूक होते. 

समजा एखादा आदर्श स्वयंरोजगारी कारागीर आहे. तो फक्त कारागिरीच करतो काय? तो ग्राहक शोधण्याच्या आणि आपले काम ग्राहकाच्या पसंतीस उतरेल असे बदल करण्याच्या, खटपटीत नसतो काय? किती कच्चा माल कधी आणायचा? कोणते काम केव्हा हाती घ्यायचे- याचे नियोजन तो करत नसेल? तो त्याच्या साधनांची निगा राखणे, जरूर तर नवी घेणे, नवी घेण्यासाठी बचत करून ठेवणे, हे सारे करत नाही काय? कामे अचूक व मापात व्हावीत याची काळजी घेणे आणि त्यासाठी जरूर त्या नोंदी ठेवणे, हे त्याला आवश्यक नसते काय? हाताखालच्या चेल्याला स्वत:सारखे तयार करणे आणि त्यासाठी त्याला खुब्या समजावून सांगणे; मात्र चेल्याचा चुकारपणा चालवून न घेणे, हाही त्याच्या व्यवसायाचा भाग नव्हे का? ग्राहकाची तक्रार आल्यावर योग्य ती दुरुस्ती तो करून देत नाही काय? तो त्याच्या कार्यस्थळाचे नेपथ्य आखत नाही काय? जरूर तर कर्ज घेणे आणि वेळेत फेडणे ही जबाबदारी त्याला पार पाडावी लागत नसेल? त्याला जिथे काम मिळेल तिथे स्थलांतर करावे लागत नसेल? आपली कारागिरी निरुपयोगी ठरू लागल्यास नवी कारागिरी तो शिकून घेत नसेल? किंवा आपल्या कौशल्यात विविधता आणण्यासाठी झटत नसेल? न झेपण्याइतके जास्त काम आले तर आपल्यासारख्याच दुसऱ्या कारागिराकडे त्यातले काही सोपवणे त्याला गरजेचे वाटत नसेल? त्याच वेळी आपल्यासारख्या इतर कारागिरांपेक्षा आपणच कसे सरस ठरू याची चिंता तो वाहात नसेल? नुसते सरस ठरू इतकेच नाही तर आपल्या सरसपणाकडे ग्राहकाचे चित्त आकर्षति कसे करता येईल हेही तो पाहत नसेल?

कार्याला अनेक अंगे असतात. ही कार्यागे (फंक्शन्स) एकाच व्यक्तीत एकवटलेली असणे हे अशक्य ठरू शकते किंवा फारच महागात पडू शकते. ही फंक्शन्स वाटून देण्यासाठी अनेक व्यक्तींची एक कार्य-संघटना (फर्म) असू शकते किंवा एकमेकांशी विनिमय करूनदेखील ही विविध कार्ये अनेकांद्वारे साधली जाऊ शकतात.

उत्पादनाचे टप्पे, ओघ आणि निर्णयाधिकार

कापूस पिकवणे, तो साफ करणे, पिंजणे, गठ्ठे करणे, कापसाचे पेळू बनविणे, सूतकताई करणे, मागावर कापड विणणे, कापडाचे कपडे शिवणे, हे सर्व टप्पे ‘कपडे’ या एकाच उत्पादनात असतात. हौस म्हणून किंवा मूल्यप्रणालीसाठी एक सर्वच टप्पे एकच व्यक्ती करूही शकते. अर्थात परवडले तरच!

धातूंची खनिजे खणून काढणे, त्यातून धातू शुद्ध करून घेणे, धातूचे वाहतुकीला योग्य आणि पुढील प्रकियांना अनुकूल आकार निर्माण करणे, नंतर या धातूवर ओतकाम, कातकाम, दाबकाम अशा अनेक प्रक्रिया करून त्या धातूची उत्पादने काढावी लागतात. धातूचा उत्पादित माल म्हणजे जोडणी करून बनवलेल्या वस्तू असतात. म्हणजेच कपडे या एकाच गोष्टीला जसे अनेक टप्पे असतात तसे धातुकाम या एकाच गोष्टीलाही अनेक टप्पे असतात.

