|| राजीव साने

नायक विरुद्ध खलनायक अशी कथा फार सुटसुटीत असते. नायक निग्रहाने मोह टाळून कर्तव्य बजावतो तर खलनायक मोहाच्या अधीन होऊन कर्तव्यच्युत होत असतो. पण जीवन इतके सुटसुटीत नसते. त्यात कोणते कर्तव्य जास्त कसोशीने करायचे व कोणते कमी पडले तरी चालेल? असेही प्रश्न असतात. तसेच कोणता मोह जास्त वा कमी घातक ठरतो? हेही पाहावे लागते.

सद्-हेतूच प्रबळ असतानासुद्धा सकारात्मक मूल्यांपकी कोणत्या मूल्याला अग्रक्रम द्यायचा हे ठरविणे जास्त खुबीदार असते. स्वार्थ जरी असला तरी तो, ऱ्हस्वदृष्टीचा की दीर्घदृष्टीचा, एकतर्फी की दुतर्फी, एकांगी की बहुअंगी, असे विवेक स्वार्थातही लागत असतात.

तत्त्वनिष्ठेत सदसद्विवेकबुद्धी, ज्ममीर किंवा कॉन्श्यन्स अभिप्रेत आहे. खरोखरच माणसाला ही गोष्ट, जिला मी श्रेयचक्षु किंवा सत्प्रवृत्ती म्हणतो, अशी एक प्रत्ययशक्ती (फॅकल्टी) लाभलेली असते. भल्याबुऱ्याचा थेट प्रत्यय आपल्याला असतो. चुकीच्या रूढी- संस्कारांमुळे हा प्रत्यय अयोग्य बनलेला असू शकतो. म्हणूनच नीतिचिकित्सा करून तो सुधारून घ्यावा लागतो. कॉन्श्यन्सची फारशी पर्वा न करता तो बाजूला रेटणेही काहींना जमते! आपण जे उद्दिष्ट म्हणून ठरवितो आहोत ते योग्य आहे की नाही? याचे उत्तर कॉन्श्यन्सकडून मिळत असते.

पण आपण घेतलेल्या उद्दिष्टासाठी जो मार्ग व जी साधने अवलंबित आहोत ती दिलेल्या प्रसंगी सर्वात परिणामकारक व मन:शक्तीची बचत करणारी आहेत की नाहीत हा विचारही कमी महत्त्वाचा नसतो. म्हणजेच हेतू चांगला असला तरी परिणाम स्वतला किंवा इतरांनाही घातक ठरू शकतो. तसेच चांगल्या उद्दिष्टाच्या प्राप्तीत वैफल्य येऊ शकते. असे न व्हावे यासाठी जे रीतिचातुर्य लागते त्याला प्रूडन्स असा शब्द आहे. सत्प्रवृत्ती आणि रीतिचातुर्य यांचा मेळ घालता येणे म्हणजे शहाणेपणा होय. विजडम इज कॉम्प्लेमेंटरी रिलेशन बिट्वीन कॉन्श्यन्स अँड प्रूडन्स!

दोन्ही बाजू राखता येणे

आपणा सर्वाना अगदी हवीशी वाटणारी गोष्ट म्हणजे उत्स्फूर्तता! पण तिला वाव जरा कमीच असतो. स्वयंनियंत्रण हेच जबाबदार स्वातंत्र्याचे इंगित आहे. जे आपण अन्यांच्या सक्तीविना (व्हॉलेंटरीली) करतो त्यात स्वातंत्र्य अनुभवाला येते. जे सक्तीखाली नाइलाजाने करावे लागते त्यात घुसमट होते. म्हणूनच आपण ज्यात शक्यतो सक्ती येणार नाही अशा सामाजिक संयोजना (अरेंजमेंट्स) आणू पाहतो. पण ज्यांच्यात जबाबदारीशी निष्ठा आणि स्वयंशिस्त आहे अशीच माणसे विनासक्ती ‘नांदू’ शकतात. म्हणजे स्वयंनियंत्रण हवेच. पण स्वयंनियंत्रणात उत्स्फूर्तता गमवावी लागते. उत्स्फूर्त की अनुत्स्फूर्त हे द्वंद्व सक्ती की विनासक्ती या द्वंद्वाने तोललेले आहे! म्हणजेच आपण उत्स्फूर्तता कमावण्यासाठीच काही वेळा उत्स्फूर्तता गमावत असतो. उत्स्फूर्तता केव्हा एन्जॉय करायची? आणि केव्हा तिला आवर घालून स्वयंनियंत्रण करायचे? यातील सर्वोत्तम जुळणी साधावी लागते. असा तोल राखणे म्हणजे शहाणेपणा असतो.

