News Flash

द्विशताब्दीचा ज्ञानप्रवाह..

डॉ. प्रज्ञा कुलकर्णी ‘हिंदू कॉलेज’पासून सुरू झालेली एक ज्ञानपरंपरा येत्या मंगळवारी २०० व्या वर्षांत प्रवेश करीत आहे.. हीच आज ‘डेक्कन कॉलेज’ म्हणून ओळखली जाणारी; पुरातत्त्व,

डेक्कन कॉलेज’ची १८६८ पासूनची मूळ वास्तू

डॉ. प्रज्ञा कुलकर्णी

‘हिंदू कॉलेज’पासून सुरू झालेली एक ज्ञानपरंपरा येत्या मंगळवारी २०० व्या वर्षांत प्रवेश करीत आहे.. हीच आज ‘डेक्कन कॉलेज’ म्हणून ओळखली जाणारी; पुरातत्त्व, संस्कृत आणि भाषाशास्त्र यांसाठीची अव्वल संशोधन संस्था..

विद्येचे माहेरघर  म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यातच नव्हे तर भारताच्या पश्चिम भागातली सर्वात जुनी शिक्षण संस्था.. पुरातत्त्व, भाषाशास्त्र, संस्कृत कोशनिर्माण यांसारख्या दुर्मीळ विषयांवर संशोधन जिथे होते अशी ख्यातनाम संशोधन संस्था.. भारतातील अनेक ठिकाणचे तसेच देशोदेशीचे संशोधक सातत्याने जिथे अभ्यास करत आहेत अशी संशोधन संस्था.. प्रसिद्ध इंग्रजी कवी विल्यम वर्डस्वर्थ यांचा नातू ज्या संस्थेचा एके काळी प्राचार्य होता अशी संस्था.. अर्थातच पुण्यातलं डेक्कन कॉलेज! ६ ऑक्टोबर १८२१ ला स्थापन झालेली ही संस्था  दोनशेव्या वर्षांत प्रवेश करत आहे.

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, सुधारकाग्रणी गोपाळराव आगरकर, ग. वि. केतकर, गुरुदेव रानडे, केरूनाना छत्रे, विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्यापासून डॉ. रा. गो. भांडारकर, डॉ. रा. ना. दांडेकर, डॉ. एच. डी. सांकलिया, डॉ. द्वारकानाथ कोटणीस, वि. का. राजवाडे, डॉ. इरावती कर्वे.. पुढेही डॉ. अशोक केळकर, डॉ. शां. बा. देव, डॉ. मधुकर ढवळीकर, डॉ. म. अ. मेहेंदळे, यांच्यासारख्या असंख्य विद्वानांनी अध्ययन अध्यापन, संशोधन जिथे केले अशा या संस्थेत आजही अव्याहतपणे हे काम चालू आहे.

