कर्तृत्ववान, प्रगतशील, श्रीमंत, मग ते देश असोत वा व्यक्ती, अशांना खलनायक ठरविले जाते व त्यामुळे डोळस-अनुकरणही थांबते. 

आज जे प्रगत देश आहेत, त्यांच्यापैकी काहींनी इतर देशांचे साम्राज्यवादी शोषण केले हे खरेच आहे. पण कित्येक प्रगत देश उदा. स्वीडन, जपान, हे देश साम्राज्य नसूनही प्रगत झालेत. समजा सर्वच प्रगत देशांना शोषणाचे अपश्रेय दिले तरीही त्यांचे, मागास देशात औद्योगिक क्रांती आणि आधुनिकता पोहोचवण्याचे, श्रेयही विसरता येणार नाही. तोफांचे ओतकाम हे कार्य जरी विघातक असले तरी त्यातून सापडलेली प्रक्रिया ‘उत्पादक’च असते. कित्येक शोध जरी सुरुवातीला वाईट हेतूंनी लावले गेले असले तरी ते शोध चांगल्या हेतूंसाठी उपयोगी पडतात, हे सत्य राहतेच. कोणीतरी पुढे गेल्याशिवाय इतरांना पुढे जाण्याची शक्यता खुली होत नसते. वाटाडे नवी वाट फोडतात, वाटसरू ती वाट रुळवतात, पण ‘वाटा’ मागायच्या वेळी मात्र, ती वाट न वापरणारेही दावा सांगतात!

प्रगती ही एकसमयावच्छेदेकरून सर्वाची होतेय असे कधीच घडले नाही आणि घडणारही नाही. एक तर शोध लागणे हे काहीसे यादृच्छिक असते. त्याहून महत्त्वाचे असे की शोध लावण्यासाठी लागणारी प्रयोगशीलता परवडावीही लागते आणि जोपासावीही लागते.

नवे शोध, अगोदर न अपेक्षिलेले दुष्परिणाम घडवितात, आणि नंतर ते ध्यानात येऊन ते दूर करण्यावर संशोधन सुरू होते. उदाहरणार्थ पूर्वी रेफ्रिजरेटरमध्ये क्लोरोफ्ल्युरोकार्बन्स ही द्रव्ये वापरली जायची. त्यांनी ओझोन लेअरला क्षती पोहोचे आणि अल्ट्राव्हायोलेट किरण जास्त पोहोचत, जे मानवाला घातक होते. आता ते मटेरियल टाळले जाते. पण मुळात ओझोन लेअर असतो, अल्ट्राव्हायोलेट किरण असतात, ते आयनायझिंग रेडिएशन असते, म्हणून माणसाला धोकादायक असते, हे सर्व कळायला तंत्राची जी पातळी लागते ती मिळण्याचा मार्ग सदोष रेफ्रिजरेशनसह अनेक धोक्यांतून जाणारा असतो. तो मार्ग चोखाळला नसता तर पुढची सुधारणा आवश्यक आहे हेच समजले नसते आणि कोणती सुधारणा करायची हेही समजले नसते. पण हे सोयीस्कररीत्या विसरून क्लोरोफ्ल्युरोकार्बन वापरणे हे जणू मुद्दाम दुष्टपणाने केले गेले आहे, अशी हाकाटी केली जाते. पण सुरुवातीला चुका होतात म्हणून सुरुवातच करायची नाही असे चालत नसते.

पहिलेवहिले ग्राहक श्रीमंतच 

कोणत्याही नव्या उत्पादनाचा मूळ-नमुना (प्रोटोटाइप) बनवणे फार खर्चीक असते. सुरुवातीची बॅचही खर्चीक आणि म्हणून महागडी असते. माझ्या वडिलांनी गणिताला स्लाईडरूलही वापरला. त्यांनी फॅसिटचे हँडल मारण्याचे मशीनही वापरले. इलेक्ट्रिकल कॅल्क्युलेटर तर वायाच गेला. पहिला इलेक्ट्रॉनिक कॅल्क्युलेटर त्या काळात अठराशे रुपये म्हणजे फारच महाग होता.

