राजीव साने

कथा रचण्याची आपली क्षमता अतिशय चपळ व क्ऌप्तिबाज असते. पण कथेच्या ओघात जे चपखल बसते, ते सत्य वा उचित असते, असे नव्हे.

भाषिक वातावरणात इतस्तत: तरंगणारी अनेक ‘प्रेरक-मते’(मीम्स) का स्वीकारली जातात? व टिकून राहतात? आपल्यात प्रमाणन-आस्था (रॅशनॅलिटी) असतेदेखील. पण आपल्यात तिला धुडकावणाऱ्या किंवा लुप्त करणाऱ्या प्रेरणाही कार्यरत असतात. विधान सिद्ध करता येणे आणि सकृद्दर्शनी पटणे यात मोठाच फरक असतो. जे, अगदीच अशक्य नाही, असूही शकेल, आणि वरकरणी पटण्याजोगे वाटते, त्याला ‘प्लॉजिबल’ असे म्हणतात. कथेच्या ओघात न खटकण्यासाठी प्लॉजिबलिटी पुरेशी असते! आपण तिला कथनगम्यता असे म्हणू. प्रामणिकपणे विचार करतानासुद्धा कथनगम्यतेचीच काळजी जास्त घेतली जाते. म्हणूनच ‘यथातथ्य’ निश्चित करण्यासाठी (स्वत:चीसुद्धा) उलटतपासणी आवश्यक असते.

एखादा किस्सा (अनेक्डोट) सांगून त्यावरून सामान्य विधान करणे, हा प्रकार वक्ते व लेखक करीत असतात. तो किस्सा तसाच घडण्यासाठी लागणाऱ्या बऱ्याच योगायोगांविषयी मूक राहून, तो तसाच घडणे जणू अनिवार्यच होते, अशा थाटात तो सांगितला जातो. किस्सा रंगतदार असण्याचा, पुढचे सामान्य विधान रास्त असण्याशी, तसा संबंध नसतो. पण रंगतदार किश्श्याला जोडून आल्यामुळे ते विधान श्रोत्यांना एकदम पटणीय ठरते!

समष्टीय म्हणजेच मॅक्रो – लेव्हलचे वास्तव समजावून घेण्याच्या पद्धती वेगळ्या असतात. पण व्यष्टीय म्हणजेच मायक्रो लेव्हलला जगत असताना, जसे आकलन करून घ्यावे तसेच आकलन मॅक्रो -लेव्हलला लावणे, ही मोठीच चूक आपण करत असतो.

अर्थव्यवस्थेतील शक्ती-संतुलन कसकसे बदलले? एकूण संस्कृतीत प्रभावी मान्यता  कोणत्या होत्या? असे खुलासे समजायला अवघड जातात. पण ‘कारस्थान होते’ हे सहजच पटते. खरे तर मॅक्रो-वास्तव हे कारस्थान नसते. मोठय़ा प्रमाणातल्या सामाजिक प्रक्रियांना कुणी एकच व्यक्ती जबाबदार असणे शक्यच नाही.पण कारस्थानाची कथनगम्यता जोरदार असल्याने कारस्थान-सिद्धांत आरामात खपवले जात राहतात. त्याच ओघात कोणालातरी खलनायक ठरवून शिव्याशाप देणे हे सोपे असते. यातून समस्यांचे निदान करण्याचे अवघड काम टाळले जाते. यातून राजकीय टीकाही उथळ, प्रतिक्रियात्मक व दोषदर्शी बनते, उपायदर्शी बनत नाही.

अनुभव, कथन आणि चिकित्सा

ध्यान करताना, नामे चिकटवू नका, मागचापुढचा विचार करू नका, मनातल्या मनात स्वत:शी बोलू नका, अशा आज्ञा ध्यानगुरू देत असतात. कारण किंचित काळ का होईना, पण ओझे घेणे थांबवता आले पाहिजे. आपण अनावश्यक त्रास कोणते करून घेतोय हे कळण्यासाठी निवडी व निवाडे थांबवायचे असतात. याचा थेरप्युटिक फायदा असतो असे कोणतेही पारलौकिक दावे न करतासुद्धा म्हणता येईल.

