|| राजीव साने

पुरुषार्थामध्ये परस्परपूरकता असते. त्यातील एकेकाच्या साधनेत आपण कमी पडतो किंवा त्यांच्यात समतोल राखत नाही, हे दुरिताचे मूळ असते..

गेल्या वेळी मूळ पुरुषार्थ-कल्पनांचे नवे अर्थाकन करून व पृथक्करण करून आपण स्वास्थ्य, रस, विद्या, उद्योग, स्वातंत्र्य, न्याय, कल्याण, सहभाव हे नवे पुरुषार्थ स्थापित केले. आज प्रत्येकातील खास उपमुद्दे, सर्व पुरुषार्थामधील परस्परपूरकता आणि दुरिते का निर्माण होतात? याचे पुरुषार्थ-साधनेच्या अंगाने केलेले निदान, या गोष्टी पाहणार आहोत.

सहभाव निर्माण होण्यासाठी संवाद साधला पाहिजे. पण हा संवाद नुसतेच ‘तिळगूळ घ्या गोड बोला’ असे म्हणून होणार नाही. आस्था जाणवली पाहिजे आणि त्यासाठी प्रत्यक्ष मदत केली गेली पाहिजे. म्हणजेच कल्याण हे सहभावासाठी आवश्यक आहे. कल्याण करायला जाताना जर अन्याय केला गेला किंवा स्वातंत्र्याची गळचेपी केली तर उद्योग पुरुषार्थ इतका मार खातो की कल्याणाला अवकाश(स्कोप)च उरत नाही. ही समतावाद्यांची प्रसिद्ध गोची आहे. न्यायी हुकूमशाही ही कल्पनाच विसंगत आहे. न्याय लादणारे हे न्याय लादला गेलेल्यांवर अन्याय करतातच. स्वातंत्र्याच्या वातावरणातच उद्योग पुरुषार्थ पुढे नेता येतो व त्यातून आलेल्या समृद्धीमुळे स्वातंत्र्य व न्याय हे परवडू शकतात. व्यवसायशिक्षण हे उद्योग-लक्ष्यी असू शकते. पण जीवनशिक्षणात रसच निर्माण व्हावा लागतो. रस-पुरुषार्थामुळे रस घेणारे विद्यार्थी निर्माण होतात. रस-पुरुषार्थामुळे एका बाजूने जीवनाची गुणवत्ता वाढत असली तरी त्यामुळे अस्वास्थ्य, कल्लोळ व कर्षही वाढू शकतो. म्हणून स्वास्थ्य-पुरुषार्थाची जोड असल्याशिवाय रस घातक ठरू शकतो. स्वतशी दुरावा कमी करण्याच्या प्रक्रियेत इतरांशी दुरावा कमी होणे हेही आवश्यक ठरते. म्हणजेच स्वास्थ्यासाठी सहभाव आवश्यक ठरतो. असे हे चक्र आहे. फक्त चक्रक्रमानेच नव्हे तर कोणताही पुरुषार्थ इतर कोणत्याही पुरुषार्थाशी (कधी दूरान्वयाने) पूरकच असतो.

एकेका नव्या पुरुषार्थाचे सारांश 

(१) स्वास्थ्य: कर्ष-लोप कसा करायचा याची कला, स्वीकार(पलायन नसलेला) केल्याने पुनपुन्हा परत मिळवलेली प्रसन्नता, अनासक्ती व तिच्यासाठीचा संयम(सुखविरोध नव्हे), निवाडा देण्याचा पवित्रा सोडता येणे, जे जाणवते आहे ते न ‘पटवता’ जाणवू देता येणे, सोसलेला त्रास वसूल व्हावा म्हणून सोसणे चालू न ठेवणे, उपाय असेल तर यत्न अन्यथा निर्यत्न असे राहता येणे, स्वामित्वहक्क सोडता येणे, प्रतिष्ठा-अहंकार सोडणे आणि कार्यात्मक अहंकार राखणे, आत्मघातकी दुर्गुणांना थारा न देणे.

