19 October 2019

News Flash

विम्बल्डनचे बदलते रंग

पारंपरिकतेला अंतर देण्याची ब्रिटिशांना सवय नाही.

|| सिद्धार्थ खांडेकर

‘ब्रेग्झिट’मुळे इंग्लंडमध्ये राजकीय आघाडीवर गोंधळ असताना, विम्बल्डनमध्ये अनेक दशकांची परंपरा मोडीत काढून काही बदल करण्यात येत आहेत. हे करत असताना ऑल इंग्लंड क्लबच्या नेतृत्वामध्ये ‘ब्रेग्झिटवाद्यां’सारखा कोणताही संदेह, गोंधळ, भीती वा खेद नाही हे महत्त्वाचे.

पारंपरिकतेला अंतर देण्याची ब्रिटिशांना सवय नाही. विम्बल्डनच्या बाबतीत तर हे अलिखित तत्त्व फारच काटेकोरपणे पाळले जाते. हिरवळीचे टेनिस कोर्ट, पांढरे पोशाख, राजघराण्याची उपस्थिती, तालशिस्तीत टाळ्या वाजवून दिली जाणारी दाद आणि अर्थातच स्ट्रॉबेरी-क्रीम ही पंचसूत्री तर आजही कायम आहे आणि येणारी कित्येक वर्षे ती तशीच राहील. इंग्लंडमध्ये एरवी फुटबॉलच्या मैदानांवर आणि अलीकडे क्रिकेटच्या मैदानांवरही बेभान होणारे प्रेक्षक विम्बल्डला येताना मात्र इतके परीटघडीचे कसे काय बनतात हे एक कोडेच. कदाचित फुटबॉलचा खेळ खेळाडू आणि प्रेक्षकांमधील धसमुसळेपणाला साद घालत असावा. क्रिकेटला ‘जंटलमेन्स गेम’ म्हटले जाते, पण क्रिकेटपटूंनी सभ्यपणा कधीच मागे सोडला आहे. टेनिसमध्ये – मुळात तो एकेरी आणि दुहेरीतच खेळला जातो म्हणून – धसमुसळेपणासारख्या सांघिक अभिव्यक्तीला फारसे स्थानच नाही. तिथे एकाग्रता आणि शिस्तीची मातबरी अधिक. शिवाय भावनोद्रेकाला स्थान नाही कारण नियम कडक. परंपरा पाळणे आणि जोपासणे या खेळातच अधिक शक्य आहे. यंदाची विम्बल्डन स्पर्धा १ ते १४ जुलै या काळात खेळवली जाईल. इंग्लंडमधील वातावरण सध्या भयग्रस्त, चिंताग्रस्त, गोंधळलेले आणि अनिश्चित आहे. कारण ‘ब्रेग्झिट’चे नेमके स्वरूप तिथल्या जनतेला आणि राज्यकर्त्यांना अद्याप नेमके कळलेले नाही. युरोपशी काडीमोड घेण्याचा निर्णय बेभान राष्ट्रवादी आवेगात इंग्लिश जनता आणि राज्यकर्त्यांनी अल्प बहुमताने घेतला खरा, पण तो कसा असेल याविषयीची कोणतीही निश्चित वैचारिक, राजकीय, आर्थिक बैठक त्या देशातील राज्यकर्त्यांना, विचारवंतांना आणि जनतेला ठरवता आलेली नाही. पंतप्रधान थेरेसा मे यांचे ब्रेग्झिटविषयक किमान तीन प्रस्ताव तेथील ‘हाऊस ऑफ कॉमन्स’नेच फेटाळून लावले. त्यामुळे आता कोणतीही रूपरेषा न ठरवता युरोपीय समुदायातून बाहेर पडण्याची (नो डील ब्रेग्झिट) नामुष्की ओढवण्याची दाट शक्यता आहे. इंग्लंडमधील सत्तारूढ हुजूर पक्षानेच गळ्यात मारून घेतलेल्या आणि इंग्लंडमधील अध्र्याअधिक जनतेने काहीही अभ्यास न करता कौल दिलेल्या ‘ब्रेग्झिट’मुळे होत असलेली फजिती स्वीकारण्याची (थोडक्यात हा मूर्खपणा आमचा आम्हीच ओढवून घेतला असे म्हणण्याची) हिंमत त्यांच्यात नाही. राजकीय आघाडीवर असा गोंधळ असताना, विम्बल्डनमध्ये अनेक दशकांची परंपरा मोडीत काढून काही बदल करण्यात येत आहेत. त्यांची दखल घ्यावी लागेल, कारण विम्बल्डन आणि बदल हे सरसकट दिसणारे समीकरण नाही. हे करत असताना ऑल इंग्लंड क्लबच्या नेतृत्वामध्ये ‘ब्रेग्झिटवाद्यां’सारखा कोणताही संदेह, गोंधळ, भीती वा खेद नाही हे महत्त्वाचे.