पण व्यवहारात असे जगता येत नसते. मुळातला अख्खा अनुभव, तो घडला त्या लयीत, स्मृतीत साठवणे शक्यही नसते व भावनिकदृष्टय़ा परवडणारेही नसते. लक्षणीय (सिग्निफिकंट) काय काय आहे? हे ठरवले जातेच. ज्याला चरित्र-शेपूट चिकटलेले असते असा ‘स्व’च जास्त  करून कार्यरत असतो. त्या ‘स्व’ला लक्षणीय वाटणाऱ्या बाबी निवडकपणे वेचून आणि त्यांना कथनात गुंफून घेत कथेकरी स्व ‘जमे’त धरत जातो. कहानेमन व इतरही मानसशास्त्रज्ञांनी ‘आठवणारा आणि सांगणारा’ स्व वेगळा काढला आहे. हा ‘स्व’ त्याचे व्हर्शन मानसिकदृष्टय़ा परवडणारे बनविताना, कोणती वक्रीकरणे (डिस्टॉर्शन्स) करतो व पूर्वग्रह बनवतो, हे दाखवून दिलेले आहे.

प्रतिकूल अनुभव येत असताना क्लेशांचा आलेख, जर कमी कमी क्लेशांकडे जात असेल, तर जमेस धरला जाणारा अनुभव, एकुणात कमी क्लेशकारक बनतो असे अनेक प्रयोगांनी दिसून आलेले आहे. सामान्यधारणांतसुद्धा ‘शेवट गोड ते सगळेच गोड’ , ‘झालं गेलं गंगेला मिळालं’ अशा म्हणी रुळलेल्या दिसतात. प्रतीक्षेमध्ये सहनशक्ती पणाला लागते हे आपण जाणतोच. समजा डॉक्टरच्या वेटिंग रूममध्ये मी ताटकळलो आहे. मला पाऊण तास बसून राहावे लागले असे धरू.  माझ्याआधी नऊ  पेशंटांचे नंबर आहेत, मात्र एकेकजण पाच मिनिटांतच बाहेर येतोय. भराभरा लाइन सरकतीय हा अनुभव मला दिलासा देत राहतो. कारण दर पाच मिनिटाला मी पुढे जात असतो! पाऊण तास हा काळ भौतिकदृष्टय़ा जरी तोच असला, तरी जर एकच पेशंट अगोदर आत गेलाय आणि कधी बाहेर येईल कुणास ठाऊक! असा पाऊण तास कितीतरी जास्त त्रासदायक ठरतो.

याउलट अनुकूल अनुभवाच्या सुखदतेची जर चढती कमान असेल तर तो अनुभव एकुणात जास्तच सुखद गणला जातो. ख्यालगायकीत ‘बढत’ करत नेतात, म्हणजेच स्वरांचा समावेश आणि ते घेण्याचा वेग हळू हळू वाढवत नेतात. जर एखादा कलाकार बढत झालेली असताना, अचानक सुरुवातीच्या सारखे संथ आलाप घेऊ  लागला तर ते कंटाळवाणे वाटते. पण सुरुवातीला, तेवढीच संथ लय उत्सुकता जागवणारी ठरलेली असते. म्हणजेच अ-भाषिक सादरीकरणालासुद्धा कथात्मकता लागते.

कथेला महत्त्व असतेच. दोन घटनांमध्ये अर्थाअर्थी संबंध जरी नसला, तरी कथा बनवताना त्यांच्यात दुवा जोडला जातो. प्रत्यक्ष घडताना ‘तसे’ जाणवलेही नसले तरी सांगण्याच्या ओघात ते ‘तसे करून’ घेतले जाते. शकुन-अपशकुन यातूनच रुळतात. कथनगम्यतेच्या आहारी जाण्याने आपले बरेच काही बिघडत असते.

आपले सोयीस्कर दुराग्रह आपण पक्के करून घेत राहतो. नव्याने उमगलेल्या ज्ञानानुसार मत बदलणे अवघड होऊन बसलेले असते. एखादा कार्यकर्ता कित्येक वर्षे एका विचारसरणीने मन:पूर्वक चाललेला असतो. त्यासाठी त्याने त्यागही केलेले असतात. आता जर ती विचारसरणी सोडायची तर ‘व्यर्थ न हो बलिदान’ ही अडचण होऊन बसते. सिनेमा अगदीच बोअर व भंकस निघाला तरीही तिकीट वसूल करण्यासाठी, उठून जावेसे वाटत असतानाही उरलेला सहन करणे, असा हा प्रकार असतो. गुंतवणूक वाया गेली असे ‘ठरू’ नये म्हणून तोटय़ातले उद्योगसुद्धा चालू ठेवले जातात.