कोणतेही उत्पादन जेव्हा नवे असते तेव्हा ते फारच महाग असते. घाऊकतेचा किफायतशीरपणा (इकनॉमी ऑफ स्केल) त्याला लाभलेला नसतो. तरीही ते खरेदी केले जातेय, हे पाहताच मूळ उत्पादकही उत्साहित होतो आणि इतर स्पर्धकही त्यात उतरतात. जास्त ग्राहक मिळावा म्हणून आणि स्पर्धेमुळे त्या उत्पादनाच्या प्रकियेत सुधारणा केल्या जातात. नवमार्गशोधने (इन्होव्हेशन्स) सापडू लागतात. किंमत कमी झाल्याने मागणी वाढते व जास्त मागणीमुळेच घाऊकतेचा किफायतशीरपणा लाभतो. उत्पादनखर्चात स्थिर खर्चाचा वाटा कमी कमी होत जाऊन आणि चल खर्चातही वेगवेगळ्या स्रोतांच्या उत्पादकता वाढून घट होते. महाग असतानाही घेणारे कोणी, श्रीमंत किंवा ध्यासवाले, नसते तर पुढची सगळी प्रक्रियाच थांबली असती. आता की-चेन विकत घेतली तरी तिच्यात लटकवलेला कॅल्क्युलेटर फुकटसुद्धा मिळतो! खिळे जुळवून छपाईची कला जिवंत ठेवली गेली. आज आपण की-इन-ऑफसेटचे फायदे मिळवत आहोत.

थेट ग्राहक असलेल्या वस्तूची ही कथा आहे. पण याहीपेक्षा अवघड प्रक्रियेतून उत्पादक-यंत्रसामुग्रीला आणि इन्फ्रास्ट्रक्चरल म्हणजे पायाभूत सुविधांना जावे लागते. त्यांच्यावर परतावा मिळणे हे बऱ्याच अवधीनंतर होणार असल्यामुळे सुरुवातीची गुंतवणूक श्रीमंतांनाही न परवडून सरकारला करावी लागते. उदा. धरणे, वीज निर्मिती प्रकल्प, रस्ते वगैरे.  सरकारने गुंतवणूक करणे हेच चूक नसते. पण जनानुरंजनापायी व अकार्यक्षमता चालू देऊन, तोटा सोसत राहूनही ती चालू ठेवणे चूक असते.

भव्य आणि कलात्मक वास्तू (मॉन्युमेंट्स) या राजाश्रयानेच शक्य झाल्या होत्या व आजही भव्य स्मारके (पर्यटनवाढीसाठी) सरकारी गुंतवणुकीतूनच होताहेत. पूर्वी राजे कोणतेही असले तरी अशा कामात शोषण अपरिहार्य होते. कारण त्या काळी उत्पादकता खूपच कमी होती. हे शोषण वाईटच होते.

संशोधनकार्य ही सर्वात दूरगामी आणि बेभरवशाची गुंतवणूक असते. संशोधनात सीमोल्लंघने (ब्रेक-थ्रूज्) कधी घडतील हे अनिश्चित असते. कोणत्याही संशोधकाचे अपयश हे त्याचे दुर्भाग्य होते? की हलगर्जीपणा? हे त्या क्षेत्रातील तज्ज्ञ नसणारांना ठरविताच येत नाही. काहीवेळा तज्ज्ञांचे परस्पर-रक्षक मेतकूट असू शकते. पण असे दोष असले तरीही संशोधनात भरपूर गुंतवणूक घालावीच लागते. बचत असो वा कर-उत्पन्न असो; कोणीतरी सुस्थित लोकच ती गुंतवणूक देऊ  शकत असतात. हा सुस्थित लोकांचा दोष म्हणता येणार नाही. उलट भविष्यात गरिबांनाही अनेक गोष्टी परवडू शकतील यासाठी ते अप्रत्यक्ष योगदानच करत असतात. गुंतवणूक हे एक उत्पादक योगदानच आहे. अर्थात सोने, जडजवाहिर, ‘रिअल’-इस्टेट  यांसारख्या अनुत्पादक (केवळ भाववाढीमुळेच परतावा देणाऱ्या) गुंतवणुकी आक्षेपार्ह आहेतच.

 धैर्यशील आशावाद की हातघाई? 

विकास होणे आणि तो विकास अनेकांपर्यंत पोहोचणे हे एकसमयावच्छेदेकरून तर शक्यच नसते. कोणी लवकर पुढे जाईल, कोणी उशिरा पुढे जाईल. कुंठितता आल्याचे जाणवले तर निराशा येईलही. मात्र प्रत्येकाला काही ना काही स्वरूपात अगोदरपेक्षा सु-अवस्थेत संक्रमण होताना आढळले आणि आढळत राहिले तर प्रेरणाही वाढेल आणि क्षमताही. मानसशास्त्रज्ञांनी हे शोधून काढलेले आहे की जर एखाद्या अनुभवात प्रतिकूलकडून अनुकूल असा बदल होत असेल तर तो आख्खा अनुभवच मनात सकारात्मक नोंदला जातो.

