16 January 2021

News Flash

भावविश्व-सुधारणा भावविश्वातूनच!

तंत्रे वापरून साधन-सुसज्जता वाढवण्यासाठी, वस्तुविश्वाचे विज्ञानच लागेल.

( संग्रहीत छायाचित्र )

तंत्रे वापरून साधन-सुसज्जता वाढवण्यासाठी, वस्तुविश्वाचे विज्ञानच लागेल. परंतु भावविश्वातल्या समस्या  ‘जडवस्तुमाग्रे’च सोडवू! हा अट्टहास व्यर्थ व घातकही..

आपण वस्तूंच्या जगात वावरतो, हस्तक्षेपही करतो. पण आत्मचरित्र अनुभवतो ते अर्थाच्या जगात (वर्ल्ड ऑफ मीनिंग्ज)! आत्मगत (सब्जेक्टिव्ह) अनुभव हा सर्व ज्ञानाचा व मूल्यांचा आदिस्रोत आहे. कुणालाही पडताळता यावे या आग्रहाला सार्वकिता (युनिव्हर्सॅलिटी ) म्हणावे. वस्तुनिष्ठता म्हटले तर त्याचा अर्थ वस्त्विभूतता असा घेतला जाऊ लागलाय. सब्जेक्टिव्ह हाही द्वर्थी शब्द आहे. आत्मगत किंवा आंतरिक असा त्याचा एक अर्थ आहे. याउलट, ‘कसेही असले तरी योग्यच, कारण सगळे व्यक्तिसापेक्ष, संस्कृतीसापेक्ष, मनोवस्थासापेक्ष, असते’- हा भलताच अर्थ निघतो. सब्जेक्टिव्ह हा शब्द सरसकट ‘अविसंबनीय’ अशा अर्थाने घेतला जाऊ लागला आहे. वस्तुनिष्ठतेच्या नावाखाली भावविश्वच नाकारले जाऊ लागले आहे.

शस्त्रास्त्रे नकोत तर विधायक उपयोगाच्या वस्तू हव्यात, ही निवड विज्ञानच आपोआप करेल काय? महत्त्वाकांक्षा, स्वामित्ववृती वैर/ द्वेष, पलायनवाद, प्रयोजनशून्यता असे रोग फक्त औषध घेऊन बरे होऊ शकतील काय? (विघातक प्रवृत्तीच्या माणसांनी उलटीच औषधे शोधली नाहीत म्हणजे मिळवली!) आपण फक्त हुशारच नाही तर शहाणेसुद्धा रोबो बनवू अशी वल्गना करायला मुदलात आपण पुरेसे शहाणे आहोत काय? संपर्कशक्ती अफाट वाढली पण त्यामानाने संवाद वाढला नाही. आशय समृद्ध झाल्याशिवाय नुसती माध्यमे काय कामाची? आपली प्रयोजने शुभकारक (बेनेव्होलंट) असतील याची खात्री, नुसत्या भौतिक कारणमीमांसेतून, मग ती कितीही प्रगत असो, मिळेल काय?

हे प्रश्न जास्त गंभीर बनलेत, ते अशामुळे की सगळे भावविश्व मेंदूत कोंबून दाखवूच असा विडा जडवाद्यांनी उचललाय. जाणीव, प्रयोजने, इच्छास्वातंत्र्य हे सर्व भास आहेत असा जडवादी मायावाद प्रसृत केला जात आहे. हा दार्शनिक गफला आहे. ज्या गोष्टी शुद्ध-जड वस्तूंच्या प्रांतात (डोमेनमध्ये) नाहीच आहेत. त्या तेथे नाहीयेत असे म्हणून, ‘त्या भावविश्वातही नाहीयेत!’ असा निष्कर्ष का काढता? जाणीव, प्रयोजने, इच्छास्वातंत्र्य या गोष्टी भावविश्वात आहेतच, याविषयी कोणीही मनुष्य खात्री देईल. मनुष्याला भावविश्वात राहून भावविश्वातल्या गोष्टींनिशी त्यांचे आंतरिक जीवन सुधारायचे आहे. हे सततच करावे लागेल. बाहेर साधनसुसज्जता जास्त असेल तर हे जास्तच अग्रक्रमाने करावे लागणार आहे.

भावविश्वाची मूलभूत रचना

‘ज्ञान’ हे फक्त वस्तुविश्वाचेच असू शकते, या ‘मता’चा मारा झाल्यामुळे भावविश्वाचे ज्ञान मुद्दाम मांडण्याची वेळ आली आहे. दिक-काल या रंगभूमीवर द्रव्य-ऊर्जा या पात्रांचा काय खेळ चालू आहे? ही वस्तू-विश्वासंबंधीची मांडणी आहे. भावविश्वाची आतून दिसू शकणारी मूलभूत रचना कोणती याची ओळख आता करून घेऊ. या ‘ओळखी’चे श्रेय जर्मन तत्त्वज्ञ एडमुंड हुस्सेर्ल (१८५९ – १९३८) यांना मुख्यत: जाते.

