23 February 2019

News Flash

श्रमांतील क्लेश व आत्मवियोग  

श्रमाला, श्रमिकाच्या दृष्टीने एक ऋण-उपयोगमूल्य असते, ही सर्वमान्य कल्पना आहे.

सृजनशील-श्रम हे मनुष्यस्वभावाचे सारलक्षण आहे, असे मार्क्‍सने उद्घोषित केले. व्यापक अर्थाने पहाता त्यात तथ्यही आहे. पण याचा अर्थ असा नाही की, माणसाला भांडवलपूर्व युगांत श्रम आवडत असत. पण भांडवलशाही आल्यावर अचानक श्रम नकोसे वाटू लागले!

‘पाथ ऑफ लीस्ट रेझिस्टन्स’ हा चक्क निसर्गनियम आहे, हे आपल्याला सहसा माहीत नसते. काही माणसे एखाद्या ध्यासाने (गिर्यारोहण असेल वा ध्येयनिष्ठा) ‘स्वयं स्वीकृतं कंटकाकीर्ण मरग’ निवडू शकतात; परंतु उदरनिर्वाहासाठी नाइलाजाने करण्याच्या कामात ध्यास ही भावना सामान्यत: नसते. श्रमात आपल्याला शारीरिक व मानसिक ऊर्जा व्यतीत करावी लागते हे उघड आहे. म्हणजे आपण काही तरी गमावत असतो. इतरही बरेच काही गमावत असतो. ते नंतर पाहूच. मोबदला या अर्थाने रेम्युनरेशन हा शब्द वापरला जातो त्याचा अर्थ ‘कॉम्पेन्सेशन’ म्हणजे भरपाई असाच आहे. थोडक्यात- श्रमाला, श्रमिकाच्या दृष्टीने एक ऋण-उपयोगमूल्य असते, ही सर्वमान्य कल्पना आहे.

क्लेश (ड्रजरी), कंटाळवाणेपणा (बोअरडम), कटकटी (बॉदरेशन्स), इतकेच नाही तर काही आरोग्यविघातकता (हजार्डस) सुद्धा श्रमातून अंगावर येत असतात. आळसही साहजिक आणि ‘स्वस्थ बसवत नाही’ हेही साहजिक; पण जेव्हा काम करणे क्रमप्राप्त असते तेव्हा, आपल्यालाच एरवी स्वस्थ बसवत नाही, हे आठवत नाही.

श्रमविभागणी न करता स्वावलंबन पद्धतीने, दीड गुंठय़ात जर अमुक इतके पाणी मिळाले, तर प्राध्यापकाचे जीवनमान मिळू शकेल, असे आदरणीय दिवंगत श्री. अ. दाभोलकर म्हणत असत; पण त्यात इतके प्रचंड श्रम लागतील की, प्राध्यापक तर विसराच, पण रोजगार हमी योजनेत काम करणारा मजूरदेखील त्या श्रमांची कल्पनाही करू शकणार नाही. तेव्हा श्रमविभागणी होत जाणे हेच परवडणारे आहे आणि अटळही आहे.

तपशीलवार श्रमविभागणी होत गेल्याने, छोटीशीच क्षमता हजारो वेळा वापरावी लागतेय असे, श्रमाचे डीग्रेडेशन होत गेले हे खरेच आहे. ‘मॉडर्न टाइम्स’ या सिनेमात चार्ली चॅप्लिनने या समस्येचे सुंदर चित्रण केले आहे. मी कामगार चळवळीत असताना, या डीग्रेडेशनला उलट दिशेने न्यावे म्हणून, जॉब रोटेशन व जॉब-एनरिचमेंटचे अनेक प्रस्ताव मांडले; पण कामगारांकडून म्हणावा असा प्रतिसाद मिळाला नाही. ‘काय आहे साहेब, एकदा तंद्री लागली की काम होऊन जातं. तुमच्या पद्धतीत आम्ही डिस्टर्ब होतो, म्हणून आहे हे राहू द्या’ असे कामगार म्हणत. भराभरा काम ‘मारून’ मोकळे व्हायला मिळणे, हे त्यांना जास्त आवडते. काम ही ‘मारण्या’ची गोष्ट असल्याने, माझ्या मनातली, मार्क्‍स वाचून मानलेली ‘हरपलेली सर्जनशीलता’, हरपल्याचा अनुभव त्यांना येत नव्हता किंवा तितकासा डाचत नव्हता.

बाजूने! कष्टकऱ्यांच्या की कष्टांच्या?