जर सक्तीच लागू लागली तर उत्स्फूर्ततेचा वाव पुरताच नष्ट होईल. म्हणून उत्स्फूर्ततेला आवर घालणे हेच उत्स्फूर्तता मिळवण्याचे साधन ठरते. ही ताíकक विसंगती नसून जीवनात जे अपरिहार्य पेच असतात त्यापकीचा एक पेच आहे. पेच सोडवता येणे हा शहाणपणा असतो. येथे आवर्जून लक्षात घेतले पाहिजे की उत्स्फूर्तता हवीशी वाटणे हीच कुवृती नाही. ती सुवृतीच आहे. त्याच वेळी सक्ती नकोशी वाटणे आणि त्यासाठी स्वयंनियंत्रणाला तयार असणे हीदेखील सुवृत्तीच आहे. या दोन सुवृत्तींचा तोल सुटला आणि ‘उत्स्फूर्तताच’ हा आग्रह धरला तर स्वैरता, अतिक्रमण, प्रतिकार, अनागोंदी आणि ती रोखण्यासाठी सक्तीची गरज, हे दुष्टचक्र सुरू होणार असते. किंवा उलटपक्षी आपण कधीच आपले न राहणे आणि स्वतच्याच रेजिमेंटेशनखाली कुढत राहणे हीसुद्धा दुरवस्थाच असते. ही दुरवस्था स्वयंनियंत्रणाच्या अतिरेकामुळे येत असते. अशा तऱ्हेने उत्स्फूर्तता की स्वयंनियंत्रण हे द्वंद्व तोलता येण्यात शहाणेपणा आहे. सुवृत्तींचा समतोल सुटण्याने कुवृती (म्हणजे वरील उदाहरणात बाह्य सक्ती वा आंतरिक दमन) मोकळ्या सुटतात.

वर मी एक द्वंद्व-जोडी सोडवून दाखवली. यातील सूत्र-मुद्दा ध्यानात घेऊन तुम्ही अशा अनेक जोडय़ा ओळखू, तपासू व सोडवू शकता. आणखी एक उदाहरण घेतो. आपल्याला, मी वेगळा पडलेला नसून कोणत्या ना कोणत्या बिरादरीत सामावलेला आहे, तिने मला ‘आपले’ मानलेले आहे, या सेन्स ऑफ बिलॉन्गिंगची तीव्र गरज असते. तुटक, तुसडे, एकलकोंडे नसणे ही सुवृत्तीच आहे. पण ही जोडलेपणाची गरजच आपल्या खासियतीला अडचणीची ठरू लागते. आपल्या लोकांना काय वाटेल? याची चिंता कधी रास्त असली तरी कधी ती प्रवाहपतित करणारी किंवा फरफट करणारीही ठरू शकते. स्वत:शी निवांत असणे याला सॉलिटय़ूड म्हणतात. तर एकटे पडल्याच्या भावनेला लोनलीनेस म्हणतात. आपले अनन्य व्यक्तित्व व्यक्त करावेसे वाटणे हीदेखील एक सुवृत्तीच आहे. जोडलेपणाची गरज हीदेखील एक सुवृत्तीच आहे. याही दोन सुवृत्तींमधला समतोल सुटला तर एकीकडे एकलकोंडे तुटक तुसडे बनण्याचा धोका तर दुसरीकडे समूह-शरण जथानुगतिक (कन्फॉर्मिस्ट) बनण्याचा धोका असतो. याला वेगळेपण/ जोडलेपण द्वंद्व असे म्हणता येईल.

विश्राम आणि प्रेरितता, सुख आणि अनासक्ती, प्रांजळपणा आणि ऋजुता, तत्त्वनिष्ठा आणि अनाग्रह, अर्हतादृष्टी आणि औदार्य / करुणा, प्रयोगशीलता आणि सावधगिरी, सृजनशीलता आणि खात्रीलायकपणा, अशा सुवृतींच्या समतोल लागणाऱ्या जोडय़ा सापडत जातात.

काही वेळा सुवृती आणि कुवृत्ती यांच्यात साम्य असल्याने गल्लत होऊ शकते. अ-लिप्तता ही सुवृती आहे, पण अनास्था ही कुवृती आहे. पण अलिप्तता अनास्थेत शिरू शकते. अनाग्रह वेगळा आणि भीरुता वेगळी. भोगवाद नको म्हणजे वैराग्यवाद हवा असे नाही.