आपण जेव्हा एखाद्या बाबतीत निराशाजनक चित्र रंगवतो तेव्हा आपण हमखास एक गोष्ट विसरतो की, आता मानकेच अधिकाधिक वरची घेत आहोत. म्हणून आत्ताच्या आघाडीच्या मानकानुसार काही कमी पडत असले, तरी त्यावरून काहीच सुधारणा होत नाहीये असा निष्कर्ष काढणे योग्य नसते. तुलना ही इतर कोणाशी स्वत:ची करण्यापेक्षा आपलीच अगोदरपेक्षा आत्ताची करणे श्रेयस्कर असते.

जे आपल्याला जमलेले नाही ते दुसऱ्याकडून शिकावे. (शक्यतो फुकटात कॉपी मारून! वा जमेल तितके मानधन देऊन.) मला का नाही अगोदर जमले? हा जळफळाट बिनकामाचा आहे. या जळफळाटातून ज्यांना अगोदर जमले त्यांचा द्वेष करणे हे आपल्याला मानसिकदृष्टय़ा घातक आहे. त्यांच्याकडून शिकायलाच नकार देणे हे तर अत्यंत कर्मदरिद्रीपणाचे आहे.

युरोपवर निरनिराळे आरोप ‘युरोपित’ करण्यापेक्षा, युरोपच का औद्योगिक क्रांती करू शकला, हे समजावून घेणे अगत्याचे आहे. त्यात भाग्याचा घटकही आहे. बारमाही नद्या आणि प्रचंड गोडय़ा पाण्याचा पुरवठा हा भौगोलिक फायदा होता. थंड प्रदेशात प्रजननदरही कमी असतो. थंडीवर विजय मिळवायला केवळ अग्नी पुरेसा असतो. आव्हानात्मक जीवन असल्याने जिगरबाज वृत्तीही वाढते. सामान्यत: विषुववृत्ताजवळच्या देशात गरिबी आढळते. या देशांना उन्हाळ्यावर विजय मिळवायला लागणारे तंत्र फारच नंतरच्या काळात मिळाले. इथे उन्हाळ्याने शारीरिक क्षमता कमी होते हाही मुद्दा आहे.

औद्योगिक क्रांती होण्यामागे ग्रीकांचे तत्त्वज्ञान हाही महत्त्वाचा घटक आहे. आपल्याकडे द्रव्य महत्त्वाचे आणि आकार गौण मानला गेला. उलट तेथे आकाराला नित्य अस्तित्व आणि तो आकार कोणत्या द्रव्याचा याला नैमित्तिक (कंटिजंट) स्वरूप मानले गेले. भूमिती आणि गणित यांवरील बरेच मोठे चिंतन, त्यांची उपयोजने सापडण्याअगोदरच, करून तयार होते. युरोपात, कारागीर हेच विचारवंतसुद्धा असणे, हा मोठाच फायदा होता. आपल्याकडे वर्णव्यवस्थेमुळे चिंतन आणि उत्पादनक्रिया यांच्यात तुटलेपणा राहिला. त्यांच्याकडे प्रोटेस्टंट पंथामुळे, आपण कृपाप्राप्त आहोत की नाही याच्या खुणा, ऐहिक ऐश्वर्यात शोधल्या गेल्या; तर उलट आपल्याकडे ‘मोक्षमेव लभते’ या घोषणेमुळे इतर पुरुषार्थ गौण मानले गेले.

ते काहीही असो. धाकटे असण्यात बरेच काही आयते मिळते हा फार मोठा फायदा आपल्याला लाभला आणि आपण तो टिच्चून वसूल करतो आहोत. आपण कृतज्ञ राहिले पाहिजे. पण ‘एकूण मानवी समाजाप्रति’ असे गोलमाल श्रेय देता येणार नाही. त्या त्या काळातल्या सर्व देशीच्या प्रतिभावान, साहसी, परिश्रम घेणाऱ्या, विधायक कार्य करणाऱ्या, सुरुवातीच्या काळातील प्रतिकूलता सोसणाऱ्या, (उदा गॅलिलिओ, पाश्चर इत्यादी) व्यक्तींप्रति कृतज्ञ राहिले पाहिजे.

लेखक तत्त्वज्ञान व सामाजिक शास्त्रांचे आंतरविद्याशाखीय अभ्यासक आहेत. ई-मेल :  rajeevsane@gmail.com