विम्बल्डनच्या एकूण पारितोषिक निधीत ११.८ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. यात सर्वाधिक प्रतिष्ठेच्या असणाऱ्या पुरुष व महिला एकेरीतील विजेत्यांच्या पारितोषिक रकमेत ४.४ टक्क्यांचीच वाढ झाली आहे. याउलट व्हीलचेअरवरील टेनिसपटूंसाठी आणि पहिल्या फेरीतच गारद होणाऱ्या टेनिसपटूंसाठी अधिक घशघशीत वाढ जाहीर झाली. पहिल्या फेरीतच बाद होणाऱ्यांसाठीची ही वाढ वादग्रस्त ठरते. कारण असे अनेकदा आढळून आले आहे, की पात्रता फेरीतून विम्बल्डनच्या मुख्य स्पर्धेत आलेले टेनिसपटू दुखापतीचे कारण दाखवून पहिल्या फेरीतच निवृत्त होतात आणि तरीही बक्षिसाची रक्कम घेऊन जातात! या वेळी तसे होणार नाही याची खबरदारी ऑल इंग्लंड क्लबतर्फे घेतली जाणार आहे. त्यानुसार, कोणताही टेनिसपटू दुखापती लपवून पहिल्या फेरीत दाखल झाल्याचे आढळल्यास त्याला किंवा तिला बक्षिसाच्या पूर्ण रकमेइतका दंड ठोठावला जाईल. गेल्या वर्षी विम्बल्डन जिंकलेल्या नोव्हाक जोकोविच आणि अँजेलिक कर्बर यांना प्रत्येकीला २२.५० लाख पौंड (जवळपास २० कोटी ४४ लाख रुपये) मिळाले होते. ती रक्कम आता २३.५० लाख पौंडांवर (जवळपास २१ कोटी ४१ लाख रुपये) जाईल. हा बदल तातडीने अमलात येत असून वाढीव बक्षीसनिधीचा लाभ यंदाच्या वर्षीपासूनच मिळणार आहे. या वाढीमुळे विम्बल्डनचा पारितोषिक निधी आता ऑस्ट्रेलियन आणि फ्रेंच खुल्या स्पर्धेपेक्षा अधिक होणार असला, तरी अमेरिकन खुल्या स्पर्धेपेक्षा तो कमीच आहे.

यंदा सर्वात महत्त्वाचा बदल आहे पुरुष एकेरीसाठी पाचव्या सेटमध्ये टाय-ब्रेकर ठेवण्याचा. विम्बल्डनच्या इतिहासात हे पहिल्यांदाच होत आहे. आजवर पाचव्या सेटमध्ये बाराव्या गेमनंतर ६-६ अशी बरोबरी झाल्यास एक टेनिसपटू प्रतिस्पध्र्यापेक्षा दोन गेम अधिक जिंकेपर्यंत वाट पाहावी लागायची. या नियमामुळे काही अविस्मरणीय विम्बल्डन अंतिम सामने अनुभवायला मिळाले. उदा. बियाँ बोर्ग वि. जॉन मॅकेन्रो, १९८० किंवा रॉजर फेडरर वि. राफाएल नडाल, २००८. तरी काही राक्षसी लांबलेले सामनेही झेलावे लागले. उदा. गेल्या वर्षी उपान्त्य फेरीत झालेली केव्हिन अँडरसन (द. आफ्रिका) वि. जॉन इसनर (अमेरिका) ही लढत पाचव्या सेटमध्ये अँडरसनने २६-२४ अशी जिंकली. २०१० मध्ये इसनरने फ्रान्सच्या निकोलस माहुतचा पाचव्या सेटमध्ये ७०-६८ असा पराभव केला. ती लढत ११ तास चालली, तीन दिवस खेळवावी लागली आणि खेळाडूंबरोबरच व्यवस्थापन आणि प्रेक्षकांचीही कसोटी पाहणारी ठरली होती. यंदा पाचव्या सेटमध्ये १२-१२ अशी बरोबरी झाल्यानंतर टायब्रेकरचा अवलंब केला जाईल. परंपरेचा आब राखून बदल स्वीकारण्याची ही खास ब्रिटिश तऱ्हा. यामुळे बोर्ग-मॅकेन्रो किंवा फेडरर-नडालसारखे अविस्मरणीय सामने होतील आणि उपरोल्लेखित इतर दोन सामन्यांसारखा छळ टाळता येईल.