आजमितीस अभिमत विद्यापीठाचा दर्जा असणारी ही संस्था स्थापनेपासून आजच्या रूपापर्यंत पाच स्थित्यंतरांमधून गेली. पेशवाईच्या काळात विद्वान आणि गुणिजनांचा सन्मान प्रतिवर्षी लक्षावधी रुपये दक्षिणा देऊन केला जात असे. पेशवाईच्या अस्तानंतर इंग्रजांना त्यांचे बस्तान इथे बसवयाचे होते. त्यासाठी सरदार दाभाडेंनी सुरू केलेली पेशवाईत रुजलेली विद्वत्गौरवाची परंपरा चालू ठेवण्याचे मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर एल्फिन्स्टन यांनी ठरवले आणि ६ ऑक्टोबर १८२१ रोजी ‘हिंदू कॉलेज’ची स्थापना विश्रामबाग वाडा येथे झाली. १८५१ साली हिंदू कॉलेज आणि इंग्रजी कॉलेज एकत्र करून ‘पूना कॉलेज’ नावाने मुंबई विद्यापीठाच्या आधिपत्याखाली संस्थेचे कामकाज सुरू झाले. त्यानंतर १८६८ मध्ये गॉथिक शैलीचे बांधकाम असणाऱ्या स्थापत्यकलेचा अनोखा नमुना असणाऱ्या सध्याच्या मुख्य इमारतीत संस्थेचे स्थलांतर झाले. जमशेटजी जिजीभॉय यांनी दिलेल्या एक लाख पंचवीस हजार रुपयांच्या देणगीतून त्यांच्याच १५० एकर जागेवर १८६४ ते १८६८ या काळात ही इमारत साकारली. आज मूळ वास्तूच्या आसपास नव्याने बांधल्या गेलेल्या इतरही काही इमारती आहेत. इमारत बांधली त्या वेळच्या संशोधक, अध्यापक आणि विद्यार्थ्यांनी लावलेली वडाची झाडे संस्थेच्या आवारात आजही मूळ धरून आहेत. मुख्य शहरापासून हे ठिकाण दूर असल्याने संशोधनाला पोषक शांतता, निवांतपणा डेक्कन कॉलेजमध्ये आजही अनुभवता येतो. १९३४ ते १९३९ या काळात काही तांत्रिक कारणाने संस्थेचे कामकाज थांबले होते. १७ ऑगस्ट १९३९ ला ते पुन्हा नव्याने पदव्युत्तर अध्यापन आणि संशोधन संस्था या रूपाने चालू झाले. १९९५ मध्ये संस्थेला अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळाला.

सध्या संस्थेत पुरातत्त्व विभाग, भाषाशास्त्र विभाग, संस्कृत कोश विभाग असे तीन प्रमुख विभाग असून संस्थेचे वैशिष्टय़पूर्ण अवाढव्य ग्रंथालय हा एक स्वतंत्र विभागच आहे. संस्थेच्या आवारात दोन संग्रहालये आहेत.

पुरातत्त्वविभाग

भारतात पुरातत्त्वविशयक संशोधन संस्थामध्ये तसेच  विदेशातही आपल्या वैशिष्टय़पूर्ण संशोधनकार्यामुळे प्रसिद्ध असणारा हा विभाग! येथे पदव्युत्तर शिक्षणाच्या अभ्यासक्रमांबरोबरच संशोधनात्मक पदव्युत्तर शिक्षणाचीही (पीएच.डी.) सोय आहे. देशोदेशीच्या विद्यापीठांसह संयुक्त विद्यमाने इथे अनेक प्रकल्प चालू असतात. पुरावनस्पतीशास्त्र, पुरारसायनशास्त्र, याबरोबरच पुराजीवशास्त्राची प्रयोगशाळा भारतात या ठिकाणाशिवाय क्वचितच कुठे असेल. या प्रयोगशाळांमध्ये एक्स-रे-रिफ्रॅक्शन मशीनसारखी अद्ययावत यंत्रसामग्री उपलब्ध आहे. या यंत्राच्या साहाय्याने उत्खननादम्यान सापडणाऱ्या वस्तूंच्या मातीचे पृथ:करण आणि विघटन करून त्यावरून त्या मातीचे उगमस्थान निश्चित करता येते.

रूपकुंड येथे बर्फात गाडल्या गेलेल्या माणसांच्या डी.एन.ए.च्या अभ्यासाचा प्रकल्प यशस्वी करण्यात डेक्कन कॉलेजमधील तज्ज्ञांचा महत्त्वाचा वाटा होता. राजस्थानातील गिलुंड, महाराष्ट्रातील जुन्नर, भोज, लातूर, कोकणातील चौल, केळशी, कर्नाटकातील इमपूर यांसारखे काही महत्त्वपूर्ण प्रकल्प भारताच्या इतिहासाच्या अभ्यासाच्या साधनांमधे मोलाची भर घालतात. सध्या विभागातर्फे अनेक उत्खननांचे प्रकल्प चालू आहेत. विभागाने गेल्या काही वर्षांपूर्वी तीन नवे प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केले; त्यांत विविध ज्ञानशाखांचं शिक्षण झालेले अभ्यासक प्रवेश घेऊ शकतात.

