उत्पादनप्रक्रियेच्या इतिहासाचा उल्लेख या सदरात अधूनमधून होईल; तो इतिहास अचूक मांडण्यासाठी नव्हे, तर विकासाची सामान्य गतिसूत्रे पकडण्यासाठी. तंत्रात आढळणाऱ्या बऱ्याच परिष्कृत गोष्टी, बीजरूपात आधी सापडलेल्या असतात. आजच्या शोधांमागील सारभूत गोष्टी प्राथमिक शोधांवरून जास्त सहज समजावून घेता येतात..  

मनुष्याला उभे राहणे, लांब हात आणि अंगठा इतर बोटांसमोर आणता येणे, स्वरयंत्र तसेच जीभ आणि टाळू यांचे उपयोग, वाढलेला मेंदू, इतर व्यक्तींच्या डोळ्याकडे व आविर्भावाकडे पाहून तिला काय वाटते आहे हे ओळखता येणे, या देणग्या निसर्गाकडूनच मिळाल्या होत्या (एकलव्याचा अंगठाच मागितला गेला!). स्वत:च्या शरीराबाहेर साधने मिळण्याची सुरुवात झाली तेव्हा निसर्गाकडून मिळालेल्या प्राथमिक वस्तू म्हणजे दगड, दांडा आणि दोरी (स्टोन, स्टिक अ‍ॅण्ड स्ट्रिंग)!

uran, fishers, financial crisis
मत्स्यसंपदा घटल्याने लाखो मच्छीमारांवर आर्थिक संकट
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
नात्यातील ताण्याबाण्यांची गंमत
best ways to kill and repel ants naturally know how to get rid of ants in the kitchen without toxic chemicals
घरात लागल्या मुंग्यांच्या रांगाच रांगा? मग केमिकल नाही तर वापरा किचनमधील ‘हे’ तीन पदार्थ? मुंग्या जातील पळून

वेली, पारंब्या, मुळे आणि नंतर काथ्या, ताग वगैरे गोष्टींपासून दोर वळणे किंवा दोऱ्या बनवणे त्याला जमू लागले. वेलींच्या दोरावर लांब झोके घेत टारझन कसा लांबच्या पल्ल्यापर्यंत पोहोचायचा हे आपण सिनेमात पाहिले आहे. टारझन वास्तवात होता की नाही हा इथे मुद्दा नाही. झोका घेणे हाही वेगाने अंतर कापण्याचा एक मार्ग असू शकतो. आपण ‘सार’ काय ते पाहात आहोत.

लाकडाची दांडकी तर मिळतच होती. दगड हे हत्यारे बनवण्याचे पहिलेवहिले मटेरियल असल्यानेच ‘अश्म’युग हा शब्द बनलेला आहे. प्राण्यांची शिकार करण्यासाठी दगड धारदार हवा. प्राण्यांच्या शरीरात घुसेल इतपत कठीण आणि दुसऱ्या दगडावर धार लावता येईल इतपत मऊ! दोन गुणधर्माची मध्यम आणि म्हणूनच इष्टतम सांगड घालता येणे या तत्त्वाचे हे प्राथमिक रूप होते. तसेच एका धोंडय़ावर मोठा धोंडा पडून किंवा मुद्दाम टाकून त्याच्या ज्या चिरफळ्या किंवा खापऱ्या उडतात त्या धारदार असतात! ही प्राथमिक कुऱ्हाडीची पूर्वतयारी चाललीय हे लक्षात आले असेलच. दगडाचे पाते बनले. जास्त गतिमात्रा (मोमेंटम) देऊन घाव घालण्यासाठी दांडा हवा. पाते आणि दांडा यांचा जॉइंट हा चक्क दोरीने बांधून केला जाई. दोरी कसून आवळणे, गाठी मारणे हे अगदी महत्त्वाचे हस्तकौशल्य होते.

प्राथमिक कुऱ्हाड तर हाती लागली, पण दोरीने बांधणे हा सांधा काही चांगला नाही. तो हलू शकतो, ढिला होऊ शकतो. मुख्य म्हणजे पाते सरकलेले (एक्सेंट्रिक) असले की घाव तितका नीट बसणारही नाही. दगडातून दांडा आरपार घालणे किंवा लाकडातून पात्याचे शेपूट आरपार घालणे हे जास्त चांगले, पण ते जमेपर्यंत ही सदोष कुऱ्हाड चालवावी लागली. सदोष म्हणून न वापरणे तेव्हा परवडणारे नव्हते.