(२) रस: अर्थपूर्ण क्रीडा ही नियमांच्या बंधनातच कशी शक्य असते हे उमगणे, आश्चर्याचा आनंद घेता येणे, भावनांचे उत्तेजन-विरेचन, अपरिहार्य दुविधांमधील नाट्य़ात्मकता, दाद (मूल्यनअभिप्राय, अ‍ॅप्रीसिएशन) देता येणे, भाषेची बंधने लक्षणाशक्तीने (आलंकारिक प्रयोग) व काव्यात्मकरीत्या ओलांडता येणे. कथनाच्या क्रियेतच अनुभव मूळ राहात नाही हे उमगणे, तरीही प्रामाणिक अभिव्यक्तीचे महत्त्व. काळाला रचना मिळवून देणे, रुचिवैचिर्त्ये आणि सार्वकि सौंदर्य यातील भेद समजणे, कोंडलेल्या भावनाचे विरेचन. मानसिक ऊर्जा पुनरुज्जीवित करता येणे. नतिकता आणि कलात्मकता यांतील भेद, निर्मिती प्रकियेचे आकलन, ही रस-पुरुषार्थाची खास लक्षणे होत.

(३) विद्या: आत्मोद्धारक सद्गुण आत्मसात करणे, अभिरुची, वृती आणि क्षमता जोपासल्या जाणे. उपयुक्त कृती आणि स्वतोमूल्य कृती शिकणे, गुरू-शिष्य संबंध, देता येण्याच्या आणि घेताही येण्याच्या क्षमता, प्रबुद्ध स्वार्थ व स्व-नियंत्रणाचे शिक्षण, क्षेत्रलवचीकता, आंतरशाखीय आकलन, अंतर्दृष्टी (इनसाइट्स) प्राप्त होणे, स्वत: ज्ञानरचना करता येणे व ग्रथित ज्ञानाचे ग्रहण करता येणे, शुद्ध जिज्ञासा आणि अवस्थेला आवश्यक तेवढीच श्रद्धा जोपासली जाणे, प्रमाणन-शक्ती (रीझन) आणि प्रमाणन-आस्था (रॅशनॅलिटी) चिकित्सक क्षमता आणि सृजनशीलता विकसित होणे.

(४) उद्योग: उपयोगमूल्य – विनिमयमूल्य, श्रम-भांडवल, मागणी-पुरवठा, निवेश (इनपुट)-निष्पत्ती (आउटपुट ), स्रोत (सोर्स)- शोष (सिंक), आय- व्यय, सेवन- बचत, गुंतवणूक- परतावा, लाभ- हानी, स्पर्धा-सहकार्य, ग्राहक-पुरवठादार, हस्तक्षेप – पर्यावरण, संधी- संकटे, नियोजन- कार्यवाही, पूरकता- मारकता, तंत्रे- कार्यसंघटन, व्यवहाराचे अंतर्गत परिणाम-बाह्य परिणाम, मानवी निसर्ग- मानवेतर निसर्ग, अशा सर्व चलांमधून इष्टतम स्थिती कशी आणता येईल याचा विचार उद्योग-पुरुषार्थात करावा लागतो.

(५) स्वातंत्र्य: व्यक्तीचे झुंडीपासून संरक्षण, क्षमतेमुळे विकल्प विस्तारणे, सामाजिक- मुभा आणि व्यक्तीवर अनाक्रमण, आक्रमणांचा प्रतिकार व प्रतिबंध पण प्रतिशोध नव्हे, क्षमा इतरांना व स्वतलाही (अपराधगंड व ग्रस्ततागंड यात रममाण न होणे),  जास्तीतजास्त स्वयंशिस्त व त्यामुळे सक्तीची गरज कमीतकमी करणे, वैरवाद व द्वेष यांचा त्याग, भिन्नमत-  सहिष्णुता, हिंसा- प्रेरक नसणारी अभिव्यक्ती, राज्यसंस्थेला अमर्याद सत्ता न देणे, तिच्या हस्तक्षेपावर मर्यादा घालणे, हितविरोध राहतील, पण संघर्षांचे रूपांतर ‘वैर आणि द्वेष’ यांत न होऊ देणे हे स्वातंत्र्य शक्य करण्यासाठी आवश्यक आहे.

(६) न्याय: आयसोनॉमी म्हणजे सर्वासाठी समान कायदा. फ्रेंच क्रांतीत समता हा शब्द याच अर्थाने आला. नंतर त्याचा अर्थ सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा यांचे समान वाटप असा घेतला जाऊ लागला (जे अशक्य आहे). निवाडय़ांतील निष्पक्षपात, योगदानानुसार अर्हता, अर्हतेनुसार फल, उत्तरदायित्वानुसार अधिकार, प्रतिबंधक दंड व संरक्षण, अनसूया हे व्रत, तसेच न्यायप्रक्रियेची स्वाभाविक तत्त्वे, भरपाई व पुनर्वसन, सूडावर बंदी, क्षमाशीलता हा सद्गुण, स्पध्रेची प्रक्रिया न्याय्य (फेअरप्ले)  राखणे, हे मुद्दे न्यायात मोडतात.