कपडय़ांच्या टप्प्यांच्या मालिकेला तसेच धातुकामातील मालिकेला एकेक सीरिज म्हणता येईल. पण या मालिका एकमेकींना मात्र समांतर (पॅरलल) असणार. असे अनेक ओघ चालू असणार. या समांतर ओघांमध्ये एकमेकात देवाणघेवाण आवश्यक असतेच. सुताराची हत्यारे लोहार बनवून देतो, लोहाराचा भाता चर्मकार बनवून देतो. अशा सगळ्या बलुतेदारांना शेतकरी अन्न पुरवतो. पण मीठ हे फक्त समुद्राच्या किनारपट्टीवर- आगरांतच बनवता येते. त्यामुळे गावोगाव एकेक ‘आगरी’ असणे शक्यच नसते. अशा प्रत्येक सीरिज आणि पॅरलल ओघांचे सुसूत्रीकरण करण्यासाठी एकेका ओघात आणि विभिन्न ओघांत काही ना काही अधिकारपदांची श्रेणी असावी लागते. तसेच समजा नदीच्या पाण्यावरून दोन गावांत तंटा झाला तर दोन्ही गावांच्या ‘वर’ निवाडा देणारे कुणी तरी असावे लागते आणि ते कुणी तरी एकाच गावचे असून चालत नाही.

या ओघांना व टप्प्यांना एकमेकांशी जोडण्याचे काम व्यापारी आणि दुकानदार करत असतात. व्यापारी आणि दुकानदार हे फक्त स्वस्तात माल घ्यायचा आणि महागात विकून नफा कमवायचा एवढेच करतात काय? आणणे, पाठवणे, वर्गवारी करणे, योग्य तऱ्हेने रचून ठेवणे, साठवणूक (साठेबाजी वेगळी) करणे, कुठे काय व किती लागेल याचे नेमके अंदाज बांधणे (हे चुकतातसुद्धा), ग्राहकासाठी मांडून ठेवणे, काय कुठे आहे हे लक्षात ठेवणे, माल पडून राहिला तर खेळत्या भांडवलात नुकसान सोसणे किंवा माल नसला तर ग्राहकाला विन्मुख करून ग्राहक गमावणे, हे सगळे खटाटोप आणि या सगळ्या झगझगी ते निभावत असतात. किरकोळ दुकानदार जितके आणि ज्या वेगाने श्रम करतो तितके आणि त्या वेगाने श्रम करताना मी अन्य कोणाला पाहिलेले नाही. भरपूर गर्दी असलेला औषध विक्रेता जितकी माहिती त्वरेने हाताळतो, विचारतो, सांगतो तितकी माहिती फारच कमी जॉब्जमध्ये हाताळली जात असेल. पानवाला ज्या वेगाने हालचाली करतो तितक्या वेगाने कोणीही कामगार हालचाली करत नाही. व्यापाराच्या एकूण व्यवहारात उत्पादक कार्येही दडलेली असतात. इतकेच नव्हे तर उत्पादन करणाऱ्या कारखान्यांत एकाच फर्मचे विविध विभागांतले आणि स्तरांवरचे नोकर, कोणता कार्यभार कोणी उचलायचा यावरून एकमेकांशी अखंड सौदेबाजी करत असतात. अशा तऱ्हेने उत्पादनात व्यापारही आणि व्यापारात उत्पादनही चालते.

कामे करवून घेणे हे काम करण्यासाठी सत्तास्थान लागते हे खरेच आहे. पण याचा अर्थ असा नव्हे की सर्व व्यवस्थापक हे फक्त मुकादमगिरी करत असतात! व्यवस्थापकांच्या कामांत श्रमप्रक्रियेतून वेचून काढलेले जास्त ज्ञानाधारित घटक समाविष्टही झालेले असतात. कार्यसंघटनेत, सत्ता गाजवणे आणि अतिकुशल श्रम, यांनी बनलेल्या संमिश्र भूमिकाही नांदत (व भांडत) असतात.