विरुद्ध टोकाची पण एकच चूक 

समजा एक परिपूर्णतावादी (परफेक्शनिस्ट) माणूस आहे. तो परिपूर्ण शुभतेकडे आकर्षति आहे. परिपूर्णपेक्षा किंचितही कमी हे त्याला निर्थक वाटते. दुसरा एक दोषवदर्शी  (सिनिक) माणूस आहे. त्याला सगळीकडे दोषच दिसत असतात. इतकेच नव्हे तर शुभतेकडे वाटचाल होऊ शकेल हा आशावाद बाळगणे, हे त्याला पाप किंवा फसवणूक वाटत असते. यात दोघेही एकच चूक करत नाहीयेत काय? खाईन तर तुपाशी. मधले अधले म्हणजे मेणचट. कुछ खास दम नही. प्रत्यक्षात सर्व उन्नती ही सलग वाढत्या मात्रेने पण नेहमीच तडजोडवादी अशीच घडत असते. सिनिक आणि युटोपियन भावना उलटय़ा पण परिणाम एकच. कशालाच ध्येय न मानणे, परिपूर्णता नाही म्हणून!

न्यायासाठी वाट्टेल तितकी हिंसा झाली तरी चालेल असे वाटणारा क्रांतिकारक (रिव्होल्यूशनरी) आणि अन्याय चालू राहू दे पण जरासुद्धा हिंसा होता कामा नये, असा आग्रह धरणारा शांततावादी (पेसिफिस्ट) हे दोघेही तीच चूक विरोधी अंगांनी करीत असतात. न्याय आणि अिहसा यांच्या दमादमाने (ग्रॅज्युअली) होणाऱ्या वाटचालीतून ते बाहेर राहतात. न्यायप्रेमीपणा आणि अिहसाप्रेमीपणा या दोन्ही सुवृत्तीच आहेत. पण त्या एकारलेल्या राहिल्या तर एकच चूक विरुद्ध भावनेतून होत असते.

माणसात सद्गुणही असतात आणि दुर्गुणही असतात. क्रमाक्रमाने दुर्गुण निरसून टाकणे आणि सद्गुण जोपासणे ही प्रक्रिया चालू असते. दुरितांचे/ दुर्गुणांचे निर्मूलन ही एक घोषणा असू शकते. निर्मूलन म्हणजे मुळासकट उखडून काढणे. मानवी स्वभावातच मुळे आहेत. तिथे तुम्ही काय उपटणार? बलप्रयोगाने निर्मूलन करायला जाल तर प्रतिक्रिया होऊन दुरिते/ दुर्गुण वाढूनच बसण्याचा धोका असतो. जास्त वाईट अवस्थेकडे प्रवास होऊ शकतो. असे इतिहासात अनेकदा झालेलेही आहे. हळूहळू निवळत जाणे व जाऊ देणे याला रोगलक्षणाचे सौम्यीकरण (अमेलिओरेशन) असे म्हणतात.

दुष्टचक्रे तोडताना सर्वात निंद्य दुव्यावर डोके आपटून घेण्यापेक्षा, सर्वात सुलभ दुवा तोडायचा असतो. विधायक कामाने प्रसादचक्र जोडायचे असते. कित्येक दुरितांवर उपाय सापडायलाही प्रतीक्षा करावी लागते असतो. दोष दाखवून शिव्याशाप द्यायचे किंवा रडगाणे गायचे ही पटकन मन वेधून घेणारी पण निरुपयोगी (दुरुपयोगीसुद्धा) गोष्ट असते. याउलट सुवृत्तींचा समतोल साधत राहाणे व निवळण्याची प्रतीक्षा करणे हे चिकाटीचे आहे, मात्र तितकेसे दिलखेचक नाही.

झटपट / आरपार-वाल्यांना श्रेय-दुरित हे द्वैतच (डायकॉटॉमी) दिसते. पण ज्यांना उपाय शोधायचे व करायचे असतात त्यांना वरील सर्व द्वंद्वात्मकतांचे भान असावे लागते. मला उमजलेल्या डायलेक्टिक्सचे मूल्यात्मक अंग हे असे आहे. जाणीव आणि जग यांचे डायलेक्टिक्स पुढे पाहू.

rajeevsane@gmail.com