जसे द्रव्य-ऊर्जेला, दिक-काल हे क्षेत्र नेहमीच उपलब्ध असते तसा भावविश्वाचा क्षेत्रआयामच, जाणीव हा आहे. जाणीव ही कोणत्याही अनुभवाची पूर्वअट आहे. जाणिवेची उत्पत्ती कशीही असो. पण भावविश्वाचा आधार जाणीव हाच असणार आहे. (भावविश्वातून ‘मी’ जरी एग्झिट घेतला तरी समाईक – मानवी – भावविश्व चालूच राहणार आहे.) समोरची वस्तू मला अमूक वाटली , पण परीक्षण करता निघाली तमुक! अशी चूक नक्कीच होऊ शकते. पण मला जाणीव आहे असे मला ‘वाटणे’, हेच मला जाणीव ‘असणे’ असते.

येणारा प्रत्यय नेहमी खराच असतो. प्रत्ययावरून तो कशाचा आहे, याबाबतचे सवयीचे अंदाज, चुकीचे किंवा बरोबर किंवा दिशाभूल करणारे असू शकतात. जे जे उपस्थित होते त्याला समक्षबाजू आणि परोक्षबाजू असतात. भिंतीवरची फ्रेम ही ‘टांगलेली’ म्हणून प्रत्ययाला येते. ‘तरंगणारी’ म्हणून नाही. खरेतर साखळी, खिळा वगैरे समोरून दिसत नसते. इंद्रधनुष्य हे दृश्य म्हणून खरेच असते. तिथे जिच्यावर चढता येईल अशी भक्कम कमान आहे, हे खोटे असते. एखाद्या उपस्थित (प्रेझेन्टेड) गोष्टीला ‘वस्तू’ म्हणून मान्यता देण्यासाठी (१) ती माझ्या लहरीनुसार बदलत नाहीये ना? (श्रमामुळे बदलू शकेल!). (२) इतर कोणालाही तसेच वाटते आहे ना? हे  दोन निकष सतत लावावे लागतात. याशिवाय श्रमाद्वारे कृत्रिम – वस्तू – विश्व घडविण्यातून व अनेकांच्या भावविश्वांच्या संयोगातून वस्तुविश्व गठित होत असते!  जाणीव ही एका बाजूने शरीर, हार्मोन्स, मेंदू इत्यादी जड घटकांचा आधार घेते. पण मानवी-संवाद या महाव्यवस्थेतून ती अवतरत असते. माझ्यासारखेच इतरही ‘जाणीव-धारक’ आहेत हे गृहीत धरूनच आपण संवाद करतो. यातून मानवी भावविश्व हे ‘जाणीवधारकांचे भावविश्व’ म्हणूनच गठित होत राहाते.

जाणिवेला नेहमीच अशी खात्री असते की या जाणिवेला एक धारक आहे, त्याला एकटय़ालाच या जाणिवेत ‘प्रथमपुरुषी प्रवेश’ आहे. या धारकात विविध वृती उत्पन्न होतात. यामुळे त्याला विषयीत्व (सब्जेक्टहुड) प्राप्त होते. विषय हा विषयीच्या पुढय़ात उपस्थित होत असतो व विषयी पुढय़ातील विषयावर काहीना काही अभिप्राय देत असतो. अभिप्रायाची वैशिष्टय़े विषयाला चिकटत असतात. जेव्हा एखादा विषय, विषयीत विकार (वृतीबदल) घडवत असतो तेव्हा त्या क्रियेला भोग म्हणायचे. याउलट जर विषयी हा विषयात विकार (निर्मिती) घडवून आणत असेल तर त्या क्रियेला यत्न म्हणायचे. यत्न मानसिकसुद्धा असू शकतो.

साध्या जीवामध्ये भोग – प्रतिक्रिया – यत्न असे घडत राहते. परंतु मनुष्य स्वतच्या विषयीत्वालाच स्वतचा विषय बनवू शकतो. म्हणून त्याच्या जाणिवेला स्वावलोकी (रिफ्लेक्टिव्ह) स्वरूपही असते. भोगाला यांत्रिक प्रतिक्रिया न देता, तो वृती तपासून बदलू व निवडू शकतो, म्हणूनच त्याच्या क्रिया, ‘कृती’ बनतात. याला बोध असे म्हणायचे. भोग- बोध – यत्न – बोध – भोग किंवा यत्न- बोध- भोग- बोध- यत्न असे क्रम चालू असतात. यामुळे विषयांचे मूलभूत प्रकार पडतात. स्वावलोकी असताना विषयी हाच विषय, त्यानंतर पुढय़ातला (प्रेझेंटेड) विषय, त्यानंतर पुढय़ातल्या विषयामागील परोक्षावरून ‘आधारवस्तू’ हाही विषय जाणिवेत उपस्थित होतो.