घटक, संघात आणि स्रोत

दगड, दांडा आणि दोरी हे घटक (कॉम्पोनंट्स) सुटेपणाने जे करू शकत नाहीत ते काम कुऱ्हाड नावाचा संघात (कॉम्पोझिट) करू शकतो. घटक आणि संघात ही फार महत्त्वाची कोटी इथे लक्षात ठेवावी. ती फारच कामाची आहे. दगडाचे शस्त्र हे एकदा बनले की त्यानंतर मारलेल्या प्राण्याची तिरकी तोडलेली हाडेही तीक्ष्ण वस्तू म्हणून उपलब्ध होतात. प्राण्याची िशगेसुद्धा तीक्ष्ण शस्त्रे बनतात. कुऱ्हाडीचा सांधा चांगला जमल्यानंतर दोरीची हकालपट्टी झाली असणार.

पण दोरी हे प्रकरण एकदा जमले की गोफण, फास टाकणे, कोळ्याचे जाळे, असे दोरीचे उपयोग आढळायला लागतात. कुऱ्हाडीहून भालाफेक जास्त फायद्याची आणि त्याही पुढे जाऊन धनुष्यबाण हे तर पहिले ‘क्षेपणा’स्त्र! त्यात लवचीक दांडा आणि दोरी आहेच. तसेच बाणात दांडा आणि पाते ही जोडी आहेच. यातही एक महत्त्वाचा धडा आहे. गोष्ट जरी एखाद्या प्रयोजनासाठी बनवली तरी ती बनवताना वेगळ्या प्रयोजनांसाठीचे स्रोतही (रिसोस्रेस) सापडत असतात. ते कधी ‘स्रोत’ ठरतील हे इतर प्रगतीवर अवलंबून असते.

जे अगोदर योजलेले नसते ते नंतर आढळू शकते, लक्षात येऊ शकते. कोणताही स्रोत हा ‘स्रोत’ आहे हे लक्षात येईपर्यंत तो स्रोत नसतो. ‘स्रोत’पण हे मानवीच असते आणि ‘फल’ हीसुद्धा मानवीच कोटी आहे. निसर्गात इनपुट आणि आऊटपुट असे काहीच नसते. आपल्याला ओतावे लागणारे की प्राप्त होणारे मूल्य यातून इनपुट की आऊटपुट हे ठरत असते. ‘स्रोत’पण लक्षात येणे हेदेखील अनपेक्षित योगायोगाने घडत असते. चुकून बरोबर येणे या अर्थाचा सेरेंडिपिटी असा शब्द आहे. ‘आंधळ्याचा हात लाडवावर पडणे’ या वाक्प्रचारात हेच व्यक्त होते.

अग्नीचा शोध म्हणजे ठरवून पेटवता आणि विझवता येणाऱ्या अग्नीचा शोध. नाही तर वणवे लागत होतेच. अन्न शिजवण्याचा शोध, हा अनेक अन्ने जी न शिजवता खाणे शक्य नव्हती, तीदेखील अन्ने म्हणून उपलब्ध करणारा शोध असतो. ऊब मिळणे, प्रकाश मिळणे, इतर श्वापदांना पिटाळण्याचे शस्त्र मिळणे हे आणि पुढे वितळवणे इत्यादी अनेक उपयोग नियंत्रित अग्नीचे असतात. ‘देवतांना खूश करण्यासाठी हवि पोहोचवणे’, हाही उपयोगच. कारण तो भंकस आहे हे समजण्याचा काळ एवढय़ात कुठून येणार?

चाकाचा शोध म्हणजे गोल वस्तू गडगडत जाते हा नव्हे तर एका अणी (अक्सल) भोवती फिरू शकणारे किंवा त्याला जोडलेला दांडा (शाफ्ट) एका गोल खोबणीत (बेअिरग) फिरू शकणारे असे ते चाक. त्याशिवाय ढकलगाडी होत नाही. अणी सापडली की तरफ शक्य होते. उभ्या खांबावरच्या अणीभोवती आडवी तुळईदेखील सी-सॉप्रमाणे डोलू शकते. तुळईच्या एका टोकाला पाण्याचा पोहरा आणि दुसऱ्या टोकाला काऊंटरवेट म्हणून दगड. तुळईला दोन्ही दिशांनी कलवण्यासाठी एक माणूस तुळईवर उभा राहून एकदा विहिरीच्या दिशेने जातो आणि एकदा काऊंटरवेटच्या दिशेने. अशी अनोखी मोट ‘चोरी चोरी’ सिनेमातल्या ‘पंछी बनू उडती फिरू’ या गाण्यात बॅकग्राऊंडला दाखवली आहे. ती जरूर पाहावी. मुद्दा असा की, एक तांत्रिक युक्ती पुढील अनेक युक्त्यांची वाट मोकळी करत असते.