(७) कल्याण: भाग्यभिन्नतेचा निरामय स्वीकार करून, करुणा; म्हणजे दुखाचा संसर्ग नव्हे तर दुखनिवारणाची तळमळ, मुदिता; म्हणजे आनंदाचा संसर्गच! औदार्य म्हणजे कर्तव्यापलीकडे जाऊन, स्वतला समाधान मिळते म्हणून, जास्त काही करणे/ देणे. यात कल्याणकर्त्यांला अहंकार आणि मुख्य म्हणजे कल्याण होणाऱ्याला कमीपणाही येणार नाही, पण हक्काची भावना व कृतघ्नपणाही येणार नाही, असे पाहिले गेले पाहिजे. न्याय अर्हतेनुसार; पण कल्याण अर्हतानिरपेक्ष असते.

(८) सहभाव : सद्भावना पोहोचण्यासाठी  तसा संदेशही पोहोचला पाहिजे. ‘टु लव्ह इज टु बी हॅपी विथ’ या पुस्तक- शीर्षकावरून सहभाव हा शब्द सुचला आहे. मनापासून ऐकून घेणे, संवाद साधताना प्रत्येक संवादकाने तो जे बोलतो आहे, ते मनापासून असेल, त्यातील तथ्य दावे पडताळता येतील, त्यातील मूल्य दावे सार्वकि असतील, युक्तिवाद वैध असतील या जबाबदाऱ्या पाळल्या पाहिजेत. यातून व्यक्तींचे वेगळेपण राखून एकमेकींशी जोडलेपण व मत्र निर्माण झाले पाहिजे. व्यवस्था जास्तीतजास्त सहभागाधिष्ठित करणे, केंद्रीकृत संज्ञापनाकडून पारस्परिक संज्ञापनाकडे जाणे, यातून सहभाव वाढत जाईल. परिणामी पुन्हा स्वास्थ्यसाधना सोपी होईल. अशा तऱ्हेने चक्र पूर्ण होते.

न जमणे, हुकणे, कमी पडणे हे दुरित सर्वच पुरुषार्थाचा पाठपुरावा पुरेसा होतो आहे असे मला अजिबात म्हणायचे नाही. तो सहजगत्याच होईल असेही म्हणायचे नाही. माणूस सर्वच पुरुषार्थात कमी पडतो आहे, हे खरेच आहे.

जगात हिंसाचार, वैर – द्वेष, हुकूमशाह्य़ा, अराजके आहेत. पण हीच गोष्ट स्वातंत्र्य पुरुषार्थात आपण कमी पडतो आहोत, अशीही बघता येईल. दारिद्रय़ आहे याचा अर्थ आपण उद्योग-पुरुषार्थात कमी पडतो असाही लावता येतो. जनमानस चाळवणे, प्रचारकीपणा व जाहिरातबाजी या गोष्टी जोरात असतात, म्हणजेच आपण ‘सहभावा’त कमी पडत असतो. विषमता वाढते म्हणजेच कल्याण पुरुषार्थ कमी पडतो. शोषण होते म्हणजेच न्याय पुरुषार्थ कमी पडतो, मानसिक आरोग्य बिघडणे यात स्वास्थ्य पुरुषार्थात आणि वैद्यक या उद्योगात कमी पडणे असते. आपण कंटाळलेलो आहोत आणि काहीतरी चाळे करून काळ काढतो म्हणजेच रस-पुरुषार्थात कमी पडतो.

आपण जगाचे वर्णन करताना हमखास दुरित-वाचक संज्ञा वापरत असतो. त्यामुळे जग वाईट आहे ही भावना पसरते. मात्र उपाय नेमका कोठे करायचा याचा काहीच संकेत मिळत नाही. या उलट पुरुषार्थसाधनेत कमी पडणे किंवा समतोल न राखता येणे हे निदान केल्यामुळे आपला कार्यक्रम मूलत विधायक बनतो.

rajeevsane@gmail.com