भाषाशास्त्रविभाग

भारतातील भाषाशास्त्राच्या अभ्यासाला एक वेगळे वळण देणारा हा भाषाशास्त्र विभाग १९३९ साली डॉ. सु. मं. कत्रे यांच्या प्रतिनिधित्वाखाली सुरू झाला. भाषाशास्त्र संशोधकांच्या पहिल्या भारतीय फळीतील बहुतेक सर्व विद्वानांनी याच विभागात प्रशिक्षण घेतले आहे. १९५० च्या दशकात इथे घेतली जाणारी समर स्कूल्स आणि विंटर स्कूल्स अनेक भाषाविद्वानांना घडवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरली. अ‍ॅस्ट्रोएशियाटिक परिवाराच्या मुंडा भाषा, तिबेटोबर्मन परिवाराच्या आदिवासी भाषा, चिंताजनक परिस्थितीत असणाऱ्या निहाली कोलमीसारख्या भाषांमधील नोंदी करणे, स्थलांतरितांची भाषा या विषयांवरच्या संशोधनाबरोबरच सध्या मराठी भाषेच्या विविध बोलींची तपशिलांसह नोंदणी करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प इथे सुरू आहे. संपूर्णतया कार्यरत असणारी ध्वनिप्रयोगशाळा हे या विभागाचे वैशिष्टय़ आहे.

संस्कृतकोशविभाग

जागतिक स्तरावर असणारा हा विभाग संस्थेला ललामभूत आहे. १९४८ साली डॉ. सु.मं. कत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘संस्कृत-इंग्रजी महाशब्दकोशा’ची निर्मिती सुरू झाली. या प्रकल्पाचा भाग म्हणून, वेदांपासून सुरुवात ते १९व्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंतच्या,  ६२ विद्याशाखांमधून निवडलेल्या १५०० ग्रंथांमधून ९० लाखांहून अधिक उद्धरणे अकारादिक्रमाने नोंदवून एक अवाढव्य असे स्क्रिप्टोरियम तयार केले आहे. हे स्क्रिप्टोरियम म्हणजे ४००० वर्षांच्या इतिहासातील वीस लाखांहून अधिक संस्कृत शब्दांचा इतिहास रेखाटणारा अमूल्य ठेवाच!  त्याचा वापर अनेक देशी-विदेशी अभ्यासकांनी संशोधनकार्यासाठी केला आहे. १९७६ साली डॉ. अ. मा घाटगे यांच्या प्रधान संपादकत्वाखाली कोशाचा पहिला भाग (१.१) प्रकाशित झाला. आजमितीस पस्तीसाव्या भागाचे काम अंतिम टप्प्यात आहे. २०१० सालापासून या विभागात नवीन कोशकर्ते निर्माण करण्यासाठी संस्कृत आणि कोशशास्त्र या विषयावरच्या पदव्युत्तर शिक्षणाची तसेच या विषयातील पीएच.डी. संशोधन करण्याचीही व्यवस्था झाली आहे. संस्कृत भाषेची ओळख करून देणारे छोटेखानी अभ्यासक्रम हा विभाग चालवत असतो.

संग्रहालये

संस्थेच्या आवारात  दोन अनोखी संग्रहालये आहेत. १९३९ साली साताऱ्याहून पुण्याला आणलेले ‘मराठा इतिहास संग्रहालय’ आणि पुरातत्त्व विभागाचे भूषण असणारे डॉ. सांकलिया यांच्या कल्पनेतून साकारलेले ‘पुरातत्त्व संग्रहालय’.

मराठा इतिहास संग्रहालयात ४० हजार मोडी-मराठी कागदपत्रे, काही राजघराण्यांची कागदपत्रे यांसह ४००० हून अधिक पुरातन, मध्ययुगीन व आधुनिक भारतीय नाणी आहेत. विविध धातूंच्या वस्तू, शस्त्रास्त्रे, शोभेच्या वस्तू, चित्रे यांचेही जतन या संग्रहालयात केले आहे. येथे विजयनगरच्या नाण्यांवर व मराठेकालीन चलनव्यवस्थेवर संशोधनात्मक काम झाले आहे.