इथे चूक नेमकी काय होते ते समजून घेतले पाहिजे. एकतर खात्रीची सार्थकता तरी! नाहीतर वैयथ्र्य तरी! असेच विकल्प जीवनात नसतात. वेळोवेळी अर्थवैफल्य म्हणजे फ्रस्ट्रेशन येणार हे मान्य केले, तर वैयथ्र्य हे संकट येत नाही. खेळायलाच न मिळण्यापेक्षा हरणे हे कधीही चांगले. निर्थकतेपेक्षा वैफल्य केव्हाही चांगले. चूक चालूच ठेवणे हे मात्र घातकच आहे.

ज्याप्रमाणे आपल्यात कथा रचण्याची क्षमता असते त्याप्रमाणे त्या कथेची चिकित्सा करून, ती दुरुस्त करण्याची क्षमतादेखील असते. पण चिकित्सा करण्यासाठी जीवनातल्या चुका मान्य करण्याचे आणि ‘गुंतवणूक’ सोडून देण्याचे, धैर्य टिकवावे लागते.

सहजपणे आणि प्रयत्नपूर्वक कथेकरी ‘स्व’ हा सहजपणे कार्यरत असतो. तो प्रचीतींवर (इन्टय़ूशन्स) चालू राहू शकतो. पण तो प्रमाणरीतीनिष्ठ (व्हॅलिड मेथॉडिक) नसतो. त्याची रॅशनॅलिटी निसटत असते. तो तार्किक निष्पत्ती न पाहता, निव्वळ योगायोगाने असलेली साहचर्ये (असोसिएशन्स) सुद्धा वापरून, निर्णय घेऊन मोकळा होतो. पण आपल्यात एक ‘चिकित्सक स्व’देखील असतो. चिकित्सक स्व, हा कथेकरी स्व वर लक्ष ठेवणारा, कथनगम्यतेचा मोह आवरून विवेकपूर्ण निर्णय घेणारा आणि शक्यतो कथेकरी स्व लाच चांगल्या सवयी लावणारा, उच्चपदस्थ स्व असतो.

पण हा चिकित्सक स्व धिमेपणाने काम करणारा व आळशीदेखील असतो. झटपट निर्णय घेताना चिकित्सक स्व उपयोगाचा नसतो. तसेच चिकित्सक ‘स्व’ला, जसा कथेकऱ्याला जोरदार अभिनिवेश असतो. तोही नसतो! मग चिकित्सक ‘स्व’ला जागवणार कोण? जेव्हा कथेकरी ‘स्व’ अरिष्टात सापडतो, त्याची कोंडी होते, तेव्हा तोच चिकित्सक ‘स्व’ला जागवत असतो!

दुसरे असे की तातडी नसताना, मुद्दाम एक व्यायाम म्हणून, चिकित्सक स्व ला जागवणे व कथेकऱ्याने केलेले गफले दुरुस्त करून घेणे, हे आपण नियमितपणे करत राहिले पाहिजे. विवेकी माणूस, म्हणजे पढिक ‘ज्ञाना’ची भरताड बाळगणारा(व मिरवणारा!) पंडित नव्हे, तर चिकित्सक ‘स्व’ला जागवण्यासाठी आपली यत्नशक्ती वळवणारा माणूस होय. पण कथेकरी ‘स्व’चा अभिनिवेश दांडगा असल्याने त्याच्या सक्तीतून मोकळेही होता आले पाहिजे. कथेकरी ‘स्व’ला ‘रजेवर’ पाठवता आले पाहिजे! याकरिता अनुभवणाऱ्या ‘स्व’ला कथेत न अडकवता अनुभवू दिले पाहिजे.

लेखक तत्त्वज्ञान व सामाजिक शास्त्रांचे आंतरविद्याशाखीय अभ्यासक आहेत. ई-मेल :  rajeevsane@gmail.com