गोळा करणे आणि साठवणे

आत्तापर्यंत फक्त शिकारीवर जाणाऱ्या पुरुषांचाच संदर्भ घेतला गेला. मात्र फळे, मुळे, शेंगा वगैरे जमा करणाऱ्या स्त्रियांच्या क्षेत्रातही शोध लागत गेले. फुले वेचतानाची परडी हे अन्न गोळा करण्याच्या साधनांचे एक सुंदर प्रतीक आहे. टोपले, घमेले असे काहीही म्हणजे कंटेनर. (मी याला अंतर्धारक म्हटले असते, पण कंटेनरच म्हणू या.) कंटेनर म्हणजे टाकी किंवा माल-वाहतुकीचा मोठा डबादेखील असू शकेल. प्लास्टिकच्या पिशव्या हाही एक कंटेनरच आहे. इष्टतमीकरणाची गरज कंटेनरचा साइज ठरवताना असतेच. फार छोटा घेतला तर खेपा वाढतात. फार मोठा घेतला तर एकाच खेपेत कंबरडे मोडते. चामडे हे मटेरियल आदिम काळात महत्त्वाचे होते. पखाल आणि पोहरा हे आजही काही ठिकाणी चामडय़ाचे आढळतात. लोहाराचा भाता हा पहिला कॉम्प्रेसरसुद्धा चामडय़ाचाच.

अन्न टिकवण्यासाठी ते वाळवून ठेवणे हे आजही उपयोगी आहे. पुन्हा सौर ऊर्जेचा थेट उपयोग. म्हणजे ज्वलनाची जरूर नाही. निवडणे, पाखडणे अशा अनेक क्रिया पुढे वाढत गेलेल्या दिसतात. हे फळ आज तोडावे की उद्यासाठी झाडावरच राखावे हा निर्णय दमादमाने घेता येतो. चुकला तरी मोठे नुकसान होत नाही. उलट या क्षणी भाला फेकू की नको याचा विचार करायला वेळ नसतो. इस पार या उस पार. पुरुषाचे सहकारी लांब अंतरावर दबा धरून असतात. तसेच दूरवर जाऊन रस्ते शोधणे, दिशांचा अंदाज घेणे हेही शिकारवाल्यांना करावे लागत असणार. खाणाखुणा करून निर्णायक हल्ला चढवायचा असतो.

स्त्री आणि पुरुष यांच्या विचार करण्यातला हा फरक जनुकीय आहे की नाही हे मला माहीत नाही. निवडणे, गाळून घेणे, शिजवणे वगैरे जास्त बारकाईने करण्याच्या गोष्टी आदिम स्त्रियाच करत असत. औषधी वनस्पती ओळखण्यात त्यांचे योगदान असावे असाही अंदाज आहे. शेती हा फारच मोठा शोध मुळात स्त्रियांचा आहे. (हा शोध जमीनदारी काळात सामाजिकदृष्टय़ा स्त्रियांच्या फारच अंगलट आला ही पुढची गोष्ट.) जनावरांची ऊर्जा वापरणे हे शेतीतून सुरू झालेले आहे. पशुपालनातही स्त्रियांचाच मोठा वाटा असावा. हे कन्येला ‘दुहिता’ म्हणतात यातूनही दिसते.

तंत्रे सापडणे हे बराच काळ विज्ञानाच्या आधीच घडत राहिले आहे. त्यात व्यावहारिक विचार कसे केले गेले? आणि त्यातून तंत्रांची कोणती बिगर वैज्ञानिक सूत्रे आढळतात? तसेच तंत्रांचे समाजावर आणि समाजाचे तंत्रांवर काय परिणाम होतात? याचा शोध आपण घेत राहणार आहोत.

लेखक कामगार संघटनांचे उत्पादकता सल्लागार, तसेच तत्त्वज्ञान व सामाजिक शास्त्रांचे आंतरविद्याशाखीय अभ्यासक आहेत. ई-मेल : rajeevsane@gmail.com