पुरातत्त्वसंग्रहालय

डेक्कन कॉलेजने ठिकठिकाणी केलेल्या उत्खननांत सापडलेल्या वस्तूंचा हा अद्भुत संग्रह मानववंशाच्या प्रगतीचा आलेख मांडत असल्यामुळे महत्त्वाचा ठरतो. चार लाख वर्षांच्या सांस्कृतिक प्रगतीची नोंद ठेवणारा इथला ‘नेवासा विभाग’ आवर्जून पाहावा असा आहे. संग्रहालयाचे शैक्षणिक व संशोधकीय मूल्य दिवसेंदिवस वाढत आहे. शालेय शिक्षकांसाठी दरवर्षी एक कार्यशाळा आयोजित केली जाते. संस्थेची फिरती प्रदर्शने खेडय़ापाडय़ांतही या विषयाची जाणीव निर्माण करतात. संग्रहालयातर्फे जुन्या दुर्लक्षित मंदिरासाठी ‘टेम्पल सव्‍‌र्हे वर्क’ हा उपक्रमही राबवला जातो.

ग्रंथालय

डेक्कन अवाढव्य ग्रंथालय म्हणजे जणू एक जादूची नगरीच. १,६२,००० पुस्तकांसह इथे ३१ हजारांहून अधिक हस्तलिखितांचा संग्रहही जतन करून ठेवला आहे. याशिवाय डेक्कन कॉलेजने प्रकाशित केलेली विविध पुस्तके, जुने नकाशे, गॅझेटर्स, जनगणनेचे अहवाल, उत्खननांचे अहवाल, स्मरणिका, भाषाशास्त्रीय सर्वेक्षणांचे अहवाल यांसारखे संदर्भही इथे उपलब्ध आहेत.

ग्रंथालयातील सर्वात जुने पुस्तक १५८८ साली प्रकाशित झालेले आहे. इथली सर्व दुर्मीळ पुस्तके जिज्ञासूंना पाहता यावीत म्हणून ऑगस्ट महिन्यात दरवर्षी एक प्रदर्शन इथे  भरवले जाते.

प्रवाह वाहाता ठेवण्यासाठी ..

प्रत्येक विभागात दर महिन्याला संशोधन विषयांवर खुली चर्चा होते आणि त्यात विद्यार्थी, शिक्षक आणि संशोधक आवर्जून भाग घेतात. इथे घडणाऱ्या द्विशताब्दी वर्षांत अनेक उपक्रम आणखी जोमाने होणार आहेत. ‘सं श्रुतेनं गमेमहि’ या ध्येयवाक्याशी बांधले जाऊन, ज्ञानाशी जोडले जाऊन अनेकांना एकत्र आणण्याची इच्छा असलेल्या संस्थेतील संशोधक आणि काही अनुभवी निवृत्त संशोधकांनी विविध विषयांवरच्या संशोधनपर पुस्तकांच्या लेखनाचा उपक्रम हाती घेतला आहे. याशिवाय संपूर्ण वर्षभर अनेक व्याख्याने आयोजित केली जाणार आहेत. अनेक लघु-अभ्यासक्रमांतून, ‘व्ययतो वृद्धिमायति’ (खर्च केला असता सतत वाढणारा) असा हा ज्ञानाचा साठा जिज्ञासूंना उपलब्ध  होणार आहे!

लेखिका ‘डेक्कन कॉलेज’मध्ये अध्यापन- संशोधन करतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 4, 2020 2:48 am

Web Title: 200 year of historic deccan college zws 70
Next Stories
1 चाँदनी चौकातून : पुनरागमन..
2 सर्वकार्येषु सर्वदा : समर्पणाला दाद
3 सर्वकार्येषु सर्वदा : सेवाव्रतींच्या उमेदीला बळ
Just Now!
X