अन्याय आणि शोषणाची चीड येणे योग्यच आहे. आपण कष्टकऱ्यांच्या बाजूने असले पाहिजे, असे मला नेहमीच वाटत आलेले आहे व यापुढेही वाटेल; पण कष्ट या गोष्टीचे उदात्तीकरण करून श्रमातील कष्टदायकता तशीच राहू देणे हे मात्र योग्य नाही. मी नेहमी मालकांशी वाटाघाटी करताना, उत्पादकता वाढू द्या, पण कष्टदायकता कमी करा, अशीच मागणी करत आलेलो आहे; पण कामगारांकडून, कष्टदायकता तशीच राहिली किंवा अंमळ वाढणार असली तरीही, जर मोबदला वाढणार असेल, तर मोबदलाच वाढवा अशीच मागणी राहिलेली आहे. ‘‘आमचा सुख मिळवण्याचा स्लॉट ‘त्या साडेआठ तासांच्या’ बाहेरच असतो म्हणून मोबदल्याचं बघा,’’ असाच कामगारांचा कल असतो. उत्पादकता वाढणार असेल तर मालकही मोबदला वाढवून देण्यास फारशी काचकूच करत नाहीत. कारण उत्पादकतावाढीने त्यांची मोबदला देण्याची क्षमता वाढणार असते. पिळवणूक वाढवण्यालाच ‘मूल्य’ मानणारे काही खत्रूड मालक असतातही; पण किफायतशीरपणा मिळत असल्यास, साधारणत मालकांना ‘पिळवणूक करण्याची हौस’ अशी नसते. यामुळे तांत्रिक सुधारणा करून आपल्या कारखान्यातले काम कमी कष्टदायक करण्यात (वा कष्टदायक कामे ‘आऊटसोर्स’ करण्यात!) आतले कामगार/ मालक यांचे हितक्यच जास्त दिसते. कारण त्यामुळे ‘मोबदला’ वाढत जातो.

पण मोबदला वाढवून घेणे हे कोणत्या श्रमिकांना जास्त सहज जमते आणि कोणत्या श्रमिकांना झकत कमी मोबदलाच पत्करावा लागतो? हे बघत गेले, तर श्रमांच्या स्वरूपातच घर करून बसलेला एक दैवदुर्विलास (आयरनी), ध्यानात आल्यावाचून राहत नाही. काही श्रमप्रकारांत अंगभूत (इंट्रिन्झिक) क्लेश जास्त असतात तर काही श्रमप्रकारांत चक्क अंगभूत पारितोषिक (रिवॉर्ड)सुद्धा, म्हणजेच कंटाळवाणेपणा कमी आणि रसपूर्णता (इंटरेस्टिंग-नेस) जास्त, असू शकते. आता माझ्यासारख्या न्यायप्रेमी माणसाच्या मनात असे स्वाभाविकपणे येते की, ज्यांना अंगभूत सुख आहे त्यांना कमी मोबदला दिला तरी चालेल; पण ज्यांना कष्ट, कंटाळा, कटकटी, शारीरिक विकारप्रवणता जास्त आहे त्यांना जास्त मोबदला दिला पाहिजे!

पण, वस्तुस्थिती अशी आहे की, मोबदला हा योगदानमूल्या(काँट्रिब्युटिव्ह-व्हॅल्यू)वर अवलंबून असतो. म्हणजे, आपण किती श्रम केले याला मूल्य नसून आपण ग्राहकाचे किती श्रम वाचवले, याला मूल्य असते. मार्क्‍सने, आपण किती श्रम घातले याला मूल्य असते असे गृहीत धरून, ‘दास कॅपिटल’ लिहिले आहे. यामुळे पुढे भांडवलशाहीसाठी

‘प्रर्थिलेले’ अनेक स्वप्नाळू अपशकुन खोटे पडले आहेत. मोबदला हा मूलत: ग्राहक देत असतो आणि मालक मध्यस्थ असतो हे कित्येकांच्या लक्षातच येत नाही.