सेंटर कोर्टप्रमाणेच कोर्ट वनलाही यंदा छप्पर लाभणार आहे. त्यामुळे पावसामुळे होणारे व्यत्यय टाळता येतीलच. शिवाय इतर कोर्टवर पावसामुळे खोळंबलेले सामने खेळवण्यासाठी प्रत्येक वेळी सेंटर कोर्टचा आधार घ्यावा लागणार नाही आणि तेथील वेळापत्रक सुरळीत राहील. या वेळेपासून विम्बल्डन संकुलात प्लास्टिकच्या बाटल्यांना प्रतिबंध करण्यात आला आहे. फेरवापरयोग्य आणि फेरवापरातल्या बाटल्याच वापरण्याची संमती राहील. आणखी काही बदल अमलात येण्यासाठी २०२० उजाडावे लागेल. १९२४ पासून विम्बल्डन स्पर्धेची बहुतेक तिकिटे पोस्टाने मागवली आणि पाठवली जायची. स्वत:चा पत्ता छापलेले पाकीट व्यवस्थापनाकडे पाठवावे लागते. त्यात एक रिक्त विनंती अर्ज सारून व्यवस्थापन ते पाकीट पुन्हा अर्जदाराकडे पाठवते. तो अर्ज भरून इच्छुकांनी पुन्हा एकदा पाकीट व्यवस्थापनाकडे डिसेंबर अखेपर्यंत पाठवायचे. यात विशिष्ट तारखा किंवा कोर्टसाठी प्राधान्य दाखवता येत नाही. आता ही देवाणघेवाण पोस्टाऐवजी ऑनलाइन होईल, इतकाच काय तो फरक. अर्थात रोजच्या सामन्यांच्या तिकिटांसाठी आदल्या रात्रीपासून रांगा लावण्याची आणि विम्बल्डन परिसरातच मुक्काम ठोकण्याची लोकप्रिय पद्धतही सुरू राहणारच आहे. पुढील वर्षी आणखी एक महत्त्वाचा बदल दिसून येईल. सव्‍‌र्हिसचा वेग मोजणारी ‘शॉट क्लॉक’ प्रणाली विम्बल्डनमध्येही दिसून येईल. सध्या ही प्रणाली ऑस्ट्रेलियन आणि अमेरिकन खुल्या स्पर्धेत कार्यरत असून लोकप्रियही होत आहे.

जन्माने स्कॉटिश असला, तरी इंग्लंडवासीयांचा लाडका अँडी मरे यंदाच्या हंगामात टेनिसमधून निवृत्ती होत आहे. त्याला यंदा विशेष प्रवेश म्हणजे वाइल्ड कार्ड मिळणार का, हा इंग्लंडच्या टेनिसविश्वात चर्चेचा विषय ठरत आहे. त्याला तसा प्रवेश मिळाला आणि २०१३ व २०१६ प्रमाणे त्याने विम्बल्डनच्या हिरवळीवर अजिंक्यपद पटकावले, तर विम्बल्डनसाठी हे वर्ष संस्मरणीय ठरेल. ती शक्यता धूसर आहे, कारण अँडी मरेच्या मार्गात कायम अडथळा बनलेली फेडरर-नडाल-जोकोविच ही त्रिमूर्ती यंदाही खेळत आहे. विशेषत: जोकोविच पुन्हा एकदा अतिशय तडफेने खेळत आहे. इंग्लंडमध्ये यंदा क्रिकेट विश्वचषकही खेळवला जातोय आणि विम्बल्डनच्या काळात याही स्पर्धेची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असेल. १४ जुलै रोजी लंडनमध्ये पुरुष एकेरी आणि विश्वचषक अंतिम सामना एकाच वेळी सुरू होईल. आतापयर्र्त चार क्रिकेट विश्वचषक स्पर्धाचे यजमानपद इंग्लंडने भूषवले. पण कोणत्याही स्पर्धेत ते जेतेपदाचे दावेदार नव्हते. यंदा अशी परिस्थिती नाही. इंग्लंडचा संघ बलवान आणि जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. त्यामुळे कधी नव्हे इतके इंग्लंडमधील क्रीडारसिक यंदा विम्बल्डन आणि विश्वचषकामध्ये दुभंगलेले असतील. ही बाब क्रिकेटरसिकांच्या औत्सुक्याची असली, तरी कधी विश्वचषक फुटबॉल किंवा कधी ऑलिम्पिक स्पर्धाच्या काळात विम्बल्डनची लोकप्रियता टिकवून ठेवलेल्या ऑल इंग्लंड क्लबला हे आव्हान स्वीकारणे जड दिसत नाही. परंतु यासाठी निव्वळ ‘वैभवशाली’ इतिहासावर फाजील विसंबून न राहता काळानुरूप बदल स्वीकारत राहण्याचे शहाणपण त्यांच्या ठायी आहे.

siddharth.khandekar@expressindia.com

First Published on May 4, 2019 11:31 pm

Web Title: 2019 wimbledon championships