बाह्य़ाकडून अंतरंगात व उलटही

येथे एक विचित्र वळण  (ट्विस्ट) येते. काही वस्तू अशा असतात की ज्या विषयीच्या पुढय़ात न येता, त्याच्या ‘मागून’ त्याला वृती पुरवत असतात! इथे मेंदू / हार्मोन्समध्ये करण्याचे हस्तक्षेप हा मुद्दा उपस्थित होतो. रासायनिक मानसोपचार हे या पडद्यामागील कलाकारांचे क्षेत्र आहे. मेंदुरसायने, हार्मोन्स व एकूण शारीरक्रिया भावविश्वाबाहेरून, म्हणजे वस्तुविश्वातून, भावविश्वातील वृतींची तीव्रता टय़ून करू शकतात. मात्र मेंदुघटिते स्वरूपत:, भावघटितांपेक्षा आरपार वेगळी असतात.

परंतु उलटही खरे आहे. भावविश्वातच यथायोग्य बदल केले तर त्यातून गुणकारी शारीरक्रियाही घडवून आणता येतात. भावविश्वाचा मेंदू आदींवर निश्चित परिणाम होत असतो. म्हणूनच बोधात्मक उपचार, वर्तनात्मक उपचार, श्रद्धाधारित उपचार अशा उपचार पद्धतीदेखील कामगिरी करू शकतात. इतकेच नव्हे तर ज्या सामाजिक रचनेत व्यक्तीला भाग घ्यावा लागतो, तिच्या रेटय़ांनीही शारीर-मानसिक परिणाम घडून, भावविश्वात बदल होत असतात. हे उलटे वळण म्हणजेच, भावविश्वाच्या स्वायत्ततेला बाह्य़ वस्तुविश्वाकडून पडणारी मर्यादा होय. पण ही मर्यादा पडते, याचा अर्थ ‘स्वायत्तता नसतेच’ असा घेणे चूक आहे.

मग वैज्ञानिकांच्यात जाणिवेला पुरतीच मेंदूत कोंबण्याची धडपड का चालू आहे? कृत्रिम बुद्धिमत्तेची निर्मिती करताना, जर त्या यंत्राची क्षमता मानवी मेंदूपेक्षा जास्त वाढली तर त्यांना, इच्छा आणि महत्त्वाकांक्षा निर्माण होतील की काय? अशी भीती आहे. असे झाले तर मानवाचा पुत्र मानवालाच गुलाम करेल. यंत्राची रचना- प्रक्रिया- समृद्धी किती वाढली? तर हा धोका आहे, हे ठरविण्यासाठी मेंदू- प्रक्रियेचा अभ्यास चालू आहे. म्हणजे यंत्रेच, मेंदू बनणार नाहीत ना? हे तपासण्यासाठी मेंदूकडे यंत्र म्हणून पाहण्याचा प्रयत्न चालू आहे! ही सावधगिरी स्तुत्यच आहे. पण ही वैज्ञानिक सावधगिरी म्हणजे मानवी जीवनाला जीवनदृष्टी पुरवणारे दर्शन नव्हे.

विज्ञानाला तत्त्वज्ञानाचा दर्जा देणे हे चूक आहे. मानवाला जीवनदृष्टी व प्रयोजनांना दिशा मिळावी, मानवातील दुर्गुण सौम्य होत सद्गुण जोपासले जावेत, यासाठी घेण्याचा शोध हा भावविश्वाच्या आशयात घ्यायला हवा. मेंदूघटितांच्या विज्ञानात नव्हे. मेंदूघटितांचे विज्ञान हे आत्मिक सुधारणा सुकर करू शकेल. पण आत्मिक सुधारणांचा ‘आशय’ काय हे सांगू शकणार नाही. म्हणूनच भावमीमांसा व प्रयोजनमीमांसा हे क्षेत्र विकसित करावे लागेल. ही दृष्टी आत्मिक (स्पिरिच्युअल) आहे. पण यात कोठेही पारलौकिक गोष्टी आणलेल्या नाहीत.

विज्ञाननिष्ठ लोकांनी धर्म या गोष्टीचा इतका धसका घेतलेला आहे, की त्यांना आत्मिक म्हटले की, ते धार्मिक होईल की काय? अशी भीती वाटते. भावविश्वाचे आकलन वाढवणे, हाच या धसक्यावरही उपाय आहे व एरवीसुद्धा मानव – सुधार-  मोहिमेसाठीही भाव-  आकलन आवश्यक आहेच. इति मला उमजलेले जग-जाणीव डायलेक्टिक्स.

लेखक तत्त्वज्ञान व सामाजिक शास्त्रांचे आंतरविद्याशाखीय अभ्यासक आहेत. ई-मेल :  rajeevsane@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 20, 2018 1:01 am

Web Title: fitness by using techniques world of conscious people
Next Stories
1 शहाणेपणा : सुवृत्तींमधील समतोल
2 ‘डायलेक्टिक्स’ : वैचारिक पूर्वपीठिका
3 तंत्र व मानव्य : विद्यांमधील दुभंग
Just Now!
X