आता आयरनी काय आहे ते पाहू. ती अशी की, ज्या कामांत अंगभूत क्लेश असतात, नेमकी त्याच कामांची उत्पादकता कमी असते आणि ज्या कामांत अंगभूत सुख असते त्यांची उत्पादकतासुद्धा जास्त असते! इतकेच नव्हे तर जास्त उत्पादकता असलेल्या कार्यस्थळी काम करण्याची ज्याला संधी मिळते, त्याचे स्वत:चे योगदान त्या उत्पादकतेत फारसे नसतेच. दुसऱ्याच कोणी तरी योगदान केल्याने त्याची उत्पादकता वाढलेली असते. (डिझायनर हाही कामगारच असतो, पण त्याला सहसा युनियन करू दिली जात नाही. त्याची वैयक्तिक सौदाशक्तीच जास्त असल्याने त्याला सामूहिक सौद्याची तितकीशी गरजही भासत नाही.) याहूनही वाईट गोष्ट म्हणजे ज्याचे उत्पादन साधन जास्त भांडवल-गुंतवणुकीचे त्याला जास्त ‘कुशल’ समजले जाते! ट्रक-ड्रायव्हर आणि पायलट यांच्यात ट्रक-ड्रायव्हरचे काम फारच क्लेशदायक असते, पण पायलटची सौदाशक्ती विमानाच्या किमतीनुसार ठरते. जो मोठे भांडवल हाताळेल त्याची सौदाशक्ती जास्त असते. कारण तो मोठे भांडवल रिकामे पाडून ठेवू शकतो.

आत्मीयता नात्याने ठरते

ज्या कामगारांच्या श्रममापनाबाबत मी मिलिसेकंदात भांडत असतो, तेच जेव्हा युनियनचा तंबू उभारतात किंवा गणपती बसवतात, तेव्हा किती तरी जास्त तीव्रतेने श्रम करतात. त्यात क्लेश असले तरी दु:ख नसते. कारण हे काम स्वत:साठी केलेले असते आणि हौसेने केलेले असते. ‘आपलेच श्रम हे जेव्हा आपल्यासमोर दुसऱ्याची क्रयवस्तू म्हणून उभे ठाकतात तेव्हा आत्मवियोग (एलीयनेशन) होतो’ हे मार्क्‍सचे म्हणणे जरी चुकीचे नसले तरी बाजारव्यवस्थापूर्व मध्ययुगीन काळात जेव्हा शस्त्रबल आणि धर्मबल यांच्यापुढे हतबल होऊन राबावे लागे; तेव्हाचा आत्मवियोग जास्तच तीव्र स्वरूपाचा नव्हता काय? किंवा कम्युनिस्ट अंमलदाराच्या हुकमानुसार काम करायचे आणि तो देईल ते रेशन मुकाटय़ाने घ्यायचे, यात आत्मवियोग नव्हता काय? म्हणजेच आत्मवियोग हे फक्त भांडवलशाहीचेच वैशिष्टय़ नव्हे.

‘कामगारांचा व्यवस्थापनात सहभाग’ या नावाखाली अनेक प्रयोग केले गेले. कामगार नेत्याला ‘सीईओ’ बनवणे (कमानी टय़ूब्ज) हा प्रयोग फसला. ट्रस्टीशिप फौंडेशनचे दयानंद खिरासारखे प्रयोग फसले. याउलट पॉलिहायड्रॉन म्हणून एक कारखाना आहे. तिथे कामगारांना वेतन न देता नफ्यात वाटा देतात. दरमहा अ‍ॅडव्हान्स मिळतो. हिशेब झाल्यावर उरलेली रक्कम मिळते. तिथे सुपरवायझर, मॅनेजर कोणी नाही. प्रत्येक कामगार त्याच्या वर्क-स्टेशनचे आणि इतरांचे कामही करू शकतो. क्वालिटी स्वत:च बघतो. मेंटेनन्स स्वत:च करतो. सप्लायरकडे काही प्रॉब्लेम झाला तर तिथे जाऊन तो सोडवतो. कस्टमरकडेही तसेच. मालक नफ्यात व्यवस्थित वाटा घेतो. इतर कारणांनी नफा घटला तरी तो का घटला हे कामगारांना पटवून देतो. चक्कभारतात भांडवलशाहीत, बडय़ा कंपन्यांच्या विळख्यात ही फॅक्टरी टिकून आहे.

हे तर काहीच नाही. एक कामगार, एक शेअर, एक मत या तत्त्वावर ७०,००० कामगारांची कंपनी स्कँडेनेवियन देशात अंबानीएवढा टर्नओव्हर करते. जगभर बरेच कामगार हे स्वयं-उद्योजक बनत चाललेत. जेव्हा तोटय़ातही वाटा उचलायला लागतो तेव्हाच आत्मीयता येते! म्हणजेच आत्मवियोग दूर करण्यासाठी सर्वोद्योजक-समाज हा आदर्श आहे, समाजसत्तावाद नव्हे.

लेखक तत्त्वज्ञान व सामाजिक शास्त्रांचे स्वातंत्र्यसमृद्धीसवरेदयवादीआंतरविद्याशाखीय अभ्यासक आहेत. ई-मेल   rajeevsane@gmail.com

First Published on February 28, 2018 2:15 am

Web Title: rajiv sane article on capitalism