भांडवल आणि उद्योजकता

अगदी बेटावर एकटा अडकलेला रॉबिन्सन क्रूसो असला तरी तो वेगवेगळ्या ‘अर्था’चे श्रम करतो. झाडावरून फळे काढताना त्याला थेट आणि शब्दश: ‘फळ’ही मिळते. पण समजा त्याने फळे काढायला सोपे जावे म्हणून बांबूची शिडी बनवली, तर शिडी बनवताना त्याला फळ मिळत नसते. शिडी हे भांडवल आहे. शिडी बनवितानाचे श्रम ही गुंतवणूक आहे. शिडी खूप काळ टिकणारी आहे. तिच्या उपयोजनातून फळे काढण्यातील सोपेपणा नेहमीच मिळणार आहे. शिडी बनवणे आणि बाळगणे हे अनुत्पादक आहे असे कसे म्हणता येईल? पुंजीवाद या शब्दात पुंजी म्हणताच पशांची थली डोळ्यासमोर येते. पण भांडवलाची गुंतवणूक जर उत्पादनसाधन- निर्मितीत झालेली नसेल तर तिच्यातून काहीच मूल्यनिर्मिती होणार नसते. ताबडतोबीच्या उपभोगाचा मोह आवरून भविष्यकालीन उत्पादनासाठी आणि उत्पादकतेसाठी काही मूल्य बाजूला काढणे आणि गुंतवणे हे कोणत्याही समाजव्यवस्थेत करावेच लागते. आता असे भांडवली श्रम करतो कोण आणि पुंजी कुणाची साठते यात अन्याय असूही शकतो. परंतु हा अन्याय अधोरेखित करण्याच्या भरात ‘भांडवल हा उत्पादक घटकच नव्हे’ अशा प्रकारची विधाने करणे चुकीचे आहे. भांडवलाचा वापर कितपत उत्पादक स्वरूपाचा होतो आणि उधळण्यात वा पडीक ठेवण्यात कितपत जातो? हा अगदी कळीचा प्रश्न आहे. जरी किफायतशीर असली, तरी सोन्यातली आणि महाग जमिनीवर बांधकाम करून ते पडीक ठेवण्यातली, गुंतवणूक अनुत्पादक असते. पण मुळात भांडवलाचे योगदानच नाकारले तर उचित गुंतवणुकीचा प्रश्न, कसा काय उद्भवणार? वा सोडवता येणार?

एकेकाळी उत्पादन हे तेच तेच चक्रनेमीक्रमेण होत राहायचे. असा कुंठित काळ आता संपलेला आहे. आता कोणते नवे उत्पादन हाती घ्यायचे व कोणते थांबवायचे याचे निर्णय सततच घ्यावे लागतात. हे निर्णय, जरी त्या त्या प्रसंगी उपलब्ध माहितीवरून सयुक्तिकपणे घेतले, तरी ते मागे वळून पाहता चुकलेले निघू शकतात. चुकीचा फटकाही खावा लागतो. ही जोखीम पत्करावी लागते. मुळात नवनवीन उत्पादने सुचणे, त्यांची पूर्वतयारी करणे, यात कोणीतरी पुढाकार (इनिशिएटिव्ह) घ्यावा लागतो, नियोजन (प्लानिंग), रचनायोजन (डिझाइन) करावे लागते. अशा कृती करणाऱ्यांना उद्योजक म्हणतात. असे द्रष्टे उद्योजक लाभले नसते तर आज आपण जी क्षेत्रे जोरात चाललेली पाहतो आहोत ती क्षेत्रे मुळात निर्माणच झाली नसती. उद्योजक हे श्रमिकांचे शोषणही करू शकतात. पण उद्योजकता हा योगदान करणारा घटक म्हणूनच नाकारणे, हा शोषणावरचा उपाय असू शकत नाही.

नैसर्गिक संसाधनांवर मालकी कोणाची? हा प्रश्न मात्र गोचीदार आहे. तो नंतरच्या एका लेखांकात.

लेखक तत्त्वज्ञान व सामाजिक शास्त्रांचे स्वातंत्र्यसमृद्धीसवरेदयवादीआंतरविद्याशाखीय अभ्यासक आहेत. ई-मेल   rajeevsane@gmail.com

First Published on March 7, 2018 2:22 am

Web Title: deal self